राष्ट्रपतिपदाचे भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद हे मागासवर्गीय आहेत हे आवर्जून सांगितले जात आहे. ऊना येथील दलितांवरील हल्ला, रोहित वेमुलाची आत्महत्या, सहारणपूर दंगल यांसारख्या घटनांबाबत याच दरबारी लोकांनी किती आवाज पक्षाच्या आत वा बाहेर प्रकट केला? राज्यपाल या नात्याने कोविंद यांनी राष्ट्रपतींकडे आपले काही विचार व्यक्त केले का? या घटनांनी व्यथित होऊन राज्यपालपदाचा त्याग करण्याची तयारी या दलित नेत्याने तरी दर्शवली होती का? तर उत्तर नकारार्थी मिळेल.

तेव्हा चच्रेचा मुद्दा असा की, ज्या पक्षाच्या सत्तेच्या वळचणीला बसलेल्या व्यक्तीने देशभरात दलितविरोधी वातावरण तयार होत असताना आणि घटनात्मक पदावर बसून दलित अत्याचाराला तोंडदेखला विरोधही दर्शवला नाही, असा नेता आता राष्ट्रपती झाल्यानंतर सर्वत्र दलितपूरक वातावरण तयार होईल असे मानणे गैर वाटते. जी व्यक्ती मग ती कोणत्याही समाजाची असो, सत्तेच्या माध्यमातून समाजावर अत्याचार, जुलूम, शोषण होत असताना मूग गिळून गप्प बसते, त्याच्याकडून ठोस वा भरीव कामगिरी केव्हाही होऊ शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे भाजप जी खेळी खेळत आहे ती दलित जनतेला समजत नसेल असे मानणे भाजपच्या मुळावर येऊ  शकते.

अ‍ॅड. किशोर रमेश सामंत, भाईंदर

 

राष्ट्रपतिपदी सक्षम व्यक्ती येण्याचे दिवस संपले!

भाजपची ‘प्रतिभा’ हा अग्रलेख (२१ जून) वाचला. राष्ट्रपतिपदी सक्षम व्यक्ती बसण्याचे दिवस आता संपले आहेत हेच आत्तापर्यंतच्या (काही अपवाद वगळता) राष्ट्रपती पदावर बसणाऱ्या व्यक्तींकडे पाहून समजते आणि त्या संदर्भातील अग्रलेखातील ‘प्रतिभा’ भाजपलाही बरोबर साध्य झाली हेच रामनाथ कोविंद यांच्या नामनिर्देशनावरून दिसते! राष्ट्रपती पदाबाबतचे अनेक संकेत रूढ आहेत. त्यामध्ये पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे ही व्यक्ती राजकारणपतित नसावी किंवा अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे राजकारणातीत असावी; पण हा संकेत केव्हाच पायदळी तुडवण्यात आला आहे आणि तो इतका तुडवण्यात आला आहे की, राष्ट्रपती पदावरची व्यक्ती राजकारणातीलच असावी असा संकेत रूढ होऊ  लागला आहे की काय असे वाटावे.  दुसरा संकेत म्हणजे ती व्यक्ती जातपातविरहित असावी. म्हणजे त्या व्यक्तीला कुठल्याही जातीचे लेबल चिकटवले जाऊ  नये; पण हाही आता संकेत पाळला जात नाही, किंबहुना जातपात बघूनच ही व्यक्ती या पदासाठी निवडली जाते, हे स्पष्ट आहे.

तिसरा संकेत म्हणजे या पदाचा दुरुपयोग राजकीय पक्षाची प्रतिमा उजळण्यासाठी केला जाऊ  नये हा आहे; पण हा संकेत तरी पाळण्यात येतो का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. संकेत हे महासागराप्रमाणे विशाल असतात! त्याचे सौंदर्य राखण्यातच सगळ्यांचे भले असते. हे संकेत पाळणारेच महासागराप्रमाणे विशाल होतात. याप्रमाणे अनेक संकेतांचे उल्लंघन करूनच राष्ट्रपती पदावरील व्यक्ती निवडली जाऊ  लागली आहे हेच संकेत मिळत आहेत.

अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण

 

विरोधकांची भूमिका महत्त्वाची

बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार घोषित करून चातुर्याने संघपरिवार, एनडीए आणि दलित यांचे समाधान करण्याची कसरत मोदी-शहा जोडीने केली; परंतु या दलितस्नेही चेहऱ्याआड लपलेला शेंदूर फासण्याचा हेतू कळला आहेच. रोहित वेमुला, ऊना, सहारणपूर तसेच मागासवर्गीयांसाठीच्या योजनांसाठी आर्थिक तरतुदीमध्ये केलेली कपात अशा घटनाक्रमांतून तसेच आरक्षणविरोधी वक्तव्ये व राज्यघटना बदलण्याची साशंकता यामुळे भाजप आणि संघाविषयी दलित व अल्पसंख्य समाजामध्ये नाराजी आहे. या पाश्र्वभूमीवर विरोधक कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरेल. निवडणूक जिंकण्याप्रमाणे विरोधी मत नोंदवले जाणे हेही लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे.

वसंत नलावडे, सातारा

 

आठवीनंतर गणिताला पर्याय असावा

गणितामधील त्रिकोणमिती, एकसामायिक समीकरणे, सिद्धता प्रकरणे जे नववी, दहावीत आहेत ते एखाद्या विद्यार्थ्यांला जमतच नसतील तर त्याचे आयुष्यात पुढे काय मोठे नुकसान होणार आहे? त्यांचा आपण दैनंदिन जीवनात खरंच किती वापर करतो? इयत्ता आठवीपर्यंतच्या गणिताच्या अभ्यासक्रमात मूलभूत आकडेमोडीचा समावेश असतो ते पुरेसे नाही का? त्यामुळे ज्या मुलांचा गणितामध्ये बौद्धिक कल असेल त्यांनी आठवीनंतर गणित विषय घेऊन मग उच्चशिक्षण घ्यावे व ज्या मुलांचा गणितात बौद्धिक कल कमी आहे त्यांना आठवीनंतर त्यांचे कौशल्य असलेले विषय घेऊ  देण्यात यावेत. उदा. खेळ, कृषी, कॉम्प्युटर वगैरे. उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला गणित हा विषय पर्यायी करण्यासाठी विचार करायला लावले, ही बाब बऱ्याच मुलांसाठी सुटकेचा नि:श्वास टाकणारी आहे. शेवटी प्रत्येक मुलाला आनंदाने बहरण्याचा अधिकार आहे. मुलांना तणावात ठेवून सुदृढ  समाज आपण घडवू शकत नाही. त्यामुळे गणित हा विषय आठवीनंतर पर्यायी ठेवणे योग्य राहील.

हेमलता उत्तम पवार, कल्याण

 

मूलभूत विषय शिकणे गरजेचे!

माणसाने आजपर्यंत जी जीवनाची विज्ञानशाखा निर्माण केली आहे, त्यामध्ये भारतात शोधल्या गेलेल्या ‘शून्य’ या संकल्पनेचा खूप वाटा आहे; परंतु त्याच भारतात विद्यार्थ्यांना गणित विषय सर्वात अवघड वाटतो ही नक्कीच विचार करावयास लावणारी बाब आहे. त्यावर योग्य पर्यायदेखील शोधण्याची नितांत गरज आहे. गणित हे ‘शास्त्रांचे शास्त्र’ आहे असे म्हटले जाते. पॉल डॅरिक यांच्या मते, ‘‘देवाने जग बनवण्यासाठी ‘गणित’ हे शास्त्र वापरले आहे’’, यावरून या विषयाचे महत्त्व अधोरेखित होते. काही विषय हे मूलभूत असतात व इतर विषयांच्या बांधणीत व विस्तारात त्यांचा मोठा हातभार असतो, हे मानणे हितकारक ठरते.

शुभम व्हटकर, पुणे

 

कोकणात चांगले उच्चशिक्षण कधी मिळणार?

सलग सहा वष्रे दहावी आणि बारावीच्या निकालांत कोकणच्या मुलांनी देदीप्यमान कामगिरी करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे; पण उच्चशिक्षणाच्या जेवढय़ा सुविधा मिळाल्या पाहिजेत तेवढय़ा त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे ज्या क्षेत्रात त्यांना रुची आहे, त्या क्षेत्रात बहुतेक मुलांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. मुंबई, पुणे, ठाणे अशा ठिकाणी ज्यांचे नातेवाईक आहेत, तेथे उच्चशिक्षण घेण्यासाठी जावे लागते; पण ते खूपच कमी मुलांच्या नशिबी असते. शासनानेच किंवा सामाजिक संस्थांनी या मुलांना कोकणातच सुविधा उपलब्ध करून दिल्या तर मुलांचे भविष्य घडेल.

रवींद्र गुरव, विरार

 

यात हशील ते काय!

उमाकांत देशपांडे यांचा ‘मित्रपक्षांवर ‘शत-प्रतिशत’ पकड’ हा लेख (सह्य़ाद्रीचे वारे, २० जून) वाचला. ‘मानवाने सर्वसमावेशक आचार अंगी बाणवला पाहिजे’ हे सुभाषित म्हणून भिंतीवरच टांगून वाचायचे असते, ही आपली शिकवण अनेक चिमुकल्या हातांनी गिरवली जाते. एखाद्या पक्षाची उभारणी केली जाते तेव्हा जन्मलेल्या नवीन मतदारांबरोबर अनेक अस्तित्वात असलेले मतदारदेखील आपलेसे करण्यासाठी अनेक क्लृप्त्या योजल्या जातात. त्या वेळेस विद्यमान पक्ष एकनिष्ठतेची हाक देतो, पण स्वार्थी एकनिष्ठता, सुप्त आकांक्षा, तात्त्विक मतभेद, धोरणातील भ्रमनिरास, सांघिक कुपोषण असे अनेक हात साथ सोडून देण्यासाठी सैल झालेले आढळतात. हाकेला साद घातली जात नाही.

पक्ष दुबळा हा स्वत:मुळेच होतो. मतपेटीतील मतदार हा वाढतच असतो. आपला हिस्सा किती आणि कसा वाढीस लागला पाहिजे ही काळजी पक्षाने घेतली पाहिजे, पण दुसऱ्या पक्षांवर दोषारोपण करून नाही, तर निष्कलंक एकनिष्ठतेचे बीजारोपण करून. सर्वात सोपी गोष्ट असते ती म्हणजे.. रडणे, दुसऱ्यास दोष देणे आणि फक्त दुसऱ्यांच्या कथित किंवा कल्पित चुकांचे पाठ केलेले पाढे म्हणणे, उत्तरे देता येत नसतानादेखील प्रश्न उपस्थित करणे.. यात हशील ते काय!

धनसंचयापेक्षा मतदारसंचय वाढीस लागण्याचे उद्दिष्ट आणि ध्येय असेल तर साम, दाम, भेद, दंड कुठून येतात आणि का येतात! कारण एकनिष्ठता वेशीवर टांगली गेलेली असते. त्याचे चिंतन व्हावे.

किरण इनामदार, मुंबई

 

रिक्षा-टॅक्सीचे धोरण कुणाच्या फायद्यासाठी?                                              

‘आता सरसकट रिक्षा-टॅक्सी परवाना’ ही बातमी (१७ जून) वाचून आश्चर्य वाटले. का तर म्हणे यामुळे परवान्याचा काळाबाजार रोखला जाईल.

आज मुंबईसह महाराष्ट्रात प्रचंड रिक्षा व टॅक्सी उपलब्ध आहेत. त्यांना प्रवासी मिळत नाहीत. रिक्षा, टॅक्सी उभी करायला जागा नाही. मीटरप्रमाणे भाडे न घेता अवाच्या सव्वा भाडे मागितले जाते. मुंबईहून पुण्याला जायला जेवढे तिकीट आहे, त्यापेक्षा जवळपास दुप्पट पैसे रिक्षाने कोथरूडला जायला लागतात. रात्री अपरात्री प्रवास करावा लागणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचादेखील मुद्दा महत्त्वाचा आहे. परदेशात सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिले जाते. लोकांनी प्रदूषणाचा धोका ओळखून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडावा असा आग्रह धरला जातो. आपल्याकडे उलट निर्णय घेतला जातोय. बेस्ट, एसटी तोटय़ात चालल्या आहेत. भविष्यात त्या कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  रिक्षा, टॅक्सीची निर्मिती करणाऱ्या उद्योगपतींच्या दबावाखाली सरकारने हा निर्णय घेतला असा संशय येतो. ग्राहक पंचायत व अन्य संस्थांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे.

प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे (मुंबई)

 

उल्लेख चुकीचा

‘कुतूहल’हे सदर अनेक वर्षांपासून  वाचतो. वेगवेगळ्या विषयांची अतिशय चांगली माहिती त्यात दिली जाते. बुधवारच्या अंकातील या  सदरामध्ये रेशीमसंबंधी खूपच छान माहिती आहे; परंतु डेनियर या एककाचा दोनदा जो उल्लेख केला आहे तो चुकीचा आहे. एक डेनियर म्हणजे ९००० मीटर लांबीच्या धाग्याचे वजन १ ग्रॅम असा आहे.

प्रा. व्ही. के. जोशी, नांदेड