00nandanइतके सुंदर फूल व त्याचे नावही तितकेच अप्रतिम; अगदी दुग्धशर्करा योगच म्हणायचा. नेमेचि येतो मग पावसाळा आणि त्या पावसाळ्यातही नेमेचि फुलणारे फूल म्हणजे अग्निशिखा. अग्निशिखा म्हणजे ज्योत. या फुलाची प्रत्येक पाकळी म्हणजे अक्षरश: समईची किंवा निरांजनाची ज्योतच वाटते. कळ्या फुलताना त्या हिरवट-पिवळ्या असतात; नंतर त्या पिवळ्या होतात. कालांतराने पाकळ्यांची टोके लालसर दिसू लागतात. या स्थितीत त्या हुबेहुब ज्योतीसारख्याच दिसतात. शेवटी सर्वच पाकळ्या लाल होऊन जातात.
गौरी-गणपतीत या फुलांनी बहरलेली वेल भारतातील राना-वनांत हमखास आढळते. गौरी-गणपती पूजेच्या फुलांत हिला अढळस्थान प्राप्त झाले आहे. याच कारणाने या फुलांना ‘गौरीचे हात’ असेही एक नाव कोकणात प्रचलित आहे. बचनाग आणि खडय़ानाग या नावांनीसुद्धा ही ओळखली जाते. असे म्हणतात की, प्रसूतीचा काळ अपेक्षेबाहेर लांबला गेल्यास प्रसूतिकळा सुरुवात होण्यास कळलावीचा वापर पूर्वी केला जात असे. असे असले तरी या वेलीचे सर्वच भाग खूप विषारी आहेत हे लक्षात ठेवावे. सर्वात विषारी हिची मुळे असतात.
lp50ही वेल बहुवर्षांयू असली तरीही पावसाळ्यानंतर ही सुप्तावस्थेत जाते. वेलीचे जमिनीबाहेरील सर्व भाग वाळून जातात. मात्र जमिनीत असलेली तिची मांसल मुळे तग धरून राहतात. पुढील पावसाळ्याच्या सुरुवातीस या मुळांना परत कोंब फुटतात आणि वेल पुन्हा जोमाने वाढू लागते. या वेलीच्या पानांच्या टोकाला आकडय़ासारखे तणावे असतात. हे तणावे मिळेल त्या आधाराला जाम पकडून वेल वर वाढत जाते. वेलीच्या पानांना देठ नसतात; पाने जणू काही खोडाला बिलगूनच वाढत असतात. ही वेल आटोपशीर वाढणारी, साधारण तीन मीटपर्यंतच उंच वाढणारी आहे. या कारणाने ती कुंडीत लावून, घरातील व्हरांडय़ात किंवा खिडकीच्या जाळीवरही वाढवता येते. वेल विषारी असल्याने ती लहान मुलांच्या आवाक्याबाहेर राहील याची काळजी घेणे मात्र आवश्यकच आहे.
अग्निशिखा वेलीची फुले खूप दिवस टिकून राहतात. फुले एकामागून एक अशी फुलत जातात. अशी बहरलेली वनातील वेल दृष्टीस पडणे म्हणजे किती आनंददायी असते हे अनुभवल्यावरच उमजते. पावसाळ्यातील हिरवागार आसमंत, त्यात हिरव्याकंच वेलीवर चकाकणारे पावसाचे थेंब आणि तरारून उमलेली अग्निशिखा फुले; जणू पृथ्वीवरील नंदनवनच! या वेलीला कसलेही रोग लागत नाहीत. काही फुलपाखरांच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अळ्या दिसताच त्या काढून टाकाव्यात. काही फुलांपासून शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक बिया असतात.
अग्निशिखा वेलीचे शास्त्रीय नाव आहे Goloriosa superba. तिची आणखी एक पोटजात आहे; तिचे नाव आहे Gloriosa superba ‘Rothschildiana’. हिच्या पिवळ्या पाकळ्यांचा मध्यभाग लाल असतो. दोन्ही जातींची अभिवृद्धी बियांपासून किंवा मुळांच्या विभाजनाने करता येते.
नंदन कलबाग – response.lokprabha@expressindia.com

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज