ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या विद्यापीठांत हिंदू तत्त्वज्ञानाची उपेक्षा केली जात होती. एतद्देशीय विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या पं. मदनमोहन मालवीय यांना नुकतेच भारतरत्न जाहीर झाले आहे. त्यानिमित्त..

इंग्लंड येथे सप्टेंबर-डिसेंबर १९३१ दरम्यान दुसरी गोलमेज परिषद भरली होती. या परिषदेस महात्मा गांधींसोबत हजर असलेल्या एका काँग्रेस प्रतिनिधीला या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गांधींजींनी त्याच्या तीन अटी शिथिल करावयास लावल्या होत्या. पहिली अट गंगाजलाव्यतिरिक्त अन्य पाणी पिणार नाही. भारत सोडल्यापासून भारतात परत येईपर्यंतच्या काळात केवळ फलाहार करेन व स्वत:चे अन्न स्वत:च्या हाताने शिजवेन. काँग्रेसच्या एका नेत्याने अशा अटी घालाव्या व त्या अटी शिथिल कराव्या यासाठी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याने आपल्या अनुयायाची मनधरणी करावी, असे आज शक्य नसले तरी हे एके काळी घडले आहे. या अटी घालणारा नेता म्हणजे पंडित मदनमोहन मालवीय. या अटी घालण्यामागे काही तत्कालीन कारणे होती. इंग्रजांनी गंगाजलावर काही र्निबध घातले होते व अन्य धर्मीयांनी हिंदूंवर अकारण आक्रमण केले होते. चार वेळा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवूनदेखील काँग्रेस पक्षाच्या धोरणांना त्यांनी वेळोवेळी टोकाचा विरोध केला. अहिंदूंचा अकारण अनुनय व हिंदूंचा तिरस्कार हा दोष त्या काळीही काँग्रेसच्या धोरणात होता. या धोरणाला पं. मालवीय यांचा विरोध होता. म्हणूनच इतिहासात त्यांची प्रतिमा काँग्रेस पक्षातील कट्टर हिंदुत्ववादी अशी रंगविण्यात आली. परंतु हे अर्धसत्य आहे.
मध्य प्रदेशातील माळवा भागातील व्यास कुटुंबीयांना चरितार्थासाठी आपले मध्य प्रांतातील गाव सोडून बनारस काशी अलाहाबाद या प्रदेशात स्थलांतर करावे लागले. माळव्याचे हे कुटुंब आपले मूळ नांव सोडून ‘मालवीय’ झाले. या कुंटुंबातील कमावते पुरुष हे संस्कृतचे पंडित होते. व्यापार-उदीमामुळे देवी लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या बनारसमधील व्यापाऱ्यांच्या प्रासादातील देवपूजा ते चरितार्थासाठी करीत असत. या कुटुंबातील ब्रिजनाथ व मोना देवी या दाम्पत्याच्या पोटी २५ डिसेंबर १८६१ रोजी मदनमोहन मालवीय यांचा जन्म झाला. ब्रिजनाथ व आजोबा प्रेमनाथ हे संस्कृतचे पंडित होते. ते पुरोहित होते. ते भागवतावर अतिशय रसाळ प्रवचने करीत असत. अशा सुविद्य कुटुंबात जन्मलेल्या मदनमोहन मालवीय यांचे प्रारंभिक शिक्षण पंडित हरदेव यांच्या ‘धर्म ज्ञानोपदेश’ या संकृत पाठशाळेत झाले. १८७९ साली मॅट्रिकची परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण होऊन ते ‘म्युर सेंट्रल कॉलेज’मध्ये दाखल झाले. याच महाविद्यालयात तेजबहाद्दूर सप्रू व मोतीलाल नेहरू यांच्यासारखे भविष्यात देशाचे नेतृव करणारे नेते त्यांचे सहअध्यायी होते. १९८४ साली बीएची पदवी घेऊन ज्या शाळेत ते शिकले त्या अलाहाबाद जिल्हा माध्यमिक शाळेत मासिक चाळीस रुपये वेतनावर त्यांनी साहाय्यक शिक्षकाची नोकरी पत्करली. १८८६ मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी पहिले भाषण केले. नंतरच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाचा ओघ कायमच राहिला. दरम्यानच्या काळात वयाच्या सोळाव्या वर्षी मिर्झापूरच्या कुंदनदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पं. मालवीय यांना पाच मुलगे व पाच मुली झाल्या व यापैकी चार मुलगे व दोन मुली जगल्या.
ब्रिटिश राज्यसत्तेच्या सुरुवातीच्या काळात, उत्तर भारतात उर्दू व हिंदी या लोकभाषा होत्या. तर उर्वरित देशांत स्थानिक प्रादेशिक भाषा या व्यवहारासाठी वापरल्या जात. मोगलांचे वर्चस्व असलेल्या व राज्य इंग्रजांचे असलेल्या काळात बहुसंख्य शिक्षक मात्र पर्शियन किंवा संस्कृत पारंगत असत. मुद्रण कलेचा प्रसार झालेला नव्हता व अंकगणित आणि भाषेचे ज्ञान प्रामुख्याने गुरुमुखातून मिळत असे. भारतातील शिक्षण क्षेत्रात अशी विचित्र परिस्थिती होती. तत्कालीन शिक्षण हे संस्कृत व फार्सी या भाषा ज्योतिष पंचांग, कालगणना, अंकगणित या विषयापुरते मर्यादित होते. इंग्रज राज्यकर्त्यांचा भर प्रामुख्याने आपले राज्य चालविण्यासाठी इंग्रजी जाणणारे कारकून तयार करण्यावर होता. देशाला शैक्षणिक धोरण नव्हते. इंग्रजांनी आपल्या सोयीने देशातील लोकांची विभागणी इंग्रज व नेटीव्ह या दोन गटांत केली होती. १८५७ च्या राष्ट्रीय उठावानंतर या भूप्रदेशाला प्रथमच शिक्षण खाते मिळाले. शिक्षण खात्याची धोरणे ही शिक्षणामुळे देशातील लोकांचे जीवनमान उंचविण्यापेक्षा राज्यसत्ता राखण्याकरिता मनुष्यबळ पुरावण्याला प्राथमिकता देणारी होती. याचाच परिणाम म्हणून पूर्वेला कलकत्ता, पश्चिमेला मुंबई व दक्षिणेला मद्रास येथे तीन विद्यापीठांची स्थापना इंग्रज सरकारने केली. या विद्यापीठांचा ढाचा हा इंग्रजी पद्धतीचा होता. विद्यापीठांतून पाश्चिमात्य चालीरीतींचे अध्ययन केले जात होते व हिंदू तत्त्वज्ञानाची उपेक्षा केली जात होती.
जगापुढे देशाची प्रगतिशील राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर आधुनिक विज्ञान, भौतिकशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांची संथा या देशातील विद्यार्थ्यांना द्यावी लागेल ही भूमिका पंडित मदनमोहन मालवीय यांनी मांडली. काँग्रेसच्या अधिवेशनात सहज मांडलेल्या या कल्पनेला कल्पनेहून किती तरी पट अधिक प्रतिसाद लाभला. असे विद्यापीठ स्थापन झाले तर या विद्यापीठात आजन्म विनावेतन प्राध्यापक म्हणून काम करण्याचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी जाहीर केले. पंडितजी नुसतेच बोलले नाहीत तर त्यांनी या आपल्या कल्पनेचा पाठपुरावासुद्धा केला. या विद्यापीठासाठी पं. मदनमोहन मालवीय यांनी अनेक वर्षे निधीसंकलन केले. पंडितजींच्या अशाच एका भागवतावरील प्रवचनानंतर भरवलेल्या दरभंग्याच्या महाराजांनी पंचवीस लाखांची देणगी या विद्यापीठाला दिली. ब्रिटिश पार्लमेंटने या विद्यापीठाच्या स्थापनेचा कायदा ‘बीएचयू अ‍ॅक्ट १९१५’ मंजूर केला. विद्यापीठ सुरू करण्याची सज्जता झाल्यानंतर अ‍ॅनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखालील समारंभात गांधीजींच्या हस्ते ४ फेब्रुवारी १९१६ रोजी या विद्यापीठाचे उद्घाटन झाले. विद्यापीठाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी
पं. मालवीय यांनी यमुनेच्या तीरावर दीड कोटी गायत्री मंत्राचे पुनश्चरण केले होते. पं. मदनमोहन मालवीय या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले व पुढील दीड तपे या पदावर राहिले. त्यांच्या नंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् या विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले. त्यांच्या कुलगुरू पदाच्या कारकीर्दीत या विद्यापीठाचा सर्वागीण विकास झाला. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वर्ग, खेळण्यासाठी मैदाने, पोहण्याचे तलाव, टेनिस कोर्ट, प्रयोगशाळा सहलीसाठी हजारो एकरवर पसरलेली वनराई हे सर्व या विद्यापीठात आहे. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वडील विष्णू वा. नारळीकर हे या विद्यापीठाचे गणित विभाग प्रमुख होते. साहित्य अकादमीने या वर्षीच्या सन्मानित पुस्तकांच्या यादीत समावेश असलेल्या जयंत नारळीकर यांच्या ‘चार नगरातील माझे विश्व’ या आत्मचरित्रात त्यांच्या जडणघडणीत असलेल्या या विद्यापीठाच्या योगदानाचे ऋण मान्य केले आहे.
मदन मोहन मालवीय यांनी काँग्रेस कधीही सोडली नाही. आयुष्याच्या अखेपर्यंत ते काँग्रेसमध्येच होते. तरीही त्यांना कधीही निधर्मी असल्याचा मुखवटा धारण करावा लागला नाही. काँग्रेसमध्ये असताच त्यांनी हिंदू महासभेची स्थापना केली. ‘हिंदू संघटना’ व ‘शुद्धी’ हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. त्यांनी तीन वेळा ‘शुद्धियज्ञा’चे आयोजन केले होते. अत्यंत सोप्या धर्मविधीने हजारो अस्पृश्यांना त्यांनी सवर्णाचा दर्जा प्राप्त करून दिला. तरुणपणात ते ‘मकरंद’या नावाने कविताही करीत असत. पत्रकारिता हा युगधर्म आहे असे त्यांचे मत होते. ‘हिंदुस्थान’, ‘अभ्युदय’, ‘मर्यादा’ या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले. तत्कालीन इंग्रज सरकारने वृत्तपत्रविषयक ‘प्रेस अ‍ॅक्ट’मध्ये १९०८ साली जाचक तरतुदींचा समावेश केला तेव्हा या विरुद्ध त्यांनी परिषद आयोजित केली होती. या चळवळीत त्यांना इंग्रजी वर्तमानपत्र हाताशी असण्याची आवश्यकता भासल्याने त्यांनी ‘लीडर’ हे वर्तमानपत्र मोतीलाल नेहरूंच्या साहाय्याने सुरू केले व पहिली दोन वर्षे त्याचे संपादन केले. १९२४ मध्ये त्यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ हे वर्तमानपत्र बॅ. मुकुंदराव जयकर व घनश्यामदास बिर्ला यांच्या साहाय्याने सुरू केले. १९२४ पासून १९४६ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत हे वर्तमानपत्र चालविणाऱ्या कंपनीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याच प्रयत्नाने १९३६ मध्ये या वर्तमानपत्राची हिंदी आवृत्ती ‘हिंदुस्थान’ नावाने सुरू झाली.

Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Muslim Students Learning Sanskrit Video:
हिंदू मंदिरात पुजारी होण्यासाठी मुस्लिम विद्यार्थी घेतायत संस्कृतचे धडे? Video तुन सावधानतेचा इशारा पण? खरं..
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

20काँग्रेसच्या अधिवेशनात सहज मांडलेल्या बनारस विद्यापीठाच्या कल्पनेला  किती तरी पट अधिक प्रतिसाद लाभला. असे विद्यापीठ स्थापन झाले तर या विद्यापीठात आजन्म विनावेतन प्राध्यापक म्हणून काम करण्याचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी जाहीर केले.

चौराचौरा प्रकरणाशिवाय त्यांच्या चरित्रकथेचा आढावा पूर्ण होणार नाही. १८८१ पासून मालवीय यांनी अलाहाबाद जिल्हा न्यायालयात वकिलीला प्रारंभ केला. १८९१ पासून अलाहाबाद हायकोर्टात ते वकिली करू लागले. चौराचौरा प्रकरणात खालच्या कोर्टाने स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दोनशे पंचवीस क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली होती. प्रकरण अपिलात दाखल झाल्यानंतर या दोनशे पंचवीस आरोपींच्या वतीने मालवीय केस लढले व १५३ आरोपींची फाशी रद्द झाली. समाजकारण करण्यासाठी उत्तम चालणारी वकिली त्यांनी सोडली. १२ नोव्हेंबर १९४६ या दिवशी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली.
इतिहासात रमणाऱ्याला भविष्यकाल नसतो, असा विचारप्रवाह मानणाऱ्यांचा एक समूह समाजात आहे. इतिहासाची आपल्या सोयीने मोडतोड करणारे लोक मोठय़ा संख्येने भारताच्या राजकीय क्षितिजावर दिसत आहेत. जो भारतीय जनता पक्ष ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी निवडणूक घोषणा देत सत्ता सोपान चढला त्या पक्षाला आपल्या पक्षाच्या पहिल्या पंतप्रधानांसोबत ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी १९०९ साली लाहोर, १९१८ साली दिल्ली १९३२ साली पुन्हा दिल्ली व १९३३ साली कलकत्ता असे चार वेळा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या व्यक्तीची निवड करावी लागली हे वास्तव आहे. सरदार पटेलांपासून ते महात्मा गांधींपर्यंत ज्या ज्या नेत्यांचा आपल्या राजकीय स्वार्थापोटी भाजप उपयोग करून घेत आहे ते सर्वच कधी काळी काँग्रेस पक्षात होते हे सत्य नरेंद्र मोदी व त्यांचा गोतावळा दृष्टिआड करीत असला तरी त्याने इतिहास बदलणार नाही. या महापुरुषांनी देशासाठी दिलेले योगदान वर्तमानातील राज्यकर्त्यांना विसरून चालणार नाही. घरवापसी, राम मंदिर, संस्कृतचा आग्रह हा छुपा जाहीरनामा राबवून दुही माजविण्यापेक्षा ज्या निवडणूक जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून मतदारांनी आपल्याला सत्तेचा मार्ग दाखविला त्या ध्येयधोरणांचा आग्रह धरून त्यांचा पाठपुरावा करणे हा बोध भाजपने ‘भारतरत्न’च्या निमिताने घेतला तरी भाजपचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल.