आपला लहान मुलगा पहिल्यांदा जेव्हा उभा राहायला शिकला तेव्हाचं व्हिडियो शूटिंग एक आयटीवाला तरुण मित्र दाखवत होता. त्याच्या लहानग्याचं भरपूर फूटेज त्याच्याकडे रेडी होतं. अगदी प्रत्येक छोटय़ा गोष्टीचं. या पिढीचं आणि त्यांना उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा पुन्हा एकदा हेवा वाटला.
हल्ली लोक हॉटेलात गेले तरी मोबाइल फोनवर एकमेकांचे फोटो काढत बसतात. अगदी फेरफटका मारायला जाताना एखादा पक्षी दिसला किंवा फुलपाखरू दिसलं तरी त्याचे फोटो काढण्यात किंवा त्याची व्हिडियोक्लिप काढून घेण्यात रममाण झालेले दिसतात.
सिटिझन्स जर्नालिस्ट नावाचा एक कार्यक्रम एका न्यूज चॅनेलवर असतो. तो पाहताना लोकांनी काय काय चित्रीत केलंय ते पाहून अचंबित व्हायला होतं. लहान मुलांच्या वेगवेगळ्या चित्रीत केलेल्या अदांचा एक कार्यक्रमच परदेशी चॅनेलवर आहे. सायकलवरून उलटलेली मुलं, बाथरूममध्ये घसरून पडलेली मुलं, एकमेकांना टक्करणारी, बाहुल्याला मारणारी अशी लहान मुलं पाहताना आपणही त्यांच्या आई-बाबांबरोबर मनमुराद हसतो.
या जनरेशनच्या बाबतीत आला क्षण गेला क्षण असं होत नाही. काळाच्या कुपीत ते चालते-बोलते क्षण साठवू शकतात याचा
प्रचंड हेवा वाटतो. माझ्या जनरेशनच्या होतकरू वयात ही अशी सुविधा सहजप्राप्त नव्हती. प्रकरण महागडं होतं. तेव्हा लग्नातली व्हिडीयो कॅसेट हाच काय तो काळ पुन्हा जिवंत करण्याचा पर्याय. घरातली म्हातारी-कोतारी किंवा गेलेली मंडळी पाहायची असेल तर ती या कॅसेट मधून दिसायची.
तेव्हा व्हिडियो आणून एका रात्रीत तीन-तीन सिनेमे बघण्याची शर्यत असायची. मला आठवतंय, एका रात्री ‘अंधा कानून’, ‘सौतन’ आणि ‘सोनी महिवाल’ हे तीन सिनेमे बघितल्याचं आठवतंय. तेव्हा तर ‘सोनी महिवाल’ रिलीजही झाला नव्हता. पण या सगळ्या गदारोळात लग्नाच्या घटनेशिवाय शूटिंग आणि क्षणचित्रे जपण्याचा विचारही मनात येऊ शकला नव्हता. तो किडा नंतर नोकरी करायला लागल्यावर डोक्यात वळवळू लागला.
एकदा एका घरगुती गेट टुगेदरमध्ये लग्नाची कॅसेट लावली होती. वाटलं नातेवाईकांना त्यात इंटरेस्ट वाटेल. पण सगळे खाण्या-पिण्यातच दंग झालेले होते. या कॅसेट पाहण्याच्या कार्यक्रमात कुणालाच रस नव्हता. तेव्हा झालेला हिरमोड खचितच अपेक्षित नव्हता.
मात्र परवा अडगळीतल्या सामानात एक जुनी व्हिडियो कॅसेट सापडली. ही कॅसेट पाहताच प्रचंड हरखून गेलो. मधल्या काळाची धुळीची पुटं फुंकरली गेली. ‘बेबीज् डे आऊट’ या सिनेमाच्या धर्तीवर माझ्या छोटय़ा मुलाचं, एका व्हिडियो कॅमेऱ्याने शूटिंग केलं होतं. ही कॅसेट म्हणजे अर्थातच आमच्यासाठी खजिना होता. कारण २६ जुलैच्या पुरात बऱ्याच कॅसेट्स गेल्या होत्या. त्यात तीही गेली असावी असं वाटलं होतं. पण एका ड्रॉवरमध्ये ती बचावली.
पण कॅसेट मिळाल्याचा आनंद क्षणभरच टिकला. ती कॅसेट प्ले करण्यासाठी आवश्यक असलेला प्लेअर कुठे होता? क्षणचित्रं प्रत्यक्षात बघणं शक्य नसेल, तर ती फक्त मॅग्नेटिक फितीची गुंडाळीच. कॅसेट प्ले करण्यासाठी आवश्यक असलेला प्लेअर आम्ही कधी घेतलाच नव्हता. तेव्हा ज्या कॅमेऱ्यातून रेकॉर्डिग केलं होतं त्या कॅमेऱ्यातूनच ती कॅसेट बघितली होती. मुलाची बोबडय़ा वयातली क्षणचित्रं कॅसेटबद्ध केल्याचं समाधान होतं. पण ते भविष्यात बघण्याची वेळ आल्यास कसं बघायचं याचं काही भान ठेवलेलं नव्हतं.
खरं तर तेव्हा मूव्ही कॅमेरा बाळगण्याची तशी ऐपतही नव्हती. व्हिडियोग्राफीचा कॅमेरा ही मध्यमवर्गीय त्यातही नव्याने संसार थाटलेल्या दांपत्यांसाठी गुलबकावलीचं फूलच. पण तरीही कुणी तरी व्हिडियो कॅमेरा बाळगणारी व्यक्ती पकडून ही क्षणचित्रं काळाच्या कुपीत साठवून ठेवण्याची मनीषा त्या काळातले आम्ही सगळेच बाळगून होतो. कॅमेरा परवडण्याच्या पलीकडला होता तरीही हौस काही कमी नव्हती. लग्नातल्या रिसेप्शनचं शूटिंग करणाऱ्यांना मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी बोलावून शूटिंग करण्याची एक प्रथा होती. शिवाय एखाद्या दिवशी व्हिडियोग्राफर घरात आणून मुलांना वेगवेगळे कपडे घालून ही व्हिडियोग्राफी केली जायची.
ज्यांची मुलं आता थोडी मोठी म्हणजे आठ ते बारा वर्षांच्या घरात आहेत, त्यांनी मुलांच्या लहान वयात त्यांच्या वाढीचे क्षण चलचित्रात पकडण्यासाठी केलेली उठाठेव आता हास्यास्पद वाटेल.
पण या कॅसेटची कथा थोडी वेगळी होती. तेव्हा व्हिडियोग्राफरही महाग पडायचा. शेवटी तो एक-दोन तासच ते टिपिकल शूटिंग करायचा. आपण स्वत:च कॅमेरा हाताळला तर आपण आपल्या मुलाचं चांगलं शूटिंग करू शकू अशी एक भावना होती. शिवाय परक्या व्यक्तीच्या वावरामुळे मुलं आणि घरातलेही औपचारिक वागतात. ते शूटिंगमध्ये नको होतं. त्यापेक्षा आपणच अनौपचारिक पद्धतीने शूटिंग करू असं वाटलं आणि थोडी भीड चेपून एका ज्येष्ठ सहकारी व्यक्तीकडून दोन दिवसांसाठी कॅमेरा मागून घेतला होता. तेव्हा ती प्रचंड महागडी वस्तू होती. अशी ती उचलून नवशिक्याच्या हाती देण्यासाठी लागणारा दिलदारपणा त्यांच्याकडे होता. खरंच तोपर्यंत हाती कधी व्हिडियो कॅमेरा घेतला नव्हता. अगदी एबीसीपासून सगळं तंत्र रात्रीत शिकून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी डोक्यात एक थीम ठेवून मस्त शूटिंग केलं. अगदी एखाद्या पट्टीच्या सिनेमेकर शैलीत. त्यामुळे त्यात टिपलेले मूड्स हे खास जीवलग होते.
म्हणून या कॅसेटचं महत्त्वही खास होतं. विचारपूस केल्यावर कळलं की फोर्ट परिसरातल्या काही दुकानात हे जुने कॅमेरे अजून आहेत आणि ते या कॅसेट सीडीमध्ये कन्व्हर्ट करून देण्याचाच व्यवसाय करतात. तातडीने एक दुकान शोधून काढलं. त्याला कॅसेट दाखवली. त्याने ती थोडी न्याहाळली नि म्हणाला ती उभी ठेवायला हवी होती. फंगस काढावा लागेल म्हणाला. म्हटलं जे काही करायचं ते कर, पण मला सीडी करून दे. त्याने दोन दिवस कॅसेट त्याच्याकडे ठेवली. कापूस आणि केमिकल घेऊन आधी फितीवरचं फंगस काढून टाकलं. मग ती वारंवार फॉरवर्ड आणि रिवाइंड करून घेतली. आणि मग ती प्ले करून तिचं डिजिटलीकरण करून घेतलं. ज्या दिवशी सीडी घरी आणली त्या दिवशी घरात सोहळा होता. साताठ वर्षांपूर्वीचे क्षण पुन्हा अनुभवताना निखळलेले अनेक दुवे पुन्हा सांधता आले आणि हरवलेलं खूप काही गवसल्याचा आनंद झाला. घर, माणसं, झाडं सारं काही वेगळंच वाटलं.
आजच्या काळात मूव्ही कॅमेरा बऱ्यापैकी स्वस्त झालाय. आणि मूव्ही कॅमेरा ‘तय्यार’ अवस्थेत नसला तर मोबाइल फोनमध्ये व्हिडियो मोड असतोच. त्यामुळे हल्ली घरात सगळेच सिनेमेकर्स झालेत. पण उपलब्धता खूप झाल्यामुळे असेल पण लोकांना त्याचं अप्रूप राहिलेलं नसावं.
आजही आपण सारेच छोटे छोटे क्षण कॅमेरात बंदिस्त करून ठेवतो. या अशाच समजावर की अनंतकाळापर्यंत ते आपल्याला बघता येणार आहेत. पण आज जी सीडी आपल्या उपकरणांवर चालत्येय ती भविष्यात चालवण्यासाठी ही उपकरणं असतीलच याची खात्री काय? आनंदांच्या क्षणांच्या या कॅरिअर्सवर आपण फारच विसंबून असतो नाही?
paraglpatil@gmail.com |