स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करूनही बाजारपेठेत नाडल्या जाणाऱ्या ग्राहकाला स्वत:च्या हक्कांविषयी जागरूक करणाऱ्या, त्याला ‘ग्राहकराजा’चे स्थान मिळवून देणाऱ्या, ग्राहक चळवळीचे सर्वेसर्वा बिंदुमाधव जोशी यांच्याविषयी-

बिंदू माधव जोशी, सामान्यातले एक असामान्य व्यक्तिमत्त्व! सामान्य अशासाठी म्हणायचे की ज्या ग्राहकाला स्वत:चे अस्तित्वच नव्हते अशा ग्राहकांमधले एक. म्हणजे बिंदुमाधव जोशी एक सामान्य ग्राहक. आणि असामान्य अशासाठी की याच सामान्य ग्राहकाला त्यांनी आज ‘ग्राहक’ म्हणून समाजात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे म्हणून ते असामान्य. इतके मोठे की जागतिक स्तरावर भारतीय ग्राहकांची, ते करत असलेल्या कामांची दखल घेतली जात आहे, नव्हे जगाला ती घ्यावी लागत आहे.
कालच्या नगण्य असलेल्या ग्राहकांसाठी आज केंद्र शासनात एक स्वतंत्र खाते उघडणे सरकारला भाग पडले आहे इतका मोठा सन्मान बिंदुमाधव जोशी ऊर्फ नानांनी ग्राहकांना मिळवून दिला आहे. यामागे नानांची प्राथमिक भूमिका समजावून घेणे उचित ठरावे.
१९६७-६८ पासून ‘ग्राहक’ या समाजातील सर्वात महत्त्वाच्या घटकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा विडाच नाना आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी उचलला. त्यामध्ये विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. त्यात बाळासाहेब देवरस, सुधीर फडके, भाऊसाहेब पोरे, सूर्यकांत पाठक, भीमराव खेडकर वगैरे मंडळी होती. बाजारात ग्राहकांची होणारी फसवणूक, पिळवणूक आणि त्यामुळे ग्राहकांचा हरविलेला आत्मविश्वास या सर्व गोष्टी नानांना अस्वस्थ करत होत्या. ग्राहकांना फसविणाऱ्या इतर घटकांना हात-पाय तोडण्याची शिक्षा देणारा, चंद्रगुप्त मौर्य राजाच्या दरबारातील महत्त्वाचे पद भूषविणारा आर्य चाणक्य (ग्राहकांचा कैवारी) हे त्यांचे दैवत होते.
बिंदुमाधव जोशी यांचे उमदे, भारदस्त व्यक्तिमत्त्व, प्रभावी वक्तृत्व, शब्दांवर असलेले प्रभुत्व, प्रखर आत्मविश्वास आणि ग्राहक या घटकाबद्दल असलेली तळमळ यामुळे ग्राहकांच्या उद्धारासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्यातूनच ‘ग्राहक चळवळ’ ही संकल्पना उदयास आली आणि म्हणता म्हणता तिने उग्र स्वरूप धारण केले. ग्राहक चळवळ उभारताना एकत्रित प्रयत्न करता यावेत यासाठी संस्था स्थापन होण्याची गरज त्यांना भासू लागली. त्यांची मन:शक्ती इतकी जबरदस्त होती की त्यांनी ही कल्पना रा.स्व.सं.सरसंघचालक बाळासाहेब देवरस, सुधीर फडके, भाऊसाहेब पोरे वगैरे कार्यकर्त्यांपुढे मांडली ती त्यांना पटवलीही. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. सी. छागला, एस. एम. जोशी, अण्णासाहेब सहस्रबुद्धे आणि सर्वोदय चळवळीचे उद्गाते खुद्द जयप्रकाश नारायण या दिग्गजांनीही या कल्पनेचे स्वागत केले आणि ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ या संस्थेचे जय प्रकाश नारायण यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले. अनेक कार्यकर्ते त्यांना मिळाले. या कार्यकर्त्यांचे जाळेच नानांनी संपूर्ण भारतभर पसरवले. त्यांनी भारतभर अनेक शाखा काढल्या. संपूर्ण भारतातील ग्राहकांना वाली मिळाला आणि ही ग्राहक चळवळ जोमाने फुलली. अनेकांचे आशीर्वाद तिला मिळाले.
नानांची एक त्रिसूत्री होती तिचा उच्चार ते नेहमीच आपल्या भाषणात करीत असत. ती त्रिसूत्री म्हणजे वस्तूच्या उत्पादनात वाढ, वितरणात समानता, उपभोगावर संयम. या त्रिसूत्रीचा उपयोग करून नानांनी सर्व कार्यकर्त्यांना हाती घेऊन ग्राहकांसाठी, त्यांना त्यांचे हक्क- कर्तव्ये समजावेत, त्यांचा त्यांनी रोजच्या व्यवहारात उपयोग करून आपली होणारी फसगत आपणच टाळावी, पुढे जाऊन ग्राहकांनी समाजात मानाचे स्थान मिळवावे म्हणून राष्ट्रव्यापी दौरे काढले, ठिकठिकाणी शिबिरे घेतली आणि ग्राहकांच्यातला ‘हम भी कुछ कम नहीं’ हा आत्मविश्वास वाढवला.
या ग्राहक चळवळीचा एवढा बोलबाला झाला तरी, ग्राहकांना व्यवहारात न्याय म्हणून मिळत नव्हता. मिळालेल्या न्यायाची तड लागत नव्हती तेव्हा नानांना नवी कल्पना सुचली ती म्हणजे ग्राहकांसाठी त्यांच्या ‘हक्कांचे संरक्षण व्हावे’ म्हणून नवीन कायदा का अस्तित्वात येऊ नये? मग त्यासाठी प्रयत्न करून अनेक विधितज्ज्ञांना हाताशी धरून ‘ग्राहक संरक्षण कायदा’ तयार करून तो अस्तित्वात आणण्यासाठी नानांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी भगीरथ प्रयत्न केले (या कार्यात या संस्थेबरोबरीने काम करणाऱ्या मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेचीही मदत झाली) आणि नानांच्याच सांगण्याप्रमाणे लोकसभेत सर्वात कमी सदस्य संख्या असताना हा कायदा संमत झाला. (कारण तुम्हाला कळलेच असेल की या कायद्यातील तरतुदीनुसार सरकारच्या पदरात काहीच पडणार नव्हते) हा कायदा ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा असल्याने वस्तू उत्पादक आणि सेवाचालक यांचे धाबे दणाणले. हा कायदा पूर्णपणे ग्राहकांच्याच बाजूने असल्याने आता ग्राहकांचे शोषण थांबविण्याचे नवे शस्त्रच ग्राहकांच्या हाती मिळाले होते. ग्राहकांची जरब आता या मंडळींवर बसणार होती. महत्त्वाचे म्हणजे या कायद्यातील अनेक तरतुदींनुसार शासनाला कोणत्याही प्रकारे लाभ होणार नव्हता. कारण या कायद्यातील तरतुदीनुसार जी ग्राहक न्यायालये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्थापन होणार होती, ती न्यायालयसदृश न्यायालयीन व्यवस्था असणार होती. त्यामुळे न्यायालयाचे कोणतेच नियम या न्यायालयांना लागू असणार नव्हते. ना कोर्ट फी ना कसली फी आणि महत्त्वाचे म्हणजे या कायद्यातील तरतुदीनुसार सरकारला इतर बाबतीत दंडाच्या रूपाने जे उत्पन्न मिळते तसे काहीही उत्पन्न मिळणार नव्हते, कारण ते ‘त्या ग्राहकालाच भरून मिळावे’ अशी तरतूद या कायद्यात आहे आणि म्हणूनच हा कायदा संमत होण्यासाठी अनेक अडचणी, अनेक दबाव (राजकीय तसेच उत्पादक आणि सेवाचालक यांचे) येत होते. पण त्यातून तावूनसुलाखून निघालेला आणि एखाद्या चळवळीतून आलेला हा असा पहिलाच कायदा होता अन् हाच ग्राहक चळवळीचा मोठ्ठा विजय होता. आणि त्याचे प्रणेते बिंदुमाधव जोशी ऊर्फ नाना होते.
राजकीय पक्षांना नको असलेल्या या कायद्यातील तरतुदींमुळे ग्राहक न्यायालये स्थापन होण्यास तीन ते साडेतीन वर्षे लागली. २४ डिसेंबर १९८६ मध्ये हा केंद्रीय कायदा पारित झाला पण न्यायालये स्थापन होण्यास तीन वर्षे मध्ये जावी लागली आणि सुरुवातीला केवळ ५-६ जिल्ह्यंत रडतखडत सुरू झालेली ही न्यायालये हळूहळू बंद पडली तर पुन्हा नाना, त्यांचे कार्यकर्ते आणि मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते (मधुकररावमंत्री, सुधीर फडके, अशोक रावत, शिरीष देशपांडे वगैरे) यांच्या अथक प्रयत्नाने ही न्यायालये १९९७ मध्ये मात्र जोमाने सुरू झाली आणि या वेळेस उच्चाधिकार समिती सरकारतर्फेच नेमण्यात आली. तिचे अध्यक्षपद मिळण्याचा मान नानांना मिळाला. जो काम करतो त्याच्यामागे काम लागते, असे जे म्हणतात ते नानांच्या बाबतीत अगदी खरे ठरले. संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायालयातील दोन सदस्य आणि एक अध्यक्ष (या तिनांपैकी एक महिला) यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही नानांनी अतिशय कौशल्याने पेलली. ग्राहक न्यायालयाचे ‘अध्यक्ष’ सोडले तर इतर सदस्य विधितज्ज्ञ नसावेत पण त्यांना ग्राहकांच्या प्रश्नांची आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची भरपूर जाण असलेला कार्यकर्ताच सदस्य असावा, अशी तरतूदच या कायद्यात असल्याने, सर्वाना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही नानांनी इतरांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पाडली. त्यासाठी ‘यशदा’ या सरकारी संस्थेत एक शिबीर घेतले, एक वर्षांचा अनुभव या सदस्यांना मिळाल्यावर शेगांवलाही या मंचावरील कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी दुसरे शिबीर घेतले. (कायदेतज्ज्ञांशिवाय न्यायालय ही संकल्पनाच अविश्वसनीय आहे, पण ती नानांच्या प्रयत्नाने प्रत्यक्षात उतरली) आणि त्याचा परिणाम जास्तीत जास्त ग्राहकांना न्याय मिळण्यात झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रात ४० जिल्हा मंच कार्यरत असण्याचे बरेचसे श्रेय नानांकडे जाते.
अशा या ‘ग्राहक’वेडाने पछाडलेल्या नानांचा जन्म २१ सप्टेंबर १९३१ या गणेश चतुर्दशीच्या दिवशी पुणे येथे झाला असून लहानपणीच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले होते. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, एकनाथजी रानडे वगैरे दिग्गजांशी जवळून आलेला संबंध यामुळे नानांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. तसेच महाविद्यालयीन जीवनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन चरित्र वाचनाने ते अतिशय भारावून गेले आणि आपणही सामाजिक उत्थापनाचे कार्य करायचे, असा दृढ संकल्पच त्यांनी त्या वयात केला आणि त्याप्रमाणे त्यांनी आपले संपूर्ण जीवन ग्राहकांच्या उत्थापनासाठी अर्पित केले.
नानांनी दोन संसार केले. एक म्हणजे सर्वसामान्यांसारखा. तो होता पुण्याच्या कसबा पेठेतील त्यांच्या ‘पसायदान’ या घरात आणि दुसरा अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संस्थेशी! मुख्य म्हणजे हे दोन्ही अगदी सुखाचे आणि यशस्वी झाले!
भारतातील समस्त ग्राहकांना स्वत:च्या तपश्चर्येने ‘ग्राहक पंचायत’ नावाचे कवचकुंडल देणारे नाना, आज अनंताच्या प्रवासाला निघून गेले खरे पण त्यांनी ग्राहकवर्गाला दिलेला आत्मविश्वास, कणखरपणा पुढे टिकवून ‘ग्राहक राजा’ ही बिरुदावली मिरविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करणे हीच नानांना खरी श्रद्धांजली ठरेल!
वनमाला मंजुरे

gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघा सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री पुरुष समानतेचे उदाहरण