भोपाळमधली वायुगळती या मानवनिर्मित आपत्तीचे पडसाद सिनेमाच्या जगात तब्बल तीस वर्षांनी उमटले आहेत ते ‘भोपाल: ए प्रेयर फॉर रेन’ या चित्रपटातून. विविध महोत्सवांतून पारितोषिकं मिळवणारा हा सिनेमा ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

भोपाळ वायू दुर्घटना ही २ व ३ डिसेंबर १९८४ रोजी घडली होती. जगातील सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटना म्हणून या दुर्घटनेची नोंद घेण्यात आली असून, यात एका रात्रीत तब्बल १० हजार निष्पाप लोक गतप्राण झाले. वॉरन अ‍ॅण्डरसन यांच्या भोपाळ येथील युनियन कार्बाइड कंपनीतील मिथाइल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले, तर तेवढेच लोक कायमचे जायबंदी झाले. या भयावह मानवनिर्मित दुर्घटनेचे पडसाद सगळ्या जगभर उमटले आहेत. तब्बल ३० वर्षांनंतर या विषयावर ‘भोपाल : ए प्रेयर फॉर रेन’ हा चित्रपट रवी कुमार यांनी बनविला असून ५ डिसेंबर रोजी तो प्रदर्शित केला जाणार आहे.

१९८४ मध्ये बालपणात असलेल्या आणि त्यानंतर जन्मलेल्या पिढीसमोर या दुर्घटनेचे वास्तव हिंदी चित्रपटाद्वारे दाखविण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक रवी कुमार आणि निर्माता रवी वालिया यांनी केला आहे.

युनियन काबाईडचा प्रमुख वॉरन अ‍ॅण्डरसनच्या भूमिकेत मार्टिन शीन हा अमेरिकन अभिनेता दिसणार असून, भारतीय वंशाचा अमेरिकन अभिनेता काल पेन हाही या चित्रपटात मोटवानी ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

भोपाळमधील एका रिक्षावाल्याच्या नजरेतून चित्रपट उलगडण्यात आला आहे. रिक्षा चालविण्यापेक्षा युनियन कार्बाइडमध्ये नोकरी मिळाली तर अधिक पैसे मिळतील आणि बहिणीचे लग्न करण्यासाठी पैसा उभा राहील या विचाराने दिलीपच्या भूमिकेतील राजपाल यादव कामगार म्हणून युनियन कार्बाइडमध्ये नोकरीला लागतो. कामगार म्हणून काम करीत असताना सुरक्षितताविषयक अनेक कमतरता त्याला जाणवतात, परंतु दोन पैसे गाठीशी येत असल्यामुळे तो गप्प राहतो. मिशा बार्टन या इंग्लिश-आयरिश अभिनेत्रीने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. भोपाळ वायू दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा शोध घेणारी पत्रकार अशी तिची महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे.

भोपाळ वायू दुर्घटना घडण्याच्या आधीसुद्धा स्थानिक पत्रकार मोटवानी हा युनियन कार्बाइडच्या प्रकल्पामधील त्रुटी, सुरक्षितताविषयक खबरदारीमधील कमतरता या गोष्टी जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो, असेही या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. युनियन कार्बाइड कंपनीने आपला प्रकल्प मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातच उभारण्याचे का ठरविले, यामध्ये कोणता हेतू होता, हे संवेदनशील पद्धतीने दाखवितानाच १९७० साली ही कंपनी उभी राहिली, तेव्हा भोपाळमधील गरिबीने पिचलेल्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्याच गावात राहूनही आपली गरिबी दूर करण्यासाठी या कंपनीत नोकरी मिळवून थोडेसे अधिक पैसे गाठीशी बांधण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे लोकांना वाटले होते. या चित्रपटाची काही वैशिष्टय़े आहेत. एक तर हा माहितीपट नव्हे तर चित्रपट आहे. फक्त वायू दुर्घटना, त्याचे परिणाम, लोकांचे मृत्यू हेच फक्त न दाखविता दिग्दर्शकाने त्या काळात भोपाळमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे जीवन, त्यांचे जगणे, त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा, त्यांचा रोमान्स, त्यांचे विरंगुळ्याचे क्षण, कचरा-दरुगधी-भंगाराचा माल आजूबाजूला असूनही त्यात मजेत खेळणारी मुले असे जीवन टिपण्याचा संवेदनशील प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे भोपाळ वायू दुर्घटनेच्या पलीकडे जाऊन चित्रपट म्हणून ‘भोपाल : ए प्रेयर फॉर रेन’ला विविध चित्रपट महोत्सवांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत. दु:खद, भयंकर दुर्घटना दाखविणे केवळ हाच हेतू दिग्दर्शकाने ठेवलेला नाही. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रवी कुमार या भारतीय दिग्दर्शकाने पाश्चात्त्य दृष्टिकोनातून चित्रपट केलेला नाही, हेही महत्त्वाचे मानावे लागेल.

आजच्या पिढीला चित्रपटाद्वारे एका भयावह दुर्घटनेचे सत्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. दिलीपची पत्नी लीला ही भूमिका तनिष्ठा चटर्जीने साकारली असून, अखिल मिश्रा यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत.