| मराठीत एक म्हण आहे, ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’.. आता लवकरच ही म्हण शब्दश: खरी ठरण्याची वेळ येऊन ठेपलीय. सतत भरभराट, सतत समृद्धी, औद्योगिक प्रगती, वेगानं जवळ येणारं जग या साऱ्या संकल्पनांना लवकरच तिलांजली देण्याची वेळ आता जवळ येतेय. आणि हे असं झालं तर कदाचित तुम्हा-आम्हाला परत एकदा खेडय़ात, जंगलात आदिमानवासारखं राहण्याची पाळीही येण्याची शक्यता आहे. हे सारं वाचायला कल्पनाविलास वाटेल पण दुर्दैवानं हे वास्तवाच्या अगदी जवळ आहे. जगातल्या काही अति-उच्चशिक्षित, विचारी, बुद्धिवंत अशा भूगर्भ आणि भौतिक विज्ञानातल्या शास्त्रज्ञांनी अभ्यासाअंती काढलेलं हे एक महाभयानक अनुमान आहे. हा अभ्यास आहे एका प्रचंड जागतिक घडामोडीचा ज्याला इंग्रजीत ‘पीक ऑईल’ असं म्हणतात. मराठीत याला नक्की काय म्हणतात हे माहिती नाही पण आपण ‘तेल पराकोटी’ असं आपल्या सोयीसाठी याला नाव देऊ.
लाखो वर्षांपूर्वी एका विशिष्ट भूगर्भीय घडामोडीत कोटय़वधी समुद्रीय जीवजंतू मारले गेले. आज आपल्याला मिळत असलेलं तेल आणि वायू या ऊर्जा याच जीवाश्मांपासून मिळतायत. भूगर्भ शास्त्रज्ञांनी खोदून खोदून या पृथ्वीतलावरचे जवळजवळ असे सर्व मोठे तेल आणि वायू साठे शोधून काढले आणि वेड लागल्यासारखं दोन्ही हातांनी मानवानं हे साठे ओरपायला सुरुवात केली. तेल आणि वायूचे हे साठे अमर्याद नाहीत याचं भानच मानवाला उरलं नाही.
साधारणपणे मागची शंभर-सव्वाशे र्वष आपण तेल विहिरींमधून तेल उपसतोय आणि वापरतोय. तेल हा मानवाच्या जीवनातला सर्वात सोपा आणि सर्वात स्वस्त ऊर्जास्रोत आहे. तेल याचा अर्थ नुसतंच आपल्या गाडय़ांमध्ये भरायचं पेट्रोल किंवा डिझेल नव्हे तर याचा अर्थ फार मोठा आणि समर्पक आहे. ऊर्जा निर्माण करण्यासाठी लागणारं तेल आणि वायू, लोकांची किंवा सामानाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी लागणारी तेलं किंवा वायू आणि अन्नपदार्थाच्या निर्मितीसाठी लागणारी ऊर्जा हे सर्वात मोठे प्रकार यात मोडतात. अन्नपदार्थाच्या निर्मितीतही शेत नांगरण्यापासून किंवा रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या निर्मितीपासून ते शेवटी तयार धान्य किंवा त्यापासून केलेली उत्पादनं जगभरात सगळीकडे तुमच्या दारात पोहोचवण्यापर्यंत संपूर्ण साखळीचा समावेश आहे.
कल्पना करा ऊर्जेशिवाय आपलं सर्वसाधारण जीवनमान चालू शकेल? ऊर्जेशिवाय फक्त तुमच्या घरातले दिवेच जातील किंवा तुमच्या बिल्डिंगची लिफ्ट चालणार नाही असं समजू नका तर तुमचं सगळं जीवनमानच ठप्प होईल. पाणी येणार नाही, मलनि:सारण केंद्रे चालणार नाहीत, तुमच्या घराच्या आसपासचा कचरा उचलला जाणार नाही. रोगराई पसरेल, औषधं मिळणार नाहीत.. लाखो लोक मरण पावतील..
‘तेल पराकोटी’ ही संज्ञा तेलाच्या संपण्याबद्दलची माहिती देणारी संज्ञा नाही तर तेलाच्या उच्चतम उत्पादनाविषयी माहिती देणारी संज्ञा आहे. प्रत्येक तेलविहिरीतून दिवसाला विशिष्ट प्रमाणात तेल उत्पादन होतं. या तेल उत्पादनाच्या प्रमाणाचा ग्राफ जर काढायचा झाला तर तो घंटेच्या आकाराचा दिसतो. याचा दुसरा अर्थ असा की कुठल्याही तेलस्रोतातून मिळणाऱ्या तेलाच्या प्रमाणात विशिष्ट काळापर्यंत वाढ होत जाते. ही वाढ एका उच्चतम पातळीपर्यंत जाऊन पोहोचते आणि तिथून नंतर हे उत्पादनाचं प्रमाण घटत घटत जाऊन शेवटी त्या स्रोतातून मिळणारं तेल संपून जातं. तेल उत्पादनाची ही उच्चतम पातळी म्हणजेच ‘पीक ऑईल’ किंवा ‘तेल पराकोटी’. असाच ग्राफ तेलविहिरी असलेल्या एखाद्या प्रदेशाचा किंवा राष्ट्राचा किंवा संपूर्ण जगाचाही काढता येतो. अगदी किरकोळ फरकानं या प्रत्येक ग्राफचा आकार घंटेच्या आकाराचाच दिसतो. खाली दिलेलं चित्र बघितल्यावर हे चटकन तुमच्या लक्षात येऊ शकेल.
या बरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या तेल विहिरींतून मिळणाऱ्या अंतिम तेल उत्पादनाच्या प्रमाणात फरक असतो. हे प्रमाण सहसा EROEI (energy returned on energy invested) या संज्ञेनं दाखवलं जातं. याचा अर्थ असा की एक पिंप शुद्ध तेल मिळविण्यासाठी किती ऊर्जा खर्च करावी लागते हे प्रमाण. ५० वर्षांपूर्वी काही अशा तेलविहिरी होत्या की जिथं एक पिंपे तेलाच्या खर्चात जवळपास ४०० पिंप तेल उत्पादन व्हायचं. आज सरासरी हेच प्रमाण १ : ८ च्या आसपास आहे. याचा दुसरा आणि सरळ अर्थ म्हणजे सहज सोप्या रीतीनं मिळणारं, उच्च EROEI चं आणि चांगल्या प्रतीचं तेल आणि वायू आता संपून गेलाय. आणि म्हणूनच अजूनही नवनव्या तेलविहिरी सापडतायत पण तरीही जागतिक पातळीवर तेलाच्या उत्पादनाचं सरासरी प्रमाण उतरंडीला लागलंय. जागतिक पातळीवर आपण ‘तेल पराकोटी’ नुकतीच पार केली आहे आणि आता घसरण चालू झाली आहे. आणि दुसऱ्या हाताला आपली तेलाची गरज मात्र प्रत्येक दिवशी वाढतेच आहे. बेबंद वाढणारी लोकसंख्या, पाश्चिमात्य देशांमधली ऐश्वर्याची धुंदी, त्यांचं मोठमोठय़ा गाडय़ांचं, वातानुकूलन यंत्रणांचं, हॉलिडे पॅकेजेस्चं आणि ‘गिव्ह अवे एअर फेअर्स’चे चोचले आणि दिवसागणिक वाढत जाणारी माणसाची भोगवृत्ती आणि चीन, भारत अशा देशांची औद्योगिक भरभराटीची हाव - हे सारंच शेवटी ऊर्जेचा वापर (खरं तर गैरवापर) अमर्याद वाढण्यातच फक्त रूपांतरित होतंय.
त्यामुळे थोडक्यात एका बाजूला तेलाचं उत्पादन आता उतरंडीला लागलंय आणि दुसरीकडे आपली तेलाची गरज वाढत चाललीय. याचा परिणाम म्हणजे इथून पुढच्या काळात तेलाच्या किमती प्रचंड वाढत जातील. त्यामुळे आर्थिक मंदी येईल, तेलाची गरज त्यामुळे थोडीशी कमी होईल. याचा परिपाक म्हणून तेलाच्या किमती परत खाली येतील, पण किमतीतली ही घट फार मोठा काळ टिकणारी नसेल. तेलाच्या किमतीमधली ही चढउतार आणि आर्थिक मंदीची ही चक्रं - या साऱ्या रोलर कोस्टर राईडमध्ये आपण सगळेच आता स्वार झालो आहोत. आर्थिक मंदी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या तेलाच्या किमतीतल्या पडझडीच्या पहिल्या जीवघेण्या आवर्तनात सध्या आपण फिरतोय आणि चक्कर यायला सुरुवात झाली आहे..
१९५० च्या सुमारास अमेरिका जगातला सर्वात मोठा तेल उत्पादक देश होता. प्रचंड मोठे तेल साठे त्या वेळेस अमेरिकेच्या तेल कंपन्यांना सापडले होते आणि त्या देणगीवरच १९५० पासून पुढे अमेरिकेची औद्योगिक आणि व्यावहारिक भरभराट वेगवान गतीनं झाली होती. आणि ही देणगी आपल्याला जणू अनंतापर्यंत मिळाली आहे अशाच भ्रामक समजुतीत अमेरिकन  शास्त्रज्ञ, उद्योजक आणि राज्यकर्ते त्या वेळी (आणि जवळजवळ आत्तापर्यंत) मशगूल होते. पण याहीवेळी शेलमध्ये काम करणारा एक भूगर्भ तज्ज्ञ दूरदृष्टी असलेला होता आणि त्याचं नाव होतं मेरियन किंग हबर्ट.
१९५६ मध्ये हबर्टच्या लक्षात आलं होतं की अमेरिकेतल्या तेलाचं उत्पादन एका विशिष्ट वेळी उच्चतम पातळीवर पोहोचणार आहे आणि त्यानंतर ज्या प्रमाणात उत्पादन वाढत गेलं त्याच प्रमाणात ते घटतही जाणार आहे. म्हणजेच याचा ग्राफ घंटेच्या आकाराचा असेल. आणि या बरोबरच हबर्टनं हेही सिद्ध करून दाखवलं की, १९७० हीच ती विशिष्ट वेळ आहे. ज्या सुमारास अमेरिकेचं तेल उत्पादन पराकोटीला पोहोचलेलं असेल आणि तिथपासून ते उतरंडीला लागेल.
शेलनं, जिथं हबर्ट काम करायचा, हबर्टचं संशोधन बाहेर येऊ न देण्यासाठी खूप धडपड केली. हबर्टवर दडपणं आणली. कारण त्यांना त्यांच्या शेअर्सच्या किमती घसरण्याची भीती वाटत होती. पण सत्य बाहेर आल्यावाचून राहिलं नाही. १९७० पासून अमेरिकेच्या तेल आणि वायूच्या झऱ्यांना ओहोटी लागली आणि प्रत्येक वर्षी आयात केलं जाणारं तेलाचं प्रमाण वाढत जायला लागलं. हबर्टच्याच पद्धतीनं मग संपूर्ण जगाचं तेल उत्पादन पराकोटीला कधी पोहोचेल यावर अभ्यास केला गेला. आणि तेल पराकोटीच्या या अभ्यासावरून तेलाचं उत्पादन कसं घटत जाईल याचे आडाखे बांधले गेले.
या सर्वच अभ्यासांनी थोडय़ाफार फरकांनी असं दाखवलं की साधारणपणे २००० ते २०१० च्या दरम्यान जग तेल उत्पादन ‘तेल पराकोटीला’ पोहोचेल आणि मग तिथून हे प्रमाण कमी कमी होत जाईल. याचा दुसरा अर्थ असा की समजा २००० साली आपण ‘तेल पराकोटीला’ पोहोचणार असं समजलं तर १९७० साली तेलाचं उत्पादन जेवढं होतं तेवढंच ते २०३० साली पण असेल. खालील आलेख बघितल्यावर हे पटकन लक्षात येईल.
पण त्याचबरोबर २००० साली आपण तेल पराकोटीला पोहोचणार असं समजलं तर १९७० साली ज्या प्रमाणात या तेलाची गरज असेल त्याच्या कित्येक पटींनी जास्त गरज २०३० साली असेल. याचं मुख्य कारण म्हणजे २०३० साली १९७० च्या तिप्पट झालेली लोकसंख्या, लोकांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये झालेली वाढ, औद्योगिक भरभराटीमुळे वाढलेलं तेल- अवलंबन. त्यामुळे त्या वेळी जागतिक पातळीवर तेलाची गरज आणि तेल उत्पादन यातली तफावत फार मोठी असणार आहे. आणि याचा दुसरा अर्थ म्हणजे तेलाच्या किमती आभाळाला भिडतील, गरीब देश अक्षरश: भिकेला लागतील आणि अर्थातच त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणारे परिणामही भयानक असतील. भारतासारख्या तेलाची प्रचंड गरज असलेल्या आर्थिक सत्तेला तर तिच्या निकडीच्या दहा टक्के तेल जरी कमी मिळालं तरीही ही संस्था संपूर्ण मोडकळीस येण्यास ते पुरेसं ठरू शकेल.
तेल उत्पादन घसरणीला लागल्यानंतर (आणि आता घसरण चालू झालीच आहे असं समजायला पुरेसे शास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत.) दरवर्षी सर्वसाधारणपणे ३ ते ४ टक्के उत्पादनात घट येत जाईल असं समजायला काही हरकत नाही. बऱ्याचशा भूगर्भ शास्त्रज्ञांच्या अभ्यासाप्रमाणे जागतिक ‘तेल पराकोटी’ २००५ लाच होऊन गेलीय. आणि उरलेल्यांच्या मते ती साधारण २००५ ते २०१० या दरम्यान कधीतरी होणार आहे. हे सगळं जर का खरं असेल (जी शक्यता सगळ्यात जास्त आहे) तर पुढच्या चार-पाच वर्षांत आपल्याला याचे दणके बसायला सुरुवात होईल हे गृहीत धरायला हरकत नाही आणि या घसरगुंडीवरून आपण जसजसे खाली यायला लागू तसतसे आपण औद्योगिक पश्चात अश्मयुगाच्या जवळजवळ जाण्याची शक्यताही वाढत जाईल.
‘तेल पराकोटीची’ ही गोष्ट म्हणजे धनदांडग्या उत्पादकांच्या आणि पावटय़ा राजकारण्यांच्या बेफिकिरीचं आणि नालायकपणाचं उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेतल्या तेल उत्पादनाला १९७० पासून ओहोटी लागेल हे हबर्टनं त्या पूर्वी वीस वर्षे आधीच सांगितलं होतं. आणि तसंच झालं. १९७० पासून पुढे प्रत्येक वर्षी अमेरिकेचे तेल उत्पादन घटतच गेलंय आणि आयात  वाढतच गेलीय. अलास्कामध्ये अमेरिकेला अचानक सापडलेल्या १३० कोटी पिंपांच्या तेल साठय़ानंही अमेरिकेचा तेल पराकोटीत फारसा काहीच फरक पडला नाही.
अशा रीतीनं ‘तेल पराकोटी’ ही संकल्पना आता आपल्या लक्षात आली असेल. आधी म्हटल्याप्रमाणे ‘तेल पराकोटी’ म्हणजे तेलाचं संपणं नाही तर तेलाचं पराकोटीचं उत्पादन. तेल एकदम एका दिवशी नाहीसं होणार नाहीय तर पुढच्या पन्नास-साठ वर्षांत हळूहळू कमी होत जाईल आणि जसजसं त्याचं उत्पादन कमी कमी होत जाईल तसतसं त्याची किंमत पण वाढत जाईल. त्यामुळे खरा प्रश्न ‘तेल संपण्या’चा नसून, तेल जसजसं कमी होत जाईल तसतसा आपल्यासारख्या तेलाच्या आयातीवरच संपूर्ण अर्थकारण अवलंबून असणाऱ्या देशांचं काय होईल हा आहे. आणि आपल्यासारख्या अर्थसत्तेला कोलमडून पडायला अगदी तेल संपेपर्यंत वाट बघावी लागणार नाही. आपल्या गरजेच्या जेमतेम १०% तेल जरी आपल्याला कमी मिळालं तरीसुद्धा बास आहे. आपला सारा आर्थिक विकासाचा वेग, सारं औद्योगिकीकरण उन्मळून पडायला ते पुरेसं आहे.
हे सारं नक्की कधी होईल हे सांगणं खूप कठीण आहे. याचा अंदाज बांधण्यासाठी तेल साठे किती शिल्लक आहेत हे साधारणपणे बघूया. निसर्गानं मुळात मानवाला साधारण २ ट्रिलियन पिंप भरून तेल दिलं होतं असं समजायला हरकत नाही. हा आकडा थोडासा, पण अगदी थोडासाच, वाढत जातोय. याला बरीच कारणं आहेत. यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानातली आधुनिकता आणि नवनवीन तेलविहिरींचा शोध. दुसरं म्हणजे जसं तेल कमी होत जाईल तसतशी त्याची किंमत वाढत जाईल आणि अवघड ठिकाणचं किंवा कमी EROEI असलेलं तेल काढणंही परवडू शकेल आणि तिसरी गोष्ट  म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे तेल साठय़ांचे आकडे तेल कंपन्या आणि देश बऱ्याच वेळेस खोटेच सांगतात आणि त्यामुळे अगदी नेमका अंदाज सांगणं अवघड असतं.
वर म्हटल्याप्रमाणे साधारणपणे २ ट्रिलियन (२०००,००,००,००,०००) पिंपं तेल मुळात या पृथ्वीवर होतं आणि त्यातलं आतापर्यंत निम्म्यापेक्षा थोडं अधिक संपलंय. म्हणजेच अजून साधारण ट्रिलियन (१०००,००,००,००,०००) पिंपं शिल्लक आहे. वर्षांला अंदाजे दोन हजार पाचशे कोटी पिंपं तेल आपण संपवतो असं गृहीत धरलं तर पुढची अजून चाळीस र्वष आपल्याला तेल पुरेल असा युक्तिवाद मांडता येईल. पण हा युक्तिवाद काही फारसा पटण्यासारखा नाही. खालचा आलेख बघितला की आपली तेलाची भूक प्रत्येक वर्षांला कशी वाढतेय ते लक्षात येईल आणि मागच्या दहा वर्षांत ही भूक आणखी जोरात वाढतेय. कारण चीन आणि आपण दोघंही आता महासत्ता बनण्याच्या धावपळीत आहोत आणि आपली भूक इतर सगळ्यांच्या तुलनेत वेगानं वाढते आहे.
जगाच्या संपूर्ण तेल साठय़ांच्या तुलनेत कुठल्या देशाकडे किती साठे शिल्लक आहेत ते आता बघू. खाली दिलेले आकडे साधारण आणि गोळाबेरीज approximate and rounded) आहेत.
देश एकूण शिल्लक
तेलाच्या %

मी वर म्हटल्याप्रमाणे खरा प्रश्न तेल संपण्याचा किंवा ऊर्जा उपलब्धतेचा नसून, त्या आर्थिक गणितावर हे आपलं आधुनिक जग उभं आहे हे गणितच चुकीचं ठरण्याचा आहे. जशी या ऊर्जा स्रोतांना घसरगुंडी लागेल त्या प्रमाणातच किंवा अधिक संपत्तीच्या निर्मितीलाही घसरगुंडी लागण्याची शक्यता आहे आणि ही घसरण अशा पातळीपर्यंत मानवतेला खाली आणेल की तेलाधारित औद्योगिकता त्यावर आधारित ऐश्वर्य या गोष्टी इतिहासजमा होऊ शकतील. याच्याबरोबरीनंच शेती आणि अन्न उत्पादनाचं औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरण संपुष्टात येईल आणि काही तज्ज्ञांचं असंही मत आहे की, या साऱ्यांबरोबरच आणि यामुळे कल्पनेपेक्षाही फार मोठय़ा प्रमाणात जनसंहार होईल. हे खूपच निराशावादी चित्र वाटेल पण यावर विश्वास ठेवण्याइतपत याला तार्किक बैठक नक्कीच आहे.
हे सारं खूप अतिरंजित वाटलं तरी जगातले तेल आणि वायू साठे आता मर्यादितच आहेत आणि त्यामुळे त्यावर आधारित जीवन पद्धतीलाही खीळ बसणार आहे यात कुठलीही शंका नाही. मोटारी, ट्रक, बस, विमानं, जहाजं चालणं दुरापास्त तर होईलच पण या साऱ्या वाहनांची निर्मिती, प्लास्टिकच्या वस्तूंची निर्मिती, कापड, रसायनं, औषधं, संगणक, मोबाईल फोन, केबल्स, आगगाडय़ा, संरक्षण सामग्री या साऱ्या गोष्टींचीही निर्मिती ठप्प होईल.
पण म्हणजेच या समस्येला काहीच उत्तर नाही? भरभराटीला आणि संपत्तीच्या निर्मितीचं उदात्तीकरण करणाऱ्या अर्थतज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, जसजशी तेलाची टंचाई वाढत जाईल तसतशी पर्यायी ऊर्जेची निर्मिती परवडू शकेल. तसंच जशी तेलाची किंमत वाढत जाईल तसतशी पर्यायी ऊर्जानिर्मितीतली गुंतवणूकही वाढत जाईल आणि मानवाच्या बुद्धीची प्रगल्भता नवनवीन ऊर्जा प्रकार शोधून काढेल. ही कारणमीमांसा फार पटत नाही. कारण एक अणू ऊर्जा सोडली तर कुठलीच ऊर्जा तेल किंवा नैसर्गिक वायूएवढी कार्यक्षमही नाही आणि स्वस्तही. या संदर्भात आपल्याकडे इतर काय पर्याय उपलब्ध आहेत हेही बघणं आवश्यक ठरतं.
नैसर्गिक वायू हा तेलाला एक चांगला पर्याय आहे आणि बऱ्याच देशांमध्ये (आपल्याकडेही) आता वाहनांच्या इंधनासाठी काँप्रेस्ड नॅचरल गॅस मोठय़ा प्रमाणावर वापरला जातो. परंतु नैसर्गिक वायूची पराकोटी तेलाच्या पाठोपाठच दहा एक वर्षांनी येते त्यामुळे केवळ तात्पुरती व्यवस्था म्हणूनच याकडे बघता येईल.
आणखी एक खूप मोठय़ा प्रमाणात उपलब्धता असलेला पर्याय म्हणजे टार सँड किंवा शेल ऑईल. टार सँड म्हणजे तेल असलेली डांबरासारखी दिसणारी वाळू. या वाळूत तेलाचं प्रमाण खूप प्रचंड आहे. (विशेषत: कॅनडात). पण या पर्यायालाही बऱ्याच मर्यादा आहेत. मागचे जवळजवळ ५०-६० वर्षे तेल कंपन्यांचे शास्त्रज्ञ या वाळूतून परिणामकारकरीत्या तेल काढायचा प्रयत्न करतायत आणि त्यात त्यांना फारसं यश मिळालेलं नाहीय. म्हणजे या तेलाचा EROEI १ पिंपास १.५ पिंप यापेक्षा सुधारूच शकत नाहीय. त्याशिवाय या तेलाच्या शुद्धीकरणातून प्रचंड मोठय़ा प्रमाणात अपायकारक वायू आणि पदार्थाची निर्मिती यावरही तोडगा सापडू शकलेला नाहीय आणि एकूणात चित्र फारसं आशावादी नाहीय.
कोळसा हा आणखी एक प्रचंड उपलब्धता असलेला पर्याय आहे. असं म्हणतात की कोळशाचे एवढे प्रचंड साठे आहेत की निदान शंभर वर्षे तरी (!) आपल्याला चिंता करायचं कारण नाही (खरं खोटं देवालाच माहिती!). पण कोळशाला घाणेरडी ऊर्जा म्हटलं जातं. कारण या ऊर्जेचा वापर म्हणजे पारंपरिक वातावरण प्रदूषणाची खात्रीच. कोळसा जर त्याला इंधनात रूपांतरित करायचा प्रयत्न केला तर त्याच्या बरोबरीनं आर्सेनिक, पारा, गंधक अशा गोष्टी वातावरणात सोडतो. म्हणजे आपण ऊर्जेच्या अभावानं मरणार नाही तर प्रदूषणानं!
पवन ऊर्जा, सूर्य शक्ती (सोलर एनर्जी), बायोमास एनर्जी हे आणखी काही पर्याय आहेत. पण तेलाच्या चढत्या-उतरत्या किमतीमुळे यांच्या संशोधनावर बरेच परिणाम घडतात. दुसरी गोष्ट म्हणजे या साऱ्या ऊर्जा एवढय़ा प्रचंड महाग आहेत की यांची उपलब्धता हाच एक मोठा प्रश्न ठरू शकेल. या साऱ्या ऊर्जा मिळूनही जगाच्या ऊर्जा निकडीच्या फक्त काही प्रमाणातच ऊर्जा उपलब्ध होईल.
या सगळ्यावर उत्तर ठरू शकेल असा कदाचित एकच पर्याय आहे. हा पर्याय म्हणजे अक्षरश: आशेचा बारीक कवडसा आहे. आणि हा पर्याय म्हणजे आण्विक ऊर्जा. थर्मोन्यूक्लिअर फ्यूजनमधून तयार झालेली ऊर्जा. पण दुर्दैवाने आपण पूर्ण यशस्वीपणे ही ऊर्जा मिळवायला अजून निदान पन्नास र्वष तरी आपलं संशोधन लांब आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
यापूर्वी म्हटल्याप्रमाणे तेल कंपन्या त्यांच्याकडे असलेल्या तेल साठय़ांबाबत कधीही खरं बोलत नाहीत. कारण त्यांच्या समभागांचे बाजारभाव त्यांच्या तब्येतीवरच अवलंबून असतात. दुसरं म्हणजे या कंपन्यांच्या ख्यालीखुशालीवर देशाचं (विशेषत: अमेरिकेसारख्या) अर्थकारण बऱ्याच मोठय़ा प्रमाणात अवलंबून असतं. त्यामुळे यांच्या थापेबाजीला सरकारं आणि राजकारणीही पाठिंबा देतात.
या साऱ्या कारणांमुळे हे सांगता येणं अवघडच आहे की नक्की तेल आणि वायूचे साठे कधी आणि कसे कसे संपत जातील. पण एक गोष्ट निर्विवाद आहे की आपण आता अशा एका भविष्याला सामोरे जातोय की जिथे संपूर्ण अनिश्चितता, असुरक्षितता आणि अंधकार भरलेला असेल. या अनिश्चितता आणि असुरक्षिततेच्या पोटीच अमेरिकेनं इराकवर हल्ला केला असणार असं तर्कशास्त्र मांडणारे जगात बरेच लोक आहेत. हेच कारण अमेरिका आणि इराण यांच्यातल्या धुसफुशीमागे असण्याची शक्यताही दाट असणार.
जगातल्या शिल्लक तेलसाठय़ांपैकी दोन- तृतीयांश किंवा अधिक साठे आता मध्यपूर्वेत शिल्लक आहेत. अमेरिकेकडे आता लक्षणीय तेलसाठे जवळजवळ नाहीतच आणि त्यामुळे मध्यपूर्वेत आपली दादागिरी चालू राहण्याची तीव्र इच्छा अमेरिकेला असणार यात कुठलीही शंका नाही. या इच्छेपोटीच आपली एक चौकी (इराक) अमेरिकेनं या भागात बसवली असणार. संपूर्ण जगाच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकणाऱ्या नीतीची ही पहिली पायरी असावी असं वाटतं. इस्रायलच्या अरब राष्ट्रांशी असणाऱ्या शत्रुत्वाला त्याची स्वत:ची अशी कारणं आहेत. या कारणांसाठीच इस्रायल अमेरिकेवर (आणि इंग्लंडवर) या भागात त्यांची (सैन्याची) कारवाई करायला दबाव टाकत आहे. खरं तर मागची बरीच वर्षं इस्रायल अमेरिकेवर हा दबाव टाकतंय पण आता आताच अमेरिकेनं इस्रायलची विनंती लक्षात घ्यायला सुरुवात केली आहे आणि याचंही खरं कारण या भागातली आपली दादागिरी वाढवणं आणि त्यायोगे तेलावरचं आपलं नियंत्रण कमी होऊ न देणं हेच असावं असं दिसतंय. आता हेच सारं तर्कशास्त्र आणखी पुढे ताणलं आणि तेलाची टंचाई वाढीला लागली तर येत्या काही वर्षांत अमेरिकेनं सौदी अरेबियाची सत्ता काबीज केल्यासही नवल वाटण्याचं कारण नाही.
दुसऱ्या बाजूला जसजसं अमेरिका मध्य- पूर्वेतलं आपलं स्थान बळकट करत जाईल तसतसं मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांचा अमेरिकेच्या विरोधातला रोषही वाढत जाईल आणि मुस्लीम देशांमधला या मूलतत्त्ववाद्यांचा पाठिंबा वाढत जाईल. या पाश्र्वभूमीवर लष्कर-ए-तैय्यबासारख्या अतिरेकी संघटनांचं उद्दिष्ट न्यूयॉर्क, दिल्ली आणि तेल अव्हीववर इस्लामचा झेंडा फडकावणं लक्षात येण्यासारखं आहे. आणि मागच्या काही वर्षांमधल्या त्यांच्या आपल्या देशातल्या वाढत असलेल्या हल्ल्यांमागची विचारसरणीही लक्षात येऊ शकते.
या सगळ्याचा भारताच्या दृष्टीनं अर्थ काही फारसा चांगला नाही. भारताची तेलाची भूक दिवसेंदिवस वाढतच जाते. आपल्या आर्थिक प्रगतीचा वेगही तेलाच्या किमतीवर आणि तेलाच्या उपलब्धतेवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहे. दुसरं म्हणजे रॉकेलसारखं इंधन जे सर्वसाधारण मनुष्य वापरतो ते राजकीय कारणांमुळे महाग करणं (आंतरराष्ट्रीय किमतीच्या बरोबरच) आपल्याला अशक्य आहे. त्यामुळे सरकारचा यावरचा खर्च वाढतच जाईल. याबरोबरच आपली वाढत जाणारी लोकसंख्या आपल्यासाठी ही समस्या जटिल करू शकते. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला तेल उत्पादक (मुख्यत्वे अरब) देशांबरोबरही मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतील आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांशीही संबंध बिघडून चालणार नाही. ही खरंच अवघड तारेवरची कसरत असेल. याबरोबरच अमेरिकेनं मध्य पूर्वेतलं आपलं बस्तान जर घट्ट करायला सुरुवात केली तर अमेरिकेच्या बरोबरच आपल्या देशातही अतिरेकी हल्ले वाढत जाऊ शकतील आणि ही एक डोकेदुखीच होऊन बसेल. पाकिस्तानशी युद्धजन्य परिस्थिती ही पण एक कायमचीच गोष्ट होऊ शकेल आणि याचाही आर्थिक प्रगतीला फटका बसेल.
जागतिक नेत्यांनी आता तरी जागं होणं आवश्यक आहे आणि या समस्येकडे काळजीपूर्वक बघणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खरंतर या समस्येकडे एक नवीन ऊर्जा शोधून काढण्याची एक सुवर्णसंधी म्हणून बघितलं तर पर्याय सापडूही शकेल. सामुदायिकरीत्या पर्यायी ऊर्जेच्या संशोधनावर पुढची पंधरा-वीस वर्षे जर लक्ष केंद्रित केलं आणि यासाठी लागणारा पैसा उपलब्ध करून दिला गेला तर उत्तर सापडणं अवघड नाही.
या लेखमालेच्या शेवटी पुन्हा एकदा थोडंसं, हा प्रश्न कशानं थोडासा हलका होऊ शकेल आणि कशानं जास्त अवघड होऊन बसेल हे बघूया.
प्रथम कुठल्या गोष्टींनी हा प्रश्न सुटेल किंवा हलका होईल.
१) ‘तेल पराकोटी’ दाखवून देणारं हबर्ट आणि इतर भूगर्भ तज्ज्ञांचं संशोधन चुकीचं असल्याचं सिद्ध झालं.
२) मध्यपूर्वेत आताच्या अंदाजांपेक्षा खूप जास्त तेल साठे सापडले.
३) मध्यपूर्वेत किंवा जगात इतरत्र कुठेही तेलाचे अतिप्रचंड साठे सापडले.
४) तेल संवर्धनावर संशोधन होऊन तेलाची गरज कमी करण्यात यश मिळालं.
५) आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्रितरीत्या संशोधन करून नवीन आणि पुरेशी ऊर्जा उपलब्ध झाली.
६) चीन आणि भारतानं वाहनांच्या आणि औद्योगिक संयंत्रांच्या कार्यक्षमतेवर कडक र्निबध लागू केले.
७) सँड ऑईल, शेल ऑईल, कोळसा यावर अधिक संशोधन होऊन या इंधनाची शुद्धीकरणाची कार्यक्षम पद्धती शोधून काढण्यात आली.
आता कुठच्या गोष्टी या समस्येला अधिक अवघड बनवतील-
१) तेल पराकोटी या संशोधनाप्रमाणेच किंवा त्याआधीच झाली असेल.
२) मध्यपूर्वेतले तेल साठे घोषित साठय़ांपेक्षा कमी असतील.
३) अतिरेकी हल्ले आणि युद्धं.
४) तेल उत्पादक देशांमध्ये राजकीय अस्थैर्य.
५) तेल पराकोटीच्या समस्येवर तोडगा शोधण्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायांकडून होणारा उशीर.
६) ग्राहकांची वाढती भोगलोलुपता.
७) लोकसंख्येत अमर्यादित वाढ.
वरचे हे दोन्ही मुद्दे आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी बघितल्या तर ही समस्या अवघड बनवणारे जे मुद्दे वर मांडले आहेत ते दुर्दैवानं आज तरी जास्त सयुक्तिक वाटतात आणि ही गोष्ट या जगासाठी चांगली नाहीच.
शेवटी, आपल्या भविष्यात नक्की काय लिहिलंय? खरं तर कुणास ठाऊक, पण एक गोष्ट नक्की की तेल संपणार आहे आणि त्यामुळे खूप मोठे घोटाळे होणार आहेत. या घोटाळ्यांची सुरुवात झालीही असेल किंवा कदाचित येत्या काही वर्षांतच होईल. वर्ष, दोन र्वष, दहा र्वष किंवा अगदी वीस र्वष.. मानवतेच्या इतिहासाच्या पाश्र्वभूमीवर या आकडय़ांना फारसं काहीच महत्त्व नाही. आपण किंवा आपली मुलं किंवा अगदी फार फार तर आपली नातवंडं या वैश्विक होळीत होरपळून निघणार यात कुठलीच शंका नाही. या शतकात अशा रीतीने संपूर्णपणे आपणही जीवाश्म इंधनं वापरून संपवून टाकली तर आणि तरीही ही पृथ्वी वास्तव्य करण्याजोगी उरली असली तर संपूर्ण नवीन इंधनरहित अशी जीवनपद्धती आपल्याला शोधून मात्र काढायला लागेल.
milindganeshjoshi@gmail.com
|