| आपली सृष्टी, तिचा विकास, सभ्यता, सभ्यतेचा विकास हे खूप रहस्यमय विषय आहेत. या सृष्टीची सगळ्यात सुंदर व श्रेष्ठ निर्मिती म्हणजे माणूस. आध्यात्मिक व्याख्येनुसार मानवाची निर्मिती पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्त्वांनी झाली. पण विज्ञानानुसार मानवाची निर्मिती ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. खरं तरं दोन्ही गोष्टी एकच आहेत, पण सांगण्याची पद्धत वेगळी आहे. तरीही हेही खरंच आहे की प्रत्येक व्यक्तीवर निरनिराळ्या गोष्टींचा आणि परिस्थितींचा वेगवेगळा परिणाम होतो.
आता आपण मूलांक व संयुक्तांकानुसार (जन्मतारीख) प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव, स्वरूप, गुण-अवगुणांसह इतर अनेक मुद्दय़ांचे विश्लेषण केले. याच मालिकेत पुढे आपण आपल्यावर परिणाम करणारी फळे, फुले, औषधे, संगीत आदींचा अभ्यास करणार आहोत. कारण आपल्या यशापयशामध्ये आपले मूड, आरोग्य, भावना यांचा मोठा वाटा असतो.
म्हणूनच आजपासून आपण प्रत्येक मूलांकाला अनुकूल अशा औषधी वनस्पती, फुले आणि संगीताची ओळख करून घेऊ.
मूलांक -३ (जन्मतारीख ३, १२, २१, ३०)
आरोग्य- हा गुरूचा मूलांक आहे. गुरू हा प्रचंड मानसिक आणि आंतरिक शक्तीचा प्रतीक मानला जातो. त्यामुळेच या व्यक्ती
विवेक आणि बुद्धी यांचा योग्य समन्वय असलेल्या दिसून येतात. सहनशीलता या व्यक्तींच्या अंगी खूप दिसून येते. दुसऱ्यांच्या दुखात मानसिक आधार देण्यात या व्यक्ती कायम अग्रेसर असतात. या त्यांच्या स्वभावामुळे यांना अनेक मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
विकार आणि आजारांचे प्रकार -
अधिक शारीरिक आणि मानसिक कष्टांमुळे यांना हाडांच्या समस्या संभवतात. एकूणच ते सहन करत असलेल्या व्यापामुळे डोकं आणि स्नायू यांचे तंत्रही बिघडते. यामुळेच यांना खरंतर अनेक रोगांना सामोरं जावं लागतं. स्नायूंची दुखणी यांना खूप मोठय़ा प्रमाणावर होतात. गुरूचा सरळ संबंध हा विवेक आणि डोकं यांच्याशी असल्याने खूप विचार केल्याने यांच्या डोक्यावर अधिक ताण वाढतो.
कोणते उपाय कराल -
* रोज सकाळी पिवळे कपडे घालून सूर्यनमस्कार करावा.
* दुधात हळद घालून प्यावे.
* गुरुवारी चणे किंवा बेसन अथवा बुंदीचे लाडू दान करावेत.
* ३ किंवा १२ मुखी रूद्राक्ष सोन्यात धारण करावे.
* काळा रंग वापरू नये.
लाभदायक फळे, सुकामेवा व औषधी वनस्पती
फळे - सफरचंद, स्ट्रॉबेरी, चेरी, अनार, अननस, द्राक्ष, नास्पती
सुकामेवा- बदाम, अंजीर
भाजी- बीट, पुदीना
औषधी वनस्पती व मसाले- लवंग, जायफळ, केशर
आरोग्य बदलण्याची वेळ - फेब्रुवारी, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यात आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं. १२, २१, ३०, ३९, ४८, ५७ आणि ६६ ही वर्षे स्वास्थ्य परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.
संगीत - यांना जोशपूर्ण संगीत आवडते. उदास प्रकारची गाणी यांना अजिबात आवडत नाहीत. पण असं असलं तरी यांना जुन्या संगीतामध्ये अतिशय रुची दिसून येते. जुनी अर्थपूर्ण गाणी ऐकणं यांना अधिक रूचतात. संतूर, सितार ही वाद्यं ऐकल्याने यांना मानसिक शांती मिळते.
मूलांक - ४ (जन्मतारीख ४, १३, २२, ३१)
याआधी आपण वाचले की, मूलांक ३चा स्वामी गुरू आहे. ४ या मूलांकचा स्वामी युरेनस म्हणजेच हर्षल आहे. याला सूर्याचे प्रतीक मानले जाते. यामुळेच यांच्यात भरपूर राग दिसून येतो. या रागामुळे यांच्यात बैचेनी आणि उदासी दिसून येते. अधिक विचारशीलता आणि बौद्धिकता यामुळे कुठलीही जोखीम घेण्यास हे तयार असतात. त्यामुळे यांना फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टींना सामोरं जावं लागतं.
विकार व आजारांचे प्रकार - दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तयार असल्याने स्वतची दुखणी हे विसरून जातात. पण यामुळेच अनेक समस्यांना यांना सामोरं जावं लागतं. स्वतचे कष्ट, विकार आणि आजार हे दुसऱ्यांना सांगत नाहीत. यांना अनेक रहस्यमय विकार होण्याची शक्यता असते. यांना मानसिक तणावामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. मूत्रसंबंधी रोग आणि गुप्तरोग यासारखे रोग होऊ शकतात. म्हणूनच यांनी अधिक सतर्क राहावे. यांना डोळ्यांच्या समस्याही त्रास देऊ शकतात. त्याचबरोबर रक्ताची कमी यांच्या शरीरात दिसून येते.
कोणते उपाय कराल-
* रोज सूर्याचे दर्शन घ्यावे. सूर्यनमस्कार करणे अतिउत्तम.
* प्राणायाम रोज करावा. भ्रामरी प्राणायाम करणं अधिक उत्तम.
* काळा रंग वापरू नये. हिरवा रंग वापरावा.
* महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
मंत्र : ॐ हृौं जूं स:
* तांब्याच्या भांडय़ात रात्रभर पाणी ठेवावे. आणि हे पाणी सकाळी उठून प्यावे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल.
* लाभदायक फळे, सुकामेवा व औषधी वनस्पती
फळे- सफरचंद, टरबूज, कलिंगड
भाजी- पालक, मेथी, दूधी, कोबी, गवार, हिरव्या पालेभाज्या
औषधी वनस्पती व मसाले- वेलची, आवळा, कडीपत्ता, मूग, तमालपत्र, हिरवी मिरची
आरोग्य बदलण्याची वेळ- तिखट मसालेदार पदार्थ स्वास्थ्यावर परिणाम करू शकतात. म्हणून ते पदार्थ कमी खावेत. त्याजागी हिरवी मिरची खावी. संगीत- यांना सॉफ्ट प्रकारचे संगीत आवडते.
anandjohri@gmail.com
|