| ‘फलज्योतिषाची ऐशीतैशी’ या लेखात फलज्योतिष संस्कृती कशी घडत गेली याचा इतिहास जाणून घेणे प्रबोधनकारी ठरू शकते, असा डॉ. रायकरांचा प्रतिपादनाचा मुद्दा आहे आणि तो त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने सविस्तरपणे मांडला आहे. त्यांच्या लिखाणात सत्य आहे, पण ते इतिहासपूर्ण विवेचन आहे. फलजोतिष शास्त्र आहे किंवा ते थोतांड आहे हे ते सिद्ध करू शकत नाहीत. तात्त्विक विचारसरणीचा विचार शास्त्रीय पद्धतीने होणे आवश्यक असते. इतिहास हे एक शास्त्र असेल, पण ते विषयाच्या तात्त्विक विचारसरणीचे मूल्यमापन करण्यास कितपत योग्य आहे, याचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शास्त्राच्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह वेगळा आणि त्याचा इतिहास सांगणे वेगळे; हे दोन स्पष्ट वेगळे विचारप्रवाह आहेत. माननीय डॉ. रायकर यांनी ऐतिहासिक बाजू फार स्पष्टपणे व तर्कशुद्ध पद्धतीने मांडली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे.
ज्योतिषशास्त्राचा अल्प प्रमाणात त्यांनी सांगितलेला इतिहास सोडून ज्योतिष तत्त्वज्ञानाचा विचार होणे आवश्यक आहे.
त्यासाठी ‘मानव’ कसा आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. मानवाच्या निर्मितीबद्दल दोन प्रभावशाली विचारपरंपरा आहेत. एक म्हणजे मानवाची उत्क्रांती ही नैसर्गिक श्रेष्ठत्वावरून (Evolution Theory) झाली. मानव हा एक ‘प्राणी’ आहे, असे सुप्रसिद्ध संशोधक डार्विन यांचे मत आहे; तर दुसरी तत्त्वमालिका ‘ईश्वरनिर्मित’ (Grand and Intelligent Design) या तत्त्वावर असून सर्व मानवी व्यवहार ईश्वराच्या कृपेने चालतात, असे त्याचे प्रतिपादन आहे. या दोन विचारप्रभावांत बरोबर कोण हा विषय या लेखाचा नाही. त्याच्या विचारसरणीचा आढावा स्वतंत्रपणे घेता येईल. या दोन्ही विचारमालिकांनी एक तत्त्व मान्य केले आहे की, निसर्गातील किंवा विश्वातील जी ऊर्जा 'energy' आहे त्याचा परिणाम सर्वत्र होत असतो, असेच नव्हे तर माणसाच्या जडणघडणीस ते मोठय़ा प्रमाणात कारणीभूत असतात. वैश्विक ऊर्जा ‘Cosmic Energy’ चा परिपाक म्हणजे मानवी जीवनाची शृंखला आहे. ‘मनुष्य हा मुख्यत: रासायनिक परिपाक आहे’ ‘Human being is a chemical product’ आणि त्याच्यात होणारे बदल हे मानवी जीवनावर परिणाम करू शकतात, हे शास्त्रसिद्ध आहे. उदा. हवामानात होणारे बदल अगर विषारी वायूचे परिणाम हे जीवनात बदल घडवू शकतात. आता प्रश्न आहे की, ‘मनुष्य’ म्हणजे नेमके कोण? त्याचे शरीर का त्या शरीरावर ज्या अदृश्य शक्तीचे (Cosmic Energy) वर्चस्व आहे ती म्हणजे ‘मनुष्य.’ का दोन्ही मिळून निर्माण झालेली उत्क्रांतीची एक स्थिती? ज्योतिषशास्त्र या तत्त्वप्रणालीवर आधारलेली आहे आणि म्हणूनच ते ‘ज्योति’चे (तेज- Energy) शास्त्र आहे. ते प्रकाशाचे शास्त्र आहे. मानवी जीवन (रोजचे व्यवहार नव्हेत) व प्रकाशशास्त्र यांचे नाते अतूट आहे. ज्योतिषशास्त्राच्या तात्त्विक विचारसरणीचा हा महत्त्वाचा वैचारिक दुवा आहे.

मानवी जीवन हे षड्रिपूंचे आहे आणि हे षड्रिपूसुद्धा वैश्विक किरणांचा परिपाक आहे आणि त्यांच्यातील बदल मानवाच्या शरीरावर आणि बुद्धीवर निरंतरपणे परिणाम होत असतात. हे षड्रिपू मानवाच्या वर्तणुकीचा एक अविभाज्य आहे आणि यांचे स्वरूप रासायनिक आहे. कारण ते वैश्विक किरणापासून तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे याच्या उलट गुणधर्म असलेले रसायने एकाच वेळेला कार्यरत असतात आणि या दोन्ही रसायनाची देवाणघेवाण शरीरात सतत चालू असते आणि म्हणूनच मनुष्य कधी सुखी तर कधी दु:खी असतो.
ज्या वेळेस विश्वनिर्मिती झाली त्या वेळेस ही सर्व रसायने निर्माण झाली असली पाहिजे. त्यांच्या स्वरूपाबद्दल एकमत शास्त्रज्ञांत झालेले दिसत नाही. काहींच्या मते ते अणूच्या स्वरूपात (Atom) तर काहीच्या मते ती रसायने लहरीच्या (waves) स्वरूपात शरीरात कार्य करीत असतात. ज्योतिशास्त्र या दोन्ही स्थिती एकाच स्वरूपात आहेत, असे मानते. ज्याप्रमाणे पाण्यावरील लाट आणि पाणी ही एकच आहेत त्याचप्रमाणे या दोन्ही स्थिती एकाच एक रसायनाच्या आहेत. ज्योतिषाचा तात्त्विक विचार हा या तत्त्वावर उभारलेला आहे आणि मानवाचे कार्यकारण भाव याची चिकित्सा याच तात्त्विक विचारसरणीवर आहे. शरीर हे त्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. एक प्रयोगशाळा आहे. हे विसरून चालणार नाही. मानवनिर्मिती कोणी आणि कशी केली हा विचार जरा बाजूला ठेवून मानवाच्या निर्मितीचा उद्देश काय? असा विचार प्रामुख्याने मानवाच्या वर्तणुकीचा एक महत्त्वाचा घटक आहे, असे दिसून येते. यातील काही रसायने हितकारक (Positive) आणि काही हानिकारक (Negative) स्वरूपात कार्यरत असतात. तत्त्वत: ही सर्व रसायने तटस्थ (Neutral) स्वरूपाची आहे; परंतु मानवाने आपले जीवन सुसह्य व्हावे म्हणून सकारात्मक आणि ‘नकारात्मक’ अशी मूल्ये (Values) निर्माण करून त्यांच्या निकषांवर माणसाच्या जीवनाचा ‘यश’ आणि ‘अपयश’ यांचा विचार केला आहे कारण मनुष्यप्राणी त्यांचा कसा उपयोग करतो त्यावर त्यांची उपयुक्तता ठरविण्याच्या सतत प्रयत्नांत असतो. समाज हिताच्या दृष्टीने त्याने कसे वागावे हे सामाजिक मूल्ये स्वत:हून निर्माण करून बदलत्या काळात जीवन सुसह्य कसे होईल याचा प्रयत्न मानवी समाज निरंतरपणे करीत आला आहे आणि पुढेही तो तसाच करत राहील. हेच मानवाचे इतर प्राण्यापासूनचे वैशिष्टय़ आहे.
जीवनाचा उद्देश मोक्ष हा जर मान्य केला तर त्याच्या जिज्ञासेचे स्वरूप वेगळे असू शकते. फलज्योतिषाचा उपयोग प्रारंभ काळात जरी ‘शेती’ आणि ‘राजा’ यांच्या हितासाठी केला गेला असला तरी ते त्याचे सामाजिक स्वरूप आहे. वैयक्तिक पातळीवर मात्र ‘मोक्ष संपदा’ हे त्याचे उद्देश असावे, असे वाटते याचे कारण ज्यांनी कोणी हे विश्व निर्माण केले असेल त्याचे स्वरूप काय असेल ही जिज्ञासा प्रभावीपणे कार्यरत होती. मोक्षाच्या अपेक्षेचे ‘फल’, ‘ज्योति’ म्हणजे तेजाचे (Cosmi forces) ज्ञान साह्याने मिळविण्याचे शास्त्र (मार्ग) म्हणजेच ज्योतिषशास्त्र होय!
एकदा जीवनाचे उद्दिष्ट ठरले म्हणजे त्या अनुषंगाने कर्म मार्ग शोधण्याची गरज भासते. फलज्योतिष्यात पत्रिकेद्वारे ती बारा घरांत ३६०० शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत म्हणजे सुमारे २४ तास ३६०० विभागले तर साधारणपणे १५० होते आणि सूर्योदयापासन सूर्यास्तापर्यंत ती ३० अंशात म्हणजे बारा घरांत होते. ३०० एक घर गणितशास्त्रात योग्य असेल पण त्याचा उपयोग मानवी कर्माच्या दृष्टीने बघता, त्या ३६० अंशात माणसाच्या देहाची आकृती विविध अवयवांच्या द्वारे बसवली असावी. कारण मातेच्या गर्भाशयात तो त्याच अंशात फिरत असला पाहिजे आणि एकदा मानवप्राण्याची जागा अशा प्रकारे वाटून दिल्यावर तो जेव्हा स्वतंत्र अस्तित्वात येतो तेव्हा ते सर्व अवयव वैश्विक किरणांच्या प्रभावाखाली कार्यरत होत असतात ही तात्त्विक भूमिका आहे; परंतु कोणत्या प्रकाशकिरणाच्या द्वारे प्रभावित झालेले शारीरिक विभाग उदा. हात, पाय, पोट, चेहरा अगर मस्तक प्रभावित नेमके कोणते गुणधर्म निर्माण करतात? या प्रश्नाचे उत्तर कदाचित पूर्वीच्या ऋषीनी, आत्मज्ञानाने किंवा निरीक्षणाद्वारे किंवा दोन्ही मिळून लिहून ठेवले असले पाहिजे. वैश्विक प्रभाशक्ती आणि शरीर कार्यरत शक्ती यांचे नाते कोणत्या गुणधर्माला जन्म देतात हे शोधणे आवश्यक आहे. या पूर्वजांच्या तपश्चर्येच्या ज्ञानांचे तुटलेले दुवे (Missing Links) शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करणे आज आवश्यक आहे. मिथुन राशीचा भाग हातावर आहे असे मान्य केले तर ती मिथुन रास सर्व शरीराची मालकीण कशी होऊ शकते? त्याची शास्त्रीयदृष्टय़ा चिकित्सा होणे आवश्यक आहे? फलज्योतिषात हे निसटलेले दुवे आजच्या तंत्रज्ञानाने सिद्ध होणे आवश्यक आहे आणि ही रास द्विस्वभावी कोणत्या वैश्विक किरणांच्या द्वारे झाली? व का व कशी झाली? हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. कदाचित ते बरोबरही असेल पण ते शास्त्राच्या कसोटीवर तपासून बघणे आवश्यक आहे. जी गोष्ट राशींची तीच विचारसरणी गुणकर्म बारा घरांच्या विभागांची. नवमस्थान भाग्यस्थान का? व कसे? आणि कोणत्या शक्तीने भाग्यस्थान श्रेष्ठ अगर कनिष्ठ ठरविता येते? आणि तिसरा मुद्दा नवग्रहांचा!! कोणत्या ग्रहाला कोणते गुणधर्म आहेत याचे निकष काय? तत्त्वत: कोणत्याही ग्रहाला असे गुणधर्म शास्त्रीय दृष्टीने कसे आहेत याची तपासणी केली पाहिजे. ‘गुरूने सौख्य लाभते’ याला शास्त्रीय आधार? आणि सौख्याची कल्पना सर्वत्र एकच असू शकते काय? कदाचित ती विचारसरणी अगर विभागणी अनुभव, अंतज्र्ञान आणि निरीक्षण याद्वारे पूर्वी केली असेल पण ती आता शास्त्रीय पद्धतीने तपासली पाहिजे. कुंडलीचे तत्त्वज्ञान तर्कशुद्ध असेल तर विज्ञानाच्या निकषावर स्पष्ट होणे आवश्यक आहे. कारण हे सर्व वैश्विक किरणांच्या द्वारे निर्माण होण्याच्या रसायनामुळे हे सिद्ध झाले पाहिजे.
सूर्यमालिकेत अनेक ग्रह आहेत आणि ते विश्व निर्मितीच्या वेळी ‘तेजोकण’ म्हणून बाहेर पडलेले आहेत. काही वर्षांनी थंड झाल्यावर त्याचे रूपांतर ग्रहात झाले असले पाहिजे आणि विश्वनिर्मितीची रसायने कमी-जास्त प्रमाणात सर्व ग्रहांत असतात. ग्रहांना स्वत:चे तेज नाही. ते आपल्यामधील रसायनाद्वारे, विश्वातील किरणांची ऊर्जा पृथ्वीवर परावर्तित Reflet करतात ते स्वत: ‘तटस्थ’ Neutral आहेत. माणसाने स्वत: निर्माण केलेली मूल्ये त्यांना लावून त्याप्रमाणे कर्माची सांगता लावली आहे की काय? असा विचार निर्माण होतो.
ज्या वेळेस ही ऊर्जा पृथ्वीच्या कक्षेत येते त्या वेळेस पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणांशी घर्षण होऊन ती प्रकाश किरणे रंगाच्या स्वरूपात आपणास दिसतात याचे कारण त्यांच्यातील विविध रसायने होय. कोणत्या रसायनाद्वारे कोणते कर्म प्रवृत्त मनुष्य होते हे रंगाच्याद्वारे सिद्ध होणे आवश्यक आहे. निळा, पिवळा, तांबडा हे रंगाचे त्रिकूट ज्योतिषशास्त्रांत महत्त्वाचे आहे. निर्मिती, वाढ आणि शेवट यांचे गुणधर्म त्यात आहेत. याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. कदाचित ते सत्य असेलही पण शास्त्रसिद्ध झाले पाहिजे. असे कोणते गुणधर्म आहेत की ही प्रकाश किरणे रंगाच्याद्वारे उत्पत्ती वलयाची कारणमीमांसा करू शकतील! प्रत्येक रंगात रासायनिक शक्ती असते हे शास्त्र सिद्ध आहे. त्यात ऊर्जा असते. (Colour has Energy and chemical strenty) या तत्त्वाचा आणि कर्मकार्याचा दुवा जोडणे आवश्यक आहे. संशोधनाद्वारे ते शक्य आहे असा माझा विश्वास आहे.
आधुनिक जगात, जीवनाचे उद्दिष्ट अधिभौतिक सौख्य हे जर प्रामुख्याने असेल तर मोक्षाची कल्पना जरा वेळ बाजूला ठेवून अधिभौतिक सुखाचा विचार कुंडलीद्वारे शास्त्रीय पद्धतीने जर करण्याचे ठरविले तर गृहित धरलेल्या बारा घरांची गुणविभागणी कशी करावयाची कारण सर्व घराचे उद्दिष्ट अधिभौतिक सौख्य असल्याकारणाने कोणत्या घराला कोणते अधिभौतिक सौख्य देणार व ते का व कसे? याचा विचार होणे आवश्यक आहे आणि सौख्याची मूल्ये जर सतत बदलणारे असले तर काळ आणि वेळ यांची जोडणी कशी करणार? कोणत्या ग्रहाला कोणते सुख का व कसे देणार? आणि त्याला कोणती रसायने कारणीभूत आहेत हे सिद्ध होणे आवश्यक आहे. पारंपरिक विचारसरणीची, फेरतपासणी करणे आवश्यक आहे असे मला वाटते. सौख्यासाठी बारा घरे, नऊ ग्रह आणि त्यांच्या भ्रमण दशा यांची खरोखरच गरज आहे काय? का जर कुंडली म्हणजे पृथ्वीवरचा ग्रहाचा नकाशा असेल तर त्याचे मूल्यमापन नवीन मूल्यांच्याद्वारे करणे आवश्यक नाही का? भावना, श्रद्धा, विश्वास आणि परंपरेचा अभिमान ही सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये जरी कितीही श्रेष्ठ असली तरी विज्ञान युगात काळाच्या कसोटीवर सिद्ध होणे समाजाच्या, व्यक्तीच्या आणि शास्त्राच्या दृष्टीने आवश्यक असावयास पाहिजे. त्यात वावगे काहीच नाही. ‘बदल’change हा निसर्गाचा स्थायिभाव आहे हे विसरून चालणार नाही. ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात तो असतो. फलज्योतिष हे त्याला अपवाद असता कामा नये.
माझ्या प्रबंधातील काही मुद्दे :
१) आपणास नवग्रहांची आवश्यकता आहे का? त्याचप्रमाणे बारा घरांची फेरतपासणी आवश्यक आहे?
२) रंगाचा (प्रकाश किरणांचा) शरीरावर कसा आणि कुठे परिणाम होऊन मनुष्य, कार्यप्रवृत्त होतो आणि त्या कार्याची मानवी मूल्यांची कशा प्रकाराची साखळी आहे याचे निकष (Parameters) कोणते?
३) प्रचलित कुंडलीचे पूर्वविवेचन आवश्यक नाही का? कारण जीवनमूल्ये झपाटय़ाने बदलत आहेत.
४) मनुष्य हा स्वत: एक ग्रह आहे किंवा नाही-
५) आपण चंद्रावर गेल्यावर ‘पृथ्वी’ ग्रह कसा मांडणार व त्याचे गुणधर्म कोण व कसे ठरविणार? आणि असल्यास त्याच्या कार्याचे मूल्यमापन कसे व कोणत्या निकषावर करावयाचे?
६) मानसशास्त्र आणि फलज्योतिष यांचे नाते निश्चित स्वरूपात कोणते आहेत? (Emotional Expliotation vs Predictions)
फलज्योतिष्याची केविलवाणी अवस्था संपवणे आपले जर कर्तव्य असेल तर त्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा उपाय नाही तर माझ्या मते खालील संस्थांच्या सहकार्याने शास्त्रीय पद्धतीने फलज्योतिष्याचे फेरविवेचन होणे शक्य आहे.
(1) T.I.F.R. (2) University Dept of Chemical Technology (3) Neero Scientists and Physician from Medical Faculties (4) Spiritual Leaders and (5) Some Renowned Experienced Astrologer.
यांची एक ‘संशोधन समिती’ स्थापून त्याचा विचार होणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत मनुष्याला भविष्याची जिज्ञासा आहे तोपर्यंत ‘फलज्योतिष’ आहे. मग त्याला प्रतिष्ठा, सन्मान, विश्वासार्हता आणि एक शास्त्र म्हणून का प्रयत्न करू नये? लोकप्रभाने ‘ज्योतिषाची ऐशीतैशी’ अवस्था संपुष्टात आणून मानवी जिज्ञासेला आधुनिक शास्त्रीय पायावर आणून, फलज्योतिषाची परंपरा व उज्ज्वल ध्वज मानवाच्या सुखासाठी सतत फडकत ठेवावा ही त्यांना माझी विनंती. |