आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या ब्रेग्झिटची चर्चा सुरू आहे. भारतातील बऱ्याच गोवेकरांच्या दृष्टीनेही या सार्वमताला वेगळेच महत्त्व आहे. गोवा ही १९ डिसेंबर १९६१ पर्यंत पोर्तुगीज वसाहत होती आणि म्हणून पोर्तुगालचा नागरिक होण्यासाठीच्या नियमानुसार १९६१ पूर्वी गोव्यात जन्मलेले तसेच त्यांच्या पुढील तीन पिढय़ांच्या वंशजांना आपोआप पोर्तुगीज नागरिक होता येते. याच नियमाच्या आधारे अलीकडच्या काळात बऱ्याच लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडून लिस्बनला आपल्या जन्माची नोंद केली आहे, पण यामागे खरी गोम वेगळीच आहे. कारण पोर्तुगालचे नागरिकत्व हे पोर्तुगालमध्ये राहण्यापेक्षा ब्रिटनमध्ये राहण्यासाठीच जास्त वापरले जाते, कारण सबंध युरोपीय महासंघाचे एकच नागरिकत्व असते. म्हणजेच पोर्तुगाल अथवा युरोपीय महासंघातील कोणत्याही राष्ट्राच्या नागरिकाला सदस्य देशांत कोठेही राहण्याची तसेच नोकरी वा व्यवसायाची आपोआप परवानगी मिळते. भर म्हणून तिथल्या स्थानिक सरकारकडून सामाजिक- आíथक मदतही मिळते. म्हणूनच मागच्या दशकभरात ब्रिटनच्या एकटय़ा स्वीण्डन या शहरात सुमारे १२ हजार गोवेकर स्थलांरित झाले आहेत. ब्रेग्झिटसोबत गोव्याचे हे सध्या आगळेवेगळे कनेक्शन आहे!

 – अनिरुद्ध ढगे, वास्को द गामा, गोवा</strong>

 

इस्रो के मन की बात

‘भरारीचे भांडवल’ हा अग्रलेख (२४ जून) वाचला. जनतेला खायला अन्न नाही आणि अंतराळात कसल्या भराऱ्या घेता? उपग्रह पाठवून काय भलं होणार आहे? अशा टीकात्मक प्रश्नांचं उत्तर शोधताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते ती म्हणजे ‘इस्रो’च्या असंख्य लोकोपयोगी उपक्रमांची उपयुक्तताच मुळात जनसामान्यांपर्यंत पोहोचवली गेली नाही आणि दुर्दैवाने अजूनही हव्या त्या प्रमाणात पोहोचत नाही.

शेतीसंबंधित कामं सोयीस्कर व्हावीत, शिक्षण, दूरसंपर्क यांसारख्या क्षेत्रातील व्यवहार सुरळीत चालावेत म्हणून ‘इस्रो’ने अनेक उपग्रहांचं प्रक्षेपण केलं आणि ही उद्दिष्ट पार पाडण्यात इस्रो शंभर टक्के यशस्वी ठरलं. पण आपली कामं व्यवस्थित पार पाडण्यामागे बऱ्याच अंशी ‘इस्रो’ची मेहनत आहे याची जाणीवच मुळात जनसामान्यांमध्ये नाही आणि खरं सांगायचं झाल्यास त्यात त्यांचा फारसा दोष नाही.

‘इस्रो’ची एकूणच सगळी वाटचाल पाहिली तर छाती देशाभिमानाने भरून जाते हे सत्य आहे आणि वादातीतसुद्धा. पण सामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवूनच जे उपक्रम इस्रो पार पाडते, त्यांची आखणी करते. त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यात मात्र ‘इस्रो’ बऱ्याच अंशी कमी पडलं आहे. म्हणूनच विज्ञानक्षेत्रातील संस्थेने सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करायलाच पाहिजेत. म्हणूनच ‘इस्रो’ने ‘मन की बात’सारख्या उपक्रमाचं जर अनुकरण केलं तर ‘इस्रो’च्या मनकी बातसुद्धा जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांनासुद्धा ‘इस्रो’चे उपक्रम जनहितार्थच राबवले जातात याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जनतेचे हित मध्यस्थानी ठेवून केलेली जाहिरातबाजी स्वागतार्हच आहे.

– अन्वय वसंत जावळकर,अमरावती

 

स्वामींना आवरा

गांधी घराण्याला लक्ष्य केल्यावर सुब्रमण्यन स्वामी यांना राज्यसभेच्या खासदारकीचे बक्षीस मिळाले. मग स्वामींनी विनाकारण रिझर्व बँकेचे गव्हर्नर राजन यांना लक्ष्य केले. परिणामी राजन यांनी मुदतवाढ नकोच म्हणून जाहीर केले. आता स्वामींनी मोर्चा सरकारचे मुख्य आíथक सल्लागार अरिवद सुब्रमण्यन यांच्याकडे वळवला आहे. स्वामी यांना २७ लोकांची पोलखोल करायची आहे. स्वामींचे हे उद्योग देशासाठी घातक ठरणार असल्याने मोदी यांनी या स्वामींना तत्काळ आवर घालावा.

– अमेय फडके, कळवा

 

गरसमज तरी दूर होतील

अनिकेत भावठाणकर यांचा ‘जगत्कारण’ या सदरातील ‘परराष्ट्र धोरणातील अन्य निर्णायक घटक’ हा लेख (२४ जून) वाचला. त्यात म्हटल्याप्रमाणे प्रसार माध्यमांबरोबर सर्वसामान्य जनतेत हीच धारणा दिसून येत होती, की परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना डावलून मोदी आपले स्वत:चेच घोडे पुढे दामटत आहेत. पण या सदरात स्वराज यांच्याबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अन्य मंत्री व अधिकारी यांच्या कार्याचा जो आढावा घेतला आहे त्यामुळे अनेक गरसमज दूर होण्यास मदत झाली आहे. शिवाय सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांमध्ये सुषमाजींचा समावेश केल्यामुळे त्यांच्या बाबतीत पसरवलेले गरसमज नक्कीच दूर होतील.

– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

 

जोडाक्षरे आणि मुळाक्षरांचे जोडकाम हे भिन्नच

माझ्या २० जून रोजीच्या पत्रावरील ‘जोडाक्षरे वापरत नाहीत हा कुठला तर्क?’ ही प्रतिक्रिया (लोकमानस, २४ जून) वाचली. गिरीश दळवी यांचा मूळ लेख हा देवनागरी लिपीतील ‘टंकनिर्मिती’ या विषयावर होता. ही संपूर्ण मालिकाच ‘अभिकल्प’ (design) या विषयावर आहे. अर्थातच त्यावरचे माझे पत्र हे देवनागरी ‘लिपी’मध्ये ‘अक्षरांचे जोडकाम’ सुलभपणे कसे दर्शविले जावे याविषयी होते. पत्रलेखकाचे ‘जोडाक्षरे नीट छापली जात नाहीत’ हे म्हणणे योग्यच आहे आणि याच्याशीच संबंधित खरा विषय आहे. मराठी ‘भाषे’तील जोडाक्षरयुक्त शब्द किंवा जोडाक्षरेच कमी करावीत असे माझे म्हणणे नाही. मुळाक्षरांच्या जोडण्या सुलभतेने करून छापाच्या ‘खिळ्यांची संख्या’ (font characters) कमी करता येत असेल तर ते स्वागतार्ह आहे असे माझे मत आहे. हे मत भाषेच्या संदर्भात नसून टंकनिर्मितीच्या अभिकल्पाविषयी आहे. चित्रात दिलेली जोडाक्षरे इतिहासजमा झाली आहेत हे माझेच मत नसून, मूळ लेखातच असे मत व्यक्त केले आहे. पत्रलेखकाचा ‘शोक’ आणि ‘षोक’ या शब्दांच्या वापराचे उदाहरण हा विषय भाषेच्या आकलनाशी संबंधित आहे. टंकनिर्मितीतील क्लिष्टतेशी (किंवा वाचनाच्या सुलभतेशी) याचा संबंध नाही. त्यांनी दिलेल्या दुसऱ्या उदाहरणातील इंग्रजी ‘शब्दां’च्या लघुरूपांचा एसएमएससाठी केला जाणारा वापर हा मुद्दाही भाषिक वापराचा आहे. रोमन लिपीत जोडाक्षरे नाहीत म्हणून या उदाहरणाचासुद्धा ‘टंकनिर्मितीतील जोडकामाशी’ संबंध नाही. मराठी ‘भाषेतील’ जोडाक्षरे आणि ‘जोडाक्षरे दाखविण्यासाठी केलेले मुळाक्षरांचे जोडकाम’ (joinery details) या वेगळ्या गोष्टी आहेत.

– दीपक गोखले, पुणे</strong>