१२ फेब्रुवारी २०१०
सत्पुरुष

विवेक वैद्य
माघ वद्य सप्तमी, शके १८०० अर्थात २३ फेब्रुवारी १८७८. विदर्भातील खामगाव तालुक्यात असलेल्या शेगांव या छोटेखानी गावामध्ये त्या दिवशी अवतरीत झालेला, वरकरणी वेडसर भासणारा, हाती कच्ची चिलीम बाळगणारा, उष्टय़ा पत्रावळीवरची खरकटी शितकणं वेचून खाणारा, अन्न हे परब्रह्म आहे; त्याची नासाडी करू नका हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारा दिगंबरावस्थेतील सत्पुरुष म्हणजेच श्रीगजानन महाराज.

वैशाखाचं रणरणतं ऊन, अंगाची काहिली होत होती. घामाच्या धारा अंगाअंगातून निथळत होत्या आणि उष्म्याच्या कडाक्याने तिथल्या तिथे थिजूनही जात होत्या. सोळा कलांनी तापणारा सूर्य त्या दिवशी जास्तीच्या सोळा कला घेऊन आल्यागत सर्व आसमंत भाजून काढत होता. अंगातलं सळसळणारं रक्त देखील आतल्या आत सुकून जाईल की काय या भीतीने शेगावातला एकहीजण घराचा उंबरठा ओलांडून बाहेर जाण्यास धजावत नव्हता. अगदी नाइलाजाने ज्यांना घराबाहेर पडावं लागलं ते नशिबाला दोष देत भराभर पावलं टाकत चालत होते. फुटक्या कौलांच्या अध्र्यामुध्र्या सावलीचा आधारसुद्धा त्यांना जीवनदायी वाटत होता. झाडेझुडपं असहाय्यपणे पान गाळून बसली होती. रस्त्यावरची कुत्री-डुकरंसुद्धा वळचणीची जागा पकडून ओलावा शोधत होती, पशुपक्षी चिडिचूप झाले होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंच्या डोळ्यातून ओघळणारी आसवं कढत पाण्याचे थेंब होऊन पाहता पाहता दिसेनाशी होत होती.
विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा आणि पाण्याचं दुर्भिक्ष हे कायमचं आहे. कालिदासाच्या मेघदूतामधील दाटून आलेले ढग इथं पर्जन्याचा शिडकाव करताना मात्र नेहमीच हात आखडता घेतात. पावसाच्या तुरळक सरी सोडल्या की नऊ महिने उन्हाळा आणि उरलेल्या तीन महिन्यात कडाक्याचा उन्हाळा. अशा त्या विपरीत वातावरणामध्ये देविदास पातुरकरांचा वाडा मात्र

 

उत्साहाने सजलेला-धजलेला होता. त्याचं कारण त्या दिवशी पातुरकरांच्या मुलाची ऋतुशांती होती. लांबलांबून आलेली पाहुणी मंडळी, नातलग, सोयरे-धोयरे यांची लगबग आणि चेहेलपेहेल यांमुळे पातुरकरांचे घर अक्षरश: गजबजलेलं होतं.
दुपारची वेळ. पूजा विधी आटोपले तशा भोजनाच्या पंक्ती बसल्या. एक एक करून पंक्ती उठू देखील लागल्या. साग्रसंगीत भोजन आणि खास वैदर्भीय पाहुणचाराचा आग्रह यांमुळे पंगती अगदी रंगात आल्या होत्या. प्रत्येक पंगत उठली की उष्टय़ा, खरकटय़ा पत्रावळ्या बाहेरच्या बाजूस असलेल्या डेरेदार वटवृक्षाखाली टाकल्या जात होत्या.
* * *
उन्हामुळे पावलं आपोआपच वेगात पडत होती. चालता चालता जीव कातावला होता, मेटाकुटीला आला होता. ओठ सुकले होते. बंकटलाल वारंवार आपली टोपी आणि धोतराचा सोगा सावरीत घराच्या दिशेने झपझप पावलं टाकत होता. त्याच्या सोबत दामोदरपंत कुलकर्णी देखील होते. बंकटलाल हा मूळचा साहुकार. मुलगा वयात आला की हळूहळू व्यवहाराची जबाबदारी त्याच्या खांद्यवर सोपवायची असा सर्वसामान्य ‘व्यावहारिक विचार’ प्रत्येक आईबापाच्या मनात येतोच. त्यानुसार बंकटलाल जाणता आणि नेणता झाल्याची खात्री पटताच वडील भवानीराम अग्रवाल यांनी पेढीवरची कामे त्याच्याकडे सोपविण्यास सुरुवात केली. अशाच एका ‘कुळा’कडे व्यवहाराची उकल करण्यासाठी बंकटलाल गेला होता. परतताना उशीर झाला तसा रणरणत्या उन्हात घराकडचा रस्ता तुडविताना आपण युगानुयुगे प्रवास करीत असल्याचा थकवा त्याच्या गात्रागात्रातून ठिबकू लागला.
बंकट आणि दामोदरपंतांचे पाय एकाच गतीने, एकाच तालात कवायत केल्यागत पडत होते. बोलण्याचे विषय अनेक होते आणि इच्छादेखील. मात्र उन्हाचा तडाखा असा काही जबरदस्त की घशातील आवंढय़ासोबत शब्दही गिळावे लागत होते. तेवढय़ात रस्त्यावरून जीव तोडून धावणारी आणि कुठल्याशा गटारात अदृश्य होणारी डुकरांची पिलावळ पाहून बंकटलालला गंमत वाटली. वास्तविक हे दृश्य रोजचंच पण तरीही त्याच्या ओठावर स्मित उमटलं त्याचं कारण हेही होतं की त्याच्या घराचा परिसर त्याच्या दृष्टिपथात आला होता. कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं होतं. त्याचं घर तिथून अवघ्या मिनिटभर अंतरावर होतं. चौक ओलांडून मधल्या वाडीतील वटवृक्षाचा पार ओलांडला की आपलं घर आलंच. घरी पोहोचणार या कल्पनेनेच तो सुखावला. पावलांची गती वाढली. चालीतील अधीरताही वाढली. आपल्याच नादात झपाझप पुढे जाणाऱ्या बंकटलालची तंद्री भंग पावली ती एकाएकी त्याच्या हाताला बसलेल्या हिसक्याने. दामोदरपंतांनी एकाएकी बंकटलालचा हात खस्कन ओढला आणि त्याला समोरचं दृश्य दाखविले. वर्षांनुवर्ष पुराणपुरुषागत उभ्या ठाकलेल्या त्या वडाच्या झाडाकडे काय बघायचं? अशा आश्चर्यकारक मुद्रेमध्ये त्यानं ‘ते’ दृश्य पाहिलं आणि तो जागच्या जागी खिळून राहिला. तो जे काही पाहात होता त्यात फारसं काही नावीन्य नव्हतं. तसं ते नेहमीचंच दृश्य, मात्र त्या दृश्याच्या नायकाने बंकटलालचे लक्ष वेधून घेतले. बंकटलालला इथे काही तरी विशेष, नावीन्यपूर्ण घडतंय याची जाणीव झाली. त्यानं दामोदरपंतांकडे चमकून पाहिलं. दोघांच्याही मनात आलेला विचार त्यांच्या डोळ्यातून प्रगटला. हे ‘प्रकरण’ काहीसं निराळं आहे याची नोंद एव्हाना बंकटलालने घेतली होती.
* * *
पत्रावळ्यांची नुसती रास रचली गेली होती. तो मात्र शांतपणे प्रत्येक उष्टय़ा, खरकटय़ा पत्रावळीवरनं शीत अन् शीत उचलून खात होता. येणारी जाणारी लोकं चमत्कारिक नजरेनं ते दृश्य पाहात होती, थांबत होती आणि वास्तवाचं भान आलं की पुन्हा आपल्या कामाला लागत होती. पातुरकरांच्या वाडय़ातील नोकरचाकरही आश्चर्याने त्या माणसाकडे पाहात होती आणि आश्चर्यचकित होत होती. त्याला मात्र त्याचं कसलंही सोयरसुतक नव्हतं. तो निजानंदात रंगलेला तरुण आपल्याच रंगात रंगून गेला होता. अव्याहतपणे उष्टय़ा पत्रावळींवरची खरकटी शितकणं उचलून खात होता. पत्रावळ्यांमध्ये अनेक पदार्थ तसेच पडून होते. गोड, तिखट, आंबट, तुरट, तेलकट, एक ना अनेक. त्याला मात्र चव-रव या कशाचीही देणंघेणं नव्हतं. सगळेच पदार्थ एकत्र करुन तो सारख्याच चवीने ते खात होता.
* * *
बंकटलालने हे दृश्य पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. समोर उष्टय़ा पत्रावळींवरील शितकणं वेचणारा माणूस वेडाखुळा तर वाटत नव्हता, चेहऱ्यावर अलौकिक, प्रसन्न तेज बाळगणारा तो ‘बंकटलालच्या’ मनाला स्पर्शून गेला. लांबसडक हात, सडसडीत देहयष्टी, धारदार नाक, तीक्ष्ण नजर, रापलेला काळासावळा देह, अंगावर एकही वस्त्र नाही तरीही बैठक अशी की पाहणाऱ्यालाही वावगं वाटू नये. बंकटलाल आणि दामोदरपंत दोघेही त्या माणसाची देहबोली पाहून समजून गेले की ‘हे प्रकरण नक्कीच वेगळं आहे, निराळं आहे.’
* * *
माघ वद्य सप्तमी, शके १८०० अर्थात २३ फेब्रुवारी १८७८. विदर्भातील खामगाव तालुक्यात असलेल्या शेगांव या छोटेखानी गावामध्ये त्या दिवशी अवतरीत झालेला, वरकरणी वेडसर भासणारा, हाती कच्ची चिलीम बाळगणारा, उष्टय़ा पत्रावळीवरची खरकटी शितकणं वेचून खाणारा, अन्न हे परब्रह्म आहे; त्याची नासाडी करू नका हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारा दिगंबरावस्थेतील सत्पुरुष म्हणजेच श्रीगजानन महाराज.
कालांतराने ‘श्रीगजानन महाराज’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या थोर संतश्रेष्ठाचे मूळ नाव, गाव, माता पिता, नातेवाईक या विषयीची माहिती आजतागायत कुणालाही नाही. त्याविषयीची माहिती करून घेण्याची उत्सुकता देखील शेगावातील गावकऱ्यांमध्ये नव्हती याचं कारण या सत्पुरुषाचा उण्यापुऱ्या बत्तीस वर्षांचा हा सहवास येथील गावकऱ्यांना, भक्तांना, साधकांना लाभला होता.
बंकटलाल आणि दामोदरपंत ही खरोखरच अलौकिक अशी व्यक्तिमत्त्वं होती, ज्यांनी श्रीगजानन महाराजांना पाहिलं, ओळखलं, जाणलं आणि त्यांच्यातील अवतारित्वाची पारख केली. श्रीगजानन महाराजांची ओळख आज जगभराला झाली त्याचं निर्विवाद श्रेय बंकट आणि दामोदर या जोडगोळीला आहे. आज श्रींचे सर्व भक्त बंकटलाल आणि दामोदरपंतांचं ऋणी आहे कारण त्यांच्यामुळे श्रीगजानन महाराज हे सत्पुरुष आपल्याला लाभले. त्यांच्यामुळेच आपण दरवर्षी माघ वद्य सप्तमीचा दिवस ‘श्रीं’चा प्रगट दिन म्हणून उत्साहात साजरा करतो. श्रीमहाराजांचा आठव करतो.
vivekvaidya1878@gmail.com