इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे धडे आहेत. या पाठय़पुस्तकाला ‘शिवछत्रपती’ असे नाव दिलेले आहे. गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथीच्या इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा करून नवी सुधारित आवृत्ती नुकतीच बालभारतीतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती तिचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार हे होते. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पाठय़पुस्तक आठ भाषांत तयार करण्यात आलं. या पुस्तकातील बदलाबद्दल प्रचंड वादळ निर्माण झालं. विशेषत: त्यातील शिवाजी महाराजांच्या गुरुपदावरून दादोजी कोंडदेवांचं नाव वगळल्याबद्दल डॉ. जयसिंगराव पवार हे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडलं.
‘चौथीच्या इतिहास पुस्तकातून दादोजी कोंडदेवाचे नाव गुरुत्वपदावरून वगळण्यावर कडक कारवाई करा’ असा आरोप करण्यापर्यंत काहींची मजल गेली. चौथीच्या इतिहासविषयक पाठय़पुस्तक
महामंडळाचे डॉ. जयसिंगराव पवार हे अध्यक्ष असल्यामुळे ते सर्वाच्या टीकेचे लक्ष्य झाले आहेत. याच्या उलट ‘इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकातील समितीने केलेला बदल कुणाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नसून- समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे’ असा खुलासा जयसिंगराव पवारांनी केला.
प्रसारमाध्यमांतून दररोज, ‘आज जयसिंगराव पवारांची काय खबरबात?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेव्हा या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळांत मूळ प्रश्न काय आहे? तो नीट समजावून घेतला पाहिजे.
डॉ. जयसिंगराव पवारांची खबरबात अशी की, इयत्ता चौथीच्या इतिहास पाठय़पुस्तकातून त्यांनी दादोजी कोंडदेवांचे शैक्षणिक गुरू या नात्याने पूर्वीच्या पाठय़पुस्तकात जो, ‘दादोजी कोंडदेवांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले’ असा उल्लेख होता तो वगळून त्याच्याऐवजी, ‘शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली झाले’ असा नवा उल्लेख करण्यात आला. या संदर्भातील दादोजी कोंडदेवांचे चित्र वगळून त्याऐवजी शहाजीराजांचे चित्र टाकले आहे. यावरून दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असे डॉ. जयसिंगराव पवारांनी सूचित केले आहे. वास्तविक पाहता दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असे अनेकांचे मत होते व आहे. तसे ते जयसिंगरावांचेही असायला काही हरकत नाही.
परंतु एकेकाळी हेच जयसिंगराव पवार ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू होते’ असे म्हणत होते. आज अचानक त्यांचे हे मत कसे काय बदलले, हाच अनेकांच्या भुवया वर जाण्याचा मुद्दा आहे.
कोल्हापूरच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख म्हणून काम करीत असताना त्यांनी एम.ए.च्या परीक्षेसाठी नेमलेल्या व मुंबईच्या सी. जमनादास आणि कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात ‘दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होते’ असे म्हटले होते. या पुस्तकात ते दादोजी कोंडदेवांबद्दल काय म्हणतात ते वाचण्यासारखे आहे. या पुस्तकात डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात की,
‘मालोजीराजांनी प्राप्त केलेल्या गावचे कुलकण्र्यपण हे दादोजी कोंडदेवाच्या घराण्याकडे होते. तेव्हा भोसले घराण्याशी दादोजीचा संबंध बराच जुना होता. इ. स. १९३६ साली जेव्हा शहाजीराजे कर्नाटकात गेले तेव्हा मागे महाराष्ट्रात आपल्या  जहागिरीची व्यवस्था करण्याची व कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी दादोजीवर सोपवली होती.. सततच्या लढायांमुळे शहाजीराजांची जहागीर उजाड बनली होती. ती समृद्ध करण्याची कामगिरी दादोजीने केली. एवढेच नव्हे तर शिवाजी राजांच्या शिक्षणाची चोख व्यवस्था त्याने केलेली होती. त्याच्यासारख्या व्यवहारज्ञानी व प्रामाणिक कारभाऱ्याकडून महाराजांनी राज्यकारभाराचे प्राथमिक धडे घेतले व आपल्या कर्तबगारीचा पाया घातला.. शिवकालात आजच्यासारख्या शाळा व महाविद्यालये नव्हती. घरंदाज मराठा घराण्यात आपल्या मुलावर खास शिक्षकाची नेमणूक केली जाई. शिवाजी महाराज एका बडय़ा जहागीरदाराचे चिरंजीव होते. कारभारात व राजकारणात आवश्यक असणाऱ्या सर्व शिक्षणाची व्यवस्था दादोजीने केली होती..
शिवाजी महाराजांच्या शिक्षणासंबंधी इतिहासकार श्री. त्र्यं. शं. शेजवळकर हे म्हणतात की, ‘‘दादोजी कोंडदेव याच्या शिक्षेखाली चालू मुसलमानी राज्यपद्धतीचे शिक्षण शिवाजीस उत्तमपैकी मिळाले. त्याला थोडेबहुत फारसी व उर्दू भाषांचे अध्ययनही करावे लागले असावे!..
शहाजीच्या जहागिरीचा कारभार पहात असता दादोजीच्या सोबत महाराज सतत असल्यामुळे राज्यकारभाराचे प्राथमिक धडे त्यांना मिळत गेले.. राज्यकर्त्यांजवळ कठोर शिक्षा असल्याशिवाय पुंडलोकांचे निर्दालन व गरिबांचे संरक्षण होऊ शकत नाही, हा धडा दादोजीने महाराष्ट्राला घालून दिला.. दैनंदिन राज्यकारभारातील दादोजीची उदाहरणे- संस्कारक्षम महाराजांच्या मनावर परिणाम करून गेल्याशिवाय राहिली नाहीत. दादोजी कोंडदेव नीतिमान, सचोटीचा व धार्मिक प्रवृत्तीचा गृहस्थ होता. आपल्या धन्याने आपणावर सोपविलेली कामगिरी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, त्यात बिलकूल लबाडी होता कामा नये याकडे त्याचा कटाक्ष असे.. अशी नीतिमत्ता असणारा शिक्षक महाराजांना मिळाल्यामुळेच पुढे त्यांच्या कारभारातही हा आदर्श दिसून येतो. शहाजीच्या जहागिरीची व्यवस्था लावता त्याने अनेक सुधारणा केल्या.. आणि हे सर्व शिवरायांना सोबत घेऊन दादोजी करीत होता. त्यामुळे याचे प्रशिक्षण दादोजीकडून शिवरायांना बालवयातच मिळाले.. वतनाच्या व भाऊबंदकीच्या अनेक कटकटी जहागिरीत चालू असत. त्याचे निकाल देण्याची जबाबदारी जहागिरीचे कारभारी म्हणून दादाजीवर येत असे. अशा प्रसंगी शिवाजी महाराजांना सदरेवर बसवून त्यांच्या समोरच्या तंटय़ांची सुनावणी व निकाल दिला जात असे. हे सर्व करत असता महाराजांना न्यायदानाचे प्रशिक्षण मिळावे हाच त्यांचा हेतू होता.. सारांश जिजाबाईसारखी माता व दादोजी कोंडदेवसारखा शिक्षक महाराजांना लाभल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्वाभिमान, स्वधर्मनिष्ठा, नीतिधैर्य, धाडस, शौर्य, राज्यकारभार कौशल्य, मुत्सद्देगिरी इत्यादी राज्यकर्त्यांस आवश्यक असणारे गुण निर्माण झाले व त्याचीच पुढे वाढ होऊन महाराष्ट्राला हा थोर राजा लाभला!’’
(मराठी सत्तेचा उदय : दादोजी कोंडदेव महाराज, पृष्ठ १०० ते १०२)
सदर उतारा थोडा लांबला खरा, पण डॉ. जयसिंगराव पवार यांची दादोजी कोंडदेवांबद्दलची मते वाचकाला कळावी म्हणून हा पंक्तिप्रपंच केला. वरील उताऱ्यावरून दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे शिक्षक होते हे सिद्ध होत नाही काय? परंतु अचानक ‘दादोजी कोंडदेव हे फक्त उत्तम प्रशासक होते’ असा नवा ‘पवित्रा’ जयसिंगराव पवारांनी कसा काय घेतला?
याबद्दलचा खुलासा करताना जयसिंगराव पवार म्हणतात की, ‘‘सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर ‘मराठी सत्तेचा उदय’ नावाचे एक एम.ए.चे क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजीचा शिक्षक म्हणून उल्लेख केला होता. माझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझा संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. ते पुस्तक मी १९७७ मध्ये लिहिले असून त्या वेळी ज्या पुस्तकांच्या आधारे ते क्रमिक पुस्तक लिहिले त्यात तसे उल्लेख होते. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. तेव्हा अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले की, दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू किंवा मार्गदर्शक नव्हते. तसा उल्लेख कोणत्याही समकालीन साधनांत मला आढळला नाही. त्यामुळे दि. २४ एप्रिल २००६ रोजी पुण्यातील एका जाहीर परिसंवादात ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू होते’ हे माझे पूर्वीचे मत बरोबर नसल्याचे नमूद केले होते. त्या वेळी माझी चूक झाली होती हे मी आता कबूल करत आहे. आज नवी साधनं पुढे आलेली असताना मी माझं जुनंच म्हणणं कसं काय कायम करणार? अत्यंत विश्वासार्ह साधन हाती आल्यानंतरही इतिहासकाराने आपली जुनीच मतं नोंदवावीत असे आमच्या विरोधकांना सुचवायचं आहे काय?’
जयसिंगरावांचा हा खुलासा वाचून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. एम.ए. पीएच. डी. झालेल्या एका इतिहासकाराने एम.ए.च्या परीक्षेसाठी लिहिलेले ते क्रमिक पुस्तक आहे. ते लिहिताना त्यांनी सर्वागीण अभ्यास करायला हवा होता. ‘ज्या पुस्तकाच्या आधारे ते क्रमिक पुस्तक लिहिले त्यात तसे उल्लेख होते.’’ याचा अर्थ कोणत्या तरी एखाद्या पुस्तकाच्या आधारे त्यांनी आपले पुस्तक लिहिले असा होतो. त्या वेळी त्यांनी अनेक पुस्तकांचा अभ्यास का केला नाही? डॉ. जयसिंगराव पवार नुसतेच लेखक नाहीत, ते इतिहास संशोधक आहेत. ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू नव्हते’ याचा साक्षात्कार जयसिंगराव पवारांना ३० वर्षांनंतर आणि दोन वर्षांपूर्वी झाला असला तरी ‘शिवाजीचे गुरू कोण?’ हा वाद फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. जयसिंगरावांनी जेव्हा हे ‘मराठी सत्तेचा उदय’ पुस्तक लिहिले त्या वेळी आणि त्यापूर्वीही ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू नव्हते’ असे म्हणणारे अनेक लोक होते. इतिहास संशोधक या नात्याने जयसिंगराव पवारांनी त्या सर्वाची पुस्तके व मते यांचा अभ्यास करणे आवश्यक नव्हते का? या सर्व मतमतांतरांचा अभ्यास जयसिंगराव पवारांनी त्या वेळी निश्चितच केलेला असणार. या अभ्यासाअंतीच त्यांनी ‘दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होते’ असे आपले मत बनविलेले असणार. कदाचित त्या वेळी त्यांचा अभ्यास अपुरा झाला असेल आणि अभ्यास पुरा झाल्यावर आज त्यांचे मत बदलले असेल, पण हा बदल व्हायला ३०-३२ वर्षांचा एवढा प्रदीर्घ काळ का जावा लागला?
जेम्स लेन प्रकरण उद्भवल्यावरच जयसिंगराव पवारांना या प्रश्नाचा अभ्यास करायला सवड सापडली? इतिहास संशोधक असूनही गेली २५-३० वर्षे या प्रश्नाचा अभ्यास करण्याचे त्यांना का सुचले नाही? उशिरा का असेना, पण जयसिंगरावांना हे सुचले आणि त्यांनी आपल्या कामाच्या प्रचंड व्यापातून खास सवड काढून सर्व ऐतिहासिक- समकालीन साधने धुंडाळली. या तपासाअंती त्यांची मते बदलली आणि ती त्यांनी चौथीच्या नव्या पाठय़पुस्तकात ‘छापली’. त्यासाठी त्यांनी नवी ऐतिहासिक साधनं पुढं आणली.
जयसिंगरावांनी पुढं आणलेले नवं ऐतिहासिक साधन कोणतं? तर कवींद्र परमानंदलिखित ‘शिवभारत’ हा काव्यग्रंथ. आता याला नवं ऐतिहासिक साधन कसं म्हणायचं? ‘अत्यंत विश्वासार्ह समकालीन साधन’ म्हणून जयसिंगराव ज्या परमानंदकृत ‘शिवभारत’चा उल्लेख करतात व ‘ज्याच्या आधारे इयत्ता चौथीच्या इतिहास पाठय़पुस्तकाचं आम्ही पुनर्लेखन केलं’ असं म्हणतात त्या कवींद्र परमानंदकृत ‘शिवभारत’ या मूळ संस्कृत ग्रंथाचं भाषांतर व संपादन सदाशिव महादेव दिवेकर यांनी इ.स. १९२७ मध्येच प्रकाशात आणलं होतं. त्यांच्या या ‘शिवभारत’ची पहिली मराठी आवृत्ती इ.स. १९२७ सालीच प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे सुमारे ८०-८२ वर्षांपासून हे ऐतिहासिक साधन उपलब्ध असताना आज त्याला जयसिंगराव पवार ‘नवं साधन’ कसं काय म्हणतात? सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी एम.ए.साठी जेव्हा ‘मराठी सत्तेचा उदय’ हे क्रमिक पुस्तक डॉ. जयसिंगराव पवारांनी लिहिले त्या वेळीही परमानंदकृत ‘शिवभारत’चे भाषांतर उपलब्ध होतेच ना? तरीही ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू होते’ असेच मत डॉ. जयसिंगराव पवारांनी मांडले होते. पुलाखालून एवढे पाणी वाहून गेल्यावर आज त्यांचे मत अचानक बदलले, याला काय म्हणावे? गेली ३०-३२ वर्षे जयसिंगराव पवारांच्या ‘मराठी सत्तेचा उदय’ या पुस्तकाचा अभ्यास करून अनेक विद्यार्थी एम.ए. होऊन बाहेर पडले असतील. त्यांनी ‘‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू होते. त्यांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले!’’ असेच शिक्षण घेतले. जयसिंगराव पवारांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलांची मुले ज्यांच्यासमोर इयत्ता चौथीचा बदललेला नवा इतिहास धडा असेल. ते म्हणतील की, ‘‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेच. ते कोण आहेत त्यांची नावेसुद्धा ठाऊक नाहीत!’’ दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते का नव्हते? याबद्दल दोन पिढीत संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम डॉ. जयसिंगराव पवार करीत आहेत. याबद्दल इतिहास त्यांना कधीही क्षमा करणार नाही.
ज्या शिवभारताच्या आधारावर जयसिंगराव पवारांनी चौथीच्या इतिहास पाठय़पुस्तकाचे पुनर्लेखन केले आहे त्या शिवभारताचा इतिहास लेखनासंदर्भात गौरव करताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात,
‘‘शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालिनत्त्व अनेक पुराव्यांनी सिद्ध केले आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची अगदी जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.’’
‘शिवभारत’ हे शिवचरित्राचे एक समकालीन साधन आहे याबद्दल वाद असण्याचे कारण नाही; परंतु ते ‘शिवाजीचे अधिकृत चरित्र’ आहे, असे म्हणता येणार नाही. शिवभारतामध्ये एकूण ३२ अध्याय असून, शहाजीच्या जन्मापासून ते शिवाजीचा शृंगारपुरात प्रवेश येथपर्यंतचा भाग यात आलेला आहे. म्हणजे इ.स. १६६१ पर्यंतचे शिवचरित्र यात आलेले आहे. इ.स. १६६१ ला शिवाजीचे वय ३१ होते. म्हणजे शिवाजीच्या वय वर्षे ३१ पर्यंतचाच इतिहास या शिवभारतात आलेला आहे. शिवाजीचा जन्म इ.स. १६३०चा आणि मृत्यू १६८० चा आहे. म्हणजे इ.स. १६६१ ते १६८० या १९ वर्षांचा शिवाजीचा इतिहास या शिवभारतात आलेला नाही. यात तानाजी मालुसरेचा उल्लेख आहे, पण दादोजी कोंडदेवाचा साधा नामोल्लेखही नाही. इ.स. १६६१ पर्यंतचाच भाग यात आलेला आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक व शिवाजीच्या मृत्यूचे त्यात वर्णन नाही. त्यामुळे शिवभारताला अधिकृत शिवचरित्र कसे म्हणता येईल? शिवभारतात जे उल्लेख आहेत ते अचूक आहेत, पण अनुल्लेखाचे काय करणार? शिवभारतात ज्या व्यक्ती किंवा प्रसंग यांचे उल्लेख नाहीत त्या घडल्याच नाहीत असे समजायचे का? असे समजल्यास अनवस्थाप्रसंग उद्भवेल. बखरी शिवाजीनंतर १०० वर्षांनी लिहिल्या त्यामुळे त्या अतिरंजित आहेत असे जयसिंगराव पवार म्हणतात. पण अतिरंजित वर्णने परमानंदाच्या शिवभारतात काय कमी आहेत? कवींद्र परमानंदाचा ‘शिवभारत’ हा काव्यग्रंथ आहे. त्यामुळे शिवभारत ही एक पद्यमय बखर आहे असेच म्हटले पाहिजे.
डॉ. जयसिंगराव पवार हे कवी परमानंदाच्या ‘शिवभारत’ या काव्यग्रंथाची वारंवार भलावण करताना दिसतात. या ‘शिवभारत’मध्ये नेमके काय आहे? परमानंदाने हे शिवभारत कधी रचले याचा उल्लेख ग्रंथात केलेला नाही. शिवाजीने शृंगारपूर घेऊन त्र्यंबक भास्कराची नेमणूक तिथला प्रमुख अधिकारी म्हणून केली इथपर्यंतची हकीगत या शिवभारतात आलेली आहे. या घटनेची तारीख जरी त्यात दिलेली नसली तरी ही घटना दि. २९ एप्रिल १६६१ रोजीची आहे हे इतर साधनांवरून सांगता येते. तसेच एके ठिकाणी अली आदिलशहाच्या सांगण्यावरून सिद्दी जौहर याला विषप्रयोग करून ठार मारण्यात आले अशा आशयाचा उल्लेख अंती आलेला आहे. सिद्धी जौहर दि. १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर १६६१ या दरम्यान मरण पावला हे इतर साधनांवरून समजते. तारखेच्या दृष्टीने बघितले तर ही घटना शिवभारतात उल्लेखिलेली सर्वात अलीकडची घटना आहे. अर्थात यानंतर केव्हा तरी सध्या आपल्या हाती असलेले ‘शिवभारत’ रचून तयार झाले असले पाहिजे. इ.स. १६६१ नंतरचा शिवाजीचा इतिहास या शिवभारतात आलेला नाही. इयत्ता चौथीचे ‘शिवछत्रपती’ हे इतिहासाचे पाठय़पुस्तक तर संपूर्ण शिवचरित्राचे आहे. म्हणजे शिवाजीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या घटना यामध्ये अपेक्षित आहेत आणि तशा त्या या चौथीच्या नव्या पुस्तकात आलेल्या आहेत. आता या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो की, पाठय़पुस्तक समितीने शिवाजीनंतर शंभर-दीडशे वर्षांनी बखरीत लिहिलेला मजकूर प्रमाण न मानता समकालीन अशा फक्त ‘शिवभारत’चाच मजकूर प्रमाण मानायचा असा निर्णय घेतल्याने इ.स. १६६१ पर्यंतचा मजकूर ‘शिवभारत’च्या आधारे घेता येईल यात काही शंका नाही, पण त्यापुढचा शिवाजीचा १९ वर्षांचा उरलेला इतिहास शिवभारतात नाही त्याचे काय करायचे? या कालातील मजकूर कशाच्या आधारे घेणार? या ठिकाणी खबर वाङ्मयाचेच साहाय्य घेणार ना?
येथूनच डॉ. जयसिंगराव पवार (एम.ए., पीएच.डी.) यांनी इयत्ता चौथीच्या ‘शिवछत्रपती’ या इतिहास पाठय़पुस्तकाची ‘बखर’ लिहिली आहे. शिवभारतात दादोजी कोंडदेवांचा साधा नामोल्लेखही नाही म्हणून तो शिवरायाचा गुरू नाही असे जयसिंगराव म्हणतात. पण ‘शिवभारतात’ बाजीप्रभू देशपांडेचा तरी नामोल्लेख कोठे आहे? मग बाजीप्रभू देशपांडे झालाच नाही असे समजून त्याला इतिहासातून वगळायचे का? पण जयसिंगराव पवारांनी चौथीच्या इतिहास पुस्तकात दादोजी कोंडदेवावर एक परिच्छेद आणि बाजीप्रभू देशपांडेवर ‘शर्थीने खिंड लढवली’ हे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे, ते कशाच्या आधारावर? बखर वाङ्मयाच्याच ना? इ.स. १६६१ नंतरचा इतिहास शिवभारतात नाही तरी तो चौथीच्या ‘शिवछत्रपती’मध्ये आलेला आहे. अर्थात याला आधार बखर वाङ्मयाचाच असला पाहिजे.
दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नाहीत हे सिद्ध करण्यासाठी म्हणून जयसिंगराव पवारांनी ‘शिवरायांचे शिक्षण’ हा एक नवा पाठ समाविष्ट केला आहे. यामध्ये शिवभारताच्या आधारे शिवरायांच्या शिक्षणाचा वृत्तांत सादर केला आहे. या ग्रंथात नवव्या आणि दहाव्या अध्यायात शिवाजीच्या शिक्षणाचा उल्लेख आहे. त्यानुसार जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्लोक ७०-७१)
पुढे शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची व जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो की, शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्लोक २५-२७)
शिवभारतकार पुढे म्हणतो की, शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्वारोहण, गजारोहण, तलवार पट्टा, भाला इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र, शत्रूपक्षातून निसटून जाण्याची कला, जादुगिरी, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्लोक ३४-४०)
यावरून शहाजीने पाठविलेल्या अन्य शिक्षकाकडून शिवाजीचे शिक्षण झाले असे जयसिंगराव पवार म्हणतात. पण परमानंद हा शिवाजीचा समकालीन असूनही तो या शिक्षकांची नावे का सांगत नाही? ‘परमानंदाच्या शिवभारतातील स्थळांचे व व्यक्तीच्या नावांचे बरेचसे संशोधन आतापर्यंत झाले आहे. तथापि काही नावांचा तलास लावण्याचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही.’ याबद्दल स. म. दिवेकर दिलगिरी व्यक्त करतात. पण शहाजीने शिवरायांच्या शिक्षणासाठी जे काही विख्यात शिक्षक पाठवले त्यांची नावे अद्याप कोणालाही माहिती नाहीत. या अनामिक शिक्षकांचा संदर्भ जयसिंगराव पवार देतात, पण त्यांची नावे- गावे शोधून काढण्याची निकड त्यांना वाटत नाही. त्यामुळे जयसिंगराव पवार याबद्दल अधिक संशोधन करतील, अशी शक्यता फारच कमी आहे. शिवभारतात परमानंद शिवाजीच्या शिक्षणाच्या संदर्भात दादोजी कोंडदेवाचा उल्लेख टाळतो म्हणून जयसिंगराव पवार जर त्याला शैक्षणिक पदावरून हटवणार असतील तर मग चौथीच्या पुस्तकात ‘शिवाजीचे शिक्षण’ सांगताना त्यात पुन्हा ‘दादोजी कोंडदेवाची कामगिरी’ का घुसडली? म्हणजे गंमत बघा, दादोजीला गुरुपदावरून हटवण्यासाठी शिवाजीनंतर शंभर वर्षांनी लिहिल्या म्हणून बखरी नाकारायच्या आणि आपल्यावर जातीयतेचा आरोप येऊ नये म्हणून पुन्हा बखरीतीलच मजकूर उचलून वापरायचा, असा दुटप्पीपणा जयसिंगरावांनी चालवला आहे.
शिवभारतात जिजाबाईंचा जुजबी उल्लेख आहे. पण ‘शिवछत्रपती’मध्ये जयसिंगराव पवारांनी खास जिजाबाईंसाठी ‘शिवरायांचे शिक्षण’ हे प्रकरण आणले आहे. राज्याभिषेकाचे वर्णनच शिवभारतात नाही. पण चौथीच्या क्रमिक पुस्तकात शिवराज्याभिषेकाला भर दरबारात जिजाबाई हजर असल्याचे चित्र दाखवले आहे. (शिवछत्रपती, एक अपूर्व सोहळा : पृष्ठ ८३) पण याला पुरावा काय? राज्याभिषेकाच्या वेळी भर दरबारात जिजाबाई उपस्थित असल्याचा उल्लेख शिवभारतात तर नाहीच (कारण शिवभारतात इ. स. १६६१ पर्यंतचाच शिवाजीचा इतिहास आलेला आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकाचे वर्णन त्यात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.) पण अन्य कोणत्या बखरीतही नाही. डॉ. जयसिंगराव पवारांच्या बखरीत मात्र शिवराज्याभिषेकाच्या वेळी भर दरबारात जिजाबाई सिंहासनारूढ झालेल्या दाखवल्या आहेत. शहाजीने काही शिक्षक पाठवले व त्यांनी शिवाजीला विविध विषय शिकवले असा उल्लेख शिवभारतात येतो. त्यामुळे या शिक्षकाकडून शिवाजीचे शिक्षण झाले असे म्हटले तर ते एक वेळ समजू शकते. पण ‘या अध्यापकवर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी त्यांचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखेखाली चालूच राहिले.’ (शिवरायांचे शिक्षण, पृष्ठ २६) हे सर्व संदर्भ जयसिंगरावांनी कोठून मिळवले? ‘हा घ्या अस्सल पुरावा’ म्हणून ज्या परमानंदाच्या शिवभारताचा उल्लेख जयसिंगराव करतात त्या शिवभारतात ‘शिवाजीचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली झाले’ असा कोठे चुकूनही उल्लेख आढळत नाही. याच्या उलट शिवभारतात शिवाजीच्या बालपणाच्या संदर्भात पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतात :
‘जो प्रभू स्वत: सातही लोकांचा आधार आहे तोसुद्धा दाईचे बोट धरून उठत असे.’ (अध्याय ७, श्लोक १२, पृष्ठ ६१)
‘आपल्या हस्तकमलांनी डोक्यावर धूळ उठवून घेऊन वाडय़ाच्या दरवाजापुढे खेळणाऱ्या त्या बालकास शिस्त लावण्यास आलेली दाई त्यास पाहून स्तब्ध होई.’ (अध्याय ७, श्लोक १५, १६, पृष्ठ ६२)
‘दाई टाळ्या वाजवू लागली की त्याची गंमत वाटून तो हास्यवदन करून अनेक प्रकारे नाचूबागडू लागे.’ (अध्याय ७, श्लोक १७, पृष्ठ ६२)
‘ज्याने ब्रह्मदेवाला लक्षणासह वेद पढविले तो स्वत: दाईच्या तोंडून निरनिराळे शब्द शिकत असे.’ ‘इच्छिलेले पुरविणारा तो खुषीत आला असता आपल्या अंगावरील दागिने भराभर उतरून दायांना देत असे.’
(अध्याय ७, श्लोक १८, १९, पृष्ठ ६२)
‘तो जवळ उभा राहून एकदम वाघासारखी गर्जना करून आपल्या प्रेमळ दाईससुद्धा भेडसावीत असे.’ (अध्याय ७, श्लोक २३, पृष्ठ ६३)
‘बोटांनी दटावणे इत्यादी उपायांनी दायांनी त्यास मनाई केली तरी तो शहाजीचा पुत्र त्या त्या बाललीलेत गर्क होई.’ ‘‘खा’ म्हटले तरी खात नसे, ‘पी’ म्हटले तरी पीत नसे आणि दायांनी त्यास आळवून ‘नीज’ म्हटले तरी तो निजत नसे.’ (अध्याय ७, श्लोक ३३, ३४, पृष्ठ ६४)
म्हणजे शिवभारतात कवी परमानंद शिवाजीच्या बालपणी दायांचे योगदान नमूद करतो. (जवळ जवळ ९-१० श्लोक तो खर्ची घालतो.) पण जिजाबाईच्या शिक्षणातील योगदानाबद्दल एखादा श्लोक तो लिहीत नाही. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे शिक्षण दायांच्या देखरेखीखाली झाले असा लावायचा का? परमानंद शिवाजीचा समकालीन असूनही ‘शिवरायांचे शिक्षण जिजाबाईच्या देखरेखीखाली चालूच राहिले, याबद्दल एखादा श्लोकही त्याला लिहावासा का वाटला नाही?
शिवाजीच्या शिक्षणाच्या संदर्भात जिजाबाईचा उल्लेख परमानंदाच्या ‘शिवभारत’मध्ये तर नाहीच, पण समकालीन असलेल्या ‘सभासद बखर’मध्येसुद्धा नाही. ‘सभासद बखर’मध्ये जिजाबाईचा उल्लेख पुढीलप्रमाणे फक्त तीन वेळाच येतो :
(१) ‘जिजाऊ आऊचे पोटी शिवाजीराजे जन्मले’ (सभासद बखर : संपादक हेरवाडकर, पृष्ठ ३)
(२) ‘दादोजी बेंगरुळास शहाजीचे भेटीस गेला. त्याचे बरोबर राजेश्री शिवाजी व जिजाबाई आऊऐशी गेली.’ (सभासद बखर : हेरवाडकर संपादित : पृष्ठ ४)
(३) (अफजलखान वधापूर्वी) राजे जागे होऊन जिजाबाईआऊस बोलावून आणून स्वप्नाचे वर्तमान सांगितले.’ (सभासद बखर : संपादक हेरवाडकर, पृष्ठ १२)
शिवरायांच्या विवाहाबद्दल डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, ‘शिवराय चौदा वर्षांचे झाले तेव्हा जिजाबाईने त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू केली.. शिवबाकरता त्या मुली पाहू लागल्या. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई!’ (शिवछत्रपती, शिवरायाचे शिक्षण, पृष्ठ २८-२९)
ही ‘बखर’ जयसिंगरावांनी कशाच्या आधारावर लिहिली? कवींद्र परमानंदाच्या ‘शिवभारत’मध्ये, ‘कौमार्यदशा संपून ज्याला नुकतेच नवयौवन प्राप्त झाले आहे आणि मदनासारखे लावण्य अंगी खेळू लागल्यामुळे मनोहर अशा त्या शिवाजीला शीलवती, सती, रमणीय, रूपवती व अत्यंत गुणशालिनी अशी भार्या प्राप्त झाली’ (अध्याय १०, श्लोक ४२, ४३, पृष्ठ ९०) फक्त एवढाच उल्लेख येतो आणि ‘सभासद खबर’मध्ये शिवाजीच्या विवाहाबद्दल फक्त ‘राजियाची स्त्री- निंबाळकर यांची कन्या सईबाई केली होती ती प्रसूत जाहली.’ (सभासद बखर: संपादक हेरवाडकर, पृष्ठ ९) एवढे एकच वाक्य आलेले आहे. परमानंदाचे ‘शिवभारत’ आणि कृष्णाजी अनंत ‘सभासद बखर’ या दोन्ही समकालीन ऐतिहासिक साहित्यांत शिवाजीच्या विवाहाच्या संबंधात जिजाबाईचा सहभाग मुळीच दिसून येत नाही. उलट ‘शिवाजी महाराजांची इच्छा दादाजीने शहाजीराजास पत्रद्वारे विदित करून असे कळविले की, ‘आम्ही इकडे चांगली मुलगी पाहून कार्य आटपून घेतो.’ हा विचार पसंत पडून त्यांनी त्यास संमती दिली. त्याप्रमाणे दादोजीने शिर्के यांची कन्या सईबाई हिजशी इ. स. १६४० मध्ये पुणे मुक्कामी शिवाजी महाराजांचा विवाह मोठय़ा थाटाने साजरा केला.’ (छत्रपती शिवाजी महाराज : केळुस्कर, पृष्ठे ६०).
कवींद्र परमानंदाच्या ‘शिवभारत’मध्ये शहाजीचा थोरला मुलगा व शिवाजीचा थोरला भाऊ जो संभाजी त्याच्या विवाहाचे सविस्तर वर्णन आलेले आहे. (अध्याय ८, श्लोक १० ते १६, पृष्ठ ६६; ६७) पण परमानंद समकालीन असूनही त्याने शिवाजीचा विवाह कोणी जमवला? विवाह कसा झाला? याबद्दल अवाक्षरही बोलत नाही. असे का? शहाजीराजांनी शिवाजीचे शिक्षण, जिजाबाईचे संरक्षण व जहागिरीची देखभाल करण्यासाठी दादोजी कोंडदेवाची खास नेमणूक केल्याचा अनेक ऐतिहासिक साधनांत उल्लेख आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार ‘तारीख-इ-शिवाजी’ या ग्रंथाच्या आधारे असे म्हणतात की, ‘शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवाच्या हाती आपल्या जहागिरीची व्यवस्था इ. स. १६३६ मध्ये दिली तेव्हा त्यांनी त्यास असे सांगितले की, ‘माझी बायको जिजाबाई व पुत्र शिवाजी ही शिवनेरी किल्ल्यात आहेत, त्यास पुण्यास आणून आपल्या देखरेखीखाली ठेव व त्यास लागेल तेवढा पैसा खर्चासाठी दे!’ ज्याप्रमाणे दादोजी कोंडदेवाने पुण्यात जिजाबाई व शिवराय यांना राहण्यासाठी ‘लालमहाल’ बांधून दिला त्याचप्रमाणे शिवरायांच्या विवाहाबाबतही त्याने खटपट केली असणे सहज शक्य आहे. तेव्हा जिजाबाईने शिवाजीच्या विवाहाच्या बाबतीत पुढाकार घेतला असा उल्लेख शिवभारतात तरी येणार कसा? कवींद्र परमानंदाच्या ‘शिवभारत’मध्ये जे आहे तेच प्रमाण मानायचे असा जो निकष दादोजी कोंडदेवाच्या बाबत जयसिंगराव वापरतात तोच निकष ते जिजाबाईला का लावत नाहीत?
डॉ. जयसिंगराव पवार परमानंदच्या ‘शिवभारत’चा उपयोग फक्त दादोजी कोंडदेवाचा उल्लेख हटवण्यापुरता करतात. इतर बाबतीत ते मुक्त स्वातंत्र्य घेतात. परमानंदाचे ‘शिवभारत’ समकालीन असेल, पण जयसिंगराव पवार समजतात तेवढे विश्वसनीय मानता येणार नाही. खुद्द जयसिंगराव पवारांनासुद्धा ही गोष्ट अप्रत्यक्षपणे मान्य करावी लागली आहे. कारण ‘शिवभारत’मध्ये दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी, बाजी प्रभू देशपांडे यांचे उल्लेख नाहीत. तरीपण चौथीच्या पाठय़पुस्तकात या तिघांचाही उल्लेख त्यांना करावा लागला आहे. प्रशासक म्हणून त्याला मान्यता देऊन ‘दादोजी कोंडदेवाची कामगिरी’ हा एक परिच्छेद द्यावा लागला आहे. जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ हे शिवाजीचे अधिकृत चरित्र नव्हे. कारण त्यामध्ये इ. स. १६३० ते १६६१ पर्यंतचाच शिवाजीचा इतिहास आलेला आहे. शिवाजीचा ३१ वर्षांपर्यंतचाच इतिहास ‘शिवभारत’मध्ये आलेला असल्याने शिवाजीचे उर्वरित १९ वर्षांचे आयुष्य समजून घेण्यासाठी अन्य ऐतिहासिक साधनांचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ला अधिकृत चरित्र कसे मानता येईल? शिवाजीचा जन्म इ. स. १६३० चा आणि दादोजी कोंडदेवाचा मृत्यू इ. स. १६४७चा. इ. स. १६३० ते इ. स. १६४७ पर्यंत म्हणजे जवळजवळ १७ वर्षे दादोजी कोंडदेव शिवचरित्रात वावरत होता. या अवधीत ‘दादोजी कोंडदेवाची कामगिरी’ सांगताना इयत्ता चौथीच्या पाठय़पुस्तकाचे पुनर्लेखन करणारे तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात की, ‘जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादोजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते; तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. शहाजीराजे व जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती. त्यांनी शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात जिजाबाई व शिवराय यांना राहण्यासाठी मोठा वाडा बांधला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी, म्हणून दादोजींनी त्यांना काही वर्षे साऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत; म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादोजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर त्यांनी सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला.’ (शिवछत्रपती : शिवरायांचे शिक्षण : पृष्ठ २५-२६)
डॉ. जयसिंगराव पवार जरी आज दादोजी कोंडदेवाला गुरू मानत नसले तरीही वरील- प्रमाणे दादोजी कोंडदेवाची कामगिरी अधोरेखित करतात त्या दादोजी कोंडदेवाचा साधा नामोल्लेखही परमानंद करीत नाही, ही समकालीन ‘शिवभारत’ची विश्वासार्हता निश्चितच कमी करणारी आहे. जो कवींद्र परमानंद आपल्या ‘शिवभारत’मध्ये अनामिक शिक्षक आणि दायांचा ठळक उल्लेख करतो तोच परमानंद सुमारे सतरा वर्षे शिवरायाच्या जीवनात वावरणाऱ्या व अफाट प्रशासकीय कौशल्य दाखविणाऱ्या दादोजी कोंडदेवाला मात्र अनुल्लेखाने मारतो याचे सखेदाश्चर्य वाटते. कवींद्र परमानंदाच्या ‘शिवभारत’ची खबर घेऊन डॉ. जयसिंगराव पवारांनी इयत्ता चौथीच्या इतिहासाची ‘शिवछत्रपती’ बखर लिहावी, हे महाराष्ट्राचे दुर्दैव होय.
या ठिकाणी ‘शिवाजीचे गुरू कोण?’ या प्रश्नाच्या संदर्भात शहाजी विरुद्ध दादोजी कोंडदेव किंवा जिजाबाई विरुद्ध दादोजी कोंडदेव असा वाद घालणे व्यर्थ होय. शिक्षक या नात्याचे स्थान वेगळे आहे. दादोजी कोंडदेव यांच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील योगदानाचा अनुल्लेख योग्य होणार नाही.
lokprabha@expressindia.com |