४ सप्टेंबर २००९
बखर संगणकाची

सुपर कम्प्युटर आणि सेमूर क्रे ही नावं एकमेकाशी कायमची जोडली गेली. सेमूर क्रे या माणसाचं स्वप्न जगातला सगळ्यात वेगवान आणि ताकदवान संगणक बनवायचा असं होतं, आणि त्यानं ते जिद्दीनं पूर्ण करून दाखवलं. किंबहुना १९८६ साली जेव्हा एकूण १३० सुपर कम्प्युटर्स जगभरात वापरले जात होते तेव्हा त्यातले ९० क्रेच्या ‘क्रे रीसर्च’ या कंपनीनं तयार केले होते.

सुपर कम्प्युटर म्हणजे जगातला सगळ्यात वेगवान आणि ताकदवान संगणक. असा संगणक बनवणं खूपच अवघड असतं. आता जरी ही कल्पना काळाच्या ओघात आणखीनच पुढे गेलेली असली तरी एकेकाळी ज्या संगणकाच्या सूचना ‘२० मेगाफ्लॉप्स’ म्हणजेच दर सेकंदाला २ कोटी इतक्या प्रचंड वेगवान दरानं अंमलात येऊ शकायच्या अशा संगणकाला सुपर कम्प्युटर म्हटलं जायचं. या आकडय़ांचा अंदाज यावा म्हणून तुलनेसाठी दोन उदाहरणं घेऊया. सेमूर क्रे नावाच्या माणसाच्या कंपनीनं १९७० च्या दशकाच्या मध्यावर बनवलेल्या ‘क्रे-१’ नावाच्या सुपर कम्प्युटरमध्ये १०० मेगाफ्लॉप्सपेक्षा

 

(म्हणजे दर सेकंदामागे १० कोटींपेक्षा) जास्त सूचना अंमलात आणायची जबरदस्त क्षमता होती. याउलट आयबीएमनं १९८१ साली बाजारात आणलेल्या ‘पर्सनल कम्प्युटर (पीसी)’ची क्षमता फक्त ०.०००५ मेगाफ्लॉप्स इतकी, तर मोठमोठय़ा आयबीएम मेनफ्रेम संगणकांची क्षमता ३ ते ४ मेगाफ्लॉप्स इतकी असायची. साहजिकच सुपर कम्प्युटरची किंमतपण त्या प्रमाणातच असायची. सुरुवातीला एक सुपर कम्प्युटर ४५ लाख ते १.३० कोटी डॉलर्सना पडायचा! म्हणजे त्यावेळच्या रुपयात २५-३० कोटी रुपये! सुपर कम्प्युटर्स वापरून शास्त्रज्ञ आणि अभियंता मंडळी प्रत्यक्षात करू किंवा बघू न शकणाऱ्या गोष्टींचं ‘सिम्युलेशन’ करून त्यांच्याविषयी अंदाज बांधू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या विमानाच्या पंखांवरून जात असलेल्या हवेचा वेग किती असेल हे मोजणं प्रत्यक्षात खूपच अवघड आहे. पण त्याविषयीची अनेक गुंतागुंतीची गणितं सुपर कम्प्युटरमध्ये भरून त्याविषयीचा जवळपास अचूक अंदाज काढणं शक्य होतं.
यामुळेच सुपर कम्प्युटर आणि सेमूर क्रे ही नावं एकमेकाशी कायमची जोडली गेली. सेमूर क्रे या माणसाचं स्वप्न जगातला सगळ्यात वेगवान आणि ताकदवान संगणक बनवायचा असं होतं, आणि त्यानं ते जिद्दीनं पूर्ण करून दाखवलं. किंबहुना १९८६ साली जेव्हा एकूण १३० सुपर कम्प्युटर्स जगभरात वापरले जात होते तेव्हा त्यातले ९० क्रेच्या ‘क्रे रीसर्च’ या कंपनीनं तयार केले होते.
सेमूर क्रे याचा जन्म १९२५ साली विस्कॉन्सिनमध्ये झाला. सैन्यात काही र्वष इलेक्ट्रिशियन म्हणून काम केल्यावर क्रे यानं विस्कॉन्सिन विद्यापीठात आपलं शिक्षण सुरू केलं. नंतर त्यानं ते सोडून मिनासोटा विद्यापीठात शिकायला सुरुवात केली. पण इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग हा विषय त्याला फारच सोपा तसंच कंटाळवाणाही वाटायचा. तरीही त्यात पदवी मिळवून त्यानं नंतर गणितात उच्चपदवीचं शिक्षण पूर्ण केलं. १९५० ते १९५७ या काळात क्रे यानं ‘इंजीनिअरिंग रिसर्च असोसिएट्स (इआरए)’ या कंपनीत काम केलं. तिथेच त्याची संगणकांशी प्राथमिक ओळख झाली. पण लवकरच त्यानं ती नोकरी सोडून दिली.
१९५७ साली क्रे आणि इतर ८ जणांनी मिळून ‘कंट्रोल डेटा कॉपरेरेशन (सीडीसी)’ ही नवीन कंपनी काढली. या कंपनीमध्ये क्रे याला अगदी मोकळेपणानं सुपर कम्प्युटर बनवायची परवानगी होती. अर्थात त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा निधी नव्हता. त्यामुळे हिंडून जुने झालेली उपकरणं स्वस्तात विकत घेऊन क्रे यानं कसाबसा ‘१६०४’ नावाचा संगणक बनवला. पण एकूण त्याचा हा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरला. सीडीसी कंपनीनं स्थापनेनंतर दोनच वर्षांमध्ये नफा कमवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. पण या सगळ्या काळात क्रे याची पत बरीच वाढली असली तरीही वरच्या हुद्दय़ावर गेल्यावर तंत्रज्ञानाशी संबंधित नसलेली कारकुनी आणि इतर व्यवस्थापनाची कामंच त्याच्याकडे यायला लागली. त्यामुळे कंटाळून क्रे यानं सीडीसी कंपनीचा प्रमुख असलेल्या नॉरिसला आपण नोकरी सोडून आपल्या घरी बसूनच सुपर कम्प्युटर बनवायचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. पण नॉरिसनं त्याला तसं करण्यापासून परावृत्त करून त्याऐवजी आपण सीडीसी कंपनीचीच एक शाखा तुझ्या घराजवळ काढूया असं सांगितलं. क्रे याची त्याच्या घराजवळ ४० एकरची जमीन होती. त्यात नॉरिसनं आपल्या कंपनीची एक शाखा काढली. तिथे आता क्रे याला चक्क चालत जाता यायचं! तसंच त्याला एकटय़ानंच काम करत राहायला आवडे. नॉरिसलाही त्यानं आपल्याला वर्षांत फक्त दोनदा भेटता येईल, आणि तेही त्यासाठीची ‘अपॉइंटमेंट’ घेऊनच, असं सांगितलं. त्याऐवजी क्रे हाच कंपनीच्या मिनियापोलिसच्या मुख्यालयात दर काही महिन्यांनी जायचा. तसंच आपल्या घराजवळच्या कार्यालयात अनेक मान्यवर मंडळी क्रे याची व्याख्यानं ऐकायला यायची. जेवणानंतर ते सगळे लोक क्रे याच्या सन्मानार्थ त्याला एखाद्या उंची हॉटेलात जेवायला घेऊन जायचे. पण त्याचं क्रे याला अजिबात काही वाटायचं नाही. उलट तो घाईघाईनं तिथे एक ‘हॉट डॉग’ घेऊन खायचा आणि उपस्थितांची माफी मागून पुन्हा आपल्या कार्यालयात कामासाठी जायचा!
२२ ऑगस्ट १९६३ या दिवशी सीडीसी कंपनीच्या नॉरिसनं क्रे याला त्याच्या घराजवळ सुपर कम्प्युटर बनवण्यासाठी कार्यालय काढून देण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरला. त्या दिवशी सीडीसीनं ‘सीडीसी ६६००’ या नावाचा जगातला सगळ्यात जास्त ताकदीचा संगणक बनवल्याचं जाहीर केलं. हा संगणक आयबीएमनं तीन वर्षांपूर्वी बनवलेल्या आणि नंतर कंटाळून त्यासंबंधीचं काम थांबवलेल्या ‘स्ट्रेच’ नावाच्या सुपर कम्प्युटरपेक्षा तिप्पट क्षमतेचा होता! साहजिकच या सगळ्यामुळे आयबीएमची नुसती लाहीलाही झाली! आयबीएमच्या सुपर कम्प्युटरपेक्षा हा ‘६६००’ संगणक आकारानं खूप छोटा आणि स्वस्त (७५ लाख डॉलर्स किमतीचा) होता.
१९६७ साली या संगणकाची पुढची आवृत्ती असलेला ‘७७००’ संगणक बनवायचा बेत क्रे यानं आखला होता. १९६९ साली तो तयार झालासुद्धा. नंतर क्रे यानं यापुढे जाऊन ‘८६००’ संगणकसुद्धा बनवला. पण आता सीडीसी कंपनीला त्याची विक्री करण्यात फारसा रस उरला नव्हता. अशा परिस्थितीत सीडीसीबरोबर राहण्यात क्रे याला काही रस उरला नाही. त्यामुळे सीडीसीमधल्या काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यानं ‘क्रे रिसर्च’ नावाच्या कंपनीची स्थापन केली. ही कंपनी फक्त सुपर कम्प्युटर्स बनवणार, आणि तेही एका वेळी एकच, असं ठरलं होतं. गंमत म्हणजे सीडीसीलाही क्रे यशस्वी व्हावा असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी क्रे याला सुरुवातीचं भांडवल म्हणून ५ लाख डॉलर्सचा निधी दिला होता. आर्थिकदृष्टय़ा मात्र क्रे याची कंपनी चांगलीच अडचणीत आली. त्यामुळे १९७६ सालच्या सुरुवातीला क्रे यानं आपल्या कंपनीला शेअरबाजारात उतरवायचं ठरवलं. ही चाल चांगलीच यशस्वी ठरली. अन्यथा बहुतेक ही कंपनी बंद पडली असती. त्यावेळी क्रे याच्या कंपनीकडे एकही ग्राहक नव्हता; तिनं अजून एकही सुपर कम्प्युटर तयार केला नव्हता; त्याचा खर्चच ८८ लाख डॉलर्स येणार होता, आणि एकूणच ही कंपनी खूप यशस्वी ठरली तरी तिला ८० पेक्षा जास्त ग्राहक मिळणार नाहीत असा अंदाज होता. अशा धुसर परिस्थितीतसुद्धा कंपनीनं ६ लाख शेअर्स बाजारात आणले तेव्हा त्यांची ताबडतोब खरेदी झाली, आणि कंपनीकडे १ कोटी डॉलर्सचं भांडवल आलं!
शेवटी ‘क्रे-१’ नावाचा सुपर कम्प्युटर क्रेच्या कंपनीनं १९७६ सालच्या मार्च महिन्यात ‘लॉस अलमॉस नॅशनल लॅबोरेटरी’ला विकला. हा संगणक बनवायच्या काळात क्रे दुपारी कार्यालयात येऊन ४ वाजेपर्यंत त्याच्या सहकाऱ्यांबरोबर काम करायचा. मग घरी जाऊन पहाटे एकटाच तो पुन्हा कार्यालयात येऊन बरेच तास काम करायचा. १९७९ सालापर्यंत सहा ‘क्रे-१’ सुपर कम्प्युटर्स विकल्यावर त्याची पुढची आवृत्ती असलेल्या ‘क्रे-२’ संगणकावर काम सुरू झालं. या संगणकात इतकी इलेक्ट्रॉनिक उपकरणं होती की तो वापरल्यावर भयानक तापायचा. त्यामुळे ती खराब होतील अशी भीती वाटून क्रे यानं या संगणकातच तो थंड राहील यासाठी पाणी फवारण्यासारखी यंत्रणा बसवली होती. त्यामुळे काही जण गंमतीनं या सुपर कम्प्युटरला ‘मत्स्यालयातला संगणक’ असं म्हणायचे!
१९७७ सालापर्यंत क्रे याची कंपनी नफा कमवण्याच्या स्थितीत आली होती. १९८४ साली तिनं चक्क २३ सुपर कम्प्युटर्स विकले! तंत्रज्ञानातल्या सुधारणांमुळे क्रे यानं या सुपर कम्प्युटर्सच्या किमतीही मूळच्या किमतींच्या तुलनेत ५० लाख ते १ कोटी डॉलर्सनी कमी केल्या होत्या. १९८१ साली पुन्हा व्यवस्थापनाची कामंच खूप वाढल्यामुळे क्रे यानं आपल्या कंपनीचं अध्यक्षपद सोडून पुन्हा आपला सगळा वेळ संशोधनात आणि तंत्रज्ञानविषयक कामांमध्ये घालवायचं ठरवलं. १९८८ साली त्यानं ‘क्रे-३’ हा पुढचा सुपर कम्प्युटर बनवला. या संगणकाचा आकार ‘क्रे-२’च्या तुलनेत फक्त एक पंचमांश होता! गंमत म्हणजे तरीही या ‘क्रे-३’ संगणकाच्या सीपीयूला म्हणजे मेंदूला ‘फक्त १६ स्क्वेअर फूट’ इतकी जागा लागायची! याच्यावरून ‘क्रे-१’ आणि ‘क्रे-२’ या संगणकांचा आकार किती मोठा असेल याचा आपल्याला अंदाज येईल!
क्रे याच्या मते त्याच्या यशाचं रहस्य म्हणजे संगणक बनवताना कमीत कमी माणसांना आपल्या कामात सहभागी करून घेणं हे होतं! त्याचं मत नवा संगणक बनवायचा तर खरं म्हणजे त्यावर एकटय़ानंच (म्हणजे फक्त त्यानं स्वत:च) काम केलं पाहिजे असं होतं! पण प्रत्यक्षात त्याला एकटय़ाला हे शक्य होणार नाही हे समजल्यामुळे नाइलाजानं का होईना पण तो जास्तीत जास्त १२ लोकांची टीम बनवे.
क्रे हा संगणकांच्या क्षेत्रातलं मोठं प्रस्थच बनला होता. त्यामुळे त्याला अनेक ठिकाणांहून व्याख्यानं देण्यासाठी यायची आमंत्रणं यायची. पण आपल्या सुपर कम्प्युटर्स बनवायच्या कामात असले ‘फालतू’ व्यत्यय नको असल्यामुळे तो ती आमंत्रणं तितक्याच तातडीनं नाकारायचा! १९७६ ते १९८१ या काळात त्यानं एकाही पत्रकाराला आपल्या जवळपाससुद्धा फिरकू दिलं नाही. रोज दुपारी तो आपल्या फोनचा रिसीव्हर काढून ठेवायचा! कुठल्याही क्षुल्लक गोष्टीमध्ये वेळ फुकट घालवणं त्याला अजिबात पसंत नसे. नवीन गाडी घ्यायची वेळ आली की तो आपल्या घरापासूनच्या सगळ्यात जवळच्या दुकानात जायचा, आणि त्यातली दाराजवळची सगळ्यात जवळची गाडी सरळ विकत घेऊन टाकायचा (म्हणजे मग अनेक गाडय़ा बघणं, त्यांची तुलना करणं, तिथल्या विक्रेत्यांशी बोलणं या सगळ्या अनावश्यक गोष्टी तर टळायच्याच, पण त्याशिवाय दाराजवळची गाडी घेतल्यामुळे ती पटकन बाहेर आणणंही शक्य व्हायचं, आणि त्यामुळे त्याची आणखी १-२ मिनिटं वाचायची!).
७१ र्वष वय असताना क्रेचा २२ सप्टेंबर १९९६ या दिवशी भयानक अपघात झाला. ३३ र्वष वयाच्या डॅनियल रॅरिक नावाच्या माणसानं अतिशय वेगानं गाडी चालवत असताना एका गाडीला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात क्रे याच्या जीपला धडक मारली आणि ती जीप तीन वेळा उलटपालट झाली! रॅरिकला या अपघातात काही झालं नसलं तरी क्रेवर अनेक तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण त्यात यश न आल्यानं शेवटी ५ ऑक्टोबरला त्याचा दुर्दैवानं अंत झाला!
godbolekahate@gmail.com