‘संमतीचा संघर्ष’ हा अग्रलेख (१३ ऑक्टो.) वाचला. भारतीय दंडसंहितेतील कलम ३७५ मध्ये बलात्काराची व्याख्या व कलम ३७६ मध्ये त्यासाठीची शिक्षा देण्यात आली आहे. वैवाहिक बलात्काराच्या व्याख्येत बदल केल्याबद्दल प्रथम सुप्रीम कोर्टाचे आभार. या निकालामुळे ग्रामीण भागात बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त आहे, ते कमी होण्यास मदत होईल. आता अल्पवयीन विवाहाच्या बाबतीत तक्रारदाराची माहिती उघड करणे बंधनकारक नसावे, कारण असे असेल तर तक्रारदारांना मारण व त्यांचे खून होणे हे प्रकार वाढतील. अशी माहिती उघड न केल्यास कोणीही तक्रार करू शकेल. त्यामुळे बालविवाहांचे प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

– अतुल वसेकर, पाटकूल (सोलापूर)

उद्या बारामतीचेही ‘नांदेड’ होईल..

आदर्श घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कामकाजाच्या संदर्भात विविध कारणांनी दिरंगाई झाल्यामुळे वा ती हेतु(!)पुरस्सर करण्यात आल्यामुळे अशोक चव्हाण यांना अवधी मिळून आताच्या निवडणुकीत त्यांना नवसंजीवनी मिळाली. अन्यथा केव्हाच त्यांचा ‘छगन भुजबळ’ झाला असता. शिखर सहकारी बँक आणि सिंचन घोटाळाप्रकरणी सध्या चालली आहे तशीच दिरंगाई जर चालू राहिली तर उद्या बारामतीचेही ‘नांदेड’ होईल. प्रामाणिक करदात्यांच्या पशाचा चुराडा होऊनही ‘न्याय’ झालेला नसेल. लोकांचा न्यायसंस्थेवरील विश्वास उडू शकेल. त्याला जबाबदार कोण असेल?

– अविनाश वाघ, पुणे

विजयाने नांदेडच्या काँग्रेसला बळ!

‘नांदेडच्या विजयाने काँग्रेसला बळ’ ही बातमी (१३ ऑक्टो.) वाचली.  ती वाचून करमणूक झाली. भारतात स्थानिक नेत्यांचे जे ‘पॉकेट्’ मतदारसंघ आहेत जसे बारामती शरद पवारांचा, नवी मुंबई गणेश नाईकांची, अमेठी राहुल गांधींची तसेच नांदेड हा चव्हाण कुटुंबीयांचा गेली ४०-५० वर्षे ‘पॉकेट’ मतदारसंघ असून चव्हाण कुटुंबीयांचा सहभाग नांदेडच्या मतदारांना भुरळ घालतो. अशोक चव्हाणांचा ‘आदर्श’ राजीनामा घेऊन त्यांच्या पक्षाच्या लहरी राजकुमाराने या मितभाषी कणखर मराठी नेत्याचे राजकीय कर्तृत्व एकाच फटक्यात संपवून टाकले होते. म्हणून ‘नांदेडच्या विजयाने काँग्रेसला बळ’ हा मथळा खरे तर असा हवा होता – ‘विजयाने नांदेडच्या काँग्रेसला बळ’.

– राजीव नागरे, ठाणे</strong>

गर्वाचं घर खाली..

राज्यसभेच्या गुजरातमधील निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून ती निवडणूक जिंकण्याचा अश्लाघ्य प्रयत्न भाजपने केला; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. हाच प्रयोग काँग्रेसचे नगरसेवक फोडून भाजपने नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत करून पाहिला व आता सर्वाच्याच अंगवळणी पडलेल्या भाजपच्या प्रचंड विजयाच्या वल्गनाही केल्या; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. नांदेडच्या मतदारांनी पक्षबदलूंना सपशेल नाकारले. प्रगल्भ लोकशाहीच्या दृष्टीने आताच्या राजकीय बजबजपुरीच्या वातावरणात ही निश्चितच दिलासा देणारी बाब आहे. त्याचप्रमाणे अनावश्यक उन्माद कसा आत्मघातकी ठरू शकतो, हा धडाही भाजपला मिळाला हे बरे झाले. नाही तरी आपल्याकडे ‘गर्वाचं घर खाली असतं’ हा वाक्प्रचार रूढ आहेच.

– जयश्री कारखनीस, मुंबई

याला जबाबदार कोण?

अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरुषी हत्याकांडप्रकरणी तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली, पण या माता-पित्याला आपल्याच पोटच्या मुलीचा खून केल्याच्या आरोपात चार वर्षे तुरुंगात मरणयातना भोगाव्या लागल्या, किती अपमान सहन करावे लागले. या गोष्टीला जबाबदार कोण?

मनाचीच साखळी तयार करून दाम्पत्याला दोषी ठरवणारी पोलीस यंत्रणा की त्याच साखळीचा आधार घेऊन तपास करणारी सीबीआय? दुसरे प्रकरण म्हणजे – डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांच्या खुनाचा कासवाच्या वेगालाही लाजवील अशा वेगाने चाललेला सीबीआय तपास. या प्रकरणावरून मनात प्रश्न उभा राहतो की खरेच तपासयंत्रणेत पारदर्शकता असते का? आणि हा तपास जर राजकीय दबावानुसार चालत असेल तर मूळ आरोपींना शिक्षा कधी मिळणार?

– विशाल हिंगे, अवसरी बु. (मंचर, पुणे)

‘सीसॅट’ पेपरच्या सरावावर भर द्यावा

‘सीसॅटचा पेपर पात्रता स्वरूपाचा करावा’  हे पत्र (लोकमानस, १२ ऑक्टो.) वाचले.  बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज आहे की तांत्रिक पाश्र्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना सीसॅट पेपर सोपा जातो व त्यामुळे इतर विद्याशाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. सीसॅट पेपरमधील गुण हे मुळात सरावावर अवलंबून असतात. तुम्ही किती सराव करता यावर तुम्हाला पेपर कसा जाणार ते ठरते. इंजिनीयिरगच्या विद्यार्थाना जर सीसॅट सोपे जात असेल (जे की पूर्णत: सत्य नाही) तर ते फक्त प्लेसमेंट किंवा इतर कारणासाठी केलेल्या सरावामुळे, कारण कुठल्याच इंजिनीयिरग कॉलेजमध्ये उताऱ्यावरील प्रश्न, गणित व बुद्धिमत्ता चाचणी शिकवली जात नाही.

मुळात ज्या सीसॅट पेपरबद्दल एवढा बाऊ केला जातो त्यामध्ये असते काय, तर ४० प्रश्न मराठी उताऱ्यावर, १० प्रश्न इंग्रजी उताऱ्यावर, २५ प्रश्न गणित व बुद्धिमत्ता (स्कॉलरशिप स्तर) व ५ प्रश्न निर्णय क्षमता. यातील गणिताच्या प्रश्नाचा अपवाद जरी धरला तरी बाकी ५५ प्रश्न हे तिथेच उत्तर असणारे आहेत, जे तुमची आकलन क्षमता तपासतात. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर तिचा सराव करणे हा त्यावर उपाय असतो. जसे सर्व वाणिज्य व तांत्रिक शाखेचे विद्यार्थी  एमपीएससीसाठी आवश्यक असणारे सामान्यज्ञानाचे विषय शिकतात, तसे कला शाखेच्या व सीसॅटचा बाऊ करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी थोडे समायोजन करावे व भीती बाळगण्याऐवजी सरावावर भर द्यावा.

– किरण गोसावी, भूम (उस्मानाबाद)