दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी हत्यातपासाच्या संदर्भात ‘केवळ स्मृतिदिन मोजत राहायचे. मारेकऱ्यांचा तपास करायचाच नाही काय?’ असा प्रश्न उच्च न्यायालयाने एसआयटी आणि सीबीआय यांना केला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या लेखनात, भाषणात कुठे देव-धर्मावर टीका नाही. बुवाबाजी, ज्योतिष, वास्तुशास्त्र अशा अंधश्रद्धांवर आहे. तरी आजच्या धर्माधांनी त्यांचा जीव घेतला. पूर्वी लोकहितवादी गोपाळ हरी गोखले, म. फुले, आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी िशदे, राजर्षी शाहू महाराज, गाडगेबाबा, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी किती तरी कडक शब्दांत देव-धर्म-रूढी यांवर टीका केली. लोकहितवादींनी भटांना निर्बुद्ध तर साधूंना निरुपयोगी, अज्ञानी, मूर्ख म्हटले. म. फुल्यांनी तर भटा-भिक्षुकांवर टीकेची झोड उठवली. आगरकरांनी धर्माला, ‘हे भीषण, बीभत्स, अमंगल िहदुधर्मा!’ असे, तर भटांना, ‘अकलेची ऐट मिरवणाऱ्या मतिमंद ब्राह्मणांनो!’ असे संबोधले. प्रबोधनकारांनी याहीपेक्षा तीव्र शब्द वापरले. हे समाजसुधारक आज असते तर अतिरेकी धर्माधांनी त्यांचे जीव घेतले असते. त्याकाळी सुधारकांची िनदा-अवहेलना झाली, जिवंतपणी प्रेतयात्रा काढली, पण कुणाची हत्या झाली नाही. याची दोन कारणे संभवतात. एक म्हणजे त्या काळचे धर्माध इतके अविवेकी नव्हते. दुसरे म्हणजे ब्रिटिश राजवटीत खून झाला असता तर मारेकऱ्याला शोधून फाशी दिलेच असते. आजच्या राजवटीत ती भीती मुळीच नाही. मारेकरी निर्भयपणे वावरत आहेत.
– प्रा. य. ना. वालावलकर

मराठीचे कौशल्य लयाला जाणार!
‘वाचन संस्कृतीला ओहोटी’ हा लेख (२३ एप्रिल) आवडला. खरे तर शीर्षक ‘मराठी भाषेला ओहोटी’ असे हवे होते. मराठी सतत लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या माणसाच्या अंगी एक कसब असते, त्याची त्याला जाणही नसते. लिहिणे, वाचणे कमी केल्यावर हे कौशल्य नकळत नष्ट कसे होत जाणार ते पाहा : समजा आपण ‘त्याचे वागणे’ असे लिहून वाक्याची सुरुवात केली की लगेच- टोकाचे, मवाळ, बोटचेपे, दुष्ट, फसवे, प्रेमाचे अशा तऱ्हेचे नाना शब्द आपल्यापुढे हात जोडून उभे राहतात. निवड तुम्ही करायची असते. भाजणे, पोळणे, चटका बसणे, करपणे, पेटणे, होरपळणे, आग, फुफाटा, दाह अशा शब्दांतून आपल्याला अचूक शब्दांची निवड ‘उष्णते’बाबत लिहिताना करता येते. मेंदूची ही क्षमता लिहिणेच बंद केले तर नष्ट होणार. वाचत राहिले की कोणी तरी लिहिलेले, मनाच्या अडगळीत लपलेले मालमत्ता, छद्मी, पडसाद, क्षणभंगुर, वाताहत, रानोमाळ, गवाक्ष, मुलुखगिरी, घरटे, खुराडे, अथांग, परखड असले शब्द डोळ्यापुढे उभे राहून शब्दांची उजळणी होते. आपले शब्दभांडार घासून-पुसून लख्ख होते. आपण हे कसब कारण नसताना का गमावतो आहोत? आपण पोहणे कधी विसरत नाही, पण भाषा हळूहळू विसरत जातो हे निश्चित!
– यशवंत भागवत, पुणे</strong>

सत्ता टिकविण्यासाठी तडजोड अपरिहार्यच
‘ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची बदली’ ही बातमी वाचावी लागणारच होती. राज्यकत्रे कोणीही असोत त्यांना गरसोयीचा असणारा अधिकारी ते बदलणारच. यावेळी थंडा करके खाना हे सूत्र अवलंबिले गेले एवढेच. राज्यकर्त्यांपेक्षा त्यांचे कत्रेकरविते हे असे घडवून आणण्यात माहीर असतात. शेवटी सत्ता टिकविण्यासाठी तडजोडी करणे अपरिहार्य असते. अश्विनी जोशी यांच्यासारखे कार्यक्षम व प्रामाणिक अधिकारी सरकारी सेवेत असतातच, पण त्यांची संख्या अत्यल्प असल्याने आलीया भोगासी असावे सादर या नात्याने ते सेवारत राहतात. अर्थात असे अधिकारी ज्या कुठल्या पदावर काम करतात तिथे आपला ठसा उमटवतातच आणि सामान्य नागरिकांच्या कायम स्मरणात राहतात.
– मधू घारपुरे, सावंतवाडी

गरीब शेवटपर्यंत ‘घर-घर’ करीतच हिंडेल
‘भकास आराखडा’ हा अग्रलेख (२९ एप्रिल) वाचला. ‘निजेला धोंडा व भुकेला कोंडा’ ही म्हण आता इतिहासजमा झाली आहे. त्याऐवजी ‘निजेला टॉवर व भुकेला चायनीज’ ही म्हण वापरात आल्यास नवल नाही. आता नवीन आराखडय़ानुसार परवडणारी घरे बांधली तरी अशा घरांचा देखभालीचा खर्च किती जणांना परवडेल? पुनर्वसन झालेल्या इमारतींमधील घरे परवडत नाही म्हणून विकली जातात व पूर्वीचे बकाल जीवनच पसंत केले जाते हा आतापर्यंतचा अनुभव आहे. ज्याच्यासाठी हा सारा खटाटोप तो गरीब शेवटपर्यंत ‘घर-घर’ करीतच िहडेल यात शंका नाही.
– सूर्यकांत भोसले, मुलुंड (मुंबई)

या खेळाडूंना ‘गुडविल’ नसते?
सलमान खानला रिओ ऑलिम्पिकचा भारताचा ‘गुडविल अ‍ॅम्बेसिडर’ बनवल्याची बातमी (२१ एप्रिल) वाचली. खेळाला प्रसिद्धी मिळावी यासाठी सिनेकलावंताला गुडविल अ‍ॅम्बेसिडर बनवणे ही गोष्ट नक्कीच खुपणारी आहे. त्याचे चाहते, नियुक्ती करणारे म्हणताहेत की, यामुळे भारताच्या टीमचे ग्लॅमर वाढेल, तो सुपरस्टार असल्याने आपल्या ऑलिम्पिक टीमकडे जगाचे लक्ष जाईल. या अशा चाहत्यांना आणि त्यांच्या या त्यांनाच पटणाऱ्या तर्कटाला मानलेच पाहिजे! एका आगामी चित्रपटात सलमान कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे आणि चित्रपटाच्या ‘प्रमोशन’चा हा भाग असावा.. तसे असेल, तर मग आनंदच आहे. अभिनव बिंद्रा, मिल्खा सिंग, मेरी कोम, पीटी उषा हे कुठे हरवले या झगझगत्या प्रसिद्धीच्या पडद्याआड? यांना जर ‘गुडविल अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून निवडले असते तर पदकांसाठी खेळाडूंची ‘विल’ तरी वाढली असती. पीटी उषा, मेरी कोम, मिल्खा सिंग यांचे सिनेमे चित्रित झाल्यावरच आपल्याला या खेळाडूंचे कष्ट दिसले. तोपर्यंत भारतात तरी क्रिकेट सोडून कोणत्या खेळाडूला प्रसिद्धी मिळली नसेल. बघा ना विचारून.. या देशात ‘खाशाबा जाधव’ किती जणांना आठवतात?
– इंद्रजीत यादव, सातारा</strong>

पाणी वाटपाच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे
उसापेक्षा कितीतरी पट अधिक फायदा पाणी उपलब्ध झाल्यास जिराईत शेतकरी करू शकतो याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. माझ्या मते जिराईत शेतकरी जो आज असंघटित आहे त्याचा गरफायदा संघटित उस उत्पादक घेत आहेत. पाण्याचा हवा तसा वापर करीत आहेत. केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देऊन मतांचे राजकारण करणे योग्य नाही. महाराष्ट्रात झालेले पाण्याचे गलथान नियोजन बदलून समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र शोधून काढलेच पाहिजे. तसेच पाणी वाटपाच्या पद्धतीत बदल होणे ही काळाची गरज आहे.
– भास्करराव म्हस्के