मुंबईत विलेपार्ले येथे नुकतेच डॉ. मंदार जोशी यांच्या ‘औषधी विश्वकोश’ या आयुर्वेदिक औषधांची सखोल माहिती देणाऱ्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यानिमित्त-

‘औषधी विश्वकोश’ या संदर्भग्रंथाचे लेखक डॉ. मंदार राजाराम जोशी हे विलेपाल्रे (पूर्व) येथे गेल्या २२ वर्षांपासून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत. ते मूळचे कोकणातले. त्यांचे शालेय शिक्षण विलेपाल्रे येथील ‘पाल्रे टिळक विद्यालयात’ झाले. त्या वेळेस आपण होमिओपॅथीचे डॉक्टर होऊ हे त्यांच्या स्वप्नीही नव्हते. खरे तर ‘वाणिज्य’ शाखेचे एक वर्ष पूर्ण करून ते होमिओपॅथीकडे योगायोगानेच वळले.
डॉ. जोशींच्या घरी आयुर्वेदाचा वारसा होता. त्यांच्या आजोबांना आयुर्वेदाची माहिती होती. त्यांच्यानंतर त्यांच्या आजींनी देखील तो वारसा जतन केला. त्या स्वत: अनेक आयुर्वेदिक औषधे तयार करत असत. तोच संस्कार डॉ. जोशींच्या मनात कुठेतरी रुजला असावा. त्याचेच पर्यवसान पुढे त्यांनी ‘होमिओपॅथी’ निवडण्याकडे झाले.
२००३ साली डॉ. अरुण टिकेकर डॉ. जोशींच्या संपर्कात आले आणि त्यांनी डॉ. जोशींना ‘औषधी’ हा स्तंभ लिहिण्यास सुचवले व हे काम वाटते तितके सोपे नाही, अशीही पुस्ती जोडली. पण डॉ. मंदार जोशींनी ते आव्हान पेलायचे ठरवले. त्या अगोदरही त्यांचे विविध वृत्तपत्रांमधून लेखन सुरूच होते. २००१ साली त्यांचे एक पुस्तकही श्री विद्या प्रकाशनने काढले होते. हा स्तंभ लिहिता लिहिता अगदी लहानपणापासून डोक्यात घर करून असलेले औषधींविषयक अनेक प्रश्न नव्याने समोर आले. काही नवीन प्रश्न मनात निर्माण झाले. याचे कारण बऱ्याचशा विषहर गोष्टी या औषधी म्हणून वापरात येत होत्या. त्यामुळे अस्वस्थता वाढली.
या अस्वस्थतेतूनच ‘औषधी विश्वकोश’ या ग्रंथाची निर्मिती झाली. आपल्या रोजच्या वापरातील आणि आजूबाजूला आढळणाऱ्या अनेक औषधींच्या अनेक औषधींचा या पुस्तकात खूप विस्तृत अभ्यास केला आहे. यात जवळजवळ १५१ औषधींची संपूर्ण व्याप्ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातल्या औषधी या स्वतंत्रपणे एखाद्या रुग्णाचे बरेचसे आजार बरे करण्याची क्षमता बाळगतात.
डॉ. मंदार जोशी यांनी प्रयत्नपूर्वक अशा औषधी निवडलेल्या आहेत की ज्या कुठल्या ना कुठल्या औषधोपचार पद्धतीत जसे अ‍ॅलोपॅथी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, चिनी औषध पद्धती, युरोपियन औषध पद्धती किंवा जुन्या अमेरिकेतील रेड इंडियन, प्राचीन अरबी किंवा भूमध्य समुद्राच्या तीरावरील कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या उपचारपद्धतींमध्ये वापरल्या गेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पद्धतीत याचा वापर मानवी शरीर संस्थांमधील वेगवेगळय़ा व्याधींवर झाला आहे. प्रत्येक औषध पद्धतीने आपल्याकडील पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या आजारांवरच ही औषधी वापरली आहे. त्यामुळे त्या औषधीची ओळख मर्यादित स्वरूपातच होती.
डॉ. मंदार जोशी यांनी याच विचाराने प्रेरित होऊन हा संदर्भग्रथ लिहिण्याचे ठरवले. या ग्रंथात त्यांनी विस्तृतपणे सर्वाची माहिती, शास्त्रीय नावे, उपलब्धता, उपयोगी भाग, आयुर्वेदिक गुणधर्म, कुठल्या तक्रारींकरिता उपयोगी, त्याचा दुसऱ्या पॅथीमधला वापर (त्याला संदर्भ असलेला संस्कृत श्लोक असा संपूर्ण आढावा घेतलेला आहे.) यात रंगीत चित्रांचाही समावेश आहे. या ग्रंथामध्ये सर्व औषधींचे तीन भागांत वर्गीकरण केलेले आहे. पहिला वर्ग खनिज आणि रसायन औषधी. दुसरा वर्ग प्राणीजन्य औषधी आणि तिसरा वर्ग वनौषधींचा आहे. खनिज आणि रसायन वर्गामध्ये जमिनीच्या भूगर्भात आढळणाऱ्या खनिजांचा, त्यांच्यापासून तयार केलेल्या संयुगांचा आणि जमिनीवर आढळणाऱ्या रसायनांचाही अभ्यास केलेला आहे. यातील बहुतांश औषधींचा रसायनशास्त्राच्या पिरीयॉडिक टेबलमध्ये समावेश आहे. आयुर्वेदात या सर्व खनिज मान्य केलेले आहे. आयुर्वेदात या सर्व खनिज रसायन औषधींचा ‘रसशास्त्र’या नवीन संकल्पनेत भरपूर उपयोग केलेला आहे.
प्राणिजन्य औषधींमध्ये जमिनीवर चालणाऱ्या चतुष्पाद प्राण्यांपासून समुद्रातील मासे, िशपले, शंख, प्रवाळ, गोगलगायी, साप यांच्यापर्यंत आणि आसमंतात स्वैर उडणाऱ्या मधमाशी, तेलीनी माशी यांचा समावेश आहे.
शेवटचा मोठा वर्ग आहे तो म्हणजे वनौषधींचा. यामध्ये आपल्या स्वयंपाकघरातील कांदा, आले, लसूण, दूध, भोपळा यांच्यापासून ते बरीचशी फळे आणि सुवासिक वनस्पती यांच्यापर्यंत तसेच आणि विषारी आणि अति उन्मादक अशाही औषधींचा अभ्यास केला आहे. यातील बहुतांशी आपल्या ओळखीच्या आहेत आणि नसतील त्यांची नव्याने ओळख होईल याची लेखकाला खात्री आहे. त्यांची या सर्व माहितीवरून त्या प्रत्येक औषधीची मानवी शरीरातील सर्व आजार व त्याची लक्षणे बरी करण्याची क्षमता विस्तृत करण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे करण्यात आला आहे. हा विश्वकोष ‘आजीबाईचा बटवा’ नाही हे डॉ. मंदार जोशी आग्रहपूर्वक सांगतात. हा ‘संदर्भग्रंथ’ आहे. तो काळजीपूर्वक वाचून आपल्याला नेमके त्यातले काय लागू पडू शकते याचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचा आपल्या जीवनात उपयोग करायचा आहे. हा ग्रंथ मात्र आपल्याला विचार करायला आणि अभ्यासासाठी प्रवृत्त करायला नक्कीच उपयुक्त ठरतो, अशी या ग्रंथाची मांडणी डॉ. जोशींनी केलेली आहे.
हा विश्वकोश Inking Iinnovations ने प्रकाशित केला आहे. या पुस्तकाला अस्थिशल्य विशारद डॉ. के. एच. संचेती यांची प्रस्तावना आहे. पंधरा वष्रे अथक प्रयत्न आणि अभ्यासातून हा मौलिक संदर्भग्रंथ निर्माण झाला आहे. भारताला आणि मुख्यत्वे करून महाराष्ट्राला ज्ञानकोशाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. त्या पाश्र्वभूमीवर डॉ. मंदार राजाराम जोशी यांचा हा ग्रंथ घराघरांत पोहोचायला हवा.