| चंद्रशेखर सानेकर आणि माझी ओळख दादरमधल्या एका कोंदट अशा जागेत झाली. तो एवढा मोठा कवी आहे हे मला माहीतही नव्हतं. आमचे तेव्हाचे दोन स्ट्रगलर मित्र त्या ठिकाणी कविता वाचत होते. मीही एक माझी कविता वाचली. (तेव्हा मी स्वत:ला कवी समजत असे.) माझी कविता ऐकून एकंदरीतच चंद्रशेखर फार प्रभावित झाला. मला नंतर कळलं की तो अप्रतिम कवी आहे. त्याचं ‘एका उन्हाची कैफियत’ हे पुस्तक (कवितांचं) फार नंतर आलं. त्यानंतरच दुसरं आता आलं. आपण ‘मी मराठी, मी मराठीपासून आज आवडणारी गाणी जी ऐकतो त्यातली बहुतेक गाणी ही चंद्रशेखर सानेकरने लिहिलेली असतात. त्यासाठी ‘झी गौरव’पासून अनेक पुरस्कार त्याला मिळालेले आहेत. गजल तर तो असाधारण लिहितो. त्यातल्या ओळी मी इथे उद्धृत करणार नाहीए. कारण वाचकांनी पुस्तकं त्याच्या मूळ रूपात विकत घेऊन वाचावी अशी माझी इच्छा आहे.
चंद्रशेखरला मी शेखर म्हणतो. तो खूप खूप वर्षांपूर्वी ‘सामना’मध्ये नोकरी करायचा. तिथे त्याने नोकरी करायला सुरुवात केली त्याचंही कारण गमतीशीर आहे. त्याला वीणाशी (आता त्याची बायको. तेव्हाची प्रेयसी) लग्न करायचं होतं. वीणा
प्रोफेसर होती (किंवा लेक्चरर बहुधा) तिची अट होती की तू नंतर नोकरी सोडली नि आयुष्यभर कविता लिहिल्या तरी चालेल. पण लग्नाला उभा राहताना तुझ्याकडे पदवी आणि नोकरी हवी. जेणेकरून मला माहेरी तुला सन्मानाने पेश करू शकेन. लग्नानंतर पाचएक वर्षांनंतर ‘सामना’तली नोकरी शेखरने सोडली. कार्यकारी संपादकानी नोकरी सोडण्याचं कारण विचारलं. खरं तर तेव्हा युती सरकार असल्यामुळे टेन पर्सेटमध्ये घर मिळण्याची शक्यता शेखरच्या दरवाजावर उभी होती. बरं, कार्यकारी संपादकही त्याच्या कामावर खूष होते. शेखरला जेव्हा त्यांनी नोकरी सोडण्याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला कविता नि गजल लिहायची आहे.’’ कार्यकारी संपादकांनी कपाळावर हात मारून घेतला. तेव्हा शेखर आणि वीणा डोंबिवलीला भाडय़ाच्या घरात घरमालकांच्या मर्जीने महिन्यांच्या हिशेबांवर रहात असत. मी त्यांच्या त्या घरांमध्ये बराच काळ नि बऱ्याच रात्री कविता ऐकत काढलेल्या आहेत. तेव्हा शेखरच्या मुलीचा इशाचा जन्म झाला नव्हता. माझं लग्नही व्हायचं होतं. आम्हा सर्वामध्ये वीणा एकटी मिळवती होती. माझ्या आयुष्यात तर कशाचा कशाला पत्ता नव्हता. त्या काळात शेखरने स्वत:च्या आणि स्वत:ला आवडलेल्या कवितांनी माझं आयुष्य, माझा आत्मा अक्षरश: जिवंत ठेवला. अन्यथा जगण्यासाठी कवितेसारखं एक उत्तम माध्यम आहे याची जाणीवच मला झाली नसती. नासिर काजमी या जगप्रसिद्ध शायराचं एक पुस्तक शेखरने मला आणून दिलं. त्याच्या कविता आणि गजलांची मी अक्षरश: पारायण केली. डोंबिवलीतल्या भाडय़ाच्या घरातून विद्याविहारच्या कॉलेजमध्ये जायला दूर पडत होतं म्हणून शेखर आणि वीणाने मुलुंडमध्ये घर घेतलं. तिथे माझ्या आणि बेकारीच्या काळात मी अनेक प्रकारची धमाल केलेली आहे. काव्य, शास्त्र, विनोदाच्या अनेक मैफिली तिथे रंगलेल्या आहेत.
शेखर कविता अक्षरश: जगतो. त्याच्या मनात कवितेशिवाय काहीच नसतं. त्याच्या स्वभावात जगाला फाटय़ावर मारण्याचा एक आडमुठेपणा आहे. जगायला पैसे लागतात यावर त्याचा बहुतेक विश्वास नसावा. त्यावर वीणाचा विश्वास आहे. त्यामुळेच शेखर शांतपणे कविता लिहू शकला. शेखरचं आणि सुरेश भटांचं फार सख्य होतं. माझं विजय तेंडुलकरांशी. विजय तेंडुलकर आणि सुरेश भट दोघेही परममित्र होते. भटसाहेब पुण्याला तेंडुलकर जेव्हा रहात असत तेव्हा बऱ्याचदा तेंडुलकरांकडे भटसाहेब मुक्कामाला असत. त्या मंतरलेल्या काळातली एक आठवण स्वत: मला तेंडुलकरांनी सांगितलेली आहे. एकदा रात्री भटसाहेबांना तंबाखूची तलफ आली. त्यांनी तेंडुलकरांना रात्री दोन वाजता जागं केलं नि हाताला पकडून लकडी पुलानजीकच्या (त्यावेळच्या पुण्यातल्या) एका दुकानात (जे उघडं होतं नि तंबाखूही मिळायची) तंबाखू घेतली. मग घरी आल्यावर रात्रभर खास तेंडुलकरांसाठी गज़्ालांचा ‘महोत्सव’ भटसाहेबांनी केला. जो अविस्मरणीय होता. ही गोष्ट मी शेखरला सांगितली तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला आणि माझ्यासोबत तडक तेंडुलकरांकडे आला. त्यानंतर तो भटसाहेबांचं स्मरण नित्यनेमाने करत असे.
शेखर सानेकर हा इतका मोठा कवी (आणि गीतकार) आहे की, त्याला समकालिनांची स्पर्धाच नाही. फार थोडय़ा कवींनी महाराष्ट्रात आणि मराठीत इतकं मूलभूत आणि दार्शनिक काव्य लिहिलेलं आहे. गाणी तर तो गदिमांसारखी सहजपणे उत्कृष्ट पद्धतीने लिहितो. मीटरमध्ये आधी म्युझिक सांगून लिहिणारा आज मराठीत फक्त तोच आहे. शेखर भटसाहेबांसारखाच हट्टी आहे. त्याच्या मनात नसेल तर तो करोड रुपयांवर ठोकर मारेल पण लिहिणार नाही. तो हिंदी आणि उर्दूत (लिपी नव्हे भाषा) अप्रतिम लिहितो. पण त्या भाषांमध्ये चित्रपट, गीतं किंवा छपाई करून घेण्याकरिता जे लाचार लाळ घोटेपणा करावं लागतं ते त्याला कधीच जमणार नाही.
माझी आई खूप आजारी होती. तिला अटेन्ड करायला मी किंवा वडील तिथे असायला पाहिजेच होतो. त्यातच वडिलांचं युरीन स्टोनचं ऑपरेशन निघालं. तिथे अटेन्डट म्हणून मला असणं आवश्यक होतं. हे कळल्यावर तडक शेखर तीन दिवस आईसोबत राहिला. पण याउलट तो सटकूही आहे. २००७ ला मी माझं घर (भाडय़ाच्या घरातली उंटाच्या बिऱ्हाडाची पळापळ) सोडून राहायला गेलो. मालाडला आजतागायत मी आणि सुप्रियाने वारंवार बोलावून तो माझ्या घरी आलेला नाही. वास्तविक मुलुंड-मालाडमध्ये अंतर ते किती असणार? पण शेखर आडमुठा म्हणजे आडमुठा.
एकेकाळी मी सिरीयल लिहायचो (जवळजवळ २७ लिहिल्यात) शिवाय सिनेमाचीही माझी कामं चालू होती. त्यातल्या काही प्रोजेक्टस्मध्ये शेखर होता. पण शब्द, व्याकरण, भावार्थ, शब्दार्थ आणि मीटरचं त्याला इतकं सखोल ज्ञान आहे की, बहुधा दिग्दर्शकांची भांडणं व्हायची. नंतर ते काम तो सोडायचा. त्याच्या पुढच्या सात पिढय़ांना वाचून संपणार नाहीत एवढय़ा कविता नि गज़्ाला त्याने लिहून ठेवल्यात. त्या महसूल कचेरीतल्या कीर्द-खतावण्यांसारख्या दिसतात. त्याला मी विचारतो (मराठी, हिंदू, उर्दूतल्या) या सगळ्या कविता प्रसिद्ध कधी होणार? तर तो म्हणतो. प्रत्येक गोष्ट आपली प्रसिद्धी (वा कुप्रसिद्धी) ताकद आणि जगासमोर येण्याची वेळ घेऊन येते.
मला फार थोडे मित्र आहेत. ज्यांना माझं आयुष्य पुस्तकांसारखं वाचता येतं. शेखर त्यातला एक आहे. आमचं नातं ‘या मनीचं (मनी मराठीत!) त्या मनी असं आहे. आम्ही कित्येक दिवस बोलत नाही. वाढदिवस साजरे करत नाही. शुभेच्छा देत नाही. माझ्या दु:खावर मी त्याच्याकडे व्यक्त करू शकतो. अंत:करण विदीर्ण करणाऱ्या कविता लिहितो तेव्हा मी त्याला म्हणतो, ‘‘माझ्या दु:खाच्या धगधगत्या भट्टीत तू आपल्या कवितांचे पाव भाजून घेतोस.’’ तो खळखळून हसतो.
मी माझं मन फार थोडय़ा लोकांना देतो. शेखर त्यातलाच एक आहे. शेखरकडे व्यवहारचातुर्य नाही. आत्मसन्मानाची जाणीव फार तीव्र आहे. त्यामुळे याहून कित्येकपट Money, Fame, Power, Recognition त्याला मिळायला हवी होती ती त्याला मिळालेली नाही. त्याच्यासमोर अनेक कवींनी खरं तर साष्टांग लोटांगण घालायला हवं. तरीही तो अजून स्ट्रगल करतोय. मला या महाराष्ट्राचं आश्चर्य वाटतं. शेवटी एक दिवशी महाराष्ट्राचा महाकवी म्हणून त्याला जीवनगौरव आणि अनेक पुरस्कार मिळतील पण तेव्हा त्याने ते नाकारायला हवेत. कारण तरुणपणी फेलोशिप देण्याची परंपरा नाकारून म्हातारपणी बायपासचे आणि व्हेंटीलेटरचे दिवस आल्यावर जीवनगौरव पुरस्कार देऊन स्वत: चमकून घेण्याची राजकारण्याची आणि राष्ट्रीय व ठफक उद्योगपतींना एक कवी फाटय़ावर मारणार नाही तर कोण मारणार?
चंद्रशेखर सानेकरचं नाव ज्यांना माहीत नाही त्यांना मराठी (आणि एकंदरीतच) कविता कळली नाही.
..आणि ज्याला आयुष्यात कविता कळली नाही त्याच्या आयुष्यात जनावराहून जगण्यासाठी वेगळं काय उरतं?
माझ्या वाचकांनी ९००४६७३८५४ या मोबाईलवर शेखरला फोन करून तेवढं माझ्या घरी एकदा (तरी) येऊन जायला सांगा. मला कवीपुढे पंतप्रधानही खुजे (कुणीही असते तर) वाटतात. कारण ‘जे न देखे रवी, ते देखे कवी.’
अशी सूर्यकिरणं हातात पकडून शब्दबद्ध करणाऱ्या शेखरचा माझ्या मनावर खोल ठसा आहे. Love You चंद्रशेखर!
raju.parulekar@gmail.com |