‘बाहुबली’ म्हणजेच ज्याचे बाहू सर्वाधिक बलवान आहेत. कर्नाटक राज्याच्या हसन जिल्ह्य़ात श्रवणबेळगोळ येथे सन ९८३ मध्ये गंगा राजवटीतील चामुण्डराय याने बाहुबलीच्या ५७ फूट उंच एकाच दगडात बनविलेली भव्य मूर्ती उभारली. जैन धर्मीयांचे पहिले र्तीथकर ऋषभ यांच्या शंभर मुलांपैकी दुसरा मुलगा याचे नाव बाहुबली. आपला भाऊ भरत चक्रवर्ती यांच्याशी युद्ध जिंकून बाहुबली जगज्जेता बनू शकला असता. परंतु त्याने जिंकल्यानंतरही सगळे राज्य परत केले आणि तो दिगंबर साधू बनला. स्वार्थ, अहंकार, क्रोध, मत्सर यावर बाहुबलीने विजय मिळविला. ही सगळी कथा सांगण्याचे कारण म्हणजे सुप्रसिद्ध राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक-दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी ‘बाहुबली द बीगिनिंग’ या नावाचा अतिभव्य, देशातील सर्वात महागडा, सिनेमा बनविला असून तो १० जुलै रोजी तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
बाहुबलीच्या कथेप्रमाणेच या चित्रपटातही बाहुबली त्याच्या भावासोबत युद्ध करतो असे कथानक आहे. चित्रपटाच्या यूटय़ूबवरील ट्रेलरला ३१ लाख वगैरे हिट्स मिळाल्या आहेत.
हा चित्रपट मुख्यत्वे दाक्षिणात्य असेल. कारण अमरेंद्र बाहुबली या प्रमुख भूमिकेत तेलुगू अभिनेता प्रभास झळकणार आहे. तर ज्या भावाशी बाहुबलीचे युद्ध होते त्या भल्लाला देव या भूमिकेत आणखी एक तेलुगू अभिनेता राणा दग्गूबाती पाहायला मिळणार आहे. तर तेलुगू आणि तामिळ चित्रपटांची अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही देवसेना या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर तेलुगूबरोबर हिंदी सिनेमात काम करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया ही अवंतिका या भूमिकेत झळकणार आहे. सुदीप हा कन्नड अभिनेता, नाझर आणि सत्यराज हे तामिळ अभिनेते अशी सगळी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणारी मंडळी या सिनेमात आहेत.
या चित्रपटाचा पहिला भाग ‘बाहुबली दी बीगिनिंग’ हा तब्बल १७५ कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आल्याने हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महागडा सिनेमा मानला जाण्याची शक्यता आहे एवढेच याचे वैशिष्टय़ नाही तर त्याचबरोबर अ‍ॅरि अ‍ॅलेक्सा एक्सटी कॅमेऱ्यावर हा सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले आहे. तेलुगू आणि तामिळ अशा दोन भाषेत हा सिनेमा तयार करण्यात आला असून मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. हिंदी भाषेतील सिनेमाचा सादरकर्ता करण जोहर आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते संगीतकार एम. एम. किरावाणी यांनी संगीत दिले आहे. तर कला lp89दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते कला दिग्दर्शक साबू सिरील यांनी केले आहे.
गाजलेल्या अमर चित्र कथा कॉमिक्स बुक्सच्या मालिकेतील व्यक्तिरेखांकडून व्यक्त झालेल्या भावभावनांचे प्रकटीकरण आपल्या या सिनेमात पाहायला मिळेल असे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी म्हटले आहे. सातत्याने ९ सुपरहिट सिनेमांचे लेखन-दिग्दर्शक म्हणून एस. एस. राजामौली लोकप्रिय ठरले आहेत. लहानपणापासून अमर चित्र कथा कॉमिक्स वाचण्याची आवड  होती. या सिनेमाचे लेखन आपले वडील के. विजयेंद्र प्रसाद यांनी आठ वर्षांपूर्वीच बाहुबली या प्रमुख व्यक्तिरेखेचे लेखन केल्याचे राजामौली यांनी म्हटले आहे. संपूर्ण कथा लिहिण्यासाठी तीन महिने कालावधी लागला. तर सिनेमाची संकल्पना तयार झाल्यानंतर त्यासाठी लागणारी स्केचेस काढणे, सेट्स उभारणे या सगळ्या कामासाठी तब्बल अडीच वर्षे कालावधी लागला आहे. सिनेमा १० जुलैला प्रदर्शित केला जाणार असला तरी आजघडीलाही या सिनेमाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सचे काम सुरू असल्याचेही राजामौली यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. सिनेमा माध्यमाचे मर्म सांगताना ते या मुलाखतीत म्हणतात की, पहिली २० मिनिटे सिनेमाचे कथानक आणि प्रमुख व्यक्तिरेखा कोणत्या दिशेने जाणार याचे सूचन करून कथासूत्र अतिशय रोचक पद्धतीने मांडावे लागते. पहिली २० मिनिटे प्रेक्षकांना खिळवून ठेवले तरच सिनेमात प्रेक्षक गुंततो. त्यानंतरच्या अखंड सिनेमात उत्तम वेशभूषा, भव्य सेट्स, भावभावनांचा उत्तम खेळ, उत्तम छायालेखन सारे काही उत्तम असले तरी त्याचा सिनेमाला फायदा होणे कठीण असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी सीक्वेल प्रदर्शित करण्याचा चित्रपटकर्त्यांचा मानस आहे.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com