१० जुलै २००९

पावसाचा पहिला थेंब!

आषाढी!
शेवटी व्हायचं तेच झालं. मिरगानं दगा दिला. कुण्या बिराण्या देवानं आभाळ हिसकून घेतलं पुन्यांदा. त्याचं त्यालाच माहीत.
तोंड वासून आभाळाकडं नदर लावून बसलो. पण एकही ढग कुलुंगी कुत्र्यावाणी तुरतुरलादेखील
 
नाही! शेतकऱ्याचा जल्मच भिक्कार, हे दरवर्षीचं वाक्य स्वतशीच उच्चारत त्याने तिरीमिरीतच गठुळं आवाळलं, नि गावकऱ्यांच्या वारीत पाऊल घातलं.
आता शेती त्या पांडुरंगानं पाहावी. त्याला बी दुबार पेरणी करावीच लागंल. कुठून झक मारून पैका आणतो ते पाहू. मजूर कुठून मिळवतो तेही पाहू. सरकारी जित्राबं वेटोळी घालून बसलेलीच आहेत. त्यांचे डंख कसे चुकवतो ते पाहू.
देवा पांडुरंगा, जय हारी विठ्ठल! आता पतपेढी, पाटील काप्रेटिव, सावकार सगळं तूच पाहून घे! आपल्याच्यानं तर आता काही झेपत नाही ही कुणबिक. या भिकार धंद्याला आग लागो. तुझ्या पायाशी येतो. पुढचं बघ तूच..
प्याकेज आलं होतं. सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलायची भाषा सरकार करत होतं. पण या निसर्गानंच आधी उभा न् आडवा सोलला, त्याचं काय?
आख्खा महिना कोरडाठाक गेला. मेंढराच्या कळपागत उंडारणारे पांढरे ढग आणि चराचरा चराचरा जाळणारे ऊन यापलिकडे काही दिसलंच नाही.
सरकारी बाता आणि देवाच्या लाथा!
बास, कुणबिकीत येवढंच उरलं आहे. देवाच्या ‘प्याकेज’मधे पावसकाळ बहुधा बसत नसावा. आम्हा कुणबी केले, हे तुवा बरे नाही केले रे देवा!..
नशिबाला, देवाला, आयुष्याला शिव्याशापांचे फटकारे मारत मारतच तो येथवर पोचला. दुरून राऊळाचे कळस दिसायला लागले, तशीे त्यानं रागारागातच हात आपटले आणि जोडले. नमस्कार रे बाबा! दंडवत! याच जल्मी फास घेण्याची पाळी आणलीस. पुन्यांदा असं करू नको..
..राऊळ जवळ आलेलं पाहून वारी हरखली होती. ‘जय हारी विठ्ठल’, ‘ज्ञानोबामाऊली तुकाराम’च्या गजरानं परिसर निनादत होता.
अथांग माणूस पसरलेला.
पांढरे, भगवे, तांबडे, जांभळे.. हिरव्या काठपदराचे रंगच्या रंग उधळलेले. मृदुंग, एकतारी, चिपळ्यांचे नाद आसमंतात भरून राहिलेले. पांढरे कपडे घालून डागतर मंडळींचे गट फिरताहेत. फटफटय़ा, जिपा, मेटय़ाडोर, सुम्मो.. नुसता गजबजाट आहे.
पण प्रत्येक डोळ्यात अवघ्या हंगामाचं सुख दाटलेलं. पावसानं हात द्यावा, जमिनीनं महापूर द्यावं नि अवघी कुणबीक सार्थकी लागावी, तसं जन्माच्या कर्माचं समाधान नुसत्या या राऊळाच्या दर्शनानं होतं.
पाहता पाहता त्याचं शेतकरी मन उचंबळून आलं. डोळ्यातून धारा वाहू लागल्या, रस्ताभर घातलेल्या शिव्याशापांचा क्षणार्धात विलय झाला, आणि त्याच्या देहामनात अष्टसात्विक भाव उमटले.
‘‘देवराया, चुकलं-माकलं घे पदरात. अकाळ-दुकाळ वारी चुकिवली नाही. आषाढी एकादस वाया घालिवली नाही. जिमिन तुझी, दाणं बी तुझं. मनासारखं कर..’’ हात जोडून तो म्हणाला.
झिम्माड पावसाच्या सरींनी अवघे वैष्णव भिजून गेले होते.
pravin.tokekar@expressindia.com