९ ऑक्टोबर २००९
पडघम

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाडय़ातील लढती चुरशीच्या आहेत. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या आणि महानेत्यांच्या दुसऱ्या पिढय़ा रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या गणल्या जात आहेत. मराठवाडय़ातल्या या विविध मतदारसंघात अनेक दिग्गजांचा कस लागणार आहे. बंडखोरीमुळे अनेक बालेकिल्ले ढासळतील, तर लक्ष्मीदर्शनामुळे अनेकांचे पितळ उघडे पडणार आहे. मराठवाडय़ातल्या रणकंदनाआधीच्या शांततेचा टिपलेला हा पायरव..
प्रमोद माने

गेल्या दशकात मराठवाडय़ातील दोन सुपुत्रांनी महाराष्ट्रावर राज्य केले. लातूरचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाचे दोन डाव मिळाले. तब्बल साडेसात वर्षे त्यांनी मुख्यमंत्रिपद उपभोगले. मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर विलासराव देशमुख यांच्या जागेवर कै. शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण विराजमान झाले. या दोन्ही नेत्यांवर काँग्रेसची दारोमदार आहे. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय होती. गेल्या लोकसभेत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही आणि विधानसभेत केवळ मराठवाडय़ात केवळ सातच जागा जिंकता आल्या. यात दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. जालना, बीड, परभणी या तीन जिल्ह्य़ांत काँग्रेसचे अस्तित्व शून्य आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची स्थिती सुधारली. विलासराव देशमुखांनी पश्चिम महाराष्ट्रातून आयात केलेल्या जयवंत आवळे यांना तर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांना निवडून आणले. या दोन्ही मराठवाडय़ातील नेत्यांसमोर

 

काँग्रेसच्या जागा वाढविण्याचे आव्हान असणार आहे. काँग्रेसचे मराठवाडय़ातील अस्तित्वच संपले आहे का, असे वाटत असतानाच मराठवाडय़ात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा जोर पकडू लागली. हा जोर आजही टिकून आहे. दलित आणि मुस्लिम या समाजाचा पाठिंबा काँग्रेसला आहे. नव्हे तो काँग्रेसचा पारंपरिक मतदारच आहे. मराठवाडय़ात अनेक विधानसभा मतदारसंघात या दोन जातीच्या मतदारांचा प्रभाव आहे. या प्रभावामुळेच काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीत जागा वाढण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था दयनीय होईल असा जाणकारांचा अंदाज आहे.
मराठवाडय़ातील आणखी एक नेते जे की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहे गोपीनाथ मुंडे. माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्याकडे राज्याचे प्रभारीपद आले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्य़ात आणि बाजूला असलेल्या लातूर जिल्ह्य़ात भाजपची ताकद आहे. या दोन जिल्ह्य़ाने गेल्या विधानसभा निवडणुकीत आठ जागा भाजपच्या पारडय़ात टाकल्या होत्या. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीतर्फे त्यांना यंदा विधानसभेची उमेदवारी मिळाली. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वावर मराठवाडय़ातील जनता किती विश्वास टाकते यावरच युतीचे यश अवलंबून आहे.
मराठवाडा हा शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे. मराठवाडय़ातील ४६ पैकी निम्म्या जागा या युतीच्या आहेत. त्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा शिवसेनेचा आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे तीन तर भाजपचे दोन खासदार निवडून आले आहेत. ४६ पैकी २८ विधानसभा मतदारसंघात युतीला आघाडी आहे. १६ मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मताधिक्य आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार वेरूळचे मठाधिपती शांतीगिरी मौनगिरी महाराज हे गंगापूर आणि वैजापूर या दोन विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होते. शिवसेनेसमोर यंदा बंडोबाचे आव्हान असणार आहे. शिवसेनेचे माजी खासदार, माजी महापौर प्रदीप जैस्वाल यांना औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याबरोबर उपमहापौर भाऊसाहेब वाघ (फुलंब्री), जिल्हा परिषदेतील गटनेते डॉ. अण्णासाहेब शिंदे (कन्नड), लक्ष्मण सांगळे, कारभारी जाधव (गंगापूर) यांनी युतीला उघडपणे आव्हान दिले आहे. उपमहापौर भाऊसाहेब वाघ हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री हरीभाऊ बागडे यांच्याविरोधात उमेदवार आहेत. तसेच या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आसाराम तळेकर यांनीही हरीभाऊ बागडे यांच्याविरोधात बंड केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही बंडोबांना तोंड द्यावे लागत आहे.
लोहा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे अपक्ष आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे विलासराव देशमुखांचे समर्थक. ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य. प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात आघाडी करून आपले उमेदवार उभे होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ते कट्टर विरोधक आहेत. विलासराव देशमुखांनी प्रताप पाटील चिखलीकर यांची कायम पाठराखण केली आहे. राष्ट्रवादीशी बोलणी करताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विलासराव देशमुखांवर मात केली. तहामध्ये लोहा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून दिला. प्रताप पाटील चिखलीकर यांनी अपक्ष म्हणूनच उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लोह्य़ात होते. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यकर्त्यांचा राग मुख्यमंत्र्यांवर असणे स्वाभाविक होते. एका कार्यकर्त्यांने तर मुख्यमंत्र्यांच्या दिशेने चप्पल फेकली आणि राडा झाला. चिखलीकर यांच्या समर्थकांवर पोलिसांनी लाठय़ा चालविल्या. ही घटना राज्यभर गाजली. आगामी निवडणुकीत याचा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्य़ात परिणाम होतो का, हे कळून येईल.
काँग्रेस आणि भाजपने यंदा घराणेशाहीला महत्त्व दिले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना त्यांचे चिरंजीव अमित देशमुख यांना लातूर शहरातून उमेदवारी मिळविण्यात यश मिळाले. विलासराव केंद्रात गेल्यामुळे अमित देशमुख हे त्यांचे विधानसभेतील खरे राजकीय वारसदार ठरणार आहेत का, हे २२ ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल. अमित देशमुख यांना ही घराणेशाही मान्य नाही. गेल्या १२ वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचे निष्ठेने काम करत आहे. त्याचेच फळ म्हणून मला उमेदवारी मिळाली आहे असे अमित देशमुख यांचे म्हणणे आहे.
लातूर जिल्ह्य़ातीलच निलंगा मतदारसंघात पुन्हा एकदा आजोबा-नातू यांच्यात लढत होत आहे. ही लढत रंगतदार आणि लक्षणीय होईल. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे गेल्या वेळी त्यांचे नातू आणि भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून पराभूत झाले होते. ही लढाई विचारांची आहे. मी काँग्रेस विचाराच्या विरोधात लढत आहे. काँग्रेसचे प्रतिनिधित्व कोण करतो आहे, याला मी महत्त्व देत नाही असे संभाजी पाटील यांचे म्हणणे आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही नात्याला महत्त्व नाही ही विचारांची लढाई आहे असेच सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येत कट केला म्हणून अटक झाली. गेल्या निवडणुकीत पवन राजेनिंबाळकर अवघ्या ४०० मतांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून पराभूत झाले होते. यंदा या दोन्ही प्रतिस्पध्र्याचे चिरंजीव रिंगणात आहेत. राज्यमंत्री राणा जगजीतसिंह पाटील यांना राष्ट्रवादीने उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात उतरविले आहे. शिवसेनेने तर पवन राजेनिंबाळकर यांचे चिरंजीव ओम यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारीही बहाल केली. या दोन भावकीमधील लढाई लक्षणीय ठरणार आहे.
बीड जिल्ह्य़ात गोपीनाथ मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात त्यांची कन्या पंकजा पालवे-मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा ही गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी स्टार कॅम्पेनर होती. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे हे त्यांचे राजकीय वारसदार ठरतील असा कयास होता. पण ऐनवेळी पंकजाला मैदानात उतरून राज्यात पुन्हा येण्याचे संकेत गोपीनाथ मुंडे यांनी दिले आहेत. वेळ पडली तर खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यात परतण्यासाठी हा मार्ग गोपीनाथ मुंडे यांनी चोखाळला आहे. याच जिल्ह्य़ात केजमधून राज्यमंत्रिमंडळातील कॅबिनेटमंत्री डॉ. विमल मुंदडा या पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाने समर्थ असा प्रतिस्पर्धी निर्माण केला नाही; त्यामुळे विमल मुंदडा या विजयाच्या मार्गावर आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेवराईमध्ये अमरसिंह आणि बदामराव पंडितांमधील लढाई सर्वश्रृत आहे. यंदा कोणता पंडित जिंकतो याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. जालन्यातील घनसावंगी मतदारसंघात कॅबिनेटमंत्री राजेश टोपे आणि पिता माजी खासदार अंकुशराव टोपे यांना जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी ललकारी दिली आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर अंबड विधानसभेचे अस्तित्व संपले. जालना तालुक्यातील ५१ गावे घनसावंगीला जोडण्यात आली. या गावांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांना विधानसभेसाठी घनसावंगीला जावे लागले. या दोन आमदारांच्या लढाईकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. जालन्यातील भोकरदन मतदारसंघात भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी त्यांची पत्नी निर्मला दानवे यांना मैदानात उतरविले आहे. याच मतदारसंघात राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे हे गेल्या वेळी निवडून आले होते. ही लढतही लक्षणीय होईल.
साऱ्या राज्याचे लक्ष असणार आहे ते भोकर या मतदारसंघाकडे. भोकर मतदारसंघात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आव्हान दिले आहे ते राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी. त्यांनीही बंडखोरीच केली आहे. भोकरमध्ये सलग दहा वर्षे आमदार म्हणून डॉ. किन्हाळकर यांनी काम केलेले आहे. ही लढतही एकतर्फी वाटत असली तरी निश्चितपणे चुरशीची होईल. नांदेड शहरात शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्याला शह देण्यासाठी पुनर्रचनेत दोन्ही मतदारसंघ काँग्रेसला अनुकूल कसे राहतील याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यांनी त्यांचे व्यावसायिक भागीदार डी. पी. सावंत यांना दक्षिणमधून तर माजी महापौर ओमप्रकाश पोकर्णा यांना उत्तरमधून उमेदवारी दिली. डी. पी. सावंत यांच्या मित्रप्रेमापोटी अमर राजूरकर आणि बी. आर. कदम या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मात्र बळी गेला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आमदार राजेंद्र दर्डा हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहे. औरंगाबाद शहरात शिवसेनेचे प्राबल्य संपविण्यात राजेंद्र दर्डा यांना यश मिळाले होते. यंदा राजेंद्र दर्डा यांच्यासमोर शिवसेना नसून भाजपचे उमेदवार डॉ. भागवत कराड आहेत. परभणी जिल्ह्य़ातील गंगाखेड या मतदारसंघात राज्यमंत्री सुरेश वरपूडकर आणि गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे यांचे ज्येष्ठ जावई डॉ. मधुसुदन केंद्रे यांचीही लढत लक्षणीय आहे. या निवडणुकीत ‘लक्ष्मीदर्शन’ चा योग मतदारांना होत आहे. माजी सहकारमंत्री शिवसेनेचे डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर हे पुन्हा एकदा वसमत विधानसभा मतदारसंघातून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या लढतींकडेही साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्य़ांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. एकूण काय तर मराठवाडय़ात आघाडीसमोर युतीचे आव्हान असणार आहे.
pramod.mane@expressindia.com