ch03सौंदर्याचा आनंद, निर्मितीचा आनंद, सृजनाचा आनंद, सगळं आपल्याला कलेद्वारे मिळतं. कला, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहे. सामान्य माणसाच्या जीवनातली सामान्य कला आहे ही. मनावरचा ताण कमी करण्याची, जीवन समृद्धपणे जगण्याची शिकवण देण्याची क्षमता सर्व कलांमध्ये आहे.

कलेचं माणसाशी चिरंतन नातं आहे. कला मग ती जीवनातल्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आपल्याला समृद्धच करत जाते. आता हेच पाहा ना, गणपतीची गडबड सुरू झाली की आरास कुठली करायची; मखर कुठे ठेवायला पाहिजे, त्याच्या भोवती रंगीत कागदाच्या झिरमिऱ्या, दिव्यांची माळ, मागे तेवणारी समई, प्रसाद मांडून ठेवायला पुढे नक्षीदार तबक, सुंदर फुलांचे सुंदर हार ल्यायलेली गणरायाची प्रसन्न मूर्ती. त्यातल्या कलेने वातावरण अगदी मंगलमय होणारच होणार!
लहानपणी जलाशयाच्या पृष्ठभागावर चपटा दगड भिरकवायचा ‘भाकरी’च्या खेळात, तो उडत उडत पाण्याला स्पर्श करत लांबवर जाऊन पाण्यात पडायचा. पाण्याचे अनंत तरंग त्या बिंदूपासून सुरू होऊन जलाशयभर पसरत जायचे नि त्या अनंत लहरी मनात आनंदाचे तरंग उमटवायचे. इतकंच कशाला हातात अनेक बांगडय़ा, बिलवर, तोडे घालणारी स्त्री, बरोबर हातात सगळ्यात शेवटी सोन्याचा तोडा, मधे काचेच्या बांगडय़ा, त्यामध्ये समान अंतरावर सोन्याच्या नाजूक बांगडय़ा आणि सगळ्यात शेवटी मोत्यांचा बिलवर किंवा पाटली हातात भरते. रंगलेली नक्षीदार मेंदी तळहातावर आणि असा सुरेख बांगडय़ाची रचना केलेला हात. जिचा हात आहे तिलाही आनंद होणार आणि बघणाऱ्यालाही. नटणं हीसुद्धा एक कलाच की. या नटण्याथटण्यातला हा आनंद मग खाण्यातून दिसणार नाही असं कसं शक्य आहे.
स्वयंपाकघरातून चविष्ट पदार्थ बनवून बाहेर टेबलावर आले की त्यांनाही नटविण्यात येते. त्यावर खोवलेला पांढराशुभ्र ओला नारळ, मधे भुरभुरलेली हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर, पिवळीधमक लिंबाची फोड, सुक्या मेवाने पदार्थावर घातलेली नक्षी, चव घेण्याआधीच नुसत्या नजरेने रसना तृप्त होणार. अगदी लहानशा घरांमध्ये, ज्यांच्याकडे सजावटीची साधनं नाहीत, त्यांच्याकडेही पितळी भांडी अगदी चकाचक घासून सुंदर मांडून ठेवलेली असतात. छोटय़ाशा घरात ते दृश्य आल्हाददायक वाटतं. आलेल्या प्रत्येकाचं त्यावर लक्ष खिळून राहातं.
काय आहे हे सगळं? का करतो आपण हे सगळं? भूक लागलेली असताना चविष्ट पदार्थ उपलब्ध झाला की खरं म्हणजे पुरे. पण तो चांगल्या नक्षीदार भांडय़ातून पुढे आणण्याचा, त्याला नटवण्याचा ‘नसता’ खटाटोप का केला जातो?
रोजच्या जीवनातली कला आहे ही. सगळ्यांना आनंद देणारी. नजरेला, मनाला, रसनेला.
आमची आजी संत्र सोलत असताना अशी सोलायची की त्या सुंदर केशरी रंगाची, सालाची सुंदर गोल गोल नक्षी तयार व्हायची.
पूर्वी घरोघरी नदीकाठची माती आणून गणपतीची मूर्ती बनविली जाई. आता विकत आणली जाते. पण अजूनही आरास केली जाते. नागपंचमीला गेरूचा नाग भिंतीवर रंगवला जातो. त्यावर पिवळी हळद, लाल कुंकू लावलं की पूजामंडीत असे नाग फार सुंदर दिसतात.
रांगोळीची कला घराघरात आहे. शुभचिन्ह म्हणून, पावित्र्याचं द्योतक म्हणून.. छोटय़ाशा स्वस्तिकाच्या रांगोळीपासून संस्कार भारतीच्या मोठय़ा रांगोळीच्या गालिच्यापर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. अगदी फ्लॅट संस्कृतीतसुद्धा आपल्या फ्लॅटच्या दाराबाहेरच्या चिमुकल्या जागेत सीमेंटच्या फरशीवर छोटीशी रांगोळी काढली जाते.
केरळमध्ये बोटींच्या स्पर्धा बघणे म्हणजे एक विशेष दृश्यानुभव. पारंपरिक खेळात सगळ्यांचे एकत्रित वल्हवणारे हात व हलणारी वल्ही बघण्याचा आनंद डोळे भरून घेतला जातो. लयबद्ध हालचालींची सुंदर कवायत! आहे क्रीडाप्रकार, पण कलाही ती एकप्रकारची. सामूहिकरीत्या केलेली. दक्षिण भारतीय स्त्रियांच्या केसांमध्ये भरभरून माळले गेलेले गजरे बघितल्यावर वातावरणात सुगंधी प्रसन्नता येते.
आपल्याकडचं बांधकाम खूप बदलत चाललंय. भरतमुनींच्या नाटय़शास्त्रात म्हटलं आहे, की स्थापत्यकार हा एक चांगला कलाकार असायला हवा. तरच तो चांगली वास्तू उभारू शकतो. नाहीतर निव्वळ भिंती उभ्या राहतात. आताच्या इमारती वेगळ्या. त्यांचे सजावटीचे प्रकार वेगळे. आता भिंतीवर मोठमोठी म्युरल्स उभारली जातात. स्वरूप बदललं, पण वास्तुकला आहे.
दृश्यकला आपल्यात अंगभूत आहे. निसर्गदत्त आहे. स्वरूप काळानुसार बदलत गेलं. पण सौंदर्यनिर्मितीचा आनंद घेणं हा मनुष्यस्वभाव मात्र स्थायी आहे, अक्षय आहे. आपल्या मनावर शब्दांपेक्षा दृश्याचा प्रभाव चटकन पडतो. चित्राची भाषा परिणामकारक आहे.
संगीत तर आपल्या जीवनाशी फारच निगडित आहे. बाळाला म्हणायची अंगाई गीतं, जात्यावरच्या ओव्या, लोकसंगीत, नाटय़ संगीत, सिनेसंगीत .. कितीतरी.. शास्त्रीय संगीतातले सूर तर थेट परमात्म्याशी तादात्म पावतात. निर्गुण निराकाराच्या जवळ नेतात. सुरांची भाषाही शब्दांपलीकडची आहे, चित्रांसारखीच. आपलं ‘जन गण मन’ वाद्यावर जरी वाजताना कानावर पडलं तरी मन भरून येतं. डोळ्यात पाणी येतं. आपल्याला म्हणायचं असतं.. माझ्या देशाचं गाणं आहे हे.. माझ्या भारताचं. मला माझ्या भारताचा अभिमान आहे. असं कितीतरी, खरंच शब्दांच्या पलीकडचं.
सौंदर्याचा आनंद, निर्मितीचा आनंद, सृजनाचा आनंद, सगळं आपल्याला कलेद्वारे मिळतं. कला, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहे. सामान्य माणसाच्या जीवनातली सामान्य कला आहे ही. मनावरचा ताण कमी करण्याची, जीवन समृद्धपणे जगण्याची शिकवण देण्याची क्षमता सर्व कलांमध्ये आहे. यांत्रिकपणे जगत राहायला मनुष्याला कधीच रुचणार नाही. त्यामुळे कला ‘अक्षय’ आहे. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत कला राहणार.
‘लय’, ‘ताल’ ही निसर्गाची देणगी आहे. आपलं हृदय एका तालानुरूप चालतं. श्वासाची एक वेगळी लय आहे. या निसर्गातील तालाप्रमाणे नृत्यातील लयही मनुष्याच्या मनात भिनलेली आहे. आपल्या शिवरायाच्या – नटराजाच्या विश्वरूप नृत्यापासून तर आदिवासी नृत्यापर्यंत नृत्यकलेने मानवी जीवनाला समृद्ध व आनंदी केलं आहे. पाश्चात्त्य जगातही नृत्यकला अगदी सर्वसामान्यांच्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे.
अभिव्यक्तीचं माध्यम म्हणूनही कलेचं माणसाशी चिरंतन नातं आहे. पिकासोच्या ‘गुर्निका’ चित्राचं उदाहरण घेता येईल. युद्धातील संहारावर, त्यातील निर्थकतेवर, त्यातून निर्माण होणाऱ्या वेदनांवर केलेलं अतिशय प्रभावी भाष्य आहे ते. वेदनेने पिळवटलेला घोडा, मृत बालक हातात घेऊन आक्रोश करणारी स्त्री. अस्ताव्यस्त सांडलेले मानवी देह. सत्तेचं प्रतीक म्हणून एक मस्तवाल बैल आणि कुठूनशा खिडकीतून आशेचा प्रकाश बरोबर घेऊन येणारा, दिवा धरलेला एक हात. गुर्निका शहरावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात अनेक निरपराध लोक मारले गेले. अनेक लेखांतून जे साध्य झालं नसतं ते पिकासोच्या या चित्राने साध्य केलं. अनेक शहरांतून युद्धविरोधी भाष्य करणारं हे पेंटिंग फिरवलं गेलं.
street Art (स्ट्रीट आर्ट) म्हणजे नव्या जमान्याची भाषा. जर्मनीमध्ये Buddy Bears ची संकल्पना राबवली गेली. वेगवेगळ्या देशांतील, भागांतील, कलाकारांनी फायबर ग्लासची, आपापल्या संस्कृतीची चिन्हं ल्यायलेली अस्वलं तयार केली. रंगीबेरंगी, माणसाच्या आकारापेक्षा पुष्कळ मोठय़ा आकाराची. त्यांचं एकत्रित प्रदर्शन मांडलं गेलं. फायबर ग्लासमध्ये बनलेलं अस्वलाचं हे शिल्प म्हणजे स्वातंत्र्याचं, मैत्रीचं, शांततेचं, सहिष्णुतेचं प्रतीक समजलं गेलं. हे प्रदर्शनही जगभरात अनेक ठिकाणी फिरविलं गेलं. दहशतवादाच्या दहशतीत जगणाऱ्या आजच्या पिढीला वेगवेगळ्या जातींचा, धर्माचा, संप्रदायाचा आदर करायला शिका, त्यांना स्वीकारा असा संदेश देणाऱ्या या बडी बीयरच्या शिल्पांनी किती महत्त्वाची भूमिका बजावली.
जर्मनीत फूटपाथवर बऱ्याच ठिकाणी `Here Lived’ असं जर्मन भाषेत लिहिलेल्या पितळी टाइल्स बसवलेल्या दिसतात.Gunter Demnig या कलाकाराची ही कला स्टंबलिंग ब्लॉक्स’ असं त्यांना संबोधलं गेलं आहे. नाझी राजवटीत अनन्वित छळ करून मारल्या गेलेल्या अनेक सामान्य माणसांची स्मारकं आहेत ही. त्या टाइल्सवर त्या माणसाचं नाव व माहिती लिहिली असते. हा कलाप्रकारही अनेक शहरांत पसरला. विस्मृतीच्या गर्तेत ढकलल्या गेलेल्या, अनैसर्गिक मृत्यूला नाझी कृपेने सामोरं जावं लागलेल्यांना काही क्षण आजच्या प्रवाहात ओढून आणणारी, त्यांना श्रद्धांजली वाहणारी ही कला. किती निरनिराळे उद्देश असू शकतील कलेचे.
किती विविध प्रकारे कला आपल्या जीवनाशी एकरूप झालेली आहे. पृथ्वीवर अवतरलेल्या गंगेसारखीच कलाही अक्षय आहे.. प्रवाही आहे.. चिरंजीव आहे..
डॉ. माधवी मेहेंदळे -madhavimehendale@gmail.com

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता