‘डोंबिवलीत भयकंप’ ही बातमी (२७ मे ) वाचली. डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरात प्रत्येक वर्षी आपत्ती विश्लेषण नियोजनाअभावी झालेली ही माणसांनी स्वत:हून ओढवून घेतलेली मानवनिर्मित विपत्तीच आहे. आपत्ती सहनशील बनविण्यासाठी भारतीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन नीती, २००९ मध्ये अनेक चांगल्या तरतुदी आहेत. पण डोंबिवलीत त्याचे पालनच केले जात नाही. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. जोपर्यंत आपत्ती जोखीम नियोजन तथा व्यवस्थापन अत्यावश्यक केले जाणार नाही तोपर्यंत डोंबिवली औद्योगिक परिसर व संलग्न निवासी परिसर सुरक्षित होऊ शकणार नाही. स्वार्थी कंपनीमालक, महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी, फक्त पैसा कमावणे हेच ध्येय असलेले बिल्डर व अशा संवेदनशील भागात घरे घेणारे रहिवासी यांनी आता तरी सावध व्हावे. भोपाळसारखी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच आपण शहाणे होणार का?
– नीलकंठ देशपांडे, पवई (मुंबई)

कंपनीतील बॉयलरची नियमित तपासणी व्हावी
डोंबिवली एमआयडीसीमधील आचार्य ग्रुपच्या ‘प्रोबेस एन्टरप्रायजेस’ या कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात सहा जण मृत्युमुखी पडल्याची व १३५ जण जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी करणारी ही दुर्घटना म्हणजे माणसाच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा परिणाम म्हणावा लागेल. कारण ज्या ज्या केमिकल कंपन्यांत असे बॉयलर बसवलेले आहेत त्या त्या ठिकाणी हा धोका नेहमीच राहणार आहे. एखाद्या बॉयलरचा स्फोट होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बॉयलरमधील वाढलेला दाब व वाढलेले तापमान. तसेच बॉयलरचे संपलेले यांत्रिक आयुष्य. त्यासाठी बॉयलर इन्स्पेक्टर, कारखाना निरीक्षकांकडून बॉयलरची नियमित तपासणी केली जाते व तो सुरळीत असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते; परंतु या दुर्घटनेत नियमांची पायमल्ली करून बॉयलर सुरळीत व सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सरकारी यंत्रणांनी सर्वच कंपन्यातील बॉयलर युद्धपातळीवर तपासणे गरजेचे आहे.
– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)

मोदी सरकारचा दुटप्पीपणा
‘वाढवून ठेवलेल्या अपेक्षा आता अवास्तव ठरवणे हा दुटप्पीपणा’ या पत्रात ( २७ मे ) भाजपच्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यातील तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांत काहीही प्रयत्न केलेले नाहीत याकडे लक्ष वेधले आहे. त्यात आणखी मुद्दय़ांचा समावेश करता येईल. भारतीयांचा परदेशातील काळा पसा आणून अशा भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. पण काळा पसा आणणे दूरच, असे पसे असणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे धाडसही हे सरकार दाखवू शकलेले नाही. भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत अशी धोरणे राबवू, असे आश्वासन मोदींनी दिले होते. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढच झालेली दिसून येत आहे. या जाहीरनाम्यात असे वचन दिले होते की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर ५०% नफा मिळेल असे शेतमालाचे भाव देण्यात येतील. अशी व्यवस्था तर झालीच नाही, उलट मोदी सरकारने असे भाव देता येणार नाहीत, असे शपथपत्रच सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. असा दुटप्पीपणा मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांत केला आहे. पुढील वर्षांत आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सरकार काय करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
– शिवाजी आत्माराम घोडेचोर, तेलकुडगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर</strong>

असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला..
‘कृष्णकृत्य’ हा अन्वयार्थ सदरातील शब्दप्रयोग थेट भगवान श्रीकृष्णाशी जोडून घेत आपली श्रीकृष्णाप्रति असलेली संवेदना व्यक्त करणारे पत्र (लोकमानस, २५ मे) वाचले. वस्तुत: कृष्णकृत्य म्हणजे अंधारातील कृत्य. भ्रष्ट आचरणासाठी प्रमाण मराठीत हा शब्द त्यामुळेच योजला जातो. कृष्ण या विशेषनामाशी त्याचा संबंध नाही. हे विशेषनाम कृष्ण याच शब्दाची दुसरी अर्थछटा घेऊन येते. कृष्ण म्हणजे काळा-सावळा. द्रौपदी रंगाने सावळी. म्हणून महाभारतात तिला कृष्णा म्हटले आहे. दुसरे असे की कृष्ण हे नाव फक्त भगवान कृष्णाचेच नाही. त्याकाळी समाजात अनेकांचे नाव कृष्ण असणे शक्य आहे. शिवराय जसे होते तसा शिवा काशिदही होताच व तो शिवरायांचाच कर्तबगार मावळा होता. कृष्णही माणूसच होता. पण त्याने एका सामाजिक क्रांतीचे नेतृत्व केल्याने तो महामानव झाला. महामानवांचे आम्ही ‘ देव’ का करतो ते सूज्ञास सांगणे न लगे ! कृष्ण नाव धारण करणारे सर्वच महामानव होत नाहीत. कवी ग्रेस यांनी म्हटलेच आहे- ‘असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, पण राधेस जो मिळाला तो एकटाच उरला .’ तेव्हा, शब्दांच्या वापराविषयी जागरूकता जरूर दाखवावी, पण तो केवळ अस्मितेचा किंवा अभिनिवेशाचा भाग असू नये.
– किशोर मांदळे, पुणे</strong>

मराठवाडा आता ‘मरणवाडा’ बनतोय!
‘महाराष्ट्रात मरण स्वस्त होत आहे..’ हे पत्र ( लोकमानस, २६ मे) वाचले. दहा वर्षांपूर्वी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सगळीकडे चर्चेचा व चिंतनाचा विषय होता. मात्र मागील तीन वर्षांत मराठवाडय़ातही हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आधीच टॅँकरवाडा म्हणून बदनाम झालेला भाग आता मरणवाडा बनत चालला आहे. या वर्षी कधी नव्हे तेवढे पाणीबळी मराठवाडय़ात गेले. यात लहान मुलांचाच जास्त समावेश आहे. कारण शाळांना सुटय़ा असल्याने मुले घरीच असतात. म्हणून पालकवर्ग त्यांना पाण्याला जुंपतो. आष्टी तालुक्यातील मागच्या आठवडय़ातील घटना मन हेलावून टाकणारी आहे.सावरखेड या गावातील पाचवीत शिकणारी मुलगी आईने तिला कूपनलिकेवरून पाणी आणावयास पाठवले. तिने भर उन्हात पाणी हापसल्याने तिला दम लागला व उष्माघाताने ती बिचारी मरण पावली. आता यावर उपाययोजना व्हायला हव्यात. शाळाशाळांत वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे म्हणजे येणाऱ्या काळात किमान मुलांचे तरी पाणीबळी जाणार नाहीत.
– संतोष मुसळे, जालना</strong>