lp01शालिवाहनाने सुरु केलेल्या कालगणनेला शालिवाहन शक म्हणतात असं आत्तापर्यंत समजलं जात होतं, पण संशोधनातून वेगळीच माहिती पुढे आली आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला गुढीपाडवा हे नाव आहे. या दिवशी हिंदूूंच्या नवीन वर्षांची सुरुवात होते म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असेही नाव आहे. भारतीय परंपरेमध्ये अतिशय मोठय़ा प्रमाणात वापरला गेलेला आणि शालिवाहन शक नावाने प्रसिद्ध असलेला संवत्सर या दिवशी सुरू होतो. या संवत्सराची स्थापना शालिवाहन म्हणजे सातवाहन या राजाने शक राजांचा पराभव करून केली असे सर्व भारतीय मानतात. ही घटना साजरी करण्यासाठी आपापल्या घरांवर गुढय़ा उभारल्या जातात. कलियुगाची ३,१७९ वर्षे संपल्यानंतर या संवत्सराची सुरूवात होते असेही भारतीय परंपरेत मानले आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने या दिवशीच सृष्टीची निर्मिती केली असाही समज लोकांमध्ये रूढ आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. फार प्राचीन काळापासून गुढीपाडवा आणि शालिवाहन शकाची सुरुवात या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडला गेला आहे.
प्रत्यक्ष शालिवाहन शकाचा विचार करता त्याच्याबद्दलच्या माहितीत गुढी पाडव्याचा काहीही उल्लेख येत नाही. पण काळाच्या ओघात कधीतरी त्यांचा एकमेकांशी संबंध जोडला गेला असे दिसते. शालिवाहन शक नावाचा संवत्सर कोणी स्थापन केला याबाबत परंपरेत दुमत नाही. शालिवाहन राजाने इ.स. ७८ मध्ये शक राजाचा पराभव केला तेव्हा हा संवत्सर सुरू झाला असे सर्वमान्य मत आहे. परंतु हा संवत्सर कनिष्क या राजाने सुरू केला असे बरेच विद्वान मानतात. पुढे त्याचे जे शक अधिकारी होते, त्यांनी तो वापरला आणि म्हणून त्याला शक संवत्सर हे नाव पडले. परंतु प्रत्यक्ष पुरावे पाहून या सर्व विधानांचा खोलवर आणि तपशिलात विचार करावा लागतो. सातवाहन राजांचा इतिहास पाहून त्या काळात कोण शक राजे होते आणि त्यापैकी नेमक्या कोणाचा पराभव केला हेसुद्धा पडताळून पाहावे लागते.
lp03
निरनिराळ्या मतांमधून आतापर्यंत झालेल्या इतिहासातील संशोधनातून जे काही पुरावे पुढे आले आहेत त्यामध्ये शिलालेख, नाणी, परकीय प्रवाशांची वर्णने या सर्वाचा समावेश करावा लागतो, तसेच ऐतिहासिक पुरावा हा परंपरेतील पुराव्याशी पडताळून पाहावा लागतो. त्यानंतर एक वेगळेच चित्र डोळ्यांसमोर येते. या शालिवाहन शक संवत्सराशी संबंधित कथेमध्ये काही घराणी, काही राजे यांचा समावेश आहे. ते कोण याची आधी माहिती घेऊ. यामध्ये सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी, क्षहारात क्षत्रप राजा नहपान आणि कार्दमक क्षत्रप राजा चष्टन यांचा समावेश होतो. साधारणपणे इ.स. पूर्व पहिल्या शतकातील गोष्ट आहे. पर्शिया म्हणजे प्राचीन इराण येथील सिथिया नावाच्या प्रांतातील काही अधिकारी हळूहळू स्थलांतर करत सिंध आणि राजस्थान या परिसरात आले. पुढे त्यांनी तिथे आपले राज्य प्रस्थापित केले. या लोकांना भारतीयांनी शक या नावाने संबोधले. त्यांनी पुढे राज्यविस्तार करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी नहपान नावाचा राजा खूपच बलाढय़ होता. त्याला दक्षमित्रा नावाची मुलगी होती. तिचा पती उषवदात हा त्याचा सेनापती होता. या दोघांनी आपला राज्यविस्तार करायला सुरुवात केली. ते गुजरातमधून राज्य करत असताना पुढे त्यांनी उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर ताबा मिळवला. तिथे राज्य करत असलेल्या सातवाहन राजांना त्यांनी पराभूत केले. सातवाहन तेव्हा पूर्व महाराष्ट्राच्या भागात राज्य करू लागले आणि त्यांनी नंतर आंध्र प्रदेशमध्येही आपला राज्यविस्तार केला.
नहपान पश्चिम महाराष्ट्रावर राज्य करू लागला, त्या वेळेस त्या परिसरातील बौद्ध भिक्षूंना त्यांनी काही गुहांचे दान दिले. तसेच त्या गुहांमध्ये लेखही कोरवले. अशा काही गुहा नाशिक, कार्ले, जुन्नर या परिसरात कोरलेल्या दिसतात. त्यामध्ये ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत कोरलेले लेखही आहेत. अशा पद्धतीने क्षहारात क्षत्रप राजांनी पश्चिम भारतावर अंमल तर प्रस्थापित केलाच, पण त्या काळात जो भारत आणि युरोप यांच्यामध्ये सागरी व्यापार सुरू होता त्यावरही आपला ताबा मिळवला. पश्चिम भारतातील व्यापारी मार्गावरही ताबा मिळवून त्यांनी कर वसुलीला सुरूवात केली. थळघाट, नाणेघाट यांसारख्या व्यापारी मार्गावर त्यांचे राज्य असल्यामुळे तेथील जकात आणि इतर कर मिळवून त्यांचे राज्य खूपच श्रीमंत झाले. त्यांनी मोठय़ा संख्येने चांदीची नाणी पाडली. त्यावेळेस सातवाहनांची मात्र तांब्याची आणि शिशाची नाणी होती. त्यांच्या राज्याचा बराच मोठा भाग क्षत्रपांनी जिंकून घेतला होता.
पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहारात क्षत्रप राजा नहपान याच्याशी नाशिकजवळील गोवर्धन या ठिकाणी मोठे युद्ध केले. त्या युद्धात नहपानाचा दारुण पराभव झाला आणि क्षहारात वंश ‘निरवशेष’ झाला. गोवर्धनाच्या विजय स्कंधावारातून गौतमीपुत्राने नाशिक येथील गुहेत राहणााऱ्या भिक्षूंना काही जमीनही दान दिली, ज्यावर पूर्वी नहपानाची मालकी होती. नहपानाची बाजारात प्रचलित असलेली सर्व नाणी गोळा करून त्याने त्यावर स्वत:चे नाव आणि चिन्हे उमटवली. अशी हजारो पुनर्मुद्रांकित नाणी नाशिकजवळील जोगळटेम्बी या ठिकाणी सापडली आहेत. नंतर गौतमीपुत्राच्या मुलाच्या म्हणजे वासिष्ठीपुत्र पुळूमाविच्या नाशिक येथील लेखात या सर्व घटनांची सविस्तर माहिती दिली आहे. ही घटना इ.स.७८ मध्ये घडली असावी, ज्या वेळेस गौतमीपुत्राचे राज्य वर्ष १८ आणि नहपानाचे राज्य वर्ष ४६ होते. त्या काळात राजे स्वत: गादीवर आल्यावर नवीन संवत्सर सुरू करीत, तो त्यांचे राज्य वर्ष असे.
lp04
नहपानाच्या मृत्यूनंतर त्याचे गुजरातमधले राज्य सातवाहनांनी घेतले नाही, तर शक क्षत्रप लोकांपैकीच दुसरे घराणे गादीवर आले. त्यांचे नाव होते कार्दमक. त्यांचा एक चष्टन नावाचा राजा गादीवर आला. त्याने राज्यावर बसल्यापासून जो संवत्सर सुरू केला तो त्याच्या वंशजांनीही पुढे सुरू ठेवला. त्यांनी तो पुढे जवळजवळ ३०० वर्षे वापरला. त्यामुळे त्या संवत्सराचा उपयोग करणे लोकांना सोपे जाऊ लागले. पुढे ‘शक राजांचा संवत’ या नावाने तो प्रसिद्ध झाला. वाकाटक राज देवसेन याच्या विदर्भातील हिस्सेबोराळा येथील लेखामध्ये सर्वप्रथम याचा ‘शकांचा ३८०’ असा उल्लेख सापडतो. त्यानंतर चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या ऐहोळे प्रशस्तीमध्येही शक राजांचा काल असा उल्लेख सापडतो. त्यामुळे शक राजांनी सुरू केलेली कालगणना आम्ही वापरत आहोत हे सर्वानी स्पष्ट सांगितले आहे. या सर्व लेखांमध्ये ‘शक’ शब्दाचा अर्थ संवत्सर असा नसून त्या लोकांचे नाव असा आहे. येथे कुठेही हा सातवाहनांचा संवत्सर आहे असे म्हटले नाहीये. इसवी सनाच्या बाराव्या शतकापासून या संवत्सराचा संबंध शालिवाहनांशी जोडला गेलेला दिसतो. तेव्हापासूनच ‘शक’ या शब्दाचा अर्थही संवत्सर असा झालेला दिसतो. मुळात शक हे समाजातील एका गटाचे नाव आहे याचा लोकांना विसर पडलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या राज्याभिषेकानंतर ‘राज्याभिषेक शक’ सुरू केला. या नावात ‘शक’ हा शब्द ‘संवत्सर’ या शब्दाशी समानार्थी आहे. हीच परंपरा आजपर्यंत सुरू आहे.
प्राचीन भारतीय लोकपरंपरा मात्र असे सांगते की शालिवाहनानी शकांचा पराभव केल्यावर हा संवत सुरू झाला किंबहुना तो सातवाहनांनीच सुरू केला. पण त्यांनी तो अजिबात वापरला नाही असे दिसते. कारण गौतमीपुत्र सातकर्णीनंतर त्याचा मुलगा जेव्हा गादीवर आला, तेव्हा त्याने स्वत:चा नवीन राज्य संवत्सर सुरू केला. तसेच खुद्द गौतमीपुत्रानेही तो कधी वापरला नाही. वापरायचा नव्हता तर कशाला सुरू केला असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. पण खरा इतिहास पाहिला तर असे दिसते की सातवाहनांनी एका शक राजाला म्हणजे नहपानाला हरवले तेव्हा दुसरा शक राज म्हणजे चष्टन गादीवर आला. त्याने जो संवत्सर सुरू केला, तो पुढे सलग ३०० वर्षे वापरला गेला आणि ‘शक राजांचा संवत’ या नावाने इतर अनेक राजांनी तो वापरला, कारण दरवर्षी नवीन राज्य वर्ष देण्यापेक्षा हे जास्त सोयीचे होते. तो इतका लोकप्रिय झाला की पुढे शक या शब्दाचा अर्थ संवत्सर असा घेतला जाऊ लागला. त्यानंतर तो भारतभर, एवढेच नव्हे तर आग्नेय आशियातही काही देशांमध्ये वापरला जाऊ लागला. भारतीय लोकांनी मात्र यामध्ये शालिवाहन राजाने शक राजाला हरविल्याची स्मृती कायम ठेवली, पण संवत्सर सुरू करणारा राजा हा कोणीतरी दुसराच होता हे ते विसरून गेले. त्यामुळे शालिवाहन शक असे नाव त्याला मिळाले आणि तेच वापरले जाऊ लागले. या विजयाप्रीत्यर्थ गुढी तोरणे इ. उभारून तो दिवस साजरा केला जाऊ लागला. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच ही घटना घडली का हे सांगणे आज अवघड आहे. या संवत्सराचा वापर दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातील काही भागात होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी पंजाबी, सिंधी, कन्नड लोकांचेही नवीन वर्ष सुरू होते. मात्र या सर्वाच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा आणि परंपरा आहेत.
अशा प्रकारे महाराष्ट्रात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाचा इतिहास खूप खोल आणि विस्तारलेलाही आहे.
डॉ. मंजिरी भालेराव

Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
married woman murder her son
सोलापूर : लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण उजेडात येऊ नये म्हणून विवाहितेने केला मुलाचा खून अन् स्वतः केले विषप्राशन
Violation of Model Code of Conduct by Municipal Commissioner Vipin Paliwal
मनपा आयुक्तांकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, निलंबनासह फौजदारी…