lp21चिलीमध्ये सुरू झालेली कोपा अमेरिका स्पर्धा नवोदित फूटबॉल खेळाडूसाठी व्यासपीठ म्हणून ओळखली जाते. दर तीन वर्षांनी होणाऱ्या या स्पध्रेत दिग्गज खेळाडूंना पाहण्याची संधी तर मिळतेच त्याचबरोबर उद्याचे मेस्सी, नेयमार, सुआरेजही पाहायला मिळतात.

जागतिक फुटबॉल विश्वाला हादरून टाकणाऱ्या अनेक घटना गेल्या महिन्याभरात फुटबॉल चाहत्यांनी अनुभवल्या. त्यातून जगात सर्वाधिक पसंतीच्या असलेल्या या खेळाची प्रतिमा डागाळली जाईल अशा एक एक बाबी समोर येत आहेत. त्यामुळे इतकी वष्रे ज्या खेळाने जगभरातील क्रीडा प्रेमींच्या मनावर आधिराज्य गाजवले त्या खेळाच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अडचणी मैदानाबाहेर घडलेल्या घटनांमुळे उद्भवल्या आहेत. पैशांच्या मोहापायी स्वत:चा प्रामाणिकपणाा विकणाऱ्या लोभी व्यक्तींनी फुटबॉलसारख्या थरारक खेळावर भ्रष्टाचाराची चिखलफेक केली आणि त्यामुळे या पुढे प्रत्येक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेवर संशयाच्या नजरेने पाहण्याची वृत्ती बळावली आहे. ‘फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन’ अर्थात ‘फिफा’मागे लागलेला ससेमिरा, फिफा अधिकाऱ्यांवर सुरू असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, या प्रकरणात दक्षिण अमेरिकन फुटबॉल संघटनांचेही (सीओएनएमईबीओएल) आर्थिक गैरव्यवहारात अडकलेले हात, भ्रष्टाचाराच्या या गडद ढगांमुळे चिलीमध्ये सुरू झालेल्या कोपा अमेरिका स्पध्रेसमोर लोकप्रियता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. गतमहिन्यात स्विस आणि अमेरिकेने संयुक्तरीत्या कारवाई करत फिफाच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांना १५ कोटी डॉलरच्या लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली. त्यातील काही अधिकारी हे दक्षिण अमेरिकन संघटनांमधील होते. त्यांच्यावर विश्वचषक आयोजनासोबत फिफाच्या काही महत्त्वाच्या स्पर्धाचे आयोजनपद आपल्याला मिळावे, याकरिता लाच दिल्याचे आरोप ठेवण्यात आले आणि त्यामुळेच या संघटनांच्या आयोजनाखाली होत असलेल्या प्रत्येक स्पर्धाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अशात चिली येथे कोपा अमेरिका या सर्वात जुन्या स्पध्रेच्या नव्या पर्वाची सुरुवात गत आठवडय़ात झाली. या स्पध्रेशी फिफाचा थेट संबंध नसला तरी फुटबॉलची डागाळलेली प्रमिता सुधारण्याच्या दृष्टीने तिचे महत्त्व अधिक आहे.
दक्षिण अमेरिकेतील दहा आणि फिफाशी संलग्न असलेल्या दोन देशांना या स्पध्रेसाठी निमंत्रित केले जाते. नवोदित खेळाडूंना व्यासपीठ म्हणून ही स्पर्धा ओळखली गेली आहे. तीन वर्षांनंतर होणाऱ्या या स्पध्रेत दिग्गज खेळाडूंना पाहण्याची संधी तर मिळतेच त्याचबरोबर नवीन चेहरेही उदयास येतात. इंग्लिश प्रीमिअर लीग, युएफा चॅम्पियन्स लीग, ला लिगा, कोपा डेल रे आदी क्लब स्पर्धाचा मौसम संपल्यानंतर खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर परतले आहेत. लिओनेल मेस्सी, नेयमार आणि लुईस सुआरेज या बार्सिलोना क्लबच्या खेळाडूंना कोपा अमेरिका स्पध्रेच्या निमित्ताने एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आहे. अर्थात सुआरेजवरील बंदी अद्याप कायम असल्याने त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांना थोडा संयम बाळगावा लागेल. सुआरेज या स्पध्रेचे सर्वाधिक जेतेपद नावावर असलेल्या उरुग्वे संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे, तर नेयमार ब्राझीलकडून आणि मेस्सी अर्जेटिनाचे नेतृत्व संभाळणार आहे.
जवळपास ३९ कोटी लोकसंख्या असलेला दक्षिण अमेरिका १२ दहा राज्यांमध्ये विभागला गेला आहे. यापैकी १० राज्य ही फुटबॉल क्षेत्रात आघाडीवर आहेत आणि त्यामुळे कोपा अमेरिका स्पध्रेला सर्वाधिक प्रेक्षकवर्ग लाभला आहे. विश्वचषक स्पध्रेचा उगम याच कोपा अमेरिका स्पध्रेतून झाल्यामुळे तिची उंची ही अगणित आहे. दिग्गज खेळाडूंबरोबर नवोदित खेळाडूंना खांद्याला खांदा लावून खेळण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे कोपा अमेरिका. विश्वचषक स्पध्रेच्या तयारीची चाचपणी करण्यासाठीही या स्पध्रेला अधिक महत्त्व आहे. यंदाच्या स्पध्रेत उरुग्वे, अर्जेटिना, ब्राझील, चिली हे देश विश्वचषक स्पध्रेची तयारी चाचपण्यासाठी उतरले आहेत. त्यांच्यासमोर पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, बोलाव्हिया, पॅराग्वे, वेनेझुएला आणि मेक्सिको व जमैका या निमंत्रित संघांचे आव्हान आहे. स्पध्रेला सुरुवात होऊन आठवडा उलटला असेल आणि जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या उरुग्वे आणि अर्जेटिना या तगडय़ा संघांचा प्रतिस्पर्धीनी घाम गाळला. गतविजेत्या उरुग्वेने जमैकावर १-० असा विजय मिळवला असला तरी तो सहज नक्कीच नव्हता. पहिल्यांदा कोपा अमेरिका स्पध्रेत खेळणाऱ्या जमैकाने त्यांना कडवी झुंज दिली. दुसरीकडे भलत्याच लयात असलेल्या मेस्सीच्या अर्जेटिनाला पॅराग्वेने ०-२ अशा पिछाडीवरून २-२ अशा बरोबरीत रोखून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. ब्राझील, पेरू, वेनेझुएला, बोलाव्हिया हेही जेतेपदाच्या शर्यतीत आहेत आणि त्यांनी बाद फेरीत आपले स्थान निश्चित करून उरुग्वे आणि अर्जेटिनासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. या सर्वामध्ये यजमान चिलीला कमी लेखून चालणार नाही. चार वेळा त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर घरच्या मैदानावर इतिहास घडविण्यासाठी तेही उत्सुक आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी आगेकूच केली आहे.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे हक्काचे व्यासपीठ आहे. त्यामुळे एक महिना चाललेल्या या स्पध्रेतून आपल्याला उद्याचे मेस्सी, नेयमार, सुआरेजही पाहायला मिळणार आहेत. बोलाव्हियाचा सेबॅस्टियन गॅमरा, ब्राझीलचा गेफेर्सऩ, चिलीचा अँजेलो हेन्रीक्युज, इक्वेडोरचा जॉनथन गोंझालेस, मेक्सिकोचा जीजस कोरोना, पॅराग्वेचा डेर्लिस गोंझालेज, उरुग्वेचा जोस गिमेनेझ, कोलंबियाचा जैसन मुरिल्लो, वेनेझुएलाच्या जॉन मुरिल्लो आणि पेरूचा कार्लोस अॅस्कुइस या युवा खेळाडूंचा करिश्माई खेळ आपल्याला पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या स्पध्रेत अव्वल स्थान पटकावणाऱ्या संघाला फिफा कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत थेट प्रवेश मिळणार असल्याचे संघामध्ये चढाओढ पाहायला मिळेल.
कोपा अमेरिका स्पध्रेतून प्रेरणा घेत फिफाने विश्वचषक स्पध्रेच्या आयोजनाला प्रारंभ केला. १९३० मध्ये पहिला विश्वचषक खेळविण्यात आला, त्यापूर्वी म्हणजे १९१६मध्ये सुरू झालेला हा प्रवास १०० वर्षांच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. ब्राझील, चिली, अर्जेटिना आणि उरुग्वे अशा चार संघांच्या समावेशातून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू बारा संघांपर्यंत पोहोचला. संघ वाढवून स्पध्रेतील आकर्षण हिरावू नये म्हणून संघ मर्यादा बाराच ठेवण्यात आली. या स्पध्रेत उरुग्वेने सर्वाधिक १५ जेतेपद पटकावली आहेत, त्यापाठोपाठ अर्जेटिना १४, ब्राझील आठ, पॅराग्वे व पेरू प्रत्येकी दोन आणि कोलंबिया व बोलाव्हिया प्रत्येकी एका जेतेपदाचे दावेदार ठरले आहेत. स्पध्रेच्या उगमापासून साक्षीदार असलेल्या चिलीला मात्र चार वेळा जेतेपदाने हुलकावणी दिल्याने त्यांची पाटी कोरीच आहे. त्यामुळे यंदा घरच्या मैदानावर ते जेतेपदासाठी प्रयत्नशील आहेत. अर्जेटिनाही १९९३नंतर पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांच्या कडव्या आव्हानाला प्रतिस्पर्धी संघांना सामोरे जावे लागेल. आता ४ जुलैलाच दक्षिण अमेरिकेचा ‘सम्राट’ कोण, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळणार आहे. तोपर्यंत या स्पध्रेतील थराराचा अनुभव घेऊन फुटबॉलची जादू पाहण्याची संधी आपल्याला आहे.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com