‘सह्यद्रीचे वारे’ सदरातील ‘मराठी शाळांना धोरणझळा’ हा प्रसाद हावळे यांचा लेख (१ ऑगस्ट) एकूणच मराठी भाषेविषयी सरकारी बोलघेवडेपणा आणि प्रत्यक्षात कृती याबाबत मराठी भाषकांना सत्य परिस्थिती दाखवून डोळ्यात अंजन घालणारा आहे.

महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्या की सर्वच राजकीय पक्षांनी मराठी भाषेच्या भविष्याविषयी काळजी करण्याचे नाटक करायचे, मराठी पाटय़ा असे काही विषय काढून प्रसिद्धी मिळवायची, चर्चेत राहायचे हा प्रसिद्धीनियम बनविला आहे. मुळात मराठी भाषा टिकवायची तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्याबाबत कोणताही राजकीय पक्ष इच्छुक नाही. उलट आपल्या नातेवाईक आणि सगेसोयऱ्यांच्या नावे इंग्रजी शाळा काढण्याचा व्यावहारिक दृष्टिकोन ही मंडळी ठेवतात. विरोधी पक्ष असताना बेगडी मराठीप्रेम दाखवायचे आणि सत्तेत आल्यावर मात्र सरकारी स्तरावर ठोस काही करायचे नाही, उलट चालढकल करून परभाषकांना खूश ठेवायचे असे धोरण आहे. नाही तर मराठीला अभिजात दर्जा, मराठी शाळा बृहत् आराखडा असे विषय तत्काळ मार्गी लावले गेले असते.

मराठी शाळांबाबत तर आपले शिक्षणमंत्रीच मराठी शाळा कशा बंद होतील आणि इंग्रजी शाळांना झटपट परवानगी असे अघोरी नियम बनवताना दिसतात. समाजमाध्यमांत सरकारचे पैसे कसे वाचवले याच्या गोष्टी सांगण्यात धन्यता मानतात. पटसंख्या वीसपेक्षा कमी असेल तर मराठी शाळा बंदसारखे अध्यादेश सरकारी पातळीवर निघतात- ब्राझीलसारख्या देशात अति ग्रामीण भागात एक विद्यार्थी असेल तरी शाळेत वीज, इंटरनेट सुविधा देऊन दूरस्थ/ ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा देऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. हा मोठा विरोधाभास पाहिला असता, आपला प्रयत्न गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा आहे, असेच वाटते.

गुणवत्ता नसल्याची काळजी शिक्षण विभागाला आहे ही खरी जमेची बाजू; पण यांचे ‘जखम पायाला आणि औषध डोक्याला’ हे उपाय चालू आहेत. मराठी शाळांबाबत काही अपवाद वगळता प्राथमिक स्तरावर गुणवत्तेची बोंब आहे हे मान्य; पण सरकारी नियम ८वीपर्यंत उत्तीर्ण, ९वीकरिता ‘एएलपी’ जलद गतीने शिक्षण, सीबीएसई दर्जा अभ्यासक्रम यांपेक्षा प्राथमिक शिक्षक यांच्यावर गुणवता सुधारणा आणि काटेकोर अंमलबजावणीसाठी काही तरी उपाययोजना अथवा पायाभूत चाचणी परीक्षांकरिता दहावी/बारावीच्या धर्तीवर बाह्य परीक्षक आणि बाह्य मूल्यमापन आणणे आवश्यक आहे, याबाबत विचार करावा. अन्यथा मराठी शिक्षणाबाबत सरकारी अनास्था आणि मराठी भाषेचे भविष्य यांविषयीची चिंता चालूच राहील!

अ. स. कुपेकर, मुंबई

 

हे कसे नाही आठवले?

‘कुछ तो मजबूरियाँ’ हे संपादकीय (२ ऑगस्ट) शेवटपर्यंत वाचल्यानंतर मला ‘आठवले’ की यात काही तरी कमतरता आहेच!

‘बारिश में गिरता है पाणी, काँग्रेस ने लगायी थी आणीबाणी

और लोकसत्ता ने हमारा नाम न लेके हम को मार दिया जिवंतपणी..’

यासारख्या कित्येक कविता, भलेही त्या समर्थ रामदासांच्या काव्यगुणापासून मैलोगणती दूर असोत, पण त्यात असलेला गोडवा कोणीच नाकारू शकत नाही. शिवाय या झटपट कविता. सोबत हास्याचा फवारा तोही संसदेत.. अशा गुणवान शीघ्रकवीला अनुल्लेखाने मारणे बरे नव्हे!

हे असे अनुल्लेखाने मारणे कोणत्याही सहृदय काव्यरसिकाला सहन न होण्यासारखेच म्हणून, हा पत्रप्रपंच. याबद्दल त्यांना विचारण्याचाही विचार केला, पण तेव्हाच शब्द ऐकू येऊ लागले.. ‘‘देश में चल रही है नरेंद्र मोदी की आंधी, उस में उड जायेगी हर संपादक के पेन की कांडी’’- आता बोला!

निखिल घाडगे, कळंब (जि. उस्मानाबाद) 

 

उच्चपदस्थांचे राजीनामे ही चिंतेची बाब

ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि आता निती आयोगाचे उपाध्यक्ष डाँ. अरविंद पानगढिया यांसारख्या अनेक उच्चपदस्थ आणि महत्त्वाच्या संस्थांच्या प्रमुखांचे राजीनामे ही खूपच चिंतेची बाब आहे. हे सरकारच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे तर होत नाही ना, अशी शंका येते. शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ वगैरे मंडळींना एकांतात आणि शांततेने काम करायला आवडते, कोणाची ढवळाढवळ त्यांना फारशी रुचत नाही. त्यामुळे ते अशा गोष्टी फारशा खपवून घेत नाहीत आणि पर्यायच नसेल तर सरळ राजीनामा देऊन टाकतात.

मुळात ही तज्ज्ञ मंडळी ही देशाची खूप मोठी संपत्ती असते आणि राष्ट्रउभारणीत त्यांच्या ज्ञानाचा यथायोग्य उपयोग करून घेणे ही राजकीय नेतृत्वाची जबाबदारी असते. तसेच त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून न घेणे हे कोणत्याही देशासाठी फायद्याचे नसते. सरकारने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना यथोचित स्वायत्तता देऊन त्यांचा राष्ट्रउभारणीत उपयोग करून घेणे हेच शहाणपणाचे असते.

सचिन वाळीबा धोंगडे, अकोले (जि. अहमदनगर).

 

राजकीय नैराश्यातून भगवद्गीतेला विरोध

दिवंगत शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती कलाम यांच्या पुतळ्याजवळ वीणा हे प्राचीन भारतीय वाद्यही दाखवले आहे, कारण ते त्यांचे आवडते वाद्य होते व ते स्वत: वीणा वाजवीत असत असे ऐकले आहे.

तसेच, ते स्वत: एक कर्मयोगी होते आणि कर्मयोगाचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या ग्रंथाची प्रतिकृती त्यांच्या पुतळ्याजवळ दाखवणे यात गैर काय आहे ?

शिवाय त्यांच्या कुटुंबीयांचीही या दोन्ही वस्तूंच्या प्रतिकृती पुतळ्यामध्ये अंतर्भूत करायला संमती असणारच. बातम्यांमधेही कुठे कुटुंबीयांचा विरोध असल्याचे वाचलेले नाही. उलट हे कुटुंबीय इतकेच म्हणाले की अन्य धर्मग्रंथही ठेवा, अशी बातमी इंग्रजीत आहे.

तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून वावरणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीतील कोणत्याही प्रथा-प्रतीकांना ती ‘हिंदू’ असल्याचे लेबल लावून विरोध करणाऱ्यांना सध्याच्या राजकारणामुळे नैराश्य आलेले असून त्यातून हा विरोध होत आहे. हे नैराश्य घालविण्यासाठी त्यांनी महात्मा गांधींप्रमाणे  गीतेकडेच वळावे हे उत्तम !

याच ‘अन्वयार्थ’ मध्ये १३ आकडय़ाचा उल्लेख आहे . येशू ख्रिस्ताच्या १३व्या शिष्याने (मथियस) येशूचा विश्वासघात केल्यामुळे तो आकडा बदनाम झाला असे ऐकले होते. अनेक हॉटेले, विमानांमधेही हा आकडा टाळल्याचे लक्षात येते. भारतातही हा आकडा ‘सर्वधर्मसमभावा’च्या दृष्टिकोनातून टाळत असावेत ! असो.

गीता हा काही केवळ धर्मग्रंथ नव्हे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले आहे की ‘शंका-कुशंका, निराशा यांनी घेरले की मी भगवद्गीतेकडे वळतो.’ गीतेची महती स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, पंडित नेहरू आदींनीही गायिली आहे; पण हे झाले सगळे भारतीय संस्कृतीचा आदर करणारे ‘हिंदू’ ! पण गीतेतल्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व इमर्सन, आल्ड्स हक्सले, अ‍ॅनी बेझंट इत्यादींनी मानले आहे. अणुबॉम्ब बनविणारे अमेरिकन शास्त्रज्ञ ओपनहायमर उत्तरायुष्यात म्हणतात की त्याच्या जीवनाचे तत्त्वज्ञान गीतेमुळे साकारले. अमेरिकन साहित्यिक/तत्त्वज्ञ यांनी यांच्या मताप्रमाणे गीतेमध्ये वैश्विक तत्त्वज्ञान सांगितले आहे. ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन गीतेमध्ये व्यवस्थापनशास्त्राची तत्त्वे असल्याचे सांगतात!

त्यामुळे कलामांना आदरणीय आणि प्रिय असलेल्या या ग्रंथाची प्रतिकृती त्यांच्या पुतळ्याचा भाग असेल तर ते सर्वथैव योग्यच म्हटले पाहिजे.

मुकुंद गो. फडके , बोरिवली (मुंबई)

 

वैज्ञानिकांची अंधश्रद्धा

‘शहाणपणाचे नव्हे, अशोभनीयच’ हा अन्वयार्थ (१ ऑगस्ट) वाचून मनोरंजन झाले व विषादही वाटला. आपल्यासारख्या रूढीप्रिय व परंपरावादी देशात असला अवैज्ञानिक दृष्टिकोन असणे मुळीच आश्चर्यकारक नाही. विज्ञानाने अनेक क्षेत्रांत क्रांती केली असताना आपल्याकडे मात्र दसऱ्याच्या दिवशी कार्यालयांमध्ये टाइपरायटर, कॅल्क्युलेटर्स एवढेच नव्हे तर संगणकाचीदेखील पूजा केली जाते. विज्ञानाचीच अपत्ये असलेल्या यंत्रांचीच षोडशोपचारे पूजा करण्याएवढी हास्यास्पद गोष्ट दुसरी नसेल. मनुष्य चंद्रावर पोहोचला, भारताचा उपग्रह मंगळावर पोहोचला तरी लोक अजूनही चंद्रदर्शन झाल्याशिवाय संकष्टीचा उपास सोडत नाहीत, महिला भाऊबीजेला चंद्राला ओवाळतात, कित्येकांच्या लग्नात पत्रिकेतला मंगळ अजूनही आडवा येतो!

..म्हणूनच, अन्वयार्थात वर्णन केलेल्या पूर्णपणे वैज्ञानिक प्रसंगीदेखील पूजा करणे वा अन्य प्रकार हे आपले वैज्ञानिकदेखील या अवैज्ञानिक प्रथा व रूढींच्या विळख्यातून बाहेर पडले नाहीत हेच दर्शवितात. मला तर वाटते की, जेव्हा केव्हा आपले लोक चंद्रावर किंवा मंगळावर जातील तेव्हादेखील ते या ग्रहांची षोडशोपचारे पूजा करूनच पुढे पाय टाकतील. डॉ. अब्दुल कलामांसारख्या विद्वान व विज्ञाननिष्ठाला या सगळ्या वादात ओढणे मात्र निषेधार्ह आहे.

शरद फडणवीस, पुणे

 

संकुचित विचार सोडून गीता आत्मसात करा

दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या तमिळनाडू राज्यातील स्मारकातील पुतळ्याशेजारी भगवद्गीतेची लाकडात कोरलेली प्रतिकृती ठेवण्यात आल्याने वादंग निर्माण झाला आहे. देशात कोणताही मुद्दा पकडून विरोध करण्याचा पायंडाच पडला आहे आणि तो विवाद जात-धर्म यांना अनुसरून असेल तर त्यास अटकाव करणारे कमीच; उलट त्या आगीत तेल ओतणाऱ्या अविचारींची संख्या अधिक असते.  शांती आणि विवाद ही दोन भिन्न टोके आहेत. ‘मिसाइल मॅन’ अशी ओळख असलेल्या कलाम यांनी आजीवन शांतीचाच पुरस्कार केला. देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या त्या थोर विभूतीस कोणत्याही वादाशी जोडू नये.

विद्यार्थिप्रिय कलाम यांनी आपल्या अनेक भाषणांतून शालेय शिक्षणापासून भगवद्गीता शिकवण्याची गरज बोलून दाखवली होती. कलाम आणि भगवद्गीता एक वेगळेच समीकरण होते. जेव्हा कलाम भाषणांतून भगवद्गीतेच्या आवश्यकतेवर भाष्य करीत असत तेव्हा कोणीही त्यांना त्याविषयी प्रश्न विचारले नाहीत आणि आज मात्र त्याच गीतेस पकडून वाद निर्माण झाला आहे.

भगवद्गीता हिंदूंचा मुख्य ग्रंथ आहे. त्यातील विचार आत्मसात करण्यासाठी संकुचित विचारांच्या चौकटीतून बाहेर आले पाहिजे. याचा उत्तम पायंडा खुद्द कलाम यांनीच घालून दिला आहे.

धर्माविषयी असलेल्या विचारांना योग्य दिशा मिळणे देशाची गरज आहे.

 – अर्पिता पाठक, पनवेल