१ मे २००९

तथ्यांश
फॉरवर्ड
कव्हरस्टोरी
निवडणूक
देशकारण
सुलेखन
मेतकूट
माइण्ड ओव्हर मॅटर
बखर संगणकाची
चिनी कम
लाइफ झिंगालाला
गोसीप कोलम
आपलं बुवा असं आहे!
चित्रदृष्टी
व्यक्तिवेध
ग्लिटरिंग गिझमोज
या कानाचं त्या कानाला
ज्येष्ठ नागरीक
घरचा शेफ
रॉक - ऑन
शॉपिंग
थरारक निसर्ग
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सुलेखन

इंग्रजी कर्सिव्ह लेखन हे मराठी माध्यमाच्या मुलांना शाळेतून शिकवलं जात नाही. कर्सिव्ह लेखनाचे अनेक फायदे असतात. पण मराठी माध्यमातील मुलं या फायद्यांना मुकतात.
वि. प्र. मेंडजोगी

संगणक, मोबाईल, इंटरनेट या सर्व साधनातील केवळ चमत्कार वाटावा, अशा उत्तुंग प्रगतीमुळे व्यवहारात तर सुलभता व जलदपणा आलेला आहेच; शिवाय शिक्षणक्षेत्रातही नवीनवी दालने उघडली जात आहेत. यातील प्रमुख भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर ज्या देशांनी स्वत:ला इंग्रजीपासून कटाक्षाने अलिप्त ठेवले होते; अशांनाही इंग्रजीचा अवलंब करण्यावाचून गत्यंतर राहिले नाही. शैक्षणिक क्षेत्रात पालकांचा कल मुलांना शक्यतो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाळण्याचा असतो. इतर शाळांतून सुरुवातीपासून इंग्रजी आहेच. काही जणांची अतिरंजित कल्पना आहे की भविष्यात कोणालाही लिहावयास लागणार नाही. शेकडो कारणे अशी आहेत की ज्यासाठी तुम्हाला लिहावे लागणार आहे. ज्या वेळी लेखन करावयाचे, त्या वेळी ते चांगले असावे अशी कोणाचीही अपेक्षा असते. फक्त या अपेक्षेला प्रयत्नांची जोड नगण्य असते.
या लेखात आपण फक्त इंग्रजी हस्ताक्षराबद्दलच विचार करणार आहोत. इंग्रजीमध्ये लेखनाच्या प्लेन व कर्सिव्ह अशा दोन लिपी आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्या लिपीत लिहावे यासाठी कोणतेही सुस्पष्ट निर्देश नाहीत. याकरिता विशेष हस्ताक्षर-शिक्षक असावा, यासाठी कोणत्याही पातळीवर यत्किंचितही प्रयत्न होत नाहीत. याकरता कोणती साधने वापरावीत, पुस्तके वापरवीत याच्या सूचना नाहीत. चित्रकला, हिंदी, गणित, संस्कृत इ. विषयांच्या प्रमाणपत्र परीक्षा शासन व इतर शेकडो संस्था घेत असतात. हस्ताक्षर या विषयच्या अशा परीक्षा घ्याव्यात, असा प्रयत्न कोठे होत नाही. थोडक्यत सांगावयाचे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अतिमहत्त्वाच्या अशा विषयाला शासनाने व संबंधित संस्थांनी बेवारसपणे वाऱ्यावर सोडून दिलेले आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये फक्त प्लेन इंग्लिश शिकवले जाते. त्यापुढच्या पूर्ण आयुष्यात त्यांना कर्सिव्ह कसे लिहावयाचे, ते माहीत नसते. प्लेन इंग्लिशच घाईगडबडीत एकाला एक जोडून, त्याला कर्सिव्ह समजतात. आयुष्यात याकरता त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून कर्सिव्ह शिकविले जाते. काही शाळांतून ८ वीपर्यंत कर्सिव्ह शिकवितात. ८वीच्या निकालाच्या वेळी विद्यार्थी व पालकांना सांगतात की १०वीच्या उत्तरपत्रिका खेडय़ात तपासावयास जाण्याची शक्यता आहे; तेथे कर्सिव्हचा वापर नसल्यामुळे, तुमच्या उत्तरपत्रिका तपासावयास वेळ लागण्याची शक्यता आहे; तुम्ही लिहिलेले चुकीचे वाचले जाण्याची शक्यता आहे. याकरिता तुम्ही ९वीपासून पुन्हा प्लेन इंग्लिशमध्ये लिहा. प्लेन इंग्लिशचा सराव अजिबात नसल्यामुळे प्लेन इंग्लिश शिकण्याकरिता माझ्याकडे येतात. मला हे आत्मविश्वासाने नमूद करावयाचे आहे की विद्यार्थ्यांचे कर्सिव्ह लेखन हे चांगले असले तर ते खेडय़ातील शिक्षकांना देखील तपासता येईल. याउलट ते जर खराब असेल तर खेडय़ातल्याच काय; पण पुण्या-मुंबईतील नामांकित शाळांतील शिक्षकांनाही वाचता येणार नाही.
कर्सिव्ह लेखन चांगले नसले; तर न्यूनगंडग्रस्त होऊ नका. जवळपासच्या तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्या. योग्य मार्गदर्शनाने कोणाचेही अक्षर फक्त २५ तासांत आमूलाग्र सुधारते, हा मूलमंत्र ध्यानी घ्या. कर्सिव्ह लिहावयास प्लेनपेक्षा वेळ कमी लागतो. वाचलेल्या वेळात नवीन मुद्दे सुचतात. तपासावयास जास्त कालावधी मिळतो. परिणामी महत्त्वाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळते व व्यवहारातही पदोपदी याचा फायदा होतो. कर्सिव्ह लेखन हे एखाद्या अलंकाराप्रमाणे दिसत असल्याने कोणाचेही मन आकर्षून घेते व प्रसन्न करते.
कर्सिव्ह जेथे शिकविले जाते, तेथे प्लेन इंग्रजी जुजबी शिकविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चार-पाच ओळी प्लेन इंग्रजी लिहावयास सांगितल्यास ते फार गोंधळून जातात. त्यांना प्लेन इंग्रजी आत्मविश्वासाने लिहिता येईल. अशा प्रकारचे शिक्षणच दिले जात नाही. याकरिता प्लेन इंग्रजी व्यवस्थित लिहावयास शिकवून नंतर कर्सिव्ह इंग्रजी शिकावयास हवे.
पेन्सिल वापरताना पहिली ओळ व्यवस्थित येते. नंतर क्रमाक्रमाने पेन्सिलचे टोक बोथट होऊन अक्षरही प्रमाणशीर राहात नाही. बेढब होते. येथे सुंदर हस्ताक्षराच्या कार्याचा पाया कच्चा राहतो. याकरिता या मुलांना विविध रंगांच्या स्केच पेनने शिकविल्यास बालसुलभ रंगांच्या आकर्षणामुळे व पेन्सिलमधील उपरोक्त दोष टाळल्यामुळे या विषयाचा पाया पक्का राहील.
अक्षरसुधारणेमध्ये ज्यांना कर्सिव्ह अक्षरात सुधारणा करावयाची आहे, त्यानी सुरुवातीला प्लेन अक्षर व्यवस्थित करून नंतर कर्सिव्ह शिकणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, काही शिक्षकांकडून अज्ञानापोटी मुलांना असे सांगितले जाते की प्लेन शिकताना, तुमचे आहे ते कर्सिव्ह लेखन बिघडेल. सार्वकालिक नियम असा आहे की कोणतीही नवीन गोष्ट शिकताना, अगोदर शिकलेल्या कोणत्याही गोष्टीवर विपरीत परिणाम होत नाही, झालाच तर फायदा होतो.
मूळ इंग्रजी लिपीमध्ये अक्षरांच्या जाडीबद्दल दोन नियम आहेत. वरून खाली येणाऱ्या रेषा जाड असतात. उदा. ‘आय’ची उभी रेघ. आडव्या रेघा व खालून वर जाणाऱ्या रेघा जाड नसतात. उदा. ‘ए’ अक्षरातील पहिली तिरपी व मधील आडवी रेष. हा जाडबारीकपणा फक्त कटनिबनेच काढणे शक्य आहे. साधे फौंटन, जेल पेन, बॉलपेन व पेन्सिल यांनी ते अशक्य आहे.
कटनिबने केलेले लेखन, इतर कोणत्याही साधनांनी केलेल्या साधनापेक्षा अतिसुंदर दिसते. पण त्याच वेळी फक्त कटनिब वापरल्यामुळे अक्षर सुंदर येते, असा काहींचा गैरसमज योग्य नसतो. अक्षर चांगले काढण्यासाठी, योग्य मार्गदर्शन व सरावाची जरूर आहे. जोडीला कटनिब, म्हणजे दुधात साखरच. कटनिबने लिहावयास वेळ लागतो, त्यामुळे उत्तरपत्रिका लिहून होत नाही. अशा भ्रामक समजुतीमुळे या भानगडीत कोणी पडत नाही. सरावाने लेखनाचा वेग वाढतो व आपली उत्तरपत्रिका अपेक्षित वेळात लिहून होते.
कटनिबचे लेखन कमी वेळात वाचून होते, डोळ्यावर ताण पडत नाही, वाचताना चुका होत नाहीत. या सर्वामुळे परीक्षक खुश होतो व त्याच्या हातून जास्तीत जास्त गुण दिले जातात.
कटनिब म्हणजे जुन्या काळाच्या टाकाची नवी आवृत्ती. फौंटन पेन व टाक या दोन्हीतील फायदेशीर गोष्टी घेऊन, तोटय़ाच्या गोष्टी टाळल्या आहेत. शिक्षकांनी या साधनाने सुंदर अक्षर काढावयास शिकावे व विद्यार्थ्यांनाही शिकवावे. खराब अक्षराचा हा जटिल प्रश्न सोडवून, शिवाय स्वत:ला होणाऱ्या, गृहपाठ व उत्तरपत्रिका यातील खराब अक्षरांच्या वाचनामुळे डोळ्यावर पडणारा ताण, मनाला येणारी अप्रसन्नता, विद्यार्थ्यांना कमी गुण देताना होणाऱ्या यातना या सर्वातून शिक्षकांनी मुक्त करावे.