 माझ्या आजवरच्या आयुष्यातील सवरेत्कृष्ट ‘परफॉर्मन्स’ मी माझ्या मुलीच्या लग्नात दिला. त्याची ही साठा उत्तराची सफल कहाणी.
लग्नाच्या रिसेप्शनला नवऱ्या मुलीने काय नेसायचं हा राष्ट्रीय प्रश्न ऐरणीवर आला. आफ्टर ऑल त्याच्याकडे जगाचे लक्ष लागून राहिलं होतं. ते एकदा कळलं की अमेरिका इराकवर, इझरायल पॅलेस्टाइनवर व नारायण राणे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करायला मोकळे होते. बुश त्याच्या वॉर मिनिस्टरला (डिफेन्स मिनिस्टर नाही हं. मार्क द डिफरन्स इन अॅटिटय़ूट.) म्हणे म्हणालादेखील, ‘‘तो रिसेप्शनचा ड्रेस एकदा ठरू दे. मग मी आहे आणि इराक आहे.’’ लादेनदेखील अज्ञातस्थळी रेकॉर्ड करून पाठवलेल्या व्हिडियो कॅसेटवरून इंग्रजीतून म्हणाला, ‘‘माय घातपाती कारवायाज कॅन वेट. लेट देम फर्स्ट डिसाइड ऑन रिसेप्शन ड्रेस ऑफ द ब्राइड.’’
असो तुम्हाला एक कौटुंबिक रहस्य (ज्याला मराठीत ‘फॅमिली सिक्रेट’ म्हणतात.) सांगतो. माझी मुलगी म्हणजे मधुबाला, इंदिरा गांधी व आमची कुलदेवता वाईची कृष्णामाई या तिघींचा एकत्रित अवतार आहे, अशी तिच्या आईची खात्री आहे. त्यामुळे ती तिच्याकडे कधी अनिमिष नेत्रांनी (मधुबाला), कधी वचकून (इंदिरा गांधी) तर कधी अत्यंत भक्तिभावाने (कृष्णामाई) बघत असतो. तिच्यात स्वत:त साईबाबांचे काही अंश आहेत. मीच एकटा अश्रद्ध, नप्पड, हिरण्यकश्यपू घरात कसा घुसलोय कुणास ठाऊक. एके दिवशी कोणी नरसिंहावतार धारण करून माझं पोट टरटरा फाडेल तेव्हा समजेल.
मुलीच्या सासरच्या मंडळींची अतीव इच्छा होती की, माझ्या मुलीने रिसेप्शनला शालू नेसावा. जसा सूट तो सूट तसा शालू तो शालू. दे वेअर राइट. पण नेसणारीला ते अजिबात मंजूर नव्हतं. नो वे! तिच्या डोक्यात शरारा होता.
तिच्या होता म्हणून तिच्या आईच्याही होता. शरारा काय असतं, असं मी दोन-तीनदा विचारून पाहिलं. दोघींनीही मला सांगण्याचे कष्ट घेतले नाहीत. गडय़ाला किती किंमत द्यायची? अपनी औकात मे रहो.. माझ्या लग्नाच्या मुलीने घरात भोकाड पसरलं. तिची आईही ‘रुदाली’च्या भूमिकेत होती. घरात शुभकार्य तोंडाशी आलंय असं मला एकटय़ालाच वाटत होतं. शरारा म्हणजे काय माहीत नसलं तरी त्याचं अनन्यसाधारण महत्त्व मला पटलं होतं. ‘काँप्रमाइझ फॉम्र्युला म्हणून मी शालू नेसू का?’ असं मी विचारून पाहिलं व शंकराच्या तिसऱ्या डोळ्यासमान जळजळीत नजरेचा मी धनी झालो. ‘ठीक आहे, ते म्हणतात तर तिला शालू नेसू दे. तू शरारा नेस’ मी मुलीच्या आईला सुचवले व दुसऱ्या खोलीत पळालो. भिऊन नाही, सहज.
अखेर माझ्या मुलीचं सासर शराराला राजी झालं. (वो तो होनाही था!) सीमारेषांवरील सैन्य माघारी आले. युद्ध टळले. चक्री वादळ मार्ग बदलून वेरावळच्या दिशेने निघून गेले. माझी मुलगी (तात्पुरती) आनंदित झाली. त्यामुळे तिची आईही (तात्पुरती) आनंदित झाली. माझा सगळा आनंदच होता. वाजतगाजत शराराची खरेदी झाली. तो (मेण्यातून?) घरी आला. मुलीने मला तो फर्लागावरूनच दाखवला. ‘‘लांबूनच पाहा. तुमच्या हातांनी तो खराब होईल.’’ तिने मला सांगितले. (म्हणजे दटावले.) ‘इनोसंट विथ डर्टी हँडस्’ हा चित्रपट माझ्यावरच निघाला असेल काय?
परिस्थिती आटोक्यात व अनुकूल असल्याचे पाहून मी मुलीला हळुचकन म्हणालो, ‘‘तू सुरुवातीचा पाऊणएक तास शालू नेस व मग शरारा घाल. कसं?’’
‘आता कशासाठी?’’ कपाळावर वरवंटय़ाएवढी आठी पाडत मुलीच्या आईने विचारले. मुलगी अर्थातच तिच्याशी पूर्ण सहमत होती. मुलीला बापाविषयी फार असतं, हे कोणा गाढवाने म्हटलंय?
‘‘त्यांचंही मन राखल्यासारखं होईल. तुझ्या नव्वदीच्या आजेसासूलाही बरं वाटेल. शिवाय शालू म्हणजे पोतेरं नव्हे. त्यातून उशिरा येतात ते महत्त्वाचे पाहुणे तुला शरारातच बघतील.’’ मी भीत भीत म्हणालो.
माझे हात घाणेरडे असले तरी मेंदू वाटतो तितका बथ्थड नाही, असे मी तिच्या चेहऱ्यावर वाचले. ती तयार झाली. त्यामुळे तिची आईही तयार झाली. मी सुटकेचा नि:श्वास सोडला. तो गडचिरोलीपर्यंत ऐकू गेल्याचं सांगतात.
‘‘मात्र एक करायचं.’’ धीटावलेला उंदीर दोन-दोन मांजऱ्यांपुढे म्हणाला, (What is cunning in a kitten may be cruel in a cat), ‘‘कपडे बदल हा मोजून दोन मिनिटात व्हायला हवा. फार तर तीन मिनिटे. नॉट अ मिनिट मोअर. स्टेजवरून नवी नवरी गायब हे वाईट दिसतं. निमंत्रित खोळंबलेले असतात.’’
मुलगी तात्काळ तयार झाली. त्यामुळे तिची आईही तात्काळ तयार झाली. (आईनेही ड्रेस चेंज करण्याचा कट आतून शिजलाय हे मला कसं कळावं? तिच्याकडे कोण बघणार होतं व तिने कपडे बदलल्याचे ती स्वत: सोडून कोणाला कळणार होतं तिरुपतीच्या बालाजीला माहीत.) मीही कपडे बदलावेत, असे मुलीने सुचवून पाहिले पण जास्त डिवचल्यास मी घरात घालतो त्या चटेरीपटेरी चड्डीवर ऐन रिसेप्शनमध्ये स्टेजवर ‘नच बलिये’सारखा नाच करीन हे ती जाणून होती. अर्धवट बापाच्या लीलांवर पांघरूण घालणं सोपं नसतं.
सगळं ठरल्याबरहुकूम झालं. फक्त शालू बदलून शरारा घालून यायला दोन किंवा तीन मिनिटांच्या ऐवजी वीस ते पंचवीस मिनिटे लागली. दॅटस ऑल. जाणाऱ्या दर मिनिटागणिक माझा अस्वस्थपणा वाढत होता, ब्लडप्रेशर वाढत होतं. स्टेजवर आम्ही येडबंबूसारखे उभे होतो. वधू-वरांना भेटण्यासाठी स्टेजच्या एका बाजूला लागलेली रांग लांबत चालली होती. माझ्या मुलीचे सासरे साधा शर्ट घालून मादाम तुसाँच्या म्युझियममधल्या अमिताभच्या मेणाच्या पुतळ्यासारखे शांत उभे होते. मला काय करावं सुचेना. निमंत्रितांच्या रांगेत त्या वेळेला माझ्या ओळखीचे फक्त कमलाकर नाडकर्णी होते. याचा अर्थ बाकीची मंडळी दुसऱ्या पक्षाकडून आलेली होती. (माझे वडील कोणाचं लग्न ठरल्यावर मुलगा कुठला किंवा मुलगी कुठली असं न विचारता, शत्रू पक्ष कुठला असं विचारीत.) त्यामुळे मला जास्तच ओशाळायला झालं होतं. हे सगळं त्या शरारापायी चाललं होतं.
एकाएकी माझ्या लक्षात आलं की आय अॅम सपोज्ड टु बी अॅन एंटरटेनर. ते आता कामाला येणार नाही तर केव्हा येणार? मी निमंत्रित रांगेत अवघडून उभे होते त्या बाजूला स्टेजच्या कोपऱ्याला गेलो.
‘‘वैतागलात ना?’’ मी विचारले.
काय बोलावं व नक्की कोणी बोलावं ते न कळून ते गप्प राहिले.
‘‘खरं सांगा, डोकं गेलंय की नाही?’’
ते नव्र्हसली हसले.
‘‘खोळंब्यामुळे तुम्ही चिडलेले नाहीत; आपण चिडलोय. मी वेगळा नाही; तुमच्यातलाच एक समजा. आपण सगळेच चिरडीला आलोय. काय करणार? तुम्ही माझ्या तोंडावर थुंकू शकता.’’
‘‘नाही-नाही, काहीतरी काय?’’ एकजण म्हणाला.
‘‘तशी तोंडावर थुंकून घेण्याची हौस किंवा सवय नाही मला, पण तुमच्यापैकी दोघा-तिघांना मी ओठांची चाळवाचाळव करताना पाहिलं म्हणून मी म्हणालो.’’
रांगेत खसखस पिकली. वातावरण निवळलं.
‘‘तुमची मुलगी आता कुठला ड्रेस घालणार आहे?’’ रांगेतल्या एका बाईने विचारले.
‘‘शरारा. कुठे बोलू नका. टॉप सिक्रेट आहे. भुलेश्वरला घ्या. दादरला वाटेल त्या किमती सांगतात. शिवाय व्हरायटीही नसते. पण तुमच्या नवऱ्याला शराराला हात लावू देऊ नका. डाग पडतील.’’
‘‘तुम्हाला कसं माहीत?’’ बाईने खिदळत विचारलं.
‘‘दुर्दैवाने मीही एका मुलीचा बाप आहे हो. काही काही लोकांना चार-चार मुली असतात. माझ्या सासऱ्यांना सहा होत्या. पुढे पुढे ते संतापाने शर्टाची बटणं खायला लागले होते.’’
‘‘मी बिनबटणांचा शर्टच शिवून घेतो कसा.’’ एकजण हसत हसत म्हणाला.
‘‘अहो, त्यानं काय होतंय? शर्टाची कॉलर खाल, पँटीचा पट्टा खाल, चष्म्याची काडी खाल, पेनचं टोपण खाल..’’
हशा पिकला. मस्त चाललं होतं. आता माझा मोरारबाजी झाला होता. मुलीला शरारा घालून स्टेजवर आलेली मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिलं आणि माझा ‘परफॉर्मन्स’ मी आवरता घेतला.
नंतर मुलीची आई मला म्हणाली, ‘‘दोन मिनिटात कपडे बदलून आल्याने कोणाच्या काही लक्षातही आलं नाही.’’
भारतभर व तेरा देशात एकपात्री प्रयोग केल्यावर मला जर कोणी विचारलं की तुमचा सवरेत्कृष्ट कार्यक्रम कोणता तर क्षणाचाही विलंब न लावता मी म्हणेन- ‘माझ्या मुलीच्या लग्नातला!’
shireeshkanekar@hotmail.com

|