मेष चंद्रग्रहण राशीच्या भाग्यस्थानात होईल. मंगळ राशीच्या धनस्थानात येणार आहे. त्याचा आर्थिक स्थिती भक्कम करायला उपयोग होईल. व्यापारात-जीवनात एखाद्या कारणाने नेहमीपेक्षा जादा पैशाची गरज असेल. ती भागल्याने तणाव जाणवणार नाही. ज्या गोष्टीत मार्ग मिळत नव्हता तो मिळेल. जादा कमाईसाठी मोठे काम करावेसे वाटेल. घरातील एखाद्या कार्यक्रमाकरता मोठी खरेदी किंवा इतर गोष्टींचे नियोजन होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाकरता योग्य दिशा मिळेल.
.......................................................
वृषभ राशीच्या अष्टमस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. धनस्थानातून बुध गुरूशी त्रिकोण तर शुक्र हर्षल लाभयोग होणार आहे. तुमची उमेद वाढवणारे ग्रहमान आहे. सर्वकाही ठीक असूनही अचानक काहीतरी बिनसते असा अनुभव येण्याची शक्यता आहे. मन स्थिर ठेवून काम करा. व्यापार धंद्यात पैशाची अतिहाव ठेवू नका. नवीन गुंतवणूकीचे पर्याय शक्यतो लांबवा. नोकरीमधे कामात अनपेक्षित तांत्रिक अडचणी येतील. त्यामुळे रोजच्या कार्यक्रमात फेरबदल होतील. घरामध्ये प्रत्येकाचे समाधान करणे कठीण जाईल.
.......................................................
मिथुन चंद्रग्रहण राशीच्या सप्तमस्थानात होणार आहे. बुध गुरू त्रिकोण राशीतून होईल. कोणत्याही कामात घाई न करता थोडेसे विचाराने वागलात तर अनाठायी होणारे खर्च टळतील. ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्याची विश्वासपात्रता तपासून पाहा. व्यवसाय उद्योगात नवीन संधी दार ठोठावतील. त्यातील संभाव्य धोक्यांचा आधीच नीट विचार करा. नोकरीत खरे हितचिंतक आणि छुपे शत्रू यांचा अंदाज घ्या. तरुणांनी चुकीची संगत टाळावी. घरात जोडीदारच्या स्वास्थ्याविषयी चिंता वाटेल.
.......................................................
कर्क राशीच्या षष्ठस्थानात चंद्रग्रहण होईल. शुक्र मंगळ लाभस्थानात येणार आहे. ते आर्थिक स्थिती सुधारायला मदत करतील. ज्यांच्या मनात तुमच्याविषयी असूया आहे त्यांचा चेहरा आणि मुखवटा यातील फरक लक्षात घ्या. पैशाची बाजू चांगली असेल. मात्र स्पर्धकांना कमी लेखून चालणार नाही. नोकरीमध्ये सहकाऱ्यांना कोणताही सल्ला देण्याच्या भानगडीत न पडता निगुतीने काम करा. नातेवाईक, आप्तेष्ट यांचे जेवढे कौतुकाने कराल तेवढा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळणार नाही. प्रकृती सांभाळा.
.......................................................
सिंह चलनवलन घडवून आणणारा मंगळ दशमस्थानात येणार आहे. चंद्रग्रहण राशीच्या पंचमस्थानात होणार आहे. आपुलकीच्या व्यक्तींकडून साथ न लाभल्याने निराशा येईल. स्वयंभू राहिलात तर त्याचा त्रास वाटणार नाही. उद्योगधंद्यात काहीतरी भव्यदिव्य करण्याचा मोह होईल. नशिबापेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या. नोकरीत अचानक काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यातून तात्पुरता फायदा मिळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीविषयी चिंता वाटेल.
.......................................................
कन्या मंगळाने भाग्यस्थानात हजेरी लावली आहे. दीड महिन्याच्या अवधीत बरेच खर्च वाढले. ते आता नियंत्रणात आल्याने सुटकेचा निश्वास टाकू शकाल. ग्रहमान तुमचे मनोधैर्य वाढवणारे आहे. मात्र चतुर्थस्थानातील चंद्रग्रहण घरगुती प्रश्नांकडे लक्ष वेधून घेईल. वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घेणे भाग पडेल. व्यापारातील कामाचे चित्र आशादायक असेल. तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढत राहतील. नोकरीमध्ये कंटाळवाणे काम संपेल. तरुणांना आवडीच्या करिअरचा मार्ग दिसेल.
.......................................................
तूळ शुक्र अष्टमस्थानात आहे आणि मंगळही तेथे हजेरी लावेल. चंद्रग्रहण राशीच्या तृतीयस्थानात होईल. शब्द हे शस्त्र आहे याची सतत मनात जाणीव ठेवा. तुमच्या वागण्या बोलण्याने कोणाचा गैरसमज होत नाही याची काळजी घ्या. व्यवसायातील परिस्थिती साधारण राहील. ज्याकरता कर्ज काढाल त्याच कारणासाठी खर्च करा. नोकरीत सहकाऱ्यांची अनुपस्थिती किंवा काही कारणाने कामाचा भार वाढेल. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील.
.......................................................
वृश्चिक मंगळ सप्तमस्थानात येणार आहे. तो गुरूशी केंद्र आणि हर्षलाशी त्रिकोण करेल. चंद्रग्रहण राशीच्या धनस्थानातून होईल. लांबलेल्या कामांकरता कोणावरही विसंबून राहू नका. व्यापारात कामाचे प्रमाण तात्पुरते कमी होईल. जोडधंद्यातून मोठय़ा फायद्याची अपेक्षा करू नका. नोकरीत कामाचे गणित मागेपुढे होण्याची शक्यता आहे. घरातील नैतिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. सर्दी किंवा घशाचे विकार असणाऱ्यांची काळजी घ्यावी.
.......................................................
धनू मंगळ राशीच्या षष्ठस्थानात प्रवेश करेल. स्पर्धकांवर मात करण्याची संधी तुम्हाला हेरून ठेवता येईल. मात्र त्यातही चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. तुमच्याच राशीत चंद्रग्रहण होत आहे. वादविवादाच्या प्रसंगात ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ हे ध्यानात ठेवा. व्यापारात स्पर्धकांशी तुलना न करता स्वत:च्या पद्धतीने काम करा. नोकरीत न बोलून काम करा. तुमचे कौशल्य सिद्ध करा. घरामध्ये क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालू नका. शक्यतो दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका.
.......................................................
मकर मंगळ राशीच्या पंचमस्थानात प्रवेश करेल. शुक्र मंगळ आणि हर्षलाशी लाभयोग करेल. तसेच राशीच्या व्ययस्थानात चंद्रग्रहण होणार आहे. लहानमोठय़ा घडणाऱ्या घटनांमुळे तुम्ही उत्साही बनाल. त्याचबरोबर इतरांकडून तुमच्या अपेक्षाही वाढतील. व्यापारात दिलेला शब्द पाळावा लागेल. नाहीतर गिऱ्हाईक तुटण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये सर्वतोपरि काम संपवण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांना तोंडसुख घेण्याची संधी देऊ नका. अतिविचार टाळावा.
.......................................................
कुंभ चतुर्थस्थानातील मंगळ हर्षलाशी लाभयोग करेल. चंद्रग्रहण राशीच्या लाभस्थानात होईल. शिस्तबद्ध वागणारी तुमची रास आहे. सभोवतालच्या व्यक्तींनीही तसेच वागावे अशी तुमची अपेक्षा असते. ह्या आठवडय़ात घरातील एखाद्या प्रश्नामुळे तुमचे लक्ष नेहमीच्या कामापासून विचलित होण्याची शक्यता आहे. व्यवसाय धंद्यातील प्रगतीचे चित्र संमिश्र असेल. पैशाच्या व्यवहारात विचित्र अनुभव येईल. नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या तालावर नाचावे लागेल.
.......................................................
मीन शुक्राचा हर्षलाशी लाभयोग होणार आहे. चंद्रग्रहण राशीच्या दशमस्थानात होईल. ग्रहमान तुमच्यातील कृतीशीलता वाढवणारे आहे. व्यवहारापेक्षा भावनेला जास्त महत्त्व देऊन एखादे काम हाती घ्याल. व्यापार-उद्योगात नवीन करारावर सही करताना त्यातील अटी आणि शर्ती समजून घ्या. नोकरीत वरिष्ठ जादा काम करवून घेतील. घरगुती कामांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रुसवेफुगवे होतील. खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मागणी राहील.
.......................................................
|