जंगलाजवळ असलेल्या गावाला झालेली बदली आणि तिथे मिळालेली हरणांची सोबत आनंद राजेशिर्के यांच्या पथ्यावरच पडली. तिथून सुरू झालेला हरणांचा अभ्यास त्यांच्या आयुष्यात अपार आनंद देणारा ठरला.
हरीण या प्राण्याचे नाव उच्चारलं तरी आपल्या डोळ्यासमोर लगेच सुंदर, तुकतुकीत कांती, काळेभोर रेखीव डोळे , चेहऱ्यावरचे निरागस पण तितकेच भित्रे भाव आणि कोणाच्या अध्यात-मधात लुडबूड न करणारा प्राणी येतो. त्याला पाहताच त्याबद्दल वेगळंच ममत्व, जिव्हाळा वाटतो.
साधारणत: ३५ वर्षांपूर्वीचा काळ होता. वन्यजीव संशोधक आनंद राजेशिर्के यांच्यावर हरीण या प्राण्याने अशी काही जादू केली की, ते कळत-नकळत या प्राण्याकडे आकर्षिले गेले.
बँकेत नोकरी करत असताना १९७८ च्या आणीबाणीच्या काळात जानेवारी महिन्यात राजेशिर्के यांची बदली अहमदनगरहून थेट आंध्रप्रदेशमधील आदिलाबाद येथे झाली. हा जिल्हा तेव्हा आणि अजूनही नक्षलग्रस्त आणि जंगलांनी वेढलेला होता. याच जंगलातून तेव्हा एका आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचे झालेले अपहरण बरेच गाजले होते. तीन राज्यांच्या सीमेवरील हे गाव नक्षलवादी, भुरटे चोर, जंगली उत्पादनांची तस्करी यासाठी सोयीस्कर होते. फारशी लोकवस्ती नाही, बँकेच्या शेजारीच राहण्यासाठी छोटंसं घर मिळालं होतं. फारसा कोणाशी परिचय नाही. बँकेत स्टाफही मोजकाच आणि विशेष म्हणजे कार्यालयाच्या पाठीमागे थोडय़ाच अंतरावर प्रचंड घनदाट जंगल. नाही म्हणायला या जंगलात आदिवासी कुटुंबे राहायची. ते शेळ्या चरायला जंगलात घेऊन जात असत. प्राण्यांची हत्या करून त्यांचे मांस, कातडी आणि इतर अवयवांची तस्करी तेथेही बऱ्यापकी चालत असे. संपूर्ण गाव फारसं साक्षर नव्हतं. त्यामुळे कामकाजाच्या वेळेनंतर टाइमपास कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. बँक मॅनेजरला त्या काळात बऱ्यापकी प्रतिष्ठा असायची.
lp35
राजेशिर्केना भटकंतीची आवड पूर्वीपासूनच होती. बँकेने अशा भागात बदली केली की, तो भाग हरीण या प्राण्याच्या अभ्यासासाठी सुवर्णसंधी ठरेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. या संधीचं सोनं करावं या इच्छेने त्यांनी हळूहळू जंगलभ्रमण सुरू केलं. जंगलातील आदिवासींच्या सोबतीने फावल्या वेळेत दररोज एक एक भाग पाहू लागले. एकेक दिवस वेगवेगळे प्राणी दृष्टीस पडू लागले. विशेष म्हणजे या जंगलात हरणांची संख्या मोठी होती. तशी घाबरटच जात! पण त्यांची राजेशिर्केशी मत्री झाली.
एके दिवशी एका मादीला दोन पिल्लं झाली. ही मादी हरीण दाट झाडाझुडपात आपल्या ३-४ दिवसांच्या पिल्लांना लपवून ठेवत असे. जंगलातील आदिवासी मात्र या नवजात, कोवळ्या पिल्लांवर नजर ठेवून असायचे. या पिल्लांना शेळ्यांचा आवाज आला की, त्यांची आई आल्याचा भास व्हायचा. ते लगेच झाडाच्या ढोलीतून बाहेर यायचे आणि बाहेर आले रे आले की हे मेंढपाळ त्यांना पकडत असत. शिकार करून त्यांचे मांस, कातडी विकून चरितार्थ चालवायचे. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ म्हणतात त्याची प्रचीती या जंगलात यायची.
हरीण या प्राण्याचं जीवन जवळून अनुभवताना राजेशिर्के यांना त्या प्राण्याने इतके वेड लावले की त्यांनी चक्क या प्राण्याच्या संशोधनसाठी एक दिवस स्कॉटलँड गाठलं. त्यांचा हा हरीण संशोधन प्रवास त्यांच्याच शब्दात..
आदिलाबादला असताना बँकेचे कामकाज आटोपल्यावर संध्याकाळी वा सकाळच्या रामप्रहरी माझा जंगलातल्या हरणांशी संपर्क वाढला. दिवसामागून दिवस जात होते. एकेदिवशी दोन पिल्लांना जन्म देऊन त्यांची आई अन्न शोधण्यासाठी गेली ती बरेच दिवस आलीच नाही. छोटे छोटे पाय, तजेलदार, आकर्षक डोळे, ठिपक्याठिपक्यांची रेशमी कांती. दुडक्या चालीने चालणारी ही पिल्लं माझ्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा बनून गेली. त्याचं वर्णन करावं तितकं थोडंच. दररोज त्यांना भेटल्याशिवाय चन पडत नसे. दिवसभराच्या कामांच्या यादीतील तो एक महत्त्वाचा भाग बनून गेला.
एके दिवशी ओळखीतील आदिवासींना भेटून सांगितलं, तुम्ही या हरणांच्या पाडसांना मारू नका, तुम्हाला त्यांच्या तस्करीतून किती पसे मिळणार होते? ते मी देतो आणि ही पिल्लं मला द्या. सौदा जमला आणि मी त्या पिल्लांना घरी घेऊन आलो. बाटलीने दूध पाजता पाजता कधी त्यांची आई झालो हे कळलंच नाही. बघता बघता पिल्लंही मोठी होऊन माझ्या घराच्या आसपास दुडूदुडू धावायला लागली. एका चर्मकाराने मोठय़ा हौसेने एकासाठी घुंगराचा पट्टा बनवून दिला. गावातील वयस्कर लोकांनी त्यांच्या खाण्यापिण्यासाठी सल्ले दिले. त्यांना बाटलीने दूध पाजण्याचे काम एका शिपायाने स्वत:हून स्वीकारले. आपल्या छोटय़ा बाळासारखीच ती पिल्लं. दुधात पाणी न घालताच दूध पाजले, पण छोटय़ाशा त्या पाडसाला ते पचले नाही आणि थोडय़ाच दिवसांत दगावले.
या अनुभवातून शहाणे झाल्यावर दुसऱ्या पिल्ल्याची वेगळ्या पद्धतीने निगा राखू लागलो. त्यातून अप्रत्यक्षपणे हरीण या प्राण्याबद्दल गावात लोकशिक्षणाचे धडेच गिरवले गेले. गावकऱ्यांनी प्रथम माझ्यासाठी आणि नंतर आवडीने त्याला आपल्यात सामावून घेतले. या पिल्लांच्या बाललीलांचा आनंद घेताघेता त्यांना त्यांच्या वस्तीत सोडणं हे माझं परमकर्तव्य आहे याची जाणीव झाली आणि मी त्यांना जंगलात सोडून आलो. त्यावेळी एखाद्या पित्याला मुलीला सासरी पाठवताना कसं दु:ख होत असेल अगदी तशीच कन्यादानाची हूरहूर अनुभवली. त्या हरिणीने जंगलात जाताजाता दोन वेळा मागे वळून पाहिले तेव्हा गलबलून आले. आजही एखाद्या शांत क्षणी ते हरीण जसेच्या तसे डोळ्यासमोर येते आणि एक अनामिक हूरहूर लागते. त्यानंतरही थोडय़ा थोडय़ा दिवसांनी पुन्हा पिल्लं जन्मली की माझा तोच उद्योग. हा सिलसिला सुरूच होता.
lp40
माझ्या जीवनातून एका हरिणीला मी दुरावलो असलो तरी त्या छोटय़ाशा प्रसंगातून निर्माण झालेल्या जिव्हाळ्यातून जगभरातल्या १८० हून अधिक हरणांच्या प्रजाती माझ्या जीवनात स्थिरावल्या. हरीण या प्राण्याची अथपासून इतिपर्यंत माहिती घेण्याची मनातून जिज्ञासा निर्माण झाली. या जिज्ञासेतूनच हरणांचे अंतर्बा रूप समजून घेण्याचं वेडच लागलं आणि मी झपाटल्यागत काम करू लागलो. त्या काळी इंटरनेट, मोबाइल वगरेसारखी संवादमाध्यमं नव्हती. टेलिफोन होता पण तेही महागडं साधन होतं. पत्रव्यवहार हे एकमेव स्वस्त आणि सोपं माध्यम होतं. सुट्टीच्या दिवसात मोठय़ा शहरात गेलो की तेथून ‘नेचर’ वगरेसारखी मासिकं विकत घेऊन हरिणांविषयीची माहिती गोळा करू लागलो.
एके दिवशी कळलं, स्कॉटलँडमध्ये प्राण्यांच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी फेलोशिप देण्यात येणार आहे. सुमारे २० वर्षांपूर्वीचा काळ होता तो. पत्राद्वारे स्कॉटलँडमध्ये संपर्क साधला, यातही काही महिने गेले.
दरम्यानच्या काळात मी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. त्यामुळे मनसोक्त जीवन जगणं हे खऱ्या अर्थानं तेव्हा साध्य झालं. एके दिवशी स्कॉटलँडमधून फेलोशिप मिळण्यासंबंधी होकार आला आणि काय सांगू, माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही.
lp38स्कॉटलँडमधील डियर-फार्म प्रसिद्ध आहेत. आता बऱ्याच ठिकाणी आहेत, पण तेव्हा तेथील डियर-फाम्र्सचा वेगळाच लौकिक होता. तेथील फेलोशिप मिळणं हेही प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जायचं. मीही एका पायावर जायला तयारच होतो. होकार कळवला आणि महिनाभरातच स्कॉटलँडला रवाना झालो. सहा महिन्यांत हरीण, त्यांच्या जाती, त्यांची अ‍ॅनॉटॉमी, त्यांची मानसिकता अंतर्बा समजून घेतली. या फेलोशिपमुळे हरणांविषयीची जितकी रंजक माहिती मिळाली तितकीच भारतातील त्यांच्या स्थितीविषयीची धक्कादायक माहितीही मिळाली. जेमतेम चार-सहा हरणांच्या जाती माहीत असलेल्या मला, तब्बल २२० जाती माहीत झाल्या. प्रत्येकाचे भिन्न भिन्न गुणधर्म कळले.
ह्य दीर्घ कालावधीत माझ्याकडे आज जगातील हरिणांविषयीची विविध प्रकारची रोचक माहिती आहे. त्या हरिणांच्या एकूण प्रजाती, नष्ट झालेल्या प्रजाती, शिल्लक राहिलेल्या दुर्मीळ जाती, जगभरातील वाङ्मयात असलेला हरिणांचा उल्लेख, देशोदेशींच्या तिकिटांवरील त्यांची छायाचित्रं, दुर्मीळ तिकिटे, चलनातील नोटा-नाणी, हरिणांची चिन्हं असलेल्या सनिकांच्या तुकडय़ा, दंतकथा, जगभरात झालेले व चालू असलेले संशोधन, त्यांच्या शिकारीवरील बंदी, त्यामुळे त्यांची संख्या अमर्याद वाढल्याने उद्भवलेल्या अडचणींवर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या देशांनी शोधलेले मार्ग या स्वरूपाची मुबलक माहिती संशोधनातून जमा झाली. बंदिस्त जागेत जलदगतीने हरिणांची पदास कशी करायची याविषयी डॉ. जॉन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्कॉटलँडच्या उत्तर भागातील अक्टमक्टी या निसर्गसुंदर, डोंगराळ भागातील ५०० एकरांच्या डिअर फार्मवर हा अभ्यास केला.
डॉ. फ्लेचर यांनी स्कॉटलँडमधील ‘आयसल ऑफ ऱ्हम’ या बेटावर पाच वष्रे एकाकी राहून सांबरसदृश रेड डिअर या प्राण्याचा अभ्यास केला. केंब्रिज विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. या विषयावरील मोजक्या तज्ज्ञांमध्ये त्यांचा समावेश असून त्यांची जगभर भ्रमंती सुरू असते. नामशेष होत जाणाऱ्या वन्य प्रजातींची बंदिस्त जागेत पदास ही संकल्पना सध्या जगमान्य झाली असून त्याचा यशस्वी उपयोग जगभर वन्यप्राणी संवर्धनात होत आहे. पण २० ते २५ वर्षांपूर्वी हा अभ्यास तसा दुर्लक्षितच होता. भारतात तर सद्यस्थितीत अशा अभ्यासाला खूपच वाव आणि संधीही आहेत.
डॉ. जॉन फ्लेचर व त्यांच्या पत्नी अवघ्या दोन-तीन माणसांच्या सहाय्याने ५०० एकराचा हा डिअर फार्म चालवत असत. फार्म चालवण्याबरोबरच तेथे अनेक प्रकारचे संशोधनही सुरू आहे. उदा. हरणांना लागणारे खाद्य, त्यांना होणारे आजार, त्यावरील रोग प्रतिकारबंधके, हरणांचे शास्त्रोक्त पद्धतीने पालनपोषण, जगभरात विशेषत: त्यांची युरोपात होत असलेली वाहतूक, शेतकऱ्यांची आंतरराष्ट्रीय संघटना, त्यांच्यातर्फे दर चार वर्षांनी होणारी चर्चासत्रे, मेळावे या महत्त्वाच्या विषयावरील संशोधनावरील माहितीचा जो अमूल्य ठेवा मला मिळाला तो भारतातील कोणालाही स्तिमित करणारा ठरेल. हा माहितीचा ठेवा मला कोणत्या ना कोणत्या रूपात लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यादृष्टीने मी साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी सिक्कीमच्या राज्यपालांच्या सौजन्याने गंगटोक येथे भारतीय वनसेवा अधिकारी, राज्यपाल यांच्या उपस्थितीत स्थानिक महाविद्यालये, शाळांमध्ये माझी तीन दिवस व्याख्याने झाली. दोन महिन्यांपूर्वी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात हरणाच्या दुर्मीळ जातींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मी भरवले होते त्यालाही वन्यजीवप्रेमींचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हरणांच्या निरनिराळ्या जाती-प्रजातींच्या संशोधनासाठी आजवर बऱ्याच खस्ता खाल्या. संशोधनासाठी बँकेकडून दीर्घ मुदतीच्या रजेसाठी झालेला विरोध, बिनपगारी रजा व इतर अनेकदा आलेल्या आíथक अडचणी, हरणांवरील संशोधनासाठी हुकलेली पदोन्नती या सर्व गोष्टींची भरपाई हरणांविषयीच्या संशोधनाची ब्रिटिश सरकारने दखल घेतल्यामुळे भरून पावल्या.
lp36
त्यावेळी ब्रिटिश सरकारने दिलेली शिष्यवृत्ती आणि स्कॉटलँडमधील आंतरराष्ट्रीय अनुभवांमुळे माझं संशोधनविश्व अधिक समृद्ध केलं. आपल्या भारतातूनच काही हरणे नेऊन न्यूझिलंड, स्कॉटलँडसारख्या देशांनी हरणांचं ‘कॅप्टिव्ह ब्रीिडग’ (बंदिस्त प्रजनन) करून त्यांची संख्या काही लाखांच्या घरात नेली आहे. भारतातील हरणांच्या संख्येशी आता त्यांची तुलनाच होऊ शकत नाही हे समजल्यावर वाईट तर वाटलंच; परंतु लाजही वाटली. कारण भारत आणि त्या देशातील हरणांची आकडेवारीच सत्य परिस्थिती कथन करत होती. भारतात सद्यस्थितीत कॅप्टिव्ह ब्रीडिंगला खूपच वाव आहे. त्या क्षेत्रात संधीही मुबलक आहेत .
असो, या संशोधनादरम्यान मला तेव्हा माहीत नसलेल्या काही रंजक, रोचक माहितीचा साठा आज इंटरनेटवर उपलब्ध असला तरी आजपासून २० वर्षांपूर्वी मला तो माहीत झाला म्हणून मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजतो. आणि ती माहिती तुमच्याशीही शेअर करणार आहे. हरणांचे मुख्यत: दोन प्रकार आहेत.

१) डियर
२) ऑन्टिलोपस् डियर
डियर
*    या जातीच्या हरणांची दरवर्षी शिंगांची झीज होते. आणि त्यानंतर नव्याने वाढ होते.
*   शिंगांना छोटी छोटी फांद्यांसारखी दुसरी शिंगं असतात.
*   या हरणांचं आयुष्य साधारण २० वर्षांचं असतं.
*   सुळे, चार मेमरी ग्लॅन्डस् असतात.
ऑन्टिलोपस्
* यांची शिंगं कायमस्वरूपी असतात. त्यांची झीज होत नाही.
* यांना दोन सरळ शिंगं असतात.
* ही हरणं, शेळय़ा, मेंढय़ा, गुरांच्या प्रवर्गातील आहेत.
* आयुष्य साधारण १० ते २० र्वष
* सुळे नसतात, दोन मेमरी ग्लॅन्डस् असतात. (चौसिंगा अपवाद)
हरणांचा इतिहास
हरीण हा प्राणी दोन दशलक्ष वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. एकूण ४ हजार ७०० सस्तन प्राण्यांच्या जातींपकी सुमारे ४०० भारतात आढळतात. ह्यच सस्तन प्रण्यांच्या वंशात भारत व शेजारील भूतान, तिबेट या देशांमध्ये सांबर, चितळ, दरडा, बारिशगा, काश्मिरी हंगल, सिक्कीमचे शाऊ, मणिपुरी संगई, कस्तुरी, पिसोरी व पाडा या १० सारंग प्रजाती तर चौसिंगा, नीलगाय, काळवीट, चिंकारा, गोआ, तिबेटी चिक या सहा जाती कुंरग (ANTELOPE) प्रकारात आढळतात. जगातील एकूण हरणांपकी अवघे ९ टक्के भारतात तर उरलेल्या सुमारे १८० जाती मुख्यत्वे आफ्रिका, युरोप, उत्तर-मध्य व दक्षिण अमेरिका, दक्षिण आशियातील काही देशांत अस्तित्वात आहेत. ऑरिस्टॉटलने ‘अ‍ॅनिमल किंगडम’च्या अभ्यासात प्राण्यांचे पाच महत्त्वाच्या जातींत वर्गीकरण केले होते ते असे : पायसेस, ऑम्फिबियन, रेप्टाइल, ऑव्हन, मॅमल्स. हरणांप्रमाणेच जलचर प्राणी (३५ दशलक्ष वर्षे), आदिमानव ( चार दशलक्ष वर्षे), पहिला मानव (१.५ दशलक्ष वर्षे), सस्तन प्राणी (१६ दशलक्ष वर्षे) पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. जिराफ हा सर्वात उंच (१८ फूट) सस्तन प्राणी आहे. व्हेल मासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे तर खार ही सर्वात लहान सस्तन प्राणी आहे.
हरणांचा उल्लेख :
आपल्या रामायणात हरणांचा उल्लेख आहे. (सोनेरी मृग). चिनी चित्रकलेत हरणं दिसतात. ऑन्डिज पर्वतरांगांमध्ये हिस्पॉनिकपूर्व संस्कृतीत हरणांचा उल्लेख आढळतो, विविध देशांची टपाल तिकिटं, चलनी नोटांवर हरणांची चित्रं छापलेली असतात.
पश्चिम आणि उत्तर अमेरिकेतील आदिवासींच्या जमातीत हरणांचा उल्लेख आहे. लेबनॉनमध्ये ५० हजार वर्षांपासून हरणांचा बळी देण्याची प्रथा आहे.
शेक्सपियरने (१५६४-१६१६) आपल्या विविध साहित्यकृतींत उदा. ‘कॉमेडी ऑफ एर्स’, ‘ऑल इज वेल’, ‘द मेरी वाईव्ज सिम्बेलाईन’ आदींमध्ये हरणांचा आवर्जून उल्लेख केला आहे.
भारतात चिंकारा, ब्लॉक बक (काळवीट) आणि चितळ या प्रमुख जाती माहीत आहेत. कारण त्यांची मोठय़ा प्रमाणात शिकार होते. ‘आययूसीएन’च्या पाहणीनुसार आजघडीला हरणांच्या १९ जाती धोक्यात आहेत.
स्टड बुक : या पुस्तकात कोणत्या प्राण्यांच्या किती जाती सध्या धोक्यात आहेत याची माहिती असते. १९७१ मध्ये घोडय़ांसाठी इंग्लंडमध्ये पहिले स्टड बुक तयार करण्यात आले. त्यानंतर १९३२ मध्ये नीलगायींसाठी तयार करण्यात आले. देशोदेशी कॉप्टिव्ह आणि को-ऑपरेटिव्ह ब्रीिडग कसे चालते याची साद्यंत माहिती या पुस्तकात वाचायला मिळते.
चौसिंगा (ऑन्टिलोप) : या जातीचे हरीण फक्त भारतात आणि तेही महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशच्या जंगलात आढळते. याची िशगं सुमारे ६५ सेमी लांब असतात तर सरासरी वजन २२ किलो असतं. या जातीच्या माद्यांना मात्र शिंगं नसतात. हरणाची ही प्रजाती सुमारे ८.५ दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. महाराष्ट्रात हेमलकसामध्येही हे मोठय़ा प्रमाणावर दिसतात.
याशिवाय भारतात सांबर, चितळ, दरदा, बारसिंगा, रेडडियर (काश्मीर), सारंग (सिक्कीम), सांगई (मणिपूर), कस्तुरीमृग, पिसोरी, अहेडा, पाडा, नीलगाय, काळवीट, चिंकारा, गोवा, चिरू (तिबेट) येथे या जाती आढळतात.
एकेकाळी हरणांच्या सर्वाधिक प्रजाती असलेला भारत सद्यस्थितीत किती पिछाडीवर आहे याचे आकडे बोलके आहेत.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

खंडनिहाय आकडेवारी
खंड                                जाती                                 टक्केवारी
आफ्रिका                         ८३                                     ४८ टक्के
युरोप/आशिया                ४६                                    २७ टक्के
उत्तर अमेरिका                 १७                                    १० टक्के
ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड      १५                                    ९ टक्के
मध्य/दक्षिण अमेरिका      ९                                     ५ टक्के
प. आशिया                         ३                                   १ टक्का
(तुर्कस्तान, सीरिया,    
इराण, अफगाणिस्तान इ.)    १७३                           १०० टक्के
तज्ज्ञांच्या मते मात्र हरणांच्या २२० हून अधिक जाती आहेत.
lp37रंजक सत्यकथा :
इंटरनॅशनल पार्कस : सेरेंगेटी (टांझानिया), मसाई-मारा (केनिया), वर्ल्ड हेरिटेज एरिया: ३० हजार वर्ग किलोमीटर. निसर्गाची इको सिस्टम संतुलित ठेवण्यांसाठी हरणांचे योगदान महत्त्वाचे आहे.
१९५९ मध्ये बर्नार्ड आणि मायकेल या दोघांनी हरणांवर ‘सेरेंगेटी शाल नॉट डाय’ ही ऑस्कर विजेती डॉक्युमेन्टरी काढली.
जर्मनीत वर्षभरात एक लाखाहून अधिक हरणांची शिकार होते. अमेरिकेत वाहनांच्या धडकेने वर्षभरात सुमारे १.५ दशलक्ष हरणं ठार होतात. अशा अपघातांत १.१ अब्ज डॉलरच्या मालमत्तेचे नुकसान होते. (मोटर वाहन अपघात विमा दाव्यांनुसार)
हरणांची शिकार करतानाच थायलंडच्या राजाने सिंगापूर (सिंहपूर) बेटाचा शोध लावला.
भारतात विलपट्ट नॉशनल पार्क, कान्हा नॅशनल पार्क, येला नॅशनल पार्क आणि दुधवा नॅशनल पार्कात हरणं मोठय़ा प्रमाणात दिसतात. जगातील सर्वात मोठं हरीण ‘मूस’ या जातीचं असून, त्याचे वजन सुमारे ४३० किलो तर पूर्ण शरीर धिप्पाड असतं.
हरणांच्या शिंगांचा उपयोग आकर्षक फíनचर, लॅम्पशेडस् बनविण्यासाठी केला जातो.
हरीण हे चिली देशाचा ‘नॅशनल सिम्बॉल’ आहे.
‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या छायाचित्रणासाठी अभिनेता सलमान खान १९९८ मध्ये जोधपूरला गेला होता. राजस्थानमधील बिष्णोई समाजाने वन्य प्राण्यांसाठी राखलेल्या माळरानात सलमानने सलग तीन दिवस काळवीट, चिंकारा या जातीच्या हरणांची शिकार केली. पहिले दोन दिवस त्याचा हा ‘पराक्रम’ लक्षात आला नाही, पण तिसऱ्या रात्री संपूर्ण गाव जाग होतं. गोळय़ा झाडल्याचा आवाज येताच लोक धावू लागले, लाठय़ा-काठय़ा, भाले-कुऱ्हाडी मिळेल ते घेऊन माळरानात घुसले आणि सलमान आणि त्याच्या साथीदारांना घेरलं आणि त्याला बदडू लागले. पण एका व्यक्तीने मध्यस्थी केल्यामुळे सलमान वाचला. पर्यावरण रक्षणाविरोधात कोणी ‘ब्र’ काढला तरी बिष्णोई समाज त्याला सोडत नाही अशी त्यांची ख्याती आहे.
भारतात पर्यावरण असमतोलाला हरणांची घटत असलेली संख्या मोठय़ा प्रमाणावर जबाबदार आहे, तर उर्वरित जगात वेगळेच चित्र दिसते. तेथे हरणांच्या वाढत्या संख्येमुळे प्रश्न निर्माण झाला आहे. उभ्या पिकांचं मोठय़ा प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजना करण्यात येत आहेत. लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या परिसरात विमानांच्या जोरदार आवाजामुळे त्या परिसरातील हरणांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यासाठी नवे उपाय योजण्यात येत आहेत.
एक किलो कस्तुरी मिळवण्यासाठी शेकडो हरणांची (कस्तुरी मृग) हत्या केली जाते. त्यामुळे चीनमध्ये हरणांना ठार न मारता कस्तुरी कशी मिळवता येईल यावर मोठे संशोधन सुरू आहे.
ऑस्टेलिया/ न्यूझीलंड या देशांमध्ये अठराव्या शतकात एकही हरीण नव्हतं. भारतातून न्यू साऊथ वेल्सला पहिले हरीण (चितळ) तेथे नेण्यात आलं. आज भारतात लाखभर तर न्यूझीलंडमध्ये सहा लाखांच्या वर हरणं आहेत. या देशांमध्ये पाच पाचशे एकरांचे डियर फार्मस् आहेत. त्यांची संख्या एक हजारांवर आहे. या फार्मस्मध्ये जागतिक दर्जाचे संशोधन सुरू आहे. जो देश (भारत) अगदी अलीकडच्या काळात हरणांच्या संख्येबाबत अग्रक्रमावर होता तो आता बराच पिछाडीवर गेला आहे. याची कारणं खर तर सुज्ञांस सांगावी लागू नयेत. आपल्याकडे नसíगक साधनसंपत्ती आहे. वनक्षेत्राचीही कमतरता नाही. चांगले संशोधक आहेत. त्यांना संशोधनासाठी अनुकूल वातावरण आहे. पण चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांतील लोकांसारखी इच्छाशक्तीही गरजेची आहे. तेव्हाच वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनात आपण या देशांची बरोबरी करू शकू असं वाटतं.

हरणांच्या  जाती         नर/मादी (एकत्रित)
पेरे डेव्हिड                     १४५२
स्वॉम्प                          २७०
एलक                            २५५
पुडु पुडु                          ११३
पम्पास                          ८३
पार्शिअन फॉलो              ४३
lp39त्याचप्रमाणे, आज आपल्याकडे हजारो हरणांची शिकार होते. काही धनदांडगे, चित्रपट कलाकारांचा तर तो शौक असतो. यासारख्या घटना घडत असतात, मात्र त्यापकी मोजक्याच प्रकाशात येतात. त्यांच्यावर कोर्टकेसेस होतात, वर्षांनुवष्रे खटले चालतात. पण निष्पन्न काही होत नाही. अशावेळी एखाद्या व्यक्तीने शिकार केल्याचे सिद्ध झाले की त्याच्याकडून भरमसाट दंड घेऊन ते पसे वनसंवर्धन वा हरणांच्या संवर्धनासाठी वापरावेत, असे सुचवावेसे वाटते.
अशी माहिती, संशोधनास चालना देण्यासाठी, त्याची सध्याच्या तसेच मानवाच्या पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरेल असे प्राणीसंग्रहालय वा संशोधन कार्यशाळा जगभरात अस्तित्वात आलेल्या आहेत .उदा. मेलबोर्नजवळचे फिलीप आयलँड. मेलबोर्नजवळ अटलांटिक महासागराच्या काठावर पेंग्विन या प्राण्याच्या संवर्धनासाठी निर्मिलेले सुंदर ठिकाण, ऑस्ट्रेलियाला भेट देणारा चोखंदळ, दर्दी पर्यटक एकवेळ सिडनेच्या ऑपेरा हाऊसकडे वळणार नाही पण फिलीप आयलँडकडे मात्र त्याची पावलं आपसूक वळलीच पाहिजेत .
पुणे-मुंबईकरांसारख्या दर्दी, नव्या संकल्पनांना उचलून धरणाऱ्या जाणकारांना असे जागतिक दर्जाचे संग्रहालय वा संशोधन केंद्र उभारण्याचे एक स्वप्न मी फार वर्षांपासून बाळगून आहे, गेल्या ३० वर्षांच्या संशोधनाअंती मला वाटतं की, एखाद्या मोठय़ा समूहाने वन्य प्राण्यांचे एक कायमस्वरूपी (विशेषत: हरणांचे) संग्रहालय उभारण्यासाठी मदतीचा हात दिला तर असे संग्रहालय एखाद्या नावाजलेल्या पर्यटन स्थळाजवळ सुरू झाल्यास पर्यटकांचाही ओघ वाढेल.
अमृता करकरे – response.lokprabha@expressindia.com