लोकसत्ता टीमभारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरोधात पराभूत होत असताना अनेकांना हॉकीच्या सामन्याची आठवण झाली, हे हॉकीवर अन्याय करणारे आहे. भारत क्रिकेटमध्ये जिंकत असता, तर किती जणांनी हॉकीचा सामना पाहिला असता? एखाद्याला कमी लेखण्यासाठी किंवा एखादे न्यून झाकण्यासाठी आपल्या दुसऱ्या कशातील तरी वरचढपणा दाखवणे हा खरे तर त्या दुसऱ्याचा अपमान आहे, जे रविवारी हॉकीबाबत घडले. क्रिकेटबरोबरच आपण हॉकीचाही अपमान करीत आहोत याचे अनेकांना भान राहिले नाही. त्या दिवशी सायंकाळनंतर समाजमाध्यमांतून हॉकीबाबत चर्चा, प्रतिक्रियांना आलेले उधाण पाहून आता हॉकीला चांगलेच दिवस येणार असे उगाचच वाटू लागले आहे. हॉकीचा चाहता वर्ग वाढला असेल तर आनंदच आहे, पण तो टिकावा हीच इच्छा. भविष्यात हॉकीची कामगिरी थोडी खराब झाल्यास मध्येच साथ सोडू नका. खेळ कुठलाही असो, आपला संघ हरो किंवा जिंको, आपण शेवटपर्यंत आपल्या संघाला साथ द्यायला हवी. आज हरलो म्हणून काय झाले, चिक्कार सामने होतातच की, जिंकूच पुन्हा!

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
gujarat giants
WPL 2024 : गुजरात जायंट संघाला मिळालीय ‘ही’ विशेष परवानगी; जाणून घ्या कारण…
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

अय्याज सय्यद

 

नशीब राष्ट्रीय खेळआठवला!

रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात काहीही होऊ शकते याच्याकडे काणाडोळा करून सर्व जण धुंदीत राहिले आणि शेवटी थोबाड फुटले हे या सामन्याचं फलित आहे. अंतिम सामन्याची लढत इंग्लंड किंवा श्रीलंकेशी झाली असती तर लोकांनी फक्त त्याकडे खेळ म्हणून पाहिले असते यात शंका नाही. पण पाकिस्तानकडून हार अटळ दिसताच असंख्य लोकांचे लक्ष वळाले ते हॉकीकडे. तिथे आपण जिंकलो म्हटल्यावर हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे याचा अनेकांना साक्षात्कार झाला. नशीब आपलं, हॉकीत जिंकल्यावर तरी आपला ‘राष्ट्रीय खेळ’ आठवला!

सहदेव निवळकर, सेलू, जि. परभणी</strong>

 

भरवशाच्या म्हशीला टोणगा!

भारतीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स करंडक आपल्याकडे राखणार, अशी क्रिकेटरसिकांना आशा होती. सलामीचे फलंदाज रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांचा खेळ लक्षात घेता अंतिम सामन्यात भारत पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चरणार याबाबत सर्वानाच जणू खात्री होती. परंतु ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीची प्रचीती अंतिम सामन्यात आली. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी सर्वच आघाडय़ांवर खराब कामगिरी केली. फलंदाजी फसवी ठरली. बुमरा, पंडय़ा यांची दिशाहीन गोलंदाजी, तर अश्विन आणि जडेजा यांचं फिरकी अस्त्र निकामी. पाकिस्तानच्या आक्रमणासमोर रथीमहारथींचं सपशेल लोटांगण. कर्णधार कोहलीच्या नेतृत्वातील चुकादेखील दारुण पराभवास कारणीभूत ठरल्या. भारतीय संघाची मधली फळीसुद्धा डाव सावरू शकत नाही हे दिसून आले. हार पत्करायची असेल तरी ती आक्रमकरीत्याही स्वीकारता येते ही वृत्ती आपल्याकडे नव्हतीच.

सुनील कुवरे, शिवडी, मुंबई

 

केलेल्याचुकीचे परिमार्जन होत नाही

‘लोकन्यायमूर्ती’ हा अग्रलेख (१७ जून) व त्यावरील ‘लोकमानस’मधील प्रतिक्रिया (१९ जून) वाचली. कितीही महान व्यक्तीच्या हातून चुका घडू शकतात आणि त्या मान्य करण्याकरिता मनाचा मोठेपणा लागतो हे खरे आहे. तरीही हातून ‘घडून गेलेली’ चूक आणि विचारपूर्वक ‘केलेली’ चूक यात सूक्ष्म असला तरीही अतिशय महत्त्वाचा फरक आहे, हे नमूद करावेसे वाटते. अजाणता हातून एखादी चूक होणे (उदा. रस्त्यावरील अपघात), घेतलेला निर्णय चुकीचा असणे (उदा. संपाच्या दबावामुळे अवास्तव मागण्या मान्य करणे), आणि निहित स्वार्थ लक्षात घेऊन चुकीचे वर्तन करणे यांत खूप फरक आहे. पहिल्या दोन प्रकारांत नंतर चूक मान्य करणे समजण्यासारखे आहे. तिसऱ्या प्रकारातील संघर्ष हा स्वार्थ आणि सदसद्विवेकबुद्धी यांतील असतो, आणि त्यात जाणूनबुजून सदसद्विवेकबुद्धीचा, हृदयाचा आवाज मेंदूने दाबून टाकलेला असतो. आपल्या आयुष्यातील अशा एखाद्या एकमेवाद्वितीय प्रसंगात जाणूनबुजून ‘केलेली’ चूक नंतर मनाचा मोठेपणा दाखवून मान्य केल्याने त्याचे परिमार्जन होऊ शकत नाही असे वाटते.

प्रसाद दीक्षित, ठाणे

 

सीमा सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे..

‘एक पाऊल मागे, एक पुढे’ हा अन्वयार्थ (१९ जून) वाचला. मानवी ढाल वापरणे हे लष्कराच्या मूलभूत तत्त्वात बसत नाही. तसेच लढाईतील ‘डर्टी गेम’सुद्धा निषिद्ध मानले जाते. वास्तविक लष्कर कोणत्याही गोष्टीकडे राजकारण या नजरेने पाहत नाही. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे एवढेच कर्तव्य मानते.

सां. रा. वाठारकर, चिंचवड

 

यशस्वी भवचा फायदा झाला

मी ‘लोकसत्ता’ची नियमित वाचक आहे. औरंगाबादच्या श्री शारदा मंदिर प्रशाला येथून नुकतीच दहावीची परीक्षा ९८ टक्के गुण मिळवून मी उत्तीर्ण झाली आहे. यासाठी ‘लोकसत्ता’तील ‘यशस्वी भव’ ही  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली मालिका मला साह्य़कारी ठरली. या मालिकेचे मी दहावीत नियमित वाचन केले. याचा मला खूप फायदा झाला. सर्वच विषयांचे अगदी सुटसुटीत व सोप्या भाषेतील विश्लेषण समजण्यास सोपे वाटले. मराठी, संस्कृत तसेच विज्ञान विषयांसाठी मला ‘यशस्वी भव’ मालिकेचा विशेष फायदा झाला.

राजेश्वरी उल्हास उढाण, औरंगाबाद

 

वीजयुक्त शिवारही गरजेचे

‘कर्जमाफीनंतरचे कवित्व’ हा राजेन्द्र जाधव यांचा लेख (१८ जून) अभ्यासपूर्ण व वास्तवास धरून आहे. पण कृषिपंपांना अपुरा व खंडित होणारा वीजपुरवठा याबाबत कोणीही लिहीत नाही. कारण लेख लिहिणारे शेतकरी असले तरी शहरात राहत असावेत. पाणी व वीज हे शेती व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत. जलयुक्त शिवार ही मुख्यमंत्र्यांची आवडती योजना आहे. मात्र वीजयुक्त शिवार ही योजनादेखील राबवणे तेवढेच महत्त्वाचे आहे.  कृषिपंपासाठी होणाऱ्या वीजपुरवठय़ाच्या प्रश्नाकडे शेतकरी संघटनांचेही दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रात शेतीसाठी ८ तास वीजपुरवठा करण्याचा नियम करण्यात आला आहे. प्रत्यक्षात दररोज आठ तास कधीच वीज उपलब्ध नसते. ग्रामीण भागातील विद्युत वितरण व्यवस्था अपुरी असून विद्युत उपकेंद्राची व वीजवाहिन्यांची देखभाल, दुरुस्तीकडे महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष असते. परिणामी जिरायती/ बागायती पिकांचे प्रचंड नुकसान होते. वीजबिलाच्या संदर्भात शासनाचे धोरण नाही. वीजदर व सबसिडीबाबत धरसोडीचे धोरण आहे. कृषिपंपास नवीन वीजपुरवठा विहित वेळेत देण्याबाबत धोरण नाही, नियम असला तरी अंमलबजावणी होत नाही. अशा गलथान कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस येत आहे. या संदर्भात शेतकरी संघटनांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या आग्रहाबरोबरच नियमित वीजपुरवठय़ाचाही पाठपुरावा करावा.

उज्ज्वला कदम, पनवेल

 

१९७१ ची जनगणना कितपत सयुक्तिक?

देशाच्या चौदाव्या राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क प्रदान करण्यात आला असून प्रत्येक मताचे मूल्य १९७१ च्या जनगणनेनुसार राज्यनिहाय लोकसंख्येनुसार ठरवण्यात येते. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १९७१ नंतर दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. याच प्रमाणात काही राज्यांचा अपवाद वगळता लोकसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली असतानाही लोकसंख्येच्या प्रमाणात मतांचे मूल्य ठरत नाही व ही पद्धत २००२ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीनुसार २०१६ पर्यंत कायम राहणार आहे. १९७१ची लोकसंख्या २०१७च्या निवडणुकीसाठी आधारभूत मानणे कितपत सयुक्तिक आहे?

जयंत पाणबुडे, सासवड

 

असंवेदनशील वर्तन

मुंबईतील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेशाची भेट मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. परंतु अशा आनंदाला बिहारच्या बेगुसराय जिल्ह्याच्या वीरपूर गावातील दोन सख्ख्या बहिणींना मात्र मुकावे लागले. शाळेच्या गणवेशाचे पसे दिले नाहीत म्हणून त्यांच्या शिक्षिकेने भर शाळेत अंगावर चढवलेला गणवेश उतरवायला लावला. पहिली व नर्सरीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनींचे कोवळे वय लक्षात घेता या कृतीचा त्यांच्या मनावर काय आणि किती आघात होऊ शकतो याचे भानच शिक्षिकेला राहू नये याचेच वैषम्य वाटते. अशा असंवेदनशील शिक्षिकेकडून कुठल्या संस्कारांची अपेक्षा करावी? भरीस भर म्हणजे शिक्षिकेने केलेल्या कृतीला मुख्याध्यापक व शाळा प्रशासनानेही उचलून धरावे यातच विद्यादानासारख्या पवित्र क्षेत्रातील बळावलेली धंदेवाईक वृत्ती अधोरेखित होते. गणवेश फी भरता न येणाऱ्या त्या मुलींच्या पालकाने जून अखेरीपर्यंत मुदत मागितली असतानाही असे पाऊल उचलले जाणे हे िनदनीयच होय. टोकाची भूमिका घेणारी शिक्षिका व मुख्याध्यापक यांना अटक झाली असली तरी शाळा व्यवस्थापनावरही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

दीपक काशीराम गुंडये, वरळी

 

वाङ्मय मंडळासाठी वेळ मिळेल?

महाविद्यालयात मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ सक्तीचे, हे वृत्त वाचून प्रश्न पडला की ही सक्ती करण्याची वेळ का आली? पूर्वी प्रत्येक महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आणि इंग्लिश सर्कल असायचेच आणि विद्यार्थी आपापल्या आवडीनुसार त्यात भाग घेऊन आपले महाविद्यालयीन जीवन समृद्ध करीत. पण गेल्या तीन दशकांत एक तर इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी वाढले आणि ते मार्कार्थी झाल्याने महाविद्यालयातील ही मंडळे लुप्त झाली. विद्यार्थी महाविद्यालय आणि शिकवण्यांच्या फेऱ्यात बाकी काही करू शकत नाही. त्यामुळेच मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ सक्तीचे होईलही, पण त्यात भाग घ्यायला विद्यार्थ्यांना सक्ती करणार का?

माया हेमंत भाटकर, चारकोप गाव, मुंबई

loksatta@expressindia.com