lp01कृषिप्रधान व्यवस्थेमुळे आपल्या पूर्वजांचं जगणं निसर्गाशी जोडलेलं होतं. साहजिकच आपले सगळे सण, उत्सव, परंपराही ऋतुचक्राशी नातं सांगणाऱ्या. त्यातूनच विकसित झालं आहे, भारतीय आहारशैलीचं सौंदर्यशास्त्र..

चैत्री पाडवा हा सण प्रभू रामचंद यांच्या लंकेवरील विजयानंतर पुनरागमनाचा आनंद व शालिवाहन शकाचा आरंभ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी घरोघर गुढी, तोरण, पताका उभारण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर कडुलिंबाची ताजी पाने प्रत्येकाने खावी, असा धर्माचा सांगावा आहे. चैत्र, वैशाख हा वसंत ऋतूचा काळ आहे. शिशिर ऋतूत साचलेला कफ वसंत ऋतूतील उष्णतेने पातळ होतो. तो वाढून उपद्रव होऊ नये म्हणून या ऋतूत कडुलिंबाची पाने खावीत, असा विचार वर्षप्रतिपदेच्या निमित्ताने सांगितलेला आहे. गौरीतीज व रामनवमीच्या निमित्ताने सुगंधी जाई-जुई, मोगरा, चाफा, गुलाब अशी फुले, दवणा मरवा यांचा वापर केला जातो. रामनवमीला प्रसाद म्हणून सुंठवडा, खरबुजाच्या फोडी, उसाच्या रसाच्या पोळय़ा असा प्रघात काही ठिकाणी आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्ताने मारुतीला रुईच्या पानांचे हार घातले जातात.
वैशाख म्हणजे रणरणत्या उन्हाचा, कमाल तपमानाचा महिना. या काळात अक्षयतृतीयेपर्यंत महिलांचे चैत्र, गौरीचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम चालतात. त्यानिमित्ताने कैरीची पन्हे, उसाचा रस, लिंबाचे सरबत, काकडी, वाटली डाळ असा थाटमाट असतो. आयुर्वेदीय ऋतुचर्येप्रमाणे या ऋतूत खूप उन्हाळा असल्यास शरीरातील जलद्रव्यांची कमतरता भरून काढण्यास विविध प्रकारची सरबते, खरबूज, खिरव्या, काकडय़ा, कलिंगड यांचा वापर करावा, असा शास्त्राचा सांगावा आहे. वैशाखातील पौर्णिमा बुद्ध जयंती म्हणून साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत पिंपळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वृक्षाणां अश्वत्थो अहम्!’ असे त्याचे वर्णन गीतेत केले आहे. सिद्धार्थ राजाला बोधिवृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली मानवजातीच्या सफल दु:खांच्या कारणांचा शोध लागला अशी कथा आहे. अजूनही खेडोपाडी पिंपळ या पवित्र वृक्षाच्या झाडाखाली खोटे बोलण्याचे धाडस लहान वा थोर गावकरी करीत नाहीत. वैशाखातील अमावस्या शनिजयंती आहे. त्या दिवशी रुईच्या पानांचा वापर गावाबाहेरील शनीच्या देवळात आहे.
ज्येष्ठ महिना हा वटपौर्णिमेच्या सणामुळे अतिशय पवित्र मानला गेला आहे. या दिवशी जेथे जमेल तेथे वडाच्या झाडाची पूजा, नाहीच जमले तर वडाच्या फांद्यांची पूजा महिला आवर्जून करतात.
आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत सण, उपवास, खाण्यापिण्यावरील र्निबध, व्रतवैफल्ये यांची रेलचेल दिसून येते. आषाढातील पहिल्या नवमीला कांदेनवमी म्हणून खूप महत्त्व आलेले आहे. आषाढातील पहिला आठवडा म्हणजे नवमीपर्यंत सर्व मंडळी कांद्याचे विविध पदार्थ खाऊन आपल्या पोटाला तृप्त करत असतात. आषाढ शुद्ध द्वादशीपासून चातुर्मास सुरू होतो. आषाढी एकादशीपासून आळंदी एकादशीमुळे विठ्ठलभक्तीचा महिमा सुरू होतो. तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी. तिला मातास्वरूपामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही नुसती कफाकरिता उपयुक्त आहे असे नसून घराला घरपण देणारी मातास्वरूपी सर्व कुटुंबाची, परिवाराची काळजी घेणारी असे वर्णन पद्मपुराणात आहे. जेथे जेथे तुळस आहे तेथे अस्वच्छता राहात नाही. आषाढातील अमावास्येला दिव्यांची आरास म्हणून दीपपूजन होते. त्या दिवसापासून आघाडा, दूर्वा, फुले या वनस्पतींचे महत्त्व सुरू होते. लाह्य, आघाडा, दूर्वा वाहून दिव्यांची पूजा केली जाते.
श्रावणातील सर्वच दिवस हे वेगवेगळय़ा देवतांच्या पूजेचे आहेत. श्रावणी सोमवार हा शिवामूठ वाहण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस. त्या दिवशी बेलाची त्रिदळे व पांढरे फूल महादेवाला वाहण्याचा प्रघात आहे. श्रावणातील शुक्रवारी आघाडा, दूर्वा, फुले वाहून जिवतीची पूजा धार्मिक वृत्तीच्या महिलांकडून आवर्जून केली जाते. शनिवारी मारुती व शनिदेवता या दोघांच्या पूजेच्या निमित्ताने रुईच्या पानांना महत्त्व येते. श्रावणातील नागपंचमीच्या दिवशी चुकूनही जीवहत्या होऊ नये म्हणून स्वयंपाकातसुद्धा बऱ्यापैकी काळजी घेतली जाते. या दिवशी पुरणाचे उकडलेले दिंडे खाऊन सण साजरा करण्याचा प्रघात आहे. ज्वारीच्या लाह्य त्यानिमित्ताने सगळय़ाच घरांत आणल्या जातात. आषाढातील पावसाचा जोर संपल्यानंतर श्रावण पौर्णिमेपर्यंत खवळलेला समुद्र बहुधा शांत झालेला असतो. कोकणात, कोळी लोक, मासेमारीवर अवलंबून असणारी मंडळी समुद्रात नारळ टाकून समुद्रपूजन करून आपल्या व्यवसायाला पुन्हा नव्याने दमदार सुरुवात करतात. नारळीभात घरोघर करतात. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने दूध, दही, लोणी यांची आठवण करून देणाऱ्या श्रीकृष्णाची पूजा होते. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा वाढत्या उत्साहाचा सण गोपाळकाला खाऊन साजरा केला जातो. श्रावण वद्य चतुर्दशीला बैलपोळय़ाच्या निमित्ताने पुरणपोळी बैलांना खायला घालून व त्यानिमित्ताने वर्षभर श्रम करणाऱ्या बैलांचे ऋण मानले जाते.
भाद्रपद तृतीया, चतुर्थी व पंचमी यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत अनेक वनस्पती व खाद्य द्रव्यांना धार्मिक व सामाजिक महत्त्व असल्याचे ठायीठायी आढळते. भाद्रपद शुद्ध तृतीयेला काही महिला हरतालिकेचा कडक उपवास करतात. दिवसभर पूर्ण निर्जली उपवास करून रात्रौ रुईच्या पानाला तूप लावून ते रात्री १२ वाजता चाटून खाण्याचा प्रघात अजूनही अनेक महिला करतात. एरवी अन्य महिला फलाहार करतात. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने दूर्वा, केवडा, कमळ, शमी, रुई, आघाडा, धोत्रा, डोरली, देवदार, दवणा, जुई, मालती, माका, बेल, अगस्ती, डाळिंब, कण्हेर, पिंपळ, विष्णुकांता, जास्वंद इ. वनस्पती आपल्या परिसरात असाव्यात असा उद्देश यामागे आहे.
ऋषीपंचमीच्या निमित्ताने आपल्या परिसरात आपल्या हाताने लावलेल्या स्वकष्टाच्या भाज्या व फळधान्याचा वापर करावा असा उद्देश दिसून येतो. भाद्रपदातील गौरी येणे, जेवणे व विसर्जन या काळात चढाओढीने सुगंधी फुलांची देवाणघेवाण होते. या तीन दिवसांत मोगरा, जाई, जुई या फुलांना भलताच भाव येतो.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी पांढरेशुभ्र सुगंधी फूल असलेल्या अनंताची पूजा अनेक घराण्यांत आवर्जून केली जाते. या दिवशी अनेक भाज्यांचा प्रसाद केला जातो. भाद्रपदातील दुसऱ्या पंधरवडय़ास पितृपंधरवडा म्हणून काळे तीळ, सातू, दर्भ, केळीची पाने, माका, विडय़ाची पाने, कटरेली अशा अनेक वेगवेगळय़ा वनस्पतींचा वापर आवर्जून केला जातो. या पंधरवडय़ात माक्याची पाने ही अत्यावश्यक बाब असते.
आश्विन शुद्ध एकपासून नऊ दिवस नवरात्र व विजयादशमीपर्यंत देवीचा मोठा सण घरोघर व सार्वजनिक ठिकाणी साजरा केला जातो. नवरात्राचे नऊ दिवस म्हणून वाढत्या मालेचा फुलांचा वापर होतो. याच काळात शेतात नव्याने पिके तयार होत असतात. त्यानिमित्ताने तांदळाच्या ओंब्या, आंब्याचे डहाळे यांचाही घराच्या प्रवेशदारी देवदेवतांच्या सजावटीकरिता उपलब्धतेनुसार वापर केला जातो. विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची आठवण येत असली तरी आपटय़ाच्या पानांचा म्हणजे कांचनाच्या जातीचा, पण कडक पानांची सोने म्हणून देवाणघेवाण होते.
आश्विनातील नरकचतुर्दशी या दिवशी नरकासुर म्हणून पायाखाली कवंडळाची फळे चिरडून मगच आंघोळ करण्याचा प्रघात आहे. त्यानिमित्ताने कोकणातून खेडोपाडय़ांतून कवंडळाची फळे हजारोंच्या संख्येने पुणे, मुंबई व इतर नागरी वस्तीत विक्रीला येतात.
कार्तिकातील शुद्ध नवमी ही कुष्मांड नवमी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी खूप पोसलेला कोहळा हा प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. एरवी आपल्या समाजात कोहळय़ाच्या भाजीचा वापर फारसा नसतोच. वर्षांचे पापड करण्याकरिता कोहळय़ाचे पाणी वापरण्याचा प्रघात होता. कार्तिक एकादशीने पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न अनेक ठिकाणी थाटामाटात झोकात केले जाते. त्यानिमित्ताने या दिवसात आवळे, चिंचा, ऊस ही त्या त्या ऋतूतील फळांची आठवण ठेवली जाते. त्यांच्या माला तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने सजावटीकरिता वापरल्या जातात.
कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी आहे व कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा ही तुलसी विवाह समाप्ती म्हणून साजरी केली जाते. या दोन दिवसांत ज्यांना स्वास्थ्य आहे अशी मंडळी जवळच्या आवळय़ाच्या झाडाचे पूजन करून त्या झाडाखाली आवळी भोजन करून साजरा करतात.
कार्तिक वद्य एकादशी ही आळंदी एकादशी म्हणून साजरी होते. त्या दिवशी तुळशीचे पानांना महत्त्व असते. मार्गशीर्षांच्या देवदिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीला चातुर्मासच्या सुरुवातीला व्रत वा कुळाचार म्हणून कांदा व वांगी हे निषिद्ध मानलेले पदार्थ असतात. त्यांचा वापर चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून केला जातो.
पौष महिन्यातील संक्रांतीच्या निमित्ताने मातीच्या सुगडात ऊस, पावटय़ाच्या शेंगा, बिबोटय़ा, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोर या विविध फळे व आहार पदार्थाचा मुक्त वापर होतो. संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळाच्या देवाणघेवाणीला मोठेच महत्त्व आहे.
शाकंभरीचा उत्सव पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत असतो. यानिमित्ताने अनेक भाज्यांचे महत्त्व स्थानपरत्वे आहे.
माघातील शुद्ध चतुर्थी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. त्या दिवशी गणेश चतुर्थीच्या पत्रीपेक्षा केवळ दूर्वानाच मोठे महत्त्व असते. माघ वद्य पंचमी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी बेलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या शिकारीवर दृष्टी ठेवताना आपल्या समोर येणारी बेलाची पाने खुडत नकळत महादेवाची पूजा केली, अशी कथा आहे. त्या दिवशी फिरताना कडक उपवास घडला; पण आपल्या समाजात मात्र महाशिवरात्र व आषाढी एकादशी या दोन दिवसांत चवीचवीने दुप्पट खाशीचा प्रकार चालतो. चढाओढीने भगर किंवा वऱ्याचे तांदूळ, साबुदाणा, खोबरे, शेंगदाणे, शिंगाडा, केळी, बटाटे व फळे यांचा मन:पूर्वक आस्वाद घेतला जातो.
फाल्गुन शुद्ध एकादशी ही आमलकी एकादशी म्हणून ओळखली जाते. आवळय़ाचा हंगाम या सुमारास संपत आलेला असतो. एवढीच आठवण या नावात असावी असे वाटते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळीकरिता एरंडाचे झाड व पुरणपोळीचा महिमा मोठाच आहे. फाल्गुन वद्य एक हा वसंतोत्सवाचा प्रारंभ आहे. सुश्रुत संहितेप्रमाणे फाल्गुन चैत्र वसंत ऋतू आहे. काही फाल्गुन वद्य तृतीया व पंचमीला रंगपंचमीला रंग खेळण्याची प्रथा आहे.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य / वैद्या वीणा मानकामे

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’