20 October 2017

News Flash

शिवसेनेचा ऱ्हासाकडे प्रवास?

शिवसेनेने सत्तेतील भागीदाराविरुद्ध आंदोलन करून मैत्रीपूर्ण वैराचे पुढले पर्व चालू केले आहे.

लोकसत्ता टीम | Updated: September 25, 2017 2:55 AM

शिवसेनेने सत्तेतील भागीदाराविरुद्ध आंदोलन करून मैत्रीपूर्ण वैराचे पुढले पर्व चालू केले आहे. आशीष शेलारांच्या सेनेवरच्या ‘खाल्ल्या ताटात घाण’ या शेऱ्यावरून भुजबळ यांनी सेना सोडल्याचे दिवस आठवले. त्या वेळी सेना पूर्ण जोशात होती आणि भुजबळांच्या जाण्याने चांगलीच दुखावली / डिवचली गेली होती. त्या वेळी शिवसेनेच्या मुखपत्रात ‘ज्या ताटात जेवावे, त्याच ताटात ०’ अशा शब्दांनिशी कृतघ्न भुजबळांचे व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. शिवसेनेने भुजबळांची संभावना ज्या शब्दांत केली, त्याच शब्दांत आज शिवसेनेवर टीका होते आहे. त्या वेळी टीकेचे लक्ष्य ठरलेल्या भुजबळांचा राजकीय प्रवास तेथूनच तसा उतरणीला लागला होता आणि आता तर तो संपल्यातच जमा आहे. आता जेव्हा हीच टीका शिवसेनेवर होत आहे, तेव्हा ती शिवसेनेच्या होऊ   घातलेल्या भविष्यातील ऱ्हासाचे तर सूतोवाच करीत नाही ना, असा प्रश्न पडतो.

– अर्णव शिरोळकर, मुंबई

 

खऱ्या आणि खोटय़ा वाघांसाठीही सध्या ‘बुरे दिन’

‘रविवार लोकसत्ता’चा अंक वाघांबद्दल बरेच काही बोलून जाणारा होता. मुखपृष्ठावरच्या संभाजीराजांवरील मालिकेच्या जाहिरातीत संभाजीराजे वाघाला नेस्तनाबूत करताना दिसले. बातम्यांच्या पहिल्या पानावर शिवसेनेचे वाघ (?) सहकारी भाजपविरोधात उद्विग्न झालेले दिसले. आणि ‘विशेष’ पानावर वाघ (खरेखुरे बरं!) का चिडतात, त्याचा मागोवा घेतलेला होता. खऱ्याखुऱ्या वाघाच्या अधिवासावर माणसाने अतिक्रमण केल्याने तो चिडलाय; तर राजकारणातला कागदी वाघ आपल्याच मित्रपक्षाने पद्धतशीरपणे केलेल्या अवकाश-संकोचामुळे सैरभैर झालाय. एकुणात काय तर, वाघांसाठी मग ते खरे असोत की खोटे, ‘बुरे दिन’ आल्याचेच हे लक्षण! फरक इतकाच, की खऱ्या वाघाच्या चिडण्यावर उपाय आवश्यक आहे; तर खोटय़ा वाघाचा हा चिडीपेक्षा रडीचा डाव असल्याने त्याला दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारणेच योग्य आहे.

– गुलाब गुडी, मुंबई

 

हीदेखील मारिच मायाच!

‘मारिच माया’ हा अग्रलेख (२३ सप्टें.) वाचला. मेक्सिकोमधील घटनेने प्रत्येक देशातील मिथ्या जनतेपुढे सत्य म्हणून आणण्याच्या वृत्तीवरील भाष्य खूपच आवडले.  भारतातही हीच मारिच वृृत्ती सांप्रतच्या सरकारने चांगलीच अवलंबली आहे. यातील मुख्य म्हणजे १५ लाखांचे गाजर असो अथवा अच्छे दिनचा धोशा असो ज्यामुळे समस्त जनता झिंग आल्यासारखी अजूनही एका नशेत आहे व सत्यासत्यतेवर विचार करण्याची शक्ती हरवून बसलीय. हे झाले २०१४च्या निवडणुकीचे. फसलेली नोटाबंदी, देशाची घसरलेली आर्थिक स्थिती व पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली भयानक दरवाढ यावर होणाऱ्या टीकेवर सरकारचे निर्लज्ज समर्थन हीदेखील मारिच मायाच आहे.

– चंद्रशेखर सु. खारकर, ठाणे

 

प्रदूषित प्रसारमाध्यमे

‘मारिच माया!’ या संपादकीयातील (२३ सप्टें.) ‘‘अवस्तुनिष्ठ वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडण्याचे विविध प्रकार सुरू आहेत,’’ हे वाक्य पटलं. गणपती दूध कसा पितो हे पाहायला धावणाऱ्यांची गर्दी दृक्-श्राव्य प्रसारमाध्यमांमुळेच वाढली. कुणा नेत्याच्या वा कलाकाराच्या मृत्यूची अफवा व्हॉट्सअ‍ॅपसारख्या संपर्कमाध्यमांतून उठते. ती पुढे पाठवली जाते. कूपनलिकेत पडलेल्या बालकाच्या श्वासातलं अंतर कमी होत असताना तिथे डेरे घालून दूरचित्रवाणी माध्यमं त्यांचा टीआरपी वाढवण्याच्या मागे असतात.

या पाश्र्वभूमीवर संपादकीयात वर्णिलेल्या फ्रिडा सोफियाच्या नसणाऱ्या अस्तित्वाची बातमी पसरवून लोकमानसाचं वशीकरण करून भूकंपासारख्या भयानक घटनेचं गांभीर्य अंतिमत: ‘लांडगा आला रे आला’सारखं करून टाकायचं ही प्रसारमाध्यमांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पत्रकारितेचा काही लोकांनी ‘धंदा’ केलाय.  पत्रकारितेमागच्या  नि:स्पृह विचारांचा पायाच खचू लागला तर त्यावरची विश्वासार्हता डळमळीत होऊ  लागते. त्यामुळे अशा प्रसारमाध्यमांकडे पाहायला, वर्तमानपत्र विकत घेऊन वाचायला नागरिक टाळाटाळ करू लागले तर नवल वाटू नये.  सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं वाचनात आलेलं एक वाक्य या दृष्टीनं फार महत्त्वाचं वाटतं. ‘‘केरसुणीने जर कचरा स्वच्छ काढायचा असेल आणि लेखणीने सत्य लिखाण करायचे असेल तर या वस्तू कोणत्याही प्रदूषणापासून मुक्त असायला हव्यात.’’

– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

 

आता ‘फॅमिली फार्मासिस्ट’चीही गरज

‘फार्मसी व्यवसाय स्वत्वाच्या शोधात!’ हा प्रा. मंजिरी घरत यांचा लेख (रविवार विशेष, २४ सप्टें.) खूपच उद्बोधक वाटला. ज्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असावा त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली फार्मासिस्टही असावा. ज्याप्रमाणे एक फॅमिली डॉक्टर हा रुग्णाला आजाराबद्दलची व पथ्यपाण्याबद्दलची माहिती समजावून सांगतो त्याचप्रमाणे फार्मासिस्टने, डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधांबद्दलची संपूर्ण माहिती उदा. ती औषधे कशी घ्यावीत, ती औषधे कशी व कुठे ठेवावीत अशी रुग्णोपयोगी माहिती नीट समजावून सांगणे आवश्यक आहे. डॉक्टर व फार्मासिस्ट यांनी एकमेकांच्या सहयोगाने रुग्णसेवा केल्यास त्याचे परिणाम उत्तम होतात. सद्य परिस्थितीत सामान्य प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जंतूंची पिढी, अर्थात, ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया, मानवाचा नाश करू बघत आहे व या स्थितीस कारण म्हणजे प्रतिजैविकांचा अनियंत्रित वापर. हे होण्यास कारण म्हणजे बेजबाबदार डॉक्टर व बेजबाबदार फार्मासिस्ट! कोणीही मेडिकल शॉपमध्ये जातो व आजाराचे वर्णन करून, काही फार्मासिस्ट त्यास वाट्टेल त्या प्रतिजैविकांचा वाट्टेल तसा डोस देतात. अनेक वेळा रुग्ण काही कारणाने खूप डिप्रेशनमध्ये असतो व त्या वेळी डॉक्टर त्यास अँटी डिप्रेसंट औषधे लिहून देतात. ती चिठ्ठी बघून काही फार्मासिस्ट लगेच त्या पेशंटला सुनावतात की बघा बुवा, तुमच्या डॉक्टरने झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या आहेत. असे म्हणताक्षणी तो रुग्ण घाबरून त्या गोळ्या नको म्हणून सांगतो व डिप्रेशन वाढत जाऊन कधी कधी असे रुग्ण आत्महत्येच्या विचारापर्यंतही जाऊन पोहोचतात!  सांगण्याचा मुद्दा असा की डॉक्टर व फार्मासिस्ट यांनी आपापल्या कार्यकक्षा नीट समजून काम केले तर ते समाजास खूप मोठे वरदान ठरेल.

– डॉ. मयूरेश म. जोशी, पनवेल

 

संशोधन होणे आवश्यक

‘सारं कसं सोपं सोपं..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (२३ सप्टेंबर) वाचला. या निमित्ताने एक मुद्दा मांडावासा वाटतो. तो हा की इंग्रजांच्या काळात आयुर्वेदाबद्दल एवढा अपप्रचार झाला की शास्त्र बदनाम होऊन मागे पडले. आयुर्वेदिक औषधांचा शोध कुठल्या तरी ‘लॅबोरेटरीत’ न होता, प्राचीन काळातील आपले संशोधक वनस्पतीचे गुणधर्म स्वत:च ते प्राशन करून प्रचीती घेऊन त्यावर भाष्य करायचे. आवश्यक मात्रेत रुग्णावर उपचार करायचे. या औषधांचा ‘साइड इफेक्ट’ व्हायचा नाही. आजही पूर्वीच्या पद्धतीने संशोधन जारी करणे गरजेचे आहे. आयुर्वेदात खूप काही दडलेले आहे.

– सां. रा. वाठारकर, चिंचवड

 

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची फौज हवी

‘जागोजागी पंचकुला’ हा लेख (रविवार विशेष, २५ सप्टें.) पोलीस खात्यावर असणारा सत्ताधारी व राजकीय पुढाऱ्यांचा दबाव अधोरेखित करणारा आहे. पोलीस खाते हे आपल्या मुठीत आहे असा सत्ताधाऱ्यांचा समज असतो आणि बदलीची भीती दाखवत आणि त्यांचे काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना चांगल्या जागी पोस्टिंग देऊन पोलीस खात्याला वेठीला धरले जाते. हे सर्व लोकशाही तत्त्वांना हरताळ फासणारे असून या सर्व दबावाला  भीक न घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची फौज उभी राहण्याची गरज आहे. तसे झाले तरच पोलीस खाते खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचे रक्षण कुठल्याही दबावाविना करू  शकेल आणि देशात पुरस्कृत दंगेधोपे होणार नाहीत. कुठलाही बाबा, बुवा, बापू स्वत:कडे शेकडो रक्षकांची फौज असल्याची शेखी मिरवू शकणार नाही. पोलीस हेच जनतेचे रक्षक असतील/असायलाच पाहिजेत.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

सगळेच पावसाळी निसर्गवैभव हरवते आहे..

‘बेडूकराव गेले कुठे?’ ही बातमी (२४ सप्टें.) वाचली. फक्त बेडूकच नव्हे, तर एकूणच पावसाळी निसर्गवैभव हरवत चालले आहे. शाळेची दिवाळी सुट्टी पावसाळ्यानंतर लगेच येत असल्यामुळे त्या सुट्टीत मनसोक्त अनुभवलेले ते वैभव अनेकांना आठवत असेल. पहिल्या पावसानंतर हवेत भरून राहणारा मृद्गंध आता तेवढा जाणवत नाही, कारण मोकळी माती असलेल्या जागा एक तर फार कमी आहेत आणि कदाचित तो मृद्गंध निर्माण करणारे जिवाणूसुद्धा बेडकांप्रमाणेच नामशेष होऊ  घातले असतील. मैदाने, तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोकळ्या जागेत विविध रंगांचे तेरडे, आघाडा, कणीसासारखे फूल येणारे उंच गवत  यांची रेलचेल असायची. कासच्या पठाराची छोटी आवृत्ती शोभावी इतकी रंगीबेरंगी रानफुले गल्लोगल्ली दिसायची. पहिल्या पावसानंतर अगदी टपऱ्यांवरच्या पत्र्यावरसुद्धा वालाचे द्विदलधारी हिरवे कोंब हजारोंच्या संख्येने दिसायचे. कमी झालेल्या मोकळ्या जागा, कदाचित पक्षी कमी झाल्यामुळे घटलेले परागीभवन, प्लास्टिकयुक्त आणि रासायनिक कचऱ्यामुळे घटलेला जमिनीचा कस अशी अनेक कारणे यामागे असावीत असे वाटते.

 – विनिता दीक्षित, ठाणे

 

रॅगिंगसंबंधी अहवालातील निष्कर्ष धक्कादायक

शिक्षण संस्थांमध्ये बोकाळलेल्या रॅगिंगच्या पद्धतीविषयी अभ्यास करण्यासाठी  स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने पाहणीनंतर धक्कादायक निष्कर्ष काढला आहे. काही काळापूवी रॅगिंगला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे प्रयत्नही झाले. परिणामी या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असल्याचे मानण्यात येऊ  लागले. परंतु विद्यापीठ अनुदान मंडळाच्या खास तज्ज्ञ समितीने यासंबंधी एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार देशभर ही अनिष्ट प्रथा अद्याप सुरूच असून उलट ती लाभदायक असल्याचे नमूद करून तिच्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्नही होत आहे. वाढते रॅगिंग ही एक धोकादायक प्रवृत्ती आहे. तिच्याविरुद्ध पुन्हा कारवाई करण्याची नितांत गरज आहे.

– अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे

First Published on September 25, 2017 2:55 am

Web Title: loksatta readers letter part 87