इंडियन सुपर लीगने भारतीय फुटबॉल क्षेत्रात क्रांती घडवली. गेल्या वर्षीच्या भव्यतेमुळे ही लीग प्रचंड लोकप्रिय झाली. दमदार खेळाडू, बॉलीवूडचं ग्लॅमर आणि चकचकीतपणा यांमुळे आयएसएल या वर्षी आणखी भव्य होणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीगने भारतातील क्रीडा क्षेत्राला एक नवी दिशा दाखवली. आयपीएलच्या भव्यतेने आकर्षित झाल्यामुळे इतर खेळांतही तसे प्रयोग होऊ लागले. पण व्यावसायिक कसोटीवर हे सर्वच प्रयोग यशस्वी झालेच असे नाही. कबड्डी आणि आता फुटबॉल यांचा अपवाद वगळता इतर प्रयोग अक्षरश: ढेपाळले. २०१४ मध्ये जन्मलेल्या इंडियन सुपर लीगने भारतीय फुटबॉल क्षेत्रात क्रांती घडवली.
कुणाच्याही ध्यानीमनी नसताना आयएसएल अर्थात इंडियन सुपर लीगने फुटबॉलकडे इतर प्रेक्षकांनाही आकर्षित केले. यंदा ही लीग भव्य स्वरूपात आपल्यासमोर उभी ठाकणार आहे. गतवर्षी भारतातील दिग्गजांना या लीगमध्ये राष्ट्रीय कर्तव्यामुळे खेळता आले नव्हते, परंतु यंदा त्यांच्या सहभागामुळे लीगला भव्य स्वरूप मिळाले आहे. आयएसएल हे भारतीय फुटबॉलला मिळालेले वरदानच म्हणावे लागेल. कोलकाता, बंगळुरू, गोवा, मुंबई आदी शहरांपुरता मर्यादित असलेला हा खेळ आयएसएलमुळे देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला. याआधीही तो देशभर पोहचलेला होता, परंतु आयएसएलने त्याची व्याप्ती वाढवली, त्याला दिशा दाखवली आणि एक नवा प्रेक्षकवर्ग जोडला. फुटबॉल व्यतिरिक्त इतरही खेळांचे प्रेक्षकही या खेळाला मिळाले आणि म्हणून भारतात फुटबॉलला ‘अच्छे दिन’ दिसू लागले.
जागतिक क्रमवारीत १५०च्या पुढे असलेल्या भारतात असाही प्रयोग होऊ शकतो, याची कल्पना काही वर्षांपूर्वी कुणी केलीही नव्हती. पण २०१४ला ती कागदावरून प्रत्यक्षात उतरवली ती रिलायन्सने. नीता अंबानी यांच्या कल्पनेला बॉलीवूड सेलेब्रिटी अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, हृतिक रोशन, जॉन अब्राहम, वरुण धवनसह क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांची जोड मिळाल्याने आयएसएलची भव्यता अधिकच वाढली आहे. पहिल्या सत्राच्या यशस्वी आयोजनानंतर आयएसएल आणखी भव्य आणि दिव्य स्वरूपात आपल्यासमोर पुन्हा येत आहे. चेन्नईतील जवाहलाल स्टेडियवर रंगारंग कार्यक्रमात, अभुतपूर्व रोषणाईत गतविजेत्या अ‍ॅटलेटिको दी कोलकाता आणि चेन्नईयन एफसी या तगडय़ा क्लबमध्ये उद्घाटनीय सामना होणार आहे.
१२ ऑक्टोबर २०१४मध्ये आयएसएलचा पहिला सामना खेळविण्यात आला. तो ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवणाऱ्यांना भारतात अशीही लीग होऊ शकते याची पुसटशी कल्पनाही नव्हती किंवा त्यांनी तसे स्वप्नही पाहिले नव्हते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भारतात येण्यास भाग पाडणाऱ्या या लीगमध्ये निकोलस अनेल्का, अ‍ॅण्ड्रे मोरित्झ, अ‍ॅडील नादी, मार्को मॅटेराज्जी आदी दिग्गजांचे भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. पहिल्या सत्रात बहुतांश तिशी ओलांडलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना करारबद्ध केल्याने प्रेक्षकांचा उत्साह काहीसा आटवला होता, परंतु त्याच वरिष्ठ खेळाडूंवर यंदा मार्गदर्शकाची जबाबदारी सोपवून नव्या दमाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे हा खेळ गतवर्षीच्या तुलनेत अधिकच गतिमान होणार आहे.
बेनार्ड मेंडी (चेन्नईयन एफसी) याची बायसिकल किकची मोहिनी, बोर्जा फर्नाडिसची (अ‍ॅटलेटिको दी कोलकाता) टॅकलिंग स्किल, एलानो ब्लमरची(चेन्नईयन एफसी) गोलगन, रॉबटरे कार्लो (दिल्ली डायनामोस), अ‍ॅण्ड्रे मोरित्ज (मुंबई सिटी एफसी) याने स्पध्रेत नोंदवलेली पहिली हॅट्ट्रिक या सर्व आठवणींनी अजूनही फुटबॉल रसिकांच्या मनावर गारुड करून आहे. यापेक्षा अधिक उत्कठांवर्धक आणि रोमहर्षक खेळ यंदाच्या सत्रात अनुभवण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत. या सर्व आंतरराष्ट्रीय दिग्गजांना सुनील छेत्री, एग्वेंसन लिंगडोह, रिना अँटो, थॉय सिंग, अराता इझुमी, करणजीत सिंग, सॅतीयनसेन सिंग, रॉबीन सिंग, जॅकीचंद सिंग, अ‍ॅनास एडाथोडीका या देशी खेळाडूंची फोडणी मिळाली आहे.
पहिल्या सत्रात प्रेक्षकसंख्यांच्या बाबतीत अनेक विक्रम मोडणारी ही लीग यंदा स्वत:च नवा विक्रम प्रस्थापित करण्यास सज्ज आहे. गतवर्षी जवळपास ७५ दशलक्ष प्रेक्षकांनी दूरचित्रवाहिनीवर या लीगचा आस्वाद घेतला. पहिल्या आठवडय़ात एकूण १७० दशलक्ष चाहत्यांनी ही लीग पाहिली आणि हा आकडा २०१४च्या फिफा विश्वचषक स्पध्रेतील भारतीय प्रेक्षकांच्या १२ पट अधिक आहे. ही संख्या स्पध्रेअखेरीस ४२९ दशलक्ष इतकी झाली. आकडय़ांच्या पलीकडे आयएसएलने भारतीय फुटबॉलला नवी दिशा दिली.
एरवी लाजाळू आणि भित्रे अशी ओळख असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याच्या अनुभवातून हे खेळाडू बरेच काही शिकले आहेत. त्यांच्यातील वाढलेला आत्मविश्वास राष्ट्रीय संघातील सामन्यांमध्ये प्रकर्षांने जाणवू लागला आहे आणि हेच भारतीय फुटबॉल वाटचालीसाठी महत्त्वाचे आहे. पण एक प्रश्न अनुत्तरितच राहतो आणि तो म्हणजे, या एका लीगने भारतीय फुटबॉलचा विकास खरेच होईल का? तर नाही.
तीन महिन्यांच्या या लीगने खेळाडूंना बरेच काही शिकता येत असले तरी ते दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी पुरेसे नाही. त्यामुळेच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने लीगचा कालावधी नऊ ते दहा महिने करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय स्पर्धाच्या वेळापत्रकानुसार आणि खेळाडूंच्या दुखापतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने लीगची आखणी झाल्यास खऱ्या अर्थाने भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप सोडेल.
आयएसएल की आय-लीग ?
खेळात पैसा आला की त्याचे विपरीत परिणामही सोबत घेऊन येतो. असेच काहीसे या लीगच्या बाबतीतही झाले आहे. लीगमधून येणारा पैसा आणि भव्य स्वरूपामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) या पालक संस्थेलाही झुकायला लावले आहे. आय-लीग ही भारतातील प्रमुख स्पर्धा आहे, असे छातीठोकपणे सांगणारी एआयएफएफ आज आय-लीग आयएसएलमध्ये विलीन करण्याच्या गोष्टी करू लागल्या आहेत. आयएसएलमधील पैसा त्यांच्याकडून हे वदवून घेतोय, हे सांगायची आवश्यकता नाही. पहिल्या हंगामापासून सुरू झालेला हा वाद आज आय-लीगच्या मुळावर उठला आहे. आय-लीग बंद व्हावी किंवा तिचे आयएसएलमध्ये विलीनीकरण व्हावे हा निर्णय एआयएफएफने घ्यावा, परंतु या आर्थिक उलाढालीत खेळाडू भरडले जाऊ नयेत हीच प्रामाणिक इच्छा आहे. आय-लीगची ओळख ही भारतातील सर्वात जुनी स्पर्धा म्हणून आपण करून देतो. मात्र या लीगला व्यावसायिक गणित न जमल्याने केवळ औपचारिकता म्हणून इतकी वष्रे ती रेटावी लागली. आयएसएलच्या निमित्ताने आय-लीगला पर्याय उपलब्ध झाला आहे आणि तोही तुल्यबळ आहे. २००७ मध्ये आय लीगला सुरुवात झाली आणि आठ वर्षांत त्यांना जे जमले नाही ते आयएसएलने एका वर्षांत करून दाखवले. एरवी आय-लीगच्या सामन्यांना हाताच्या बोटांवर मोजण्याइतके प्रेक्षक नसतानाही (कोलकाता, गोवा यांचा अपवाद ) आयएसएलमध्ये २५ ते ३० हजार प्रेक्षक उपस्थिती लावतात ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. ग्लॅमरस अशा या लीगने व्यवसायातील सर्व बाजूूंची योग्य आखणी करून प्रेक्षकांसमोर विविध व्यंजने ठेवली आणि त्याचा फायदा दिसला. हे आर्थिक गणित आय-लीगला जमले नाही. त्यामुळेच आय-लीगच्या संघ मालकांना गेली अनेक वष्रे तोटा सहन करावा लागला. आयएसएलमधील नफा दिसल्यामुळे आय-लीग संघमालकांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एआयएफएफला आयएसएलला महत्त्व देणे भाग पडत आहे.
या दोन्ही लीगने विलीनीकरण इतक्यात शक्य नसले तरी त्यातून आयएसएलचे महत्त्व कमी होईल, हे मात्र नक्की. कारण आय-लीग व आयएसएल विलीनीकरण केल्यास ती स्पर्धा कोणत्या नावाने खेळवली जाणार इतपासून ते संघातील विदेशी खेळाडूंच्या संख्यामर्यादापर्यंत वाद सुरू होतील आणि हे आयएसएलसाठी धोक्याचे आहे. त्यात आत्ता आयएसएलमध्ये आठ आणि आय-लीगमध्ये ११ संघांचा समावेश आहे. विलीनीकरण झाल्यास एकूण १९ संघांची एक लीग खेळविण्यात येईल आणि त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी पुरेसा नाही. कालावधी वाढवल्यास आर्थिक जुळवाजुळवही वाढवावी लागेल आणि सर्व गणित कोलमडण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे आयएसएलची लोकप्रियता कालौघात आटण्याची शक्यता आहे.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com