संजय राऊत जर माझ्या आयुष्यात आला नसता तर मी आजही भाडय़ाच्याच फ्लॅटमध्ये राहिलो असतो. त्याच्या अथक टुमण्यांमुळे मी घर घ्यायला प्रवृत्त झालो. त्याने घर घेण्याकरिता कर्ज घेण्याची जी भीती माझ्या मनात होती ती घालवली. एवढंच नव्हे तर कर्जावर जामीन राहायला सही करायला माझा इतर कुणी मित्र तयार नसताना एका अत्यंत आणीबाणीच्या दिवशी जामीन म्हणून सही करायला कुलाब्याला बँकेत आला. तो दिवस आणीबाणीचा होता शिवसेनेसाठी. त्या दिवशी शिवसेनेत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात अखेरचा ‘समेट’ झाला होता. बाळासाहेबांनी मुलगा आणि पुतण्याला टिळा लावून प्रेसला फोटो दिले होते. संजयही त्या फोटोत दिसतो. तिथून पळत तो थेट कुलाब्याला सारस्वत बँकेत माझ्यासाठी जामिनाकरिता अक्षरश: घामाघूम होत आला. घराची किंमत मला परवडेल अशी व्हावी यासाठीही त्याने अथक प्रयत्न केले.
बँकेतल्या कामांना पूर्ण करून आम्ही राज ठाकरेंकडे गेलो. राज यांचा चेहरा, बोलणं आणि त्यांची करण्यात आलेली कोंडी पाहताच मी ओळखलं की राज आणि उद्धव यांच्यातला हा समेट शेवटचाच! मी तिथे संजयच्याच गाडीने आलो. त्याच्याच गाडीने ‘सामना’मध्ये परत गेलो. ती त्याची स्कोडा गाडी नंतर राजने शिवसेना सोडल्यावर राजसमर्थकांकडून फोडली गेली व ऐतिहासिक बनली.
संजय हा अत्यंत उद्धट माणूस आहे. अत्यंत खडतर आणि भयानक वाटाव्या अशा परिस्थितीतून त्याने आजचं यश मिळवलेलं आहे. तो अप्रतिम असा आक्रमक लेखक आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्याच्या तोडीचा लोकांशी नाळ जोडला गेलेला त्याच्या वयाचा दुसरा लेखक नाही. तो लिहितो ते ‘सामना’चे अग्रलेख बाळासाहेबांनीच लिहिले आहेत असं वाटतं. इतकं बाळासाहेबांप्रती त्याचं समर्पण आहे. पण व्यक्तिश: मला हे दुर्दैवी वाटतं. एके काळी तो ‘लोकप्रभा’चा उपसंपादक होता. स्वत:च्या लेखणीच्या बळावर त्याने भल्याभल्यांना हलवून सोडलेलं होतं. त्याच मार्गाने तो पुढे जात राहिला असता तर तो आज फार मोठा लेखक- संपादक झाला असता. महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष फक्त त्याच्या नावाने थरथरले असते. पण दुर्दैवाने तो वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी (जन्म नोव्हें. १९६१) शिवसेना व बाळासाहेबांचा गुलाम झाला. त्याच्या बालपणात त्याने निम्नमध्यमवर्गीय कुटुंबातही वडील व काकांना शिवसेनेसाठी पोलिसांचा अमानुष मार खाताना पाहिलं होतं. शिवाय बाळासाहेबांमुळे भ्रमित झालेल्या वातावरणात तो मोठा झाला. त्यामुळेच उगाचच अतिउद्धटपणा, मित्रांचे योग्य सल्ले न ऐकणं, असुरक्षितता या साऱ्यांचा तो शिकार ठरला आणि एक अत्यंत गुणी माणूस आणि लेखक शेवटी शिवसैनिक झाला. त्यामुळे तो निष्कलंक, चारित्र्यवान आणि अस्सल मराठी माणूस आहे याबद्दलची विश्वासार्हताच तो गमावून बसला!
संजय राऊत आज शिवसेनेचा राज्यसभेचा खासदार आहे. लेखकाच्या बेंबीत जी कस्तुरी दडलेली असते तिचा वास तो जितका लवकर घेईल आणि ती कस्तुरी आपल्याच बेंबीतून स्रवते आहे हे समजून घेईल तेवढं चांगल्या लेखकाचं लवकर खरं सोनं होतं. पण त्या वासाने धुंद होऊन जंगलात सैरावैरा जर कस्तुरीमृग त्या वासाच्या शोधार्थ फिरू लागला (जे कस्तुरीमृग वास्तवात करतो!) तर तो झाडांमध्ये शिंग अडकून कस्तुरीसाठी माणसांचा शिकार बनतो. संजय असाच शिकार बनला. तो स्वत:च्या कस्तुरीला शिवसेनेत आणि बाळासाहेबांत शोधत पळत राहिला. उद्धववर आपली निष्ठा प्रकट करण्यासाठी त्याने स्वत:ची शिंगं स्वत:च झाडात अडकवून घेतली. जे त्याच्यासाठी विनाशक होतं. कारण उद्धव शंभर टक्के संशयी आहे. त्यामुळे संजय जितकी निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करील, तितकाच संशय उद्धवला राहणार!
संजय, तुझ्यातल्या लेखकाचं काय केलंस हे तू ? लेखणीची निष्ठा कुणालाच (स्वत:च्या बापालाही) अर्पण करायची नसते रे! खऱ्या लेखकाला जगातल्या कुणालाही फाटय़ावर मारता आलं पाहिजे. बाळासाहेबांनी संजय राऊतला उत्तम आणि कुशलपणे वापरला. खासदार मात्र संजय निरूपमला आधी केला. संजयने खरं तर तेव्हाच ठाकरे ‘केमिस्ट्री’ समजून घ्यायला हवी होती. यासाठी मी त्याला किमान कोटी शिव्या घातल्या असतील. पण शिकार होत असताना हा कस्तुरीमृग उलटा छातीत रुतलेला बाण काढणाऱ्या मलाच शिव्यांची लाखोली वाहता झाला. आमची या विषयावर अनंत वेळा भांडणं होतात. शिवसेनेचा आपण नेता झालो म्हणजे काही तरी भूषणास्पद आहे असं संजयला वाटायला लागलं. तर मी त्याला म्हणालो, ‘लीलाधर डाकेही होते रे शिवसेना नेते!’ तो उखडतो. हा त्याच्यातला न्यूनगंड आहे. ‘‘महाराष्ट्राचं भाग्य घडवायला हवेत कशाला पवार किंवा ठाकरे? राऊत, जेथे, पायगुडे, जाधव कुणीही या मराठी मनाच्या गवताला भाले फोडू शकतात. अगदी मेटे, परुळेकरसुद्धा. ठाकरे, पवार नव्हते. मराठी माणूस होताच. ते नसतील तेव्हाही तो असेलच. त्यांची जागा इतर कुणीतरी घेईल. त्यांची सरंजामशाही सहन करून अब्जावधी रुपये त्यांच्या घशात कशाला ओतायचे आपण? मंत्रचळ लागल्यासारखे?’’ हे मी भाषण एकदा संजयला ऐकवलं. तर तो लहान मुलाचं ‘टेडी बेअर’ काढून घेतल्यावर जसं ते बावरून किंचाळतं तसं करायला लागला.
संजयला आपल्यात अडकवून बाळासाहेबांनी एक अत्यंत धोकादायक लेखक आपला शत्रू बनू दिला नाही हे त्यांचं निर्विवाद कौशल्य. त्यासाठी ते त्याला इमोशनली ब्लॅकमेलच करतात. पण त्यामुळे स्वत: संजय जे होता ते तो राहिला नाही. मला तो आवडतो तो त्याच्या निष्कपट आणि मानवतावादी स्वभावामुळे. पण न्यूनगंडातून आलेला उद्धटपणा त्यात पुरेपूर आहे. बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवलेल्या प्रत्येकातच तो आहे. त्यामुळे संजयबद्दल खूप गैरसमज आहेत. उदा. तो गर्विष्ठ आहे वगैरे. हे सारं खोटं आहे. तो असुरक्षित कोब्रा नागासारखा फुसफुसत असतो. दात रुतवण्याचं त्याचं सामथ्र्य आणि विष बाळासाहेबांनी गारुडी बनून कधीच गुल केलंय.
संजय अजिबात चांगला वक्ता नाही. खूप मेहनत करून अलीकडे तो केवळ भाषणबाज झालाय. शिवसेनेपुरतं ते ठीक आहे. कारण तिथे शिवसेनाप्रमुख किंवा कार्याध्यक्ष (आता कार्यप्रमुख) येण्याअगोदर नरडी आणि माईक गरम करण्यापुरतीच माणसं लागतात. ‘वापरा आणि फेका’ या ठाकरे तंत्रात संजय इतका काळ टिकून कसा राहिला? मिलिंद नार्वेकर नावाच्या त्सुनामीत वाहून कसा गेला नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं एकच कारण आहे. त्याची न बदलता येण्याजोगी अपरिहार्य गरज जी शिवसेनेला आहे. तो नसेल तर ‘सामना’ हे वृत्तपत्र ‘बुरुज’ किंवात ‘मर्डर’ अशा गावपातळी वृत्तपत्राहून वेगळं राहणारच नाही. संजय आज आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभा आहे की तो पुढे काय करणार? याची मला काळजी वाटते. कधी कधी ही काळजी तर अतिप्रचंड असते. त्याच्या अग्रलेखांची भाषा उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारी नाही. शिवाय राज ठाकरे हे त्याचे एकेकाळी अत्यंत जिवलग मित्र होते. ते आता तसे राहिलेले नाहीत. शिवाय ते स्वत: अस्तित्वाच्या संघर्षांत गुंतलेले आहेत. शरद पवार काँग्रेसच्या मार्गाने निघालेले. अशा वेळी राजकारणाचा कीडा चावलेला संजय पुढे कुठच्या स्टेशनवर जाणार?
संजय आणि मी एकमेकांचे मन वाचू शकतो. मधल्या एका काळात शिवसेनेत मिलिंद नार्वेकरांनी परदेशातून कुणाचाही फोन टॅप करता येणारं मशीन आणलंय अशी खरी-खोटी अफवा उठली. शिवसेनेतले सर्व नेते, उपनेते मला भलत्याच नंबरवरून फोन करून आपली ‘खुशाली’ कळवू लागले. संजयच्या रक्तात हा खोटेपणा नाही. पण तोही माणूस आहे. त्यालाही असुरक्षित वाटलंच. त्याने माझ्याशी मी फोन केल्याशिवाय बोलणं बंद केलं. काही वर्षांपूर्वी संजयला ‘लोकसत्ता’च्या संपादकपदाची ऑफर होती. मी त्याला म्हटलं, ‘या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची ही तुला अखेरची संधी आहे. तू स्वत:चा स्वत:ला परत सापडशील. बाळासाहेबांवरील प्रेमामुळे त्याने ती संधी घेतली नाही. परत माझ्या शिव्या खाल्ल्या. नारायण राणेंशी संजयचं अजिबात वैर नाही. उलट खासगीत तो त्यांच्याविषयी (किंवा कुणाहीविषयी) आदराने बोलतो. पण बाळासाहेब व उद्धवसाठी तो त्यांच्याशी शत्रूत्व घेता झाला. तो अतिशय बुद्धिमान आहे. पण भ्रष्ट किंवा पैसेवाला नसल्याने त्याची एक शोकांतिका झालेली आहे. ज्यात त्याचे गुण मरत आहेत आणि दोष लोकांना दिसताहेत. तो स्वत: ना मागे फिरू शकत ना पुढे जाऊ शकत. त्याच्यासारख्या शिवसेनेचं राजकारण कोळून प्यालेल्या बुद्धिमान लेखकाला आता पुढच्या काळात अनेक कमअस्सल, नव्याने बाटलेले शिवसेनेत येणार हे सर्वजण राजकारण म्हणजे काय? शिवसेना म्हणजे काय? वगैरेंचे धडे देणार आहेत. या साऱ्यांवर उतारा म्हणजे बाळासाहेबांकडून निघताना बाळासाहेब गुलालाचा एक टिळा लावतात. तेवढा एक टिळाच संजयपाशी राहील! तेवढंच त्याचं भांडवल!
अलीकडे संजयची तब्येत वारंवार बरी नसते. मध्यंतरी तर तो चक्कर येऊन पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. हे अकाली वृद्धत्वाचं लक्षण आहे. बाळासाहेबांचे अग्रलेख लिहून लिहून संजय मनाने त्यांच्याच वयाचा झालाय. मला अक्षरश: भडभडून येतं. असं वाटतं की, संजयला घट्ट मिठी मारून ओक्साबोक्शी रडावं आणि शांतपणे विझून जावं.
महाभारतात धृतराष्ट्रापासून कौरव पांडवांपर्यंत सर्वाचं काय झाले हे चटकन आपल्या ओठांवर असतं. पण संजय धृतराष्ट्राला आपल्या दिव्य दृष्टीने युद्ध संर्पेयत मदत करून कुठे नाहीसा झाला हे कुणाला ठाऊक असतं?
संजय राऊत हा स्वत:च स्वत:ला कमी लेखण्याच्या रोगाचा शिकार झालेला आहे. नाहीतर तो महाराष्ट्राचा चांगला गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री झाला असता. किमान त्याने शिवसेनेचा (खरा) इतिहास लिहिला तर कोटय़वधी रुपये तो रॉयल्टीत मिळवेल. पण यातलं काहीही होणार नाही.
कारण मला संजयच्या दूरदृष्टीबद्दल माहीत आहे. पण त्याची जवळच्याबद्दलची दृष्टी अंधभक्तीने अधू झालेली आहे. तो ‘जय महाराष्ट्र’ म्हणताना हे विसरतो की, मुंबई आपल्या डोळ्यादेखत जैनांनी आणि भैय्यांनी अमराठी करीत नेली. ही त्याची विस्मृती ऐच्छिक आहे. त्यावर तोच निराश असेल. एकटा असताना उशीत डोकं घालून रडत असेल त्याचं आणि महाराष्ट्रातल्या शंभरातल्या नव्व्याण्णवांचं भविष्य ठाकरे आणि पवारांनी घडवलंय आणि ते याहून वेगळं नाही.
संजय, फोन कर. टॅप झाला तरी. कारण आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही रे!
raju.parulekar@gmail.com |