ज्या १९५८ साली ट्रान्झिस्टर या यंत्राचा दहावा वाढदिवस होता आणि ट्रान्झिस्टरनं इलेक्ट्रॉनिक आणि संगणक क्षेत्र ढवळून काढलं होतं, त्याच साली टेक्सास इन्स्ट्रमेंट्समध्ये नवीनच कामाला लागलेल्या साडेसहा फुटी जॅक किल्बीला (१९२३-२००५) कंपनीच्या नियमांप्रमाणे अजून सुट्टीही मिळत नसे. त्यामुळे त्याचे सहकारी उन्हाळ्यात मस्त मजा करत असताना किल्बीला कामाला यावं लागे. याचा सदुपयोग करून घेत त्यानं चक्क ‘इंटिग्रेटेड सर्किट (आयसी)’ चा शोध लावून तंत्रज्ञानाला अफाट वेगानं पुढे नेलं! ट्रान्झिस्टरचं पुढचं पाऊल म्हणजे आयसी. यालाच ‘मायक्रोचिप‘ असंही नाव आहे. अगदी ढोबळमानानं सांगायचं तर अनेक ट्रान्झिस्टर्स, डायोड्स, कपॅसिटर्स, रेझिस्टर्स अशी अनेक उपकरणं एका छोटय़ा चिपवर बसवून एकमेकांना योग्य रीतीनं जोडली तर त्यातून जे उपकरण तयार होईल ते म्हणजे आयसी. साहजिकच
अनेक ट्रान्झिस्टर्सची क्षमता आणि वेग मिळवण्याबरोबरच कमी आकारात आयसी कैकपटींनी जास्त काम करू शकते. यामुळे संगणकासह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची क्षमता सुरुवातीला शेकडो आणि मग करोडो पटींनी वाढण्याबरोबरच त्या उपकरणांचा आकार अतिशय छोटा झाला. किंबहुना आयसीशिवाय आजचे संगणक, लॅपटॉप्स, पामटॉप्स, मोबाईल फोन्स, टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, वॉशिंग मशीन्स ही आणि इतर शेकडो यंत्रं चालूच शकणार नाहीत! जॅक किल्बी हा आयसीचा शोध लावणारा पहिला माणूस, पण त्याच्या शोधात नंतर त्यात सुधारणा करणाऱ्या रॉबर्ट नॉईसच्या शोधाची सफाई नव्हती. नंतरही त्यानं खिशात मावणारं कॅल्क्युलेटर वगैरे एकूण ६० शोधांची पेटंट्स मिळवली. त्याची ही कहाणी.
मिझोरी राज्यात किल्बी जन्मला तेव्हा १९२९ साली सुरू झालेल्या जागतिक महामंदीनं डोकं चांगलंच वर काढलं होतं. त्यामुळे अमेरिकेत आणि एकंदर जगभरातच वातावरण अतिशय निराशेचं होतं. तो चार वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांनी कॅन्सासमध्ये स्थलांतर केलं. किल्बी आणि त्याची बहीण जेन हे एका सुसंस्कृत घरात वाढले होते. ‘आमच्या घरात जिथेतिथे पुस्तकंच पुस्तकं दिसायची’ असं जेन नंतर एकदा म्हणाली. रात्री जेवताना जॅक आणि जेन अनेकदा शेक्सपिअरच्या नाटकांमधले उतारे म्हणायचे, आणि त्यांना त्यामधलं काही आठवलं नाही तर त्यांचे आई-बाबा मदत करायचे. साहजिकच लहानपणापासूनच जॅकला अनेक विषय समजून घेण्याची आणि एकूणच ज्ञान मिळवायची इच्छा निर्माण झाली. किल्बीचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर होते. कष्ट करून ते ‘कॅन्सस पॉवर कंपनी’ च्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले होते. १९३७ साली एका वादळाच्या काळात किल्बीच्या वडिलांनी हॅम रेडिओच्या बिनतारी संदेशांचा वापर करून इतर ठिकाणच्या वीजनिर्मिती केंद्रांशी साधलेला संपर्क बघून छोटा जॅक हरखून गेला, आणि त्यानं ते तंत्रज्ञान आत्मसात केलं. एमआयटीच्या प्रवेश परीक्षेत १९४१ साली नापास झाल्यामुळे त्याला तिथे प्रवेश मिळाला नाही. नंतर अनेक ठिकाणी प्रचंड यश मिळवूनही किल्बीच्या डोक्यात हे अपयश कायम राहिलं!
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपाननं पर्ल हार्बरवर हल्ला केलेला असताना किल्बी भारतात, बर्मामध्ये आणि नंतर चीनमध्येही सैन्याची बिनतारी संदेशांची यंत्रणा दुरुस्त करायच्या कामावर काही महिने आला होता. महायुद्ध संपल्यावर इलिनॉईसच्या विद्यापीठात त्यानं आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करून १९४७ साली पदवी मिळवली. पण त्याला सर्वसाधारण गुण मिळायचे. मग ‘सेंट्रललॅब‘ नावाच्या कंपनीत त्यानं आपली पहिली नोकरी धरली. १९४८ साली ट्रान्झिस्टरचा शोध लागल्याची बातमी वाचून किल्बीला त्याविषयी खूप कुतूहल वाटलं. या तंत्रज्ञानातच इलेक्ट्रॉनिक्सचं भविष्य असल्याचं जाणून त्यानं ट्रान्झिस्टरचा अभ्यास सुरू केला. त्यासंबंधीच्या अनेक परिषदांनाही तो हजेरी लावे. १९५८ साली ट्रान्झिस्टरशी संबंधित काम करणाऱ्या कंपनीत नोकरी शोधण्यासाठी त्यानं आपला बायोडेटा अनेक कंपन्यांना धाडला. चार-पाच ठिकाणी मुलाखत दिल्यावर त्यानं मोटोरोलासारख्या कंपन्यांच्या ऑफर्स नाकारून टेक्सास इन्स्ट्रमेंट्समध्ये नोकरी धरायचं ठरवलं. गंमत म्हणजे मुलाखत घेऊनही त्याला आयबीएमनं निवडलंच नव्हतं!
आयसीचा शोध लावल्यावर किल्बीनं त्याचा साहेब विलीस अॅडकॉकला त्याविषयी माहिती दिली. अॅडकॉकला सुरुवातीला किल्बीला त्याचं मुख्य काम सोडून भलतंच काहीतरी करायची परवानगी दिल्याबद्दल वरिष्ठ लोक काय म्हणतील अशी धाकधुक वाटत होती. पण तरीही अॅडकॉकनं किल्बीला त्याच्या आयसी या यंत्राला तार जोडून त्याचं प्रात्यक्षिक दाखवायला सांगितलं. अनेक खटाटोपीच्या उद्योगांनंतर किल्बीनं एक ओबडधोबड दिसणारा आयसी आणि त्याला जोडलेली तार घेऊन त्या तारेला १० व्होल्ट्स किंमतीचा वीजपुरवठा केला. त्याबरोबर आयसीच्या दुसऱ्या बाजूला जोडलेल्या ऑसिलोस्कोप नावाच्या यंत्रावर एक हिरव्या रंगाची रेघ समुद्रातल्या पाण्याच्या लाटेसारखी वरखाली जाताना दिसली. याचाच अर्थ तारेतून आलेला वीजप्रवाह आयसीमध्ये गेल्यावर तिथे वीज पाण्याच्या लाटेसारखी दर सेकंदाला दहा लाख या वेगानं वरखाली होत होती. याचाच अर्थ आयसी हे यंत्र अपेक्षेप्रमाणे काम करत होतं! किल्बीनं इतिहास घडवला होता!
किल्बीचं आयसी हे यंत्र सफाईदार दिसत नसल्यामुळे १९५८ सालचा उरलेला वेळ त्यात दुरुस्त्या करण्यात किल्बीनं घालवला. त्यासाठी अर्थातच त्याची कंपनी (टेक्सास इन्स्ट्रमेंट्स) खूप मदत करत होती, आणि तिनं अनेक सहकाऱ्यांनाही त्या कामावर नेमलं होतं. १९५९ सालच्या जानेवारी महिन्यात किल्बी आणि सहकाऱ्यांचे हे प्रयत्न फळाला येतील असं वाटत असतानाच ‘फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर‘ ही कंपनी आयसीचंच पेटंट घेण्यासाठी अर्ज करत असल्याची धडकी भरवणारी बातमी टेक्सास इन्स्ट्रमेंट्सच्या वकिलांकडे आली. त्यामुळे त्यांनी अतिशय घाईघाईनं आयसीच्या पेटंटसाठी किल्बीच्या नावावर एक अर्ज तयार करून तो संबंधित सरकारी कार्यालयात दाखलसुद्धा केला. आपलं काम आणि एकूण आयुष्यच रमतगमत जगणाऱ्या किल्बीच्या रोजच्या दिनक्रमात यामुळे काही दिवस अचानक मोठी धांदलच उडाली! शेवटी ६ फेब्रुवारी १९५९ या दिवशी टेक्सास इन्स्ट्रमेंट्सनं किल्बीच्या नावावर आयसीच्या पेटंटसाठीचा अर्ज दाखल केला. त्याला ते मिळालंसुद्धा. तसंच एक वेगळं पेटंट फेअरचाईल्डच्या नॉईसलाही मिळालं.
१९७१ साली टेक्सास इन्स्ट्रमेंट्सनं किल्बीनं बनवलेलं पहिलं ‘पॉकेट कॅल्क्युलेटर‘ बाजारात आणलं. त्याचं वजन पाच किलोंच्या आसपास आणि किंमत २५० डॉलर्स इतकी होती. खिशात हे पाच किलोंचं ओझं घेऊन फिरणं नक्कीच सोपं नसणार! त्यात हे यंत्र बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चार गोष्टी करू शकायचं. आजकालच्या कॅल्क्युलेटर्ससारख्या अनेक जास्तीच्या सोयी त्यात नव्हत्या. असं असूनही हे यंत्र एकदम लोकप्रिय झालं. गंमत म्हणजे किल्बी स्वत: कधीच कॅल्क्युलेटर्स किंवा संगणक वापरायचा नाही! तो हिशेब करायला पाढे लिहिलेला कागद सतत जवळ बाळगायचा! त्याला काटय़ांचं साधं घडय़ाळ वापरायला आवडे. डिजिटल पद्धतीचं घडय़ाळ त्याला कटकटीचं वाटे!
किल्बी अतिशय साधा माणूस होता. तो कधीच चिडायचा नाही असं त्याचे कुटुंबीय म्हणायचे. किल्बी कधीही धांदरटपणा करत नसे. तो अतिशय विचारी होता. तो बोलायचाही एकदम सावकाश. भरपूर विचार करून मगच त्याच्या तोंडून कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर बाहेर यायचं! त्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्या पुरस्कारांचा स्वीकार करायला जाताना त्याला त्याच्या दोन मुली, पाच नाती, आणि बहीण जेन या सगळ्यांना घेऊन जायला आवडे! एकदा स्वीडनच्या ग्रँड हॉटेलच्या बाहेर तो टॅक्सी मिळवायच्या प्रयत्नात असताना त्याला आयोजकांनी त्याच्यासाठी आलिशान लिमोझीन गाडीची व्यवस्था केलेली असल्याचं कळालं. त्यावर वैतागून तो ‘काय ही उधळपट्टी’ असं पुटपुटला. एकदा अमेरिकेत अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘सीबीएस मॉर्निग न्यूज’ या टीव्हीच्या कार्यक्रमात त्याला मुलाखतकारानं विचारलं, ‘अमेरिकेला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याची कामगिरी केल्याबद्दल काय वाटतंय’. त्यावर एखाद्यानं किती भाव खाऊन ऐटीत भपकेदार उत्तर दिलं असतं! पण किल्बीनं काय म्हटलं असावं? ‘मला खरं म्हणजे असं काही वाटलंच नाही.’ १९७८ ते १९८५ या काळात तो इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग हा विषय शिकवायचा. २००० साली किल्बीला त्याच्या कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला. त्यावेळी तो स्वीकारतानाच्या भाषणात तो आपलं प्रेझेंटेशन देण्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर वापरणार (उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्टचं पॉवरपॉइंट वगैरे) असं त्याला विचारल्यावर ‘छे - कसलं सॉफ्टवेअर अन् काय? मी १-२ स्लाईड्स तरी बनवेन का नाही माहीत नाही’ असं त्याचं उत्तर होतं! तसंच नंतर कुणीतरी किल्बीला नोबेल पुरस्कार मिळाल्याचं कळल्यावर त्यानं लगेच काय केलं असं विचारल्यावर शांतपणे ‘कॉफी बनवली’ असं स्थितप्रज्ञतेचा कळस गाठणारं उत्तर दिलं!
त्याला फोटो काढायला खूप आवडायचं. पण त्यासाठी तब्बल ३० र्वष त्यानं एकच कॅमेरा जपून वापरला! त्याची गाडी किमान एक लाख मैल धावल्याशिवाय ती विकून दुसरी गाडी घ्यायचा तो विचारही करत नसे. कुणी त्यासंबंधी त्याला विचारलंच तर ‘गाडी मस्त पळतीये ना, मग झालं की’ असं त्याचं उत्तर असे!
सतत विचारात मग्न असलेल्या किल्बीची चाल एखाद्या वाट चुकलेल्या माणसासारखी असे! खूप उंचीची त्याच्या तंद्रीला जोड असल्यामुळे जरा खाली असलेल्या छतांना त्याचं डोकं अनेकदा आपटे. अगदी मोठय़ा साहेबापासून ते चहा आणून देणाऱ्या पोऱ्यापर्यंत प्रत्येकाला किल्बी त्याच्या नावानंच हाक मारायचा. तो काम करत असलेल्या कंपनीतल्या प्रत्येक माणसाकडे किल्बीच्या चांगुलपणाविषयी काही ना काही किस्से असायचेच. अनेक लोक त्याला शास्त्रज्ञ समजायचे. पण त्यावर किल्बीचं उत्तर तयार असे. तो म्हणायचा की ‘शास्त्रज्ञ ज्ञानाच्या भुकेनं पेटलेला असतो, त्याला काहीतरी समजावून सांगायचं असतं; मी तर पक्का अभियंता आहे, कारण मला कुठली तरी तांत्रिक अडचण सोडवून एखाद्या गोष्टीकडून काम कसं करून घ्यायचं हे शोधायचं असतं’.
बार्बरा ही किल्बीची बायको १९८२ साली वारली. नंतर किल्बीला कर्करोग झाला आणि त्यातच त्याचा शेवटही झाला.
godbolekahate@gmail.com |