१० जुलै २००९
परदेश

ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थी खरोखरीच तिथल्या गोऱ्यांच्या वर्णद्वेषाचे शिकार बनतायत की ते एक अर्धसत्य आहे? हा मंदीचा परिणाम असल्याचे आडाखेही वस्तुस्थितीला धरून आहेत का? या वर्णविखाराला भारतीयांचा आगाऊपणा तर कारणीभूत नाहीना? की आणखी काही स्थानिक कारणं यामागे आहेत? ऑस्ट्रेलियातील व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्याशी ऑनलाइन बोलून घेतलेला धांडोळा..
रश्मी घटवाई

अलिकडे वर्णद्वेषाच्या विखाराचा नवा उद्रेक ऑस्ट्रेलियात झाला आणि त्यात बरेच भारतीय विद्यार्थी होरपळून निघाले. तसे तर आपले भारतीय क्रिकेटपटूही मैदानावरच्या ‘ऑसी’ खेळाडूंच्या वर्तनामुळे त्रस्त असल्याचं अनेक घटनांवरून जाणवत असताना ऑस्ट्रेलियात शिकायला गेलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांवर वर्णद्वेषातून हल्ले केले गेले, म्हटल्यावर तिथली एकूण ‘संस्कृती’ ध्यानी यावी! मागे वर्णद्वेषातून अभिनेत्री शिल्पा शेट्टीही सुटली नव्हती, म्हणजे बघा!
शालीमार बाग, दिल्ली इथला ‘सनी बजाज’ हा २० वर्षांचा मुलगा गेल्या दीड वर्षांपासून ‘Deakins University’ मध्ये ‘अकाऊंटिंग’चा विद्यार्थी आहे. आता बारा जूनच्या सायंकाळी मेलबोर्नमध्ये, बोरोनिया (Boronia) भागात त्याला वर्णद्वेषाच्या भावनेतून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. त्यात त्याला खरचटलंच, शिवाय त्याचं बोटही फ्रॅक्चर झालं. सनी बजाजची ही ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर गेल्या

 

महिन्याभरात झालेल्या वर्णद्वेषी हल्ल्यांची चौदावी घटना! सनी बजाज मेलबोर्नवरून सांगतो, ‘‘स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्रीचे सव्वाआठ वाजले होते. मी शॉपिंग करून माझ्या गाडीजवळ गेलो, तेवढय़ात एक गोरा आणि दुसरा कदाचित आफ्रिकन वाटावा असा- दोघेजण दांडगाईने माझ्याजवळ येऊन मला पैसे मागू लागले. मी म्हटलं माझ्याजवळ नाहीयेत पैसे, तेव्हा त्यांनी मला घाणेरडी शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. त्यांना माहिती होतं मी भारतीय आहे, कारण ते तसा उल्लेख करून शिव्या देत होते. कारचा दरवाजा त्यांनी माझ्या हातावर आपटला, त्यात चिमटून माझं बोट फ्रॅक्चर झालं. त्यांनी माझ्या तोंडावर, पोटात गुद्दे मारले.’’ त्यानं या हल्ल्याची तक्रार पोलिसांकडे केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री हा प्रसंग घडला, पण तो नंतर उजेडात आला.
सोमवारी सनी बजाजची परीक्षा होती, पण हल्ल्यामुळे घाबरलेल्या त्यानं ती परीक्षाच दिली नाही. त्यानं धसकाच घेतलाय साऱ्या प्रकाराचा. जर अशा प्रकारची शिवीगाळ, मारहाण वगैरे झेलण्याची भारतीय विद्यार्थ्यांंची तयारी असेल तर त्यांनी इथे यावं.‘‘But my suggesstion is, don’t come to this country,’’ तो सांगतो, ‘‘मी केवळ सुदैवानं त्यातून वाचलो, नाही तर मीही कोमातच गेलो असतो. आजवर अनेक भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी शिवीगाळ झेलावी लागलीये!’’
दिल्लीत त्याच्या आई सुषमा बजाज यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी बातचीत होऊ शकली नाही. खरं तर परीक्षेनंतर सनी बजाज घरी येणार होता आणि त्यांच्या आईजवळ व्हिसा नसल्यानं त्यावेळी तरी त्या कशा जाऊ शकणार, एवढंच कळू शकलं.
या वर्णद्वेषी हल्ल्यांना बळी पडलेले भारतीय विद्यार्थी सगळेच सनी बजाजएवढे सुदैवी नाही ठरले. आंध्र प्रदेशमधला २५ वर्षीय श्रवणकुमार- Sravankumar Theerthala- हा कोमात आहे. त्याच्यावर टीनएजर हल्लेखोरांनी स्क्रू ड्रायव्हरनं जीवघेणा हल्ला केला. उत्तर मेलबोर्नमध्ये हॅडफील्ड (Hadfield) मधल्या एका पार्टीत श्रवणकुमारसह आंध्र प्रदेशच्या चौघा विद्यार्थ्यांवर गेट क्रॅशिंग करून गेलेल्या टीनएजर हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यानंतर ‘रॉयल मेलबोर्न हॉस्पिटल’मध्ये अ‍ॅडमिट असलेला श्रवणकुमार कोमात होता. २१ वर्षीय सौरभ शर्मा हा भारतीय विद्यार्थी KFC मधली आपली शिफ्ट उरकून Werribee लाइन ट्रेननं घरी परतत असताना चार टीनएजर्सनी वर्णद्वेषातून शिवीगाळ तसंच मारहाण केली, त्यात त्याच्या गालाचं हाड मोडलं आणि दात तुटला. सिडनीमध्ये राजेश कुमार नावाच्या भारतीय विद्यार्थ्यांवर टीनएजर्सनी पेट्रोल बॉम्बनं हल्ला केला, त्यात तो ३० टक्के भाजला. तो घरातच पुस्तक वाचत बसला होता, तेव्हा टीनएजर्सनी पेट्रोल बॉटल्सनी त्याच्यावर हल्ला केला. २५ वर्षीय बलजिंदर सिंग या विद्यार्थ्यांवरही मेलबोर्नमध्ये असाच जीवघेणा हल्ला झाला. मेलबोर्न स्टेशनवरून ट्रेन पकडून तो घरी जात होता, तेव्हा विशीच्या दोन सुराधारी युवकांनी सुरे दाखवत त्याच्याजवळ पैशाची मागणी केली. त्यांना थांबायला सांगून बलजिंदरसिंग आपल्या बॅगेतून पैशाचे पाकीट शोधू लागला, तोच एका सुराधाऱ्यानं त्याच्या पोटात सुरा खुपसला. हॉस्पिटलमधल्या उपचारानंतर तो बचावला. प्लीज डोण्ट कम टू ऑस्ट्रेलिया’ असं बलजिंदरसिंगचं इतरांना सांगणं आहे. मात्र हॉटेल मॅनेजमेण्टचा तिथला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा बलजिंदरसिंगचा संकल्प आहे.
हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रातला फॅमिली बिझनेस असूनही सुरतच्या सुकेतू मोदीनं आयटीमध्ये करिअर करायच्या इराद्यानं ऑस्ट्रेलियात Holmesglen Institute of TAFE मध्ये तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. युनिव्हर्सिटीतून ट्रेननं तो घरी परतत असताना ट्रेनमध्ये सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्यानं त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी आधी त्याच्याकडे सिगरेटस्ची मागणी केली, तेव्हा आपण स्मोकिंग करत नाही, असं त्यानं त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी वर्णद्वेषी शिवीगाळ करत त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा वर्षांव केला. २२ वर्षीय विक्रांत राजेश रतनची कार जाळून टाकली गेली. मी, अनेक भारतीय विद्यार्थी, जे ऑस्ट्रेलियात शिकायला गेले आहेत, तसंच ऑस्ट्रेलियात अनेक वर्षांपासून स्थायिक झालेल्या काही ओळखीच्या मंडळींशी ऑर्कुट, जी टॉक, ईमेल या माध्यमातून विस्तृत बातचीत केली, काहींशी फोनवर विस्तृतपणे बोलले.
अनेक विद्यार्थ्यांच्या मते भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात या आधीही वर्णद्वेषाला सामोरं जावं लागलं आहेच. मात्र तिथे आपण शिकायला गेलोय, लाखो रुपये तिथे जाण्यासाठी आणि फी देण्यासाठी खर्च केले आहेत, तेव्हा मग शिक्षण अपूर्ण सोडून कसं यायचं म्हणून बहुतेकांनी शिवीगाळ, मारहाण यातून व्यक्त होणारा वंशद्वेष-वर्णद्वेष मुकाटय़ानं सहन केला. या वर्षांतच भारतीय विद्यार्थ्यांंवर ऑस्ट्रेलियात किमान सत्तर हल्ले तरी झालेले आहेत; पण आतापावेतो हे वास्तव कधीच समोर आलं नव्हतं. हल्ले, शिवीगाळ झेलणारे भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात पोलिसांकडे जायलाही कचरत होते. आणि आता ऑस्ट्रेलियात या वर्णद्वेषी हल्ल्यांना सामोरे गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी पोलिसात तक्रार नोंदवलीही, पण एकतर त्यांची दखलच त्यांनी घेतली नाही किंवा अगदीच थंड प्रतिसाद दिला. पोलिसांकडे आपलं फ्रॅक्चर झालेलं नाक, गमावलेला डोळा आणि रिकामं पाकीट घेऊन हल्ल्याची तक्रार नोंदवायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांला पोलिसांनी ‘टेक अ टॅक्सी. वी नो व्हॉट अवर जॉब इज, यू ब्लडी ओव्हरसीज’ असं सुनावलं. ‘The police demand proof of assualt or abuse, When we complain. How can we give proof of abuse? विद्यार्थी जेव्हा तक्रार नोंदवायला जातात, तेव्हा त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात.
कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, असाच अनुभव येतो की काय न जाणे, एकतर आताच्या घटनांची दखल ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी तरी कुठे घेतली होती ? भारताच्या प्रसारमाध्यमांनी जेव्हा ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर वांशिक हल्ले, रेसिस्ट शिवीगाळ, मारहाण होत असल्याबद्दल जोरदार आवाज उठवला, तेव्हा कुठे आपल्याकडेही त्याची जाणीव व्हायला लागली. मुळात ऑस्ट्रेलिया तरी कुठे मानत होतं की हे वर्णभेदातून झालेले हल्ले आहेत म्हणून! जेव्हा आपल्या प्रसारमाध्यमांनी एक प्रकारे दबाव वाढवला, तेव्हा कुठे कुजबुजल्यासारख्या दबेल, हळू आवाजात त्यांनी काही घटना या रेसिस्ट अटॅक्स असल्याचं मानलंय, हेही नसे थोडके! या साऱ्या प्रकाराबाबत दिल्लीत, ५०४, शांतिपथ, चाणक्यपुरीच्या ऑस्ट्रेलियन हायकमिशनच्या कार्यालयात दूरध्वनीवरून (दूरध्वनी क्र. ०११- ४१३९९९००) संपर्क साधायचा बराच प्रयत्न केला, तो विफल ठरला. (संबंधित व्यक्ती जागेवर नसल्यानं मेसेज ठेवूनदेखील!) अनेक विद्यार्थ्यांना वाटतंय की भारताकडून या साऱ्या प्रकाराबद्दल जाब विचारला जायला हवा होता, किंवा एखाद्या मंत्र्यानं/ प्रशासनिक अधिकाऱ्यानं तिथे तातडीनं जायला हवं होतं. भारताऐवजी ‘अन्य’ कुठल्या मोठय़ा देशाच्या विद्यार्थ्यांवर जर अशा प्रकारचे हल्ले तिथे झाले असते- तेवढी कुणाची टापसुद्धा नाहीये म्हणा- पण झाले असते समजा तर ताबडतोब त्या देशानं सज्जड दम दिला असता, प्रशासनिक पावलं उचलली असती! पण या बाबतीत आपण जणू त्यांचे मिंधे असल्यागत आपलं वागणं! कमालीचं गुळमुळीत! पण Mos for External Affairs- परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री शशी थरूर यांचं वक्तव्य आलं.-“The attacks on Indian Students in Australia is a domestic issue of Australia and should not be treated as a bilateral problem. But very much the responsibility, lies with the Australian Government.’’
म्हणजे आम्हाला त्याशी काही देणेघेणे नाही! तुम्ही बघा काय ते!
पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी संसदेत म्हटलं की he was ‘appalled’ by the senseless violence and crime.
केवढा गुळमुळीतपणा! परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनीही विद्यार्थ्यांना सबुरीचाच सल्ला दिला. खवळलेल्या विद्यार्थ्यांनी अन्यायाची दाद मागण्यासाठी रविवारी (३१ मे) काढलेल्या मेलबोर्नमधल्या प्रोटेस्ट रॅलीत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी गुद्दे, ठोसे मारलेच, ‘कॅप्सिकम स्प्रे’ म्हणजे तिखटाचा फवारा मारण्याचीही धमकी दिली. काही निदर्शकांना शांती भंग केली म्हणून ‘डिटेन’ केलं.
‘‘I witnessed police officers stomp on a student’s Chest. Other police officers repeatedly punched students in the face.
A sitting protester was knocked unconscious by repeated punches to the head by a policeman. At least one baton was used to smash a protesters legs,’’ असं Swinburne university च्या स्टुडण्ट युनियनचा प्रेसिडेंट डॅमियन रिजवेलचं वक्तव्य एका वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. सिडनीमध्येही भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या वर्णद्वेषी हल्ल्यांच्या निषेधार्थ ३०० भारतीय विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती. नंतर ‘‘You are black, you don’t belong here. Go away from our country’’ अशी भारतीय विद्यार्थ्यांवर शेरेबाजी करणाऱ्या तिथल्या एका वीस वर्षीय युवकाला भोसकून वर्णद्वेषी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचं कामही भारतीय विद्यार्थ्यांनी केलं. त्यावर कृष्णा यानी विद्यार्थ्यांना सबुरीचा सल्ला दिला-‘‘I would like to urge the Indian students to be patient and show restraint. They have gone there (Australia) for higher studies. They should concentrate on that rather than retaliate.’’
भारतीय विद्यार्थ्यांना काय हौस आहे या फंदात पडायची? की आपल्याला अणू इंधनाची किंमत ऑस्ट्रेलियाला भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवावर चुकवायची आहे?
तरी बरं! परदेशांमध्ये शिकायला गेलेल्या ८.३ लाख भारतीय विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९५ हजार भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेताहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून ऑस्ट्रेलियाला प्रचंड रेव्हेन्यू मिळतो. त्यापैकी एकटय़ा भारतातून ऑस्ट्रेलियात शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांकडून ऑस्ट्रेलियाला १३ बिलियन (अब्ज) अमेरिकन डॉलर्स दरवर्षी मिळतात. पैशाची गंगा सहजपणे दारी आणणाऱ्या या भगिरथांना तरी त्या देशानं सुरक्षेची हमी द्यायला नको का? आणि भारतीयांचा ओघही ऑस्ट्रेलियात वाहतो आहेच आणि शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी चाळीस टक्के विद्यार्थी पंजाबमधून जातात, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, अकाऊंटिंग या अभ्यासक्रमाला मुख्यत्वे प्राधान्य देतात. पंजाबमधून साधारण ५० हजार विद्यार्थी दरवर्षी परदेशी शिकायला जातात.
भज्जीचा नातेवाईक सुद्धा वर्णद्वेषाचा बळी ठरला! त्याच्या सव्वीस वर्षीय nephew (पुतण्या) उपकार सिंहनं मेलबोर्नमध्ये आत्महत्या केली असं कुटुंबीयांना सांगण्यात आलं. त्यांच म्हणणं आहे की त्याचं पार्थिव भारतात आलं, तर लोखंडी सळीनं मारल्यागत डोक्यावर आणि डोळ्याखाली जखम होती. अन् त्यांनी कारण सांगितलं होतं की त्याने स्वत:ला ट्रेनसमोर झोकून दिलं म्हणून. हरभजनसिंहला दाट संशय आहे की तोही भारतीय विद्यार्थ्यांवर झालेला रेसिस्ट हल्ल्याचाच बळी ठरलाय. उपकार सिंह बब्बल २००४ मध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा अभ्यास करायला ऑस्ट्रेलियाला गेला होता. त्याच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार एका वर्णद्वेषी हल्ल्यात ७ मे रोजी त्याचा मृत्यू झाला असल्याचं एका वर्तमानपत्रातली बातमी सांगते.
युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये तिथल्या मुलांच्या मनात भारतीय विद्यार्थ्यांबद्दल असंतोष खदखदत नसेलच तर असं काही ऑनलाईन, पोस्टस्, मेसेज बोर्डस्, ब्लॉग्ज बघून म्हणता यायचं नाही, too many fob’s अशी नाराजी तिथे व्यक्त होत आहे. fobs म्हणजे freshly off the boats! WZ overseas students `snobs’X नको आहेत, ते घोळक्यानंच असतात, त्यांना इंग्लिश नीट येत नाही, वगैरे मजकूर तिथे आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन स्टुडन्टस् ऑफ ऑस्ट्रेलिया (FISA) ही संघटना तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांवर होत असलेल्या वर्णद्वेषी हल्ल्यांच्या निषेधार्थ निदर्शने करत असतानाच घाबरलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याचंही काम करते आहे. माझ्या शेजारणीची बहीण अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. तिच्याजवळ ऑस्ट्रेलियातल्या सद्य परिस्थितीबद्दल, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल पृच्छा केली, तर तिनं सांगितलं की तिथे खूप सेफ आहे, विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले हा ‘मीडिया हाइप’ (Media Hype) आहे. इतर भारतीय विद्यार्थी वेगळंच, भयानक चित्र दाखवत होते. तेव्हा मग FISA चे प्रेसिडेन्ट अमित मेंघानी यांच्याशी दूरध्वनीवर विस्तृतपणे बोलले.
माझ्या शेजारणीच्या बहिणीच्या वक्तव्याबद्दल सांगून ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले म्हणजे खरोखरीच मीडिया हाइप आहे का, ते हल्ले खरंच रेसिस्ट अटॅक्स आहेत की आपल्या निव्वळ लूटमारीच्या- mugging च्या घटना आहेत आणि तिथली परिस्थिती एकदम ‘सेफ’ आहे, घाबरण्यासारखं वातावरण अजिबात नाहीये किंवा नक्की काय आहे, हे विचारताच अमित मेंघानीनी सांगितलं. ‘‘मीडिया हाइप आहे, असं कसं म्हणता? आतापावेतो २०-२५ विद्यार्थ्यांवर महिन्याभरात हल्ले झालेले आहेत. त्यांना वंशद्वेषातून, वर्षद्वेषातून भरपूर शिवीगाळही केली गेली आहे. बरं हे काही आज अचानकं उद्भवलेलं नाहीये, फार आधीपासून हे सगळं सुरू आहे. It is going on since long time. Earlier people never used to come forward.
भारतीय विद्यार्थी इथे शिकायला आले असल्यामुळे पोलिसांकडे जायला साहजिकच कचरतात. कशाला विनाकारण ‘पंगा’ घ्या, असं त्यांना वाटायचं. पण आता या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं, तेव्हा असह्य होऊन विद्यार्थी पोलिसांकडे गेले. तिथे त्यांच्या तक्रारींची दखलही घेतली गेली नाही. खरं म्हणजे भारतीय मीडियानंच या विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्यांना जगासमोर आणलं आणि भारतीय विद्यार्थ्यांची केस जोरदारपणे मांडली. कोण म्हणतं या निव्वळ लूटमारीच्या mugging च्या घटना आहेत म्हणून? विद्यार्थ्यांना वर्णद्वेषी शिवीगाळ केली जाते आहे, कुणाला मारलं जातंय, आणि कोण म्हणतं इथे सेफ आहे म्हणून? Travelling in public transport or going on the road after 8 O’Clock in the night is out of question. You cannot go out even during daytime. भारतीय विद्यार्थी आता दिवसाढवळ्यासुद्धा बाहेर पडायला कचरताहेत.’’ अमित मेंघानी सांगतात.
‘भारतीय विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियात झालेल्या हल्ल्यांमागे recession चा तर काही संबंध नाहीये, आपलं काम भारतीय विद्यार्थी हिसकावून घेताहेत, अशी तर त्यांची धारणा नाहीये?’ या माझ्या प्रश्नावर अमित मेंघानी म्हणतात, Victims हे Students आहेत आणि attackers हल्लेखोर हे टीनएजर्स, शाळा किंवा कॉलेजमधले विद्यार्थी आहेत. रिसेशनशी त्यांचा तसंच या हल्ल्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. आम्ही खरं त्यांच्या इथे शिकायला जाऊन, पैसे भरून त्यांच्यासाठी जॉब्ज क्रीएट करतो आहोत. तिथे रिसेशन कसं, instead we are generating jobs for them.’’
FISA ऑस्ट्रेलियातल्या भारतीय विद्यार्थ्यांना मानसिक आधार देते आहे. त्यांच्या संरक्षणार्थ आवाज उठवायचं काम करते आहे. FISA is an organisation, which integrates, empowers and represents Indian students in Australia. FISA मेंबर्स Victims चं कौन्सेलिंगही करताहेत. त्यांना स्वसंरक्षणार्थ ‘सेल्फ डिफेन्स’ शिकवणार आहे, सेल्फ डिफेन्सचे क्लासेस विद्यार्थ्यांसाठी आणि व्हिक्टिम्ससाठी FISA नं मेलबोर्न इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये आयोजित केले आहेत. त्यांच्यातल Fear & anxiety कमी करण्यासाठी FISA नं आर्ट ऑफ लिव्हिंगचे वर्कशॉप्स त्यांच्यासाठी आयोजित केले आहेत,’’FISA च्या कार्याबद्दल मी विचारणा केल्यावर अमित मेंघांनी सांगतो, ‘‘पण दोन्ही देशांच्या गव्हर्नमेन्टस्नी बरंच काही करायला हवं आहे.’’ या मुद्याशी संबंधित अनेक पैलूंवर, दोन्ही देशांनी त्यावर काय केलंय, त्यांची काय भूमिका राहिलीय यावरचं त्यांचं मत तो अधोरेखित करून सांगतो-‘‘A lot more needs to be done!’’
नौएडातल्या आमच्या एका फॅमिली फ्रेन्डची मुलगी लग्नानंतर २००४ साली ऑस्ट्रेलियात मेलबोर्नमध्ये स्थायिक झाली. तिचे मिस्टर १९९९ सालापासूनच ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले आहेत. ती स्वत:ही खूप चांगल्या प्रतिष्ठित पदावर जॉब करते आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांना रात्रीच काय, पण दिवसाही घराबाहेर पडणं कठीण आणि धोकादायक ठरतंय आणि तिथली परिस्थिती नक्की कशी आहे, का आहे, याचं विश्लेषण करून विस्तृतपणे सांगण्याबद्दल तिला विचारताच लगोलग तिनं कळवलं -
‘‘If you asked me about how Indians are treated here, before the recent attacks, I wouldn’t even have blinked before saying that Melbourne is just the best.
आमच्या वाटय़ाला कधीही कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आलं नाही. माझे आणि माझ्या मिस्टरांचे अनेक ऑस्ट्रेलियन मित्र आहेत. आम्हाला हे शहर असुरक्षित असल्याचा कधीच प्रत्यय आला नाही. उलट भारतातल्या अनेक मोठय़ा शहरांपेक्षा इथे ‘सेफ’ वाटतं.
आताचे जे हल्ले झाले आहेत, ते मुख्यत्वे विद्यार्थ्यांवर झाले आहेत आणि माझ्या मते त्याची अनेक कारणं आहेत- एक म्हणजे भारतीय विद्यार्थी जवळ रोख रक्कम बाळगतात, या उलट बहुतेक ऑस्ट्रेलियन विद्यार्थ्यांजवळ कार्ड असतं. रोख रक्कम जवळ बाळगल्यामुळे ते गुंडांचे, चोरांचे ‘टार्गेट’ होतात. दुसरं म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा वेगळे दिसतो. याला अर्थातच आपला नाइलाज आहे. A lot of Indian students just stick together. पण त्यांनी इथल्या मेनस्ट्रीम कल्चरमध्ये, लोकांमध्ये मिसळायला हवं. भारतीय विद्यार्थ्यांजवळ भारी, महागडे सेल फोन्स असतात आणि त्यांना ते Flaunt करायला आवडतं. वर सार्वजनिक ठिकाणी, ट्रेनमध्ये, आपल्या भाषेत जोरजोरात मोबाईलवर बोलण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. इथल्या कल्चरमध्ये ते बसत नाही. It just comes across as rude and alienating in a culture where everyone talks in a low tone, specially in public places.’’
ती सांगते,
‘‘Majority of Indian students come to study here so that they can get a ‘Permanent residency’ at the end of their course. आम्ही अशा अनेक भारतीय विद्यार्थ्यांना भेटलोय, जे आपल्या अभ्यासाचे कोर्सेस बदलत राहतात जेणेकरून त्यांना तिथल्या ‘पॉइण्ट सिस्टिम’चा पुरेपूर फायदा घेता येईल. त्यामुळे भारतीय विद्यार्थी कुठल्याही प्रकारची पोलिसांकडे तक्रार करायचं टाळतात. They avoid any kind of confrontation or trouble with police or ony law enforcement agency for the fear of being implicated or being deported to lose their chance of residency. त्यामुळे ते ‘लो प्रोफाईल’ राहतात. ऑस्ट्रेलियन विद्यार्थ्यांवर हल्ला झाला, तर ते पोलिसांकडे जातील, भारतीय विद्यार्थी पोलिसांकडे जाणं टाळतील. त्यामुळे ते ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरतात. शिवाय भारतीय विद्यार्थी खूप मेहनती आणि कष्टाळू असतात. तिथल्या शिक्षणाचा आपला खर्च भागविण्याकरिता ते ऑस्ट्रेलियन लोकांपेक्षा कमी मोबदल्यात, रात्री उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे काही ऑस्ट्रेलियन लोकांना वाटतं की भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांची कामाची संधी हिसकावून घेतलीये,’’ ती विस्तृतपणे विश्लेषण करून सांगते.
ऑर्कुटवर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या कम्युनिटीत जाऊन, कुठलीही ओळख नसताना मी लेखाकरिता तिथल्या परिस्थितीबद्दल विचारणा करणारा स्क्रॅप तुहिन अभ्यंकरला पाठवला आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्यानं इमेल, स्क्रॅप आणि जीचॅटच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीबद्दल इत्थंभूत माहिती दिली. मूळ मुंबईचा असलेला २५ वर्षीय तुहिन अभ्यंकर Wollongong, न्यू साऊथवेल्स या भागात जुलै २००४ पासून ऑस्ट्रेलियात राहतोय. तो IT Management मध्ये मास्टर्स करण्यासाठी आणि नंतर IT कन्सल्टण्ट म्हणून काम करण्यासाठी तिथे गेला असल्यामुळे त्यानं ऑस्ट्रेलियातलं भारतीय विद्यार्थ्यांचं जीवन अनुभवलंय तसंच एक ‘यंग प्रोफेशनल’ म्हणूनही तिथला अनुभव घेतो आहे. त्याच्या मते हे हल्ले वर्णद्वेषातून होत नाहीयेत. ४ ‘‘You will find that a very specific subsection of Indian community in Australia has fallen prey to these attacks. It is simply a case of the victims being a target of a crime of opportunity. Indian students make for easy targets due to their propensity to flash their wealth as a mark of their or their family’s success in India,’’
तो सांगतो.
‘‘रिसेशनशी याचा काहीही संबंध नाही. हे हल्लेखोर युवक ठग आहेत, ज्यांना ‘क्विक कॅश’ हवी आहे. भारतीय विद्यार्थी इथल्या लोकांमध्ये मिसळत नाहीत. आपल्या कम्युनिटीतच वावरतात. त्यांच्यामुळे Lack of Confidence मुळे ‘इझी टार्गेट ठरतात.’’ तो सांगतो. आपल्या इथून ऑस्ट्रेलियात शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संरक्षणार्थ ऑस्ट्रेलियाचे सरकार आणि पोलिस काय करताहेत, या माझ्या प्रश्नावर तो सांगतो- ‘‘I believe Australian Government and Police are following their own protocols and taking steps as they consider adequate. I have felt safer at 1 am in Sydney than I have at Marine Drive, Mumbai, where a constable has asked me and my friends to go home because the area is unsafe.’’ चला घरी जा, रात्री इथे safe नाय! The reality here is altogether different! Nowhere are Indians being targetted owing to their race. The only once who have fallen victims to these attacks are students, and while unfortunately they have been Indians, the attacks only happened because the victims probably seemed like easy targets,’’ तो सांगतो, ‘‘हे हल्ले प्रामुख्यानं ‘सबर्बज्’मध्ये झालेत. अशा भागांमध्ये झाले आहेत, जे मध्यमवर्गीय व्हाइट ऑस्ट्रेलियन लोकांसाठीही ‘अनसेफ’ आहेत. म्हणजे गेल्या वर्षी व्हिक्टोरिया या भागातल्या assaults च्या (हल्ल्यांच्या) ३१,२८४ घटना नोंदवल्या गेल्या आणि त्याच्या आधीच्या वर्षी ३१,०५२ घटना नोंदवल्या गेल्या. म्हणजे, एक लाख लोकांपैकी गेल्या वर्षी ६०१.४ आणि त्याआधीच्या वर्षी ५९६.३ लोकांवर हल्ले झाले असं आकडेवारी सांगते. त्यामुळे कुठल्या विशिष्ट भागात हल्ले होताहेत, केवळ भारतीय विद्यार्थ्यांवरच हल्ले होताहेत, असं काही नाही. या घटकेला ऑस्ट्रेलियात ९६ हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेताहेत, पैकी सुमारे ३४ हजार भारतीय विद्यार्थी मेलबोर्नमध्ये आहेत,’’ तुहिन अभ्यंकर अगदी सगळी आकडेवारी देऊन सांगतो, त्याच्या मतेोकरअ नं भारतीय विद्यार्थ्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवला, ‘‘What FISA can do from here onwards is to tap into the network of Indian students who have studied in Australia over the last few years and are now young professionals. That can help FISA help new students to network their way into the society and assimilate in a better manner,’’ तो सांगतो.
‘‘ऑस्ट्रेलियात शिकत असलेल्या माझ्या चांगल्या ओळखीच्या भारतीय विद्यार्थ्यांनं आपलं नाव न उघड करण्याच्या अटीवर खूप विस्तृतपणे या हल्ल्यांबद्दलची कारणमीमांसा आणि माहिती इ-मेलने मला दिली.
‘‘All these attacks have mostly taken place in remote suburban areas where there are very less people and very less police force. शहरात राहणं महागडं असल्यामुळे, परवडत नसल्यामुळे ९५ टक्के भारतीय विद्यार्थी उपनगरांमध्ये राहतात. त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. पण तो लोकल प्रॉब्लेम आहे. इथल्या स्थानिक रहिवाशांवरही हल्ले झालेत, होताहेत. The problem is with 10% Aussies, who are young, immature, are school or college dropouts, live on drugs, gambling and all and they resort to violence and loot to get money. हे दहा टक्के वाईट सवयींवाले लोक रेसिस्ट आहेत, पण उरलेले ९० टक्के ऑस्ट्रेलियन लोक अतिशय फ्रेण्डली, Courteous - मित्रत्वानं, सौजन्यतेनं वागणारे आणि सगळ्या वर्णाच्या लोकांशी व्यवस्थित वागणारे, सामावून घेणारे आहेत,’’ तो सांगतो.
‘‘बहुतेक सगळ्यांना वाटतंय की, भारतीय मीडियात हे सगळं तिखटमीठ लावून तर सांगितलं जात नाहीये ना, कारण इथे टीव्हीवर, वृत्तपत्रांमध्ये काय येतंय हे त्यांच्यापर्यंत जात नाही आणि भारतातले त्यांचे पालक २४ तास विविध चॅनल्सवरच्या दळल्या जाणाऱ्या त्याच त्याच बातम्या आणि रवंथ केले जाणारे विषय बघून-वाचून कमालीचे धास्तावून उठताबसता आपल्या मुलामुलींना फोन करून ते सुरक्षित असल्याची खातरजमा करून घेतात. पालकांना आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटणारच! पण या बातम्यांमुळे भारतात विलक्षण भयप्रद वातावरण आणि पाल्यांबद्दल काळजी निर्माण झालीये, विनाकारण. News channels make it seem as if the situation here is somewhat like a curfew after some riots have taken place, which is actually wrong.प्रत्येकजण आपापलं सामान्य जीवन जगतोय इथे, कसलीही भीती नाहीये, मात्र प्रत्येकजण याबाबतीत नक्कीच अधिक सतर्क, Conscious झालेला आहे, हे नक्की!’’ तो सांगतो, ‘‘Australian Govt. and police have vowed to bring this to an end with Prime Minister Kevin Rudd apologizing publically. दूरच्या उपनगरांमधली, जिथे हल्ले होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पोलिसांची गस्तही वाढविण्यात आलेली आहे. FISA नं शांततापूर्ण मोर्चा काढला होता, त्याला ऑस्ट्रेलियाच्या सरकारमध्ये, विरोधी पक्षनेते (leader of opposition) वगैरेंनाही आमंत्रित केलं होतं आणि आपल्या मागण्या त्यांना सादर केल्या, त्यांनीही त्या संबंधितांकडे पोहोचविण्याचं आश्वासन दिलं होतं.’’
श्रवणकुमारच्या स्थितीबद्दल तो सांगतो- ‘‘He is indeed still in coma and he was attacked by a screwdriver, was hit by a screwdriver on his head. Sravankumar and his friends supposedly had a brawl with some locals at a pub nearby. Next day, the locals traced their home and two guys attacked them. धक्कादायक गोष्ट म्हणजे, श्रवणकुमारवर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा त्याच्या घरात सुमारे तीसएक लोक उपस्थित होते, तरीही दोघे स्थानिक ऑस्ट्रेलियन त्यांच्या घरात घुसले आणि त्याच्यावर आणि त्याच्या मित्रांवर हल्ला करून निघून गेले!’’
एकूण वर्णभेदातून, वांशिक द्वेषातून हे हल्ले झालेत की नाहीत, याबाबत अशा संमिश्र प्रतिक्रिया आल्या, म्हटल्यावर या समस्येकडे पुन्हा एकदा नीट बघायला हवं. या अठरा-वीस मुलांवर हल्ला झाला आहे, हेही खरं आहे आणि सरसकट सगळ्यांवर वंशभेदातून हल्ले होत नाहीयेत, परिस्थिती मुळीच चिघळलेली नाहीये, हेसुद्धा खरं! भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात (आणि इतर देशातही) जर ‘soft target’ ठरत असतील, तर त्यांनी स्वत:ला स्ट्राँग, कणखर बनवायलाच हवं! इतर अनेकांनी म्हटलं तसं असंस्कृतपणे, अशिष्टपणे आपलं चारचौघातलं वागणं, सार्वजनिक ठिकाणचं सर्वमान्य नसलेलं वर्णन असू नये, याची खबरदारी घ्यावी. श्रीमंतीचं अनाठायी प्रदर्शन टाळावं.
अर्थात आपल्याकडे मुंबईत बिहारी विद्यार्थ्यांना मूर्खासारखी मारहाण करण्याची अनुचित घटना घडली होती, याचंही विस्मरण होऊ देऊ नये! उडदामाजी काळे गोरे असले तरी पेराल तसं उगवेल, हेही ध्यानी असू द्यावं!
rashmighatwai@yahoo.co.in