दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव ही आमची वर्षभरातील सुमार कामगिरी ठरली असून ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी बुद्धीचा वापर करण्याची गरज नसते हे या दोन्ही सामन्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. कटक येथील सामन्यात तर भारतीय संघाचा डाव अवघ्या ९२ धावांत गडगडला. या मानहानीकारक पराभवाचे विवेचन करताना धोनीने पत्रकारपरिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

ट्वेन्टी-२० सामन्यांत कमी-जास्त होतच असते. दरवर्षी एकतरी सामना संघाची सुमार कामगिरी ठरणारा असतो. कटक येथील हा संघाची सुमार कामगिरी दाखवून देणारा ठरला. ट्वेन्टी-२० सामन्यांत बुद्धीची गरज नसते हे या सामन्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. वैयक्तिक पातळीवर मी ट्वेन्टी-२० सामन्यांत बुद्धीचा जरा जास्तच वापर करतो. अतिविचार करण्याऐवजी  मैदानात जाऊन मोकळेपणाने कसे खेळता येईल यावर भर दिला पाहिजे, असे धोनीने यावेळी म्हटले. फलंदाजांनी आपल्या बुद्धीचा वापर न करता मोकळेपणाने खेळायला हवे. वीस षटकांचाच खेळ असल्याने आपण जास्त विचार करत बसलो तर मोकळेपणाने खेळ होऊ शकत नाही. कटक मधील सामन्यात अतिविचारच संघासाठी घातक ठरला, असेही तो पुढे म्हणाला.

धोनीने त्याच्या फलंदाजी क्रमवारीवरही भाष्य केले. बहुतेक वेळा सामन्याच्या शेवटच्या चार षटकांत किंवा पटापट विकेट्स पडल्याने सुरूवातीच्याच षटकांत मला फलंदाजीला जावे लागते. संघ गडगडल्याने मैदानात उभे राहून संघाची धावसंख्या १३० पर्यंत जाईल यादृष्टीने प्रयत्न करावे लागतात. संघातील सहावे स्थान हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे सहाव्या स्थानी फलंदाजीला येण्याची जबाबदारी आता कोणीतरी घ्यायला हवी. जोपर्यंत एखाद्या खेळाडूच्या खांद्यावर सहावे स्थान सांभाळण्याची जबाबदारी टाकली जात नाही तोपर्यंत त्या स्थानावर कोण योग्य राहील हे आपल्याला समजणार देखील नाही. यामुळेच वरच्या स्थानी खेळण्याचा माझा आग्रह असतो, असे धोनीने सांगितले.