त्या दिवशी उशीर झाला होता. धावत पळतच स्टेशनवर पोहोचले आणि समोर आलेल्या गृहस्थांना विचारले, ‘‘लेडीज स्पेशल गेली का?’’

ते पटकन म्हणाले, ‘‘हो, आत्ताच गेली. प्लॅटफॉर्मवरचा कलकलाट थांबल्याचं जाणवत नाही का?’’ मला त्यांचा रागच आला. बायकांची ट्रेन म्हणजे कलकलाट काय? जरा डोकावलात म्हणजे कळेल, कितीतरी जणींच्या आयुष्याचा, संसाराचा आधार आहे तो. कितीतरी जणींसाठी कुटुंब आहे ते. कितीतरी जणींसाठी काऊन्सेिलग सेंटर आहे ते.
बदलापूरच्या साठय़ेआजी. वयाची साठी पार केलेल्या. परवा ट्रेनमध्ये सगळ्यांनी मिळून पारंपरिक पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला. अगदी औक्षण करून, गोड भरवून, मोगऱ्याचा गजरा व खणा-नारळाने ओटी भरून. त्यांचे पाणावलेले डोळे सगळं काही बोलून गेले. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशी स्थायिक झाला होता. त्याचं म्हणणं- तुम्ही तिथलं सगळं विकून इथे अमेरिकेत या. रेल्वेतून रिटायर झाल्यावर साठय़ेआजोबांनी बदलापूरला एक छोटासा बंगला बांधला होता. दोघांनी मिळून बंगल्याभोवती सुरेख बाग फुलवली होती. गिरगावात दोन खोल्यात उभं आयुष्य काढल्यावर जीवनाच्या कातरवेळी त्यांना शांतता, समाधान हवे होते. ते या बंगल्यात होते. हे सगळं सोडून जायला दोघांनीही नकार दिला. आजोबांना हृदयविकाराचा झटका आला. बरीचशी साठवलेली पुंजी आधी बंगल्यात आणि नंतर आजोबांच्या आजारपणात खर्ची झाली. मानी स्वभावाच्या आजींनी मुलाला यातलं काही कळवलं नाही. आजोबांच्या औषधपाण्याचा व इतर खर्च भागवण्यासाठी त्यांनी फराळाचे पदार्थ बनवून विकायला सुरुवात केली. साठय़ेआजी साक्षात अन्नपूर्णा. त्यांच्या हाताची चव हळूहळू बदलापूर ते सी.एस.टी प्रत्येक स्टेशनावर पोहोचली. वेगवेगळ्या ऑफिसेसमधून निरोप येऊ लागले. ‘‘आजी लंच टाइमला या.’’ ऑफिसात कुणाकुणाला काय काय हवंय. आजींच्या घरगुती- लोकल व्यवसायाने त्यांना चांगलंच आíथक पाठबळ पुरवलं.
पायल- एम.बी.ए.च्या पहिल्या वर्षांला शिकणारी हुशार, चुणचुणीत मुलगी. त्या दिवशी ट्रेनमध्ये चढली तीच अस्वस्थ. रडून, रडून डोळे सुजलेले. नेहमीचा मेकअप जाऊ देत, नीट केसही िवचरलेले नाहीत. पाटीलकाकूंनी तिला मांडीवर घेतलं आणि बोलतं केलं. डोळ्यांतला पूर ओसरल्यावर म्हणाली, ‘‘मला इतक्यात लग्न नाही करायचं. शिक्षण पूर्ण करायचंय. आमच्या घरी गेले महिनाभर या विषयावरून माझा छळ चालू आहे. आईने कुठल्या तरी महाराजांना माझी पत्रिका दाखवली. त्यांच्या म्हणण्यानुसार पुढल्या दोन महिन्यांत लग्न केलं नाही तर पुढची चार वष्रे योग नाही. झालं. तेव्हापासून आई अगदी डोक्यावर बसली आहे. काय करू कळत नाही.’’
पाटीलकाकूंनी विचारलं, ‘‘तुला मुलगा पसंत आहे ना?’’
पायलची कळी खुललेली त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी पहिली. ‘‘हो काकू. डिक्टो रणबीर कपूर आहे. मला हवा तसा’’ पायल म्हणाली.
‘‘मग बोल त्याच्याशी. लग्नानंतरही शिकायला परवानगी देतोय का ते बघ. यातून दोन गोष्टी साध्य होतील. आईचं मनही दुखावलं जाणार नाही आणि तडजोड करायची त्याची किती तयारी आहे हेही कळेल.’’ -इति पाटील काकू.
पायलला त्यांचं म्हणणं पटलं आणि क्षणातच सगळ्यांनी तिला तिच्या रणबीर कपूरवरून चिडवायला सुरुवातही केली.
पहिलटकरीण मंजू. तिचं डोहाळजेवणही सगळ्यांनी कौतुकाने केलं. मंजूचा प्रेमविवाह आणि सासू साक्षात कडक लक्ष्मी. ती काही डोहाळजेवण वगरे करणार नाही याची सगळ्यांना खात्री होती. सगळ्या मत्रिणींनी मिळून तिची हौस पुरवली. तिचे आवडते मटार सामोसे, गुलाब जामून असा फक्कड बेत होता. मंजूला आयुष्यभर लक्षात राहील असा तो क्षण.
कांजूरमार्गला वीणा चढली तीच ओढलेल्या चेहऱ्याने.
‘‘काय ग काय झालं?’’
‘‘कंटाळा आलाय, कसलं हे आयुष्य? बाहेर फिरायला जाणं नाही, हौसमौज नाही. घर आणि ऑफिस यात लटकतेय नुसती. रांधा-वाढा, उष्टी-काढा या पलीकडे आहे काय?’’ वैतागून वीणा म्हणाली. तिचा नवरा मिलिटरीत होता. मोठय़ा एकत्र कुटुंबाची जबाबदारी ती एकटीने पेलते म्हणून तिचं कोण कौतुक सगळ्यांना. नवरा वर्षांतून एकदा सुट्टी घेऊन घरी येणार. जी काय हौसमौज करायची ती त्या एका महिन्यात. हौसमौज म्हणजे काय बँक अकाऊंट आहे पुरवून पुरवून वापरायला? वीणाची घुसमट तिच्या डोळ्यांवाटे बाहेर पडत होती. त्यावर रीनाचा सल्ला- ‘‘कल हाफ डे डालने का, मेट्रो में पिक्चर देखने का और भेलपुरी खाने का. अब रोना धोना बंद कर नौटंकी!’’
असे किती तरी किस्से. इथे जात, धर्म, वय, शिक्षण, हुद्दा सगळे बंध तोडून मत्री केली जाते. कपडे विकणाऱ्या बिमलालाही ‘‘क्यो बिमला, आज चमक रही है? क्या स्पेशल?’’ असं चिडवल्यावर अशिक्षित बिमलाही हसून, ‘‘मडम, वेिडग अ‍ॅनिवरसरी’’ असं उत्तर देते. मुलाला ८० टक्के मार्क मिळूनही चेहरा पडून पेढे वाटणाऱ्या सुधाला मीरा तिच्या नेहमीच्या खुमासदार शैलीत विचारते, ‘‘काय ग? तुला नि नवऱ्याला मिळून तरी एवढे होते का?’’
काय नाहीये इथे? लग्न झाल्यावर सासरी कसं वागावं याचे सल्ले, आगाऊ बॉसला जागेवर कसं ठेवायचं याचे सल्ले, रेसिपींची देवाणघेवाण, घरगुती औषधोपचार, मुलांची अ‍ॅडमिशन कुठे घ्यावी यावर सल्ले. सीरियल-नाटक-सिनेमा यांचे समीक्षण, कुठल्या दुकानात कुठला सेल चालू आहे याची माहिती. आणि हे सगळं फुकट. काय घ्यायचं, काय नाही, आपलं आपण ठरवायचं.
पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत घडय़ाळाच्या काटय़ाबरोबर धावणाऱ्या या सगळ्या जणी. घरातील वृद्धांची आजारपणं, मुलांची शिक्षणं, घराच्या कर्जाचे हप्ते, कितीही काम केलं तरी सतत तक्रार करणारा बॉस. एक ना अनेक चिंता यांना. या सगळ्या ताणतणावावर रामबाण उपाय म्हणजे लोकलमधला एक तास. हा एक तास हसत खेळत, गप्पा मारत, गाणी म्हणत घालवला म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी वेगळी ट्रीटमेन्ट कशाला घ्यायला हवी. नाही का?
भाग्यश्री अभय चाळके response.lokprabha@expressindia.com