अमेरिकेतील कुठल्याही मराठी घरात (उंबरठय़ावरचे माप ओलांडून) मी गृहप्रवेश केला की, हातातली बॅग खाली ठेवली नाही तो मी घरातल्या बाईला हमखास एकच प्रश्न विचारतो, ‘‘काय, मुलं मराठी बोलतात का?’’
या प्रश्नाने अनोळखीपणा संपतो, अंतराय कमी होतो, संभाषणाला तोंड फुटते. अमेरिकेत नऊ वाऱ्यांत मिळून शंभर प्रयोग केल्यानंतर मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की, सहसा मला एकच उत्तर ऐकायला मिळतं, ‘‘त्याला सगळं कळतं, पण बोलत नाही.’’
सगळं कळणारच, कारण आई-बाप एकमेकांशी व मुलं लहान असल्यापासून त्यांच्याशी मराठीच बोलत असतात. ती मात्र इंग्रजीतून उत्तरे देतात. टीव्हीवरच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी इंग्रजी प्रश्नांना मराठीतून उत्तरे दिली होती त्याचाच उलटा प्रकार. घराच्या दारातून बाहेर पडल्यावर मुलांचा फक्त (अमेरिकन) इंग्लिशशी संबंध येतो. त्यामुळे त्या एकाच भाषेत संवाद
साधणे त्यांना अत्यंत सोयीचे वाटते. आई-बाप सोडून मराठीचा संबंध येतोच कुठे?
वॉशिंग्टनच्या शिरीष ब्रrोनं अट्टहासाने त्याच्या छोटय़ा मुलीवर मराठीचे संस्कार केले. घरात मराठीच बोलायचं असा दंडक घातला. तिच्या चिमुकल्या मेंदूत दोन भाषांची सरमिसळ झाली. मग ती शाळेतही ‘आय रॅन इंटू भिंत’ असं बोलायला लागली. लगेच ‘उसकी दिमागी हालत ठीक नहीं’ असा निष्कर्ष तिच्या शिक्षकांनी काढला. ब्रrोचं धाबं दणाणलं. आपल्या चुणचुणीत हुशार मुलीला ही माणसं ‘मेंटली स्लो’ ठरवून त्यांच्यासाठी असलेल्या शाळेत पाठवतील, अशी त्याला भीती वाटली. त्याने मराठी बासनात गुंडाळून ठेवलं. आता ती फाडफाड इंग्रजी बोलते व हा कौतुकाने ऐकत बसतो.
ह्यूस्टनच्या अचला बापटांच्या दोन्ही मुली- सई व रमा मात्र अस्खलित मराठीतून बोलतात. कमाल आहे. सात-आठ वर्षांच्या रमाला मी गमतीने विचारले, ‘‘वर्गातली मुलं तुला दातपडकी म्हणतात का गं?’’
‘‘त्यांना दातपडकी म्हणता येत नाही.’’ रमा दातातलं खिंडार दाखवत मिश्कील हसत म्हणाली, ‘‘ते म्हणतात ‘डॉटपॉडखी’.’’
यंव रे गब्रू! बापटांच्या घरात मराठी लाडात वाढतंय.
व्हँक्युअरला (कॅनडा) विनय छत्रे राहतात. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. नाव नेहा. वय सोळा. छत्रे मला म्हणाले, ‘‘तिला मराठी चांगलं येतं.’’ त्यानंतर माझ्या चार-सहा दिवसांच्या वास्तव्यात मी तिला एकदाही मराठी बोलताना ऐकलं नाही. रेशमी मुलायम इंग्लिशमधून ती बोलत होती. एकदा जेवताना तिचे बाबा तिला मराठीतूनच म्हणाले, ‘‘नेहा, केवढंसं तुझं हे जेवण गं. मी तुझ्याएवढा होतो तेव्हा किती जेवायचो माहित्येय?’’
‘‘ते दिसतंच आहे ना तुमच्या शरीरावर.’’ नेहा अमृताते पैजा जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरमाऊलींच्या मायमराठीत म्हणाली.
त्यानंतर नेहाला मराठी येतं का हा प्रश्न निकालात निघाला.
डलासच्या जया दातेंचा मुलगा तुमच्या-आमच्यासारखं मराठी बोलतो व त्याला याची किक् आहे. संधी मिळाली की तो मराठीत सुरू होतो. बापाला याचं अपार कौतुक आहे. कुठल्याशा शैक्षणिक प्रोग्रॅमनुसार (प्रोग्रॅमच्या अमेरिकेत स्पेलिंगमध्ये दोन ‘एम्’ नाहीत तर केवळ एकच ‘एम्’ ही अमेरिकन काटकसर असावी. त्यांच्या ‘कलर’मध्येही ‘यू’ नसतो.) तो बँकेत काम करीत होता. तिथं एक मराठी जोडपं आलं. त्यांना खातं उघडायचं होतं. त्याला मराठी येत नसणार हे गृहीत धरून ते जोडपं प्रथेनुसार भांडलंदेखील. दातेंचा मुलगा निर्विकारपणे बसला होता.
‘‘हा अमेरिकन वाटत नाही.’’ बायको म्हणाली.
‘‘मेक्सिकन असणार. हे कुठेही घुसलेत.’’ नवरा म्हणाला.
‘‘त्याला आपण बोललेलं कळत असेल का?’’
‘‘कसं कळणार?’’ नवरा खेकसून म्हणाला, ‘‘मी बोललेलं तुला जिथं कळत नाही तिथं त्याला काय कळणार?’’
‘‘आणखी काही काम होतं का?’’ दात्यांच्या मुलाने थंडपणे शुद्ध मराठीतून विचारले.
मराठी जोडपं थिजलं. एकमेकांशी भांडायलाही विसरलं. नुसत्या आठवणीनं दात्यांच्या मुलाला गुदगुल्या केल्यासारखं हसू येत होतं.
मिनियापोलिसच्या नंदा व प्रिया शिलोत्री यांची मुलगी प्रीती मराठीचं नाव घेत नाही. खोलीचं दार लावून ती भारतातल्या आजीआजोबांपाशी फोनवरून भरपूर मराठी बोलते, पण एरवी कोणाशी? रामा, शिवा, गोविंदा!
‘‘अहो, एकदा किनई तिच्या मराठीला कोणीतरी हसलं. तेव्हापासून तिनं मराठीचं नाव टाकलं ते टाकलं.’’ सौ. प्रिया मला सांगत होत्या.
माझ्या प्रयोगाला प्रीती नुसतीच आली नव्हती तर समोरच बसली होती. मराठीतील सर्व बारकावे तिला अचूक कळत होते व ती प्रतिसादही देत होती. काय केलं म्हणजे प्रीती मराठी बोलायला लागेल मला कळत नाही. ओबामाने सांगून पाहिलं तर ऐकेल?
कॅन्सस सिटीच्या (आता शिकागोच्या) कल्पना व संजीव निमकर यांच्या धाकटय़ाला शाहरूख खान फार आवडतो. त्यासाठी हिंदी शिकणं त्याला भाग पडलंय. त्यानं त्यासाठी हिंदीचा क्लासही जॉइन केलाय वाटतं. मराठीविषयी अशी ओढ वाटायला हवी असेल तर आधी त्याला भरत जाधवचा फॅन करावा लागेल. नको, दादा कोंडकेंचा नको. कारण त्यानंतर तो मराठी बोलायला लागेल पण ते बोबडं व द्वअर्थी असेल. ‘शाहरूखनेच गाडीतून मला आता तुमच्या घरी सोडलं.’ असं मी त्याला सांगितलं आणि त्यांनी चटकन विश्वास ठेवला. हीच मुलं मोठी होऊन मतदार होतात आणि कुठल्याही पक्षावर व उमेदवारावर असाच विश्वास ठेवतात.
पुण्याचे केळकर तलसा (ओकलाहामा) येथे गणिताचे प्राध्यापक आहेत. त्यांची बायको अमेरिकन आहे. मुलीचं त्यांनी डबल नाव ठेवलंय. ज्युली व जुईली. अमेरिकन लोकांसाठी ज्युली व भारतीयांसाठी जुईली. कार्यक्रमानंतर उत्तररात्री गप्पा मारताना केळकर मला म्हणाले, ‘‘मी जुईलीवर मराठी भाषा व आपले संस्कार मुळीच लादत नाही. या मार्गाने गेल्यास उलट तिच्या मनात त्याविषयी अप्रीती निर्माण होण्याची भीती आहे. मोठी झाल्यावर तिला कळणारच की आपण अमेरिकन नाही आहोत, वेगळे आहोत. मग तिच्या मनातील कुतूहल चाळवेल. शी वुड वाँट टु गो बॅक टु हर रुट्स. तेव्हा मी तिला माहिती देईन. ते खूपच परिणामकारक होईल.’’
जुईली आता चांगलीच मोठी झाली असेल. केळकरांची ‘थिअरी’ कितपत यशस्वी ठरल्येय हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. ती फुलटाइम ज्युली झाली असेल किंवा बामणाशी लग्न करून पुण्यात सदाशिव पेठेत स्थायिक झाली असेल. दुसरी शक्यता जरा अवघडच दिसते.
शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत आलेली व इथंच राहिलेली आपली मराठी माणसं मराठीला बिलगून आहेत. ती आवर्जून मराठीतून बोलतात, सणवार पाळतात, संकष्टी-एकादशीचं भान ठेवतात, वास्तुशांतीची व सत्यनारायणाची पूजा साग्रसंगीत करतात आणि सकाळी नेमाने मराठी गाणी, भजने व भूपाळ्या लावतात. त्यांच्या गाडय़ात पु.ल. आणि व.पु.च्या कॅसेट्स व सी.डी.ज असतात. मुलांवर मराठीचे संस्कार करण्याचे त्यांच्याकडून ते भगीरथ प्रयत्न करतात. त्यात यश येत नाही हे पाहून अखेर ते नाद सोडून देतात. क्रिकेट फॉलो करता येत नाही हे पाहून क्रिकेटचा नाद सोडून ते बेसबॉल व बास्केटबॉल यात रस घ्यायला लागतात त्याप्रमाणे. मग माझ्यासारखा कोणी भेटला की निर्विकारपणे ते विचारतात, ‘सध्या इंडियाचा कॅप्टन कोण आहे?’
मित्रवर्य रमेश गुणेबरोबर पाम स्प्रिंग्जमध्ये माझ्या घनघोर गप्पा रंगात आल्या असताना रमेशचा अर्धअमेरिकन मुलगा ऋषी मोठय़ाने किंचाळला, ‘Now enough of that Marathi’ (खूप झालं आता मराठी.)
माझ्या मनात आलं की अमेरिकेतल्या समस्त मराठी मुलांच्या भावना ऋषी बोलून दाखवतोय.
shireeshkanekar@hotmail.com |