बॉलीवूडमध्ये काही दिग्दर्शक, निर्माते यांच्या आगामी चित्रपटांची चर्चा त्या चित्रपटांच्या मुहूर्तापासूनच सुरू असते. ‘बहुचर्चित’ या गटामध्ये हमखास असण्याचे वलय आपल्या नावाभोवती आखण्यात कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच या व्यक्ती प्रयत्नात राहिलेल्या दिसतात. त्यामध्ये अग्रक्रमाने अनुराग कश्यप यांचे नाव घ्यावे लागेल. 

‘सत्या’ चित्रपटाचे लेखन तसेच ‘ब्लॅक फ्रायडे’ या १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेवरील चित्रपटामुळे अनुराग कश्यप खूपच चर्चेत आले. त्यानंतर ‘देव डी’, ‘गुलाल’, ‘नो स्मोकिंग’, ‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘दॅट गर्ल इन यलो बूट्स’, ‘अग्ली’ या चित्रपटांसाठी त्यांना समीक्षकांनी गौरविले आणि एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग त्यांनी मिळविला. स्वत: चित्रपटाच्या अनुषंगाने ‘बहुचर्चित’ राहण्यात त्यांना हातखंडा यश आले आहे. आपण करतो ते चित्रपट सर्वार्थाने वेगळे, अस्पर्शित विषयांवरील असतात आणि त्यासाठीचा प्रेक्षकवर्ग तयार करण्यातही कश्यप यांना यश मिळाले आहे, असे म्हणता येईल. ‘कल्ट फॉलोइंग’ या इंग्रजी ‘बॉम्बे टॉकीज’ या चार लघुपटांच्या एकाच चित्रपटानंतर त्यांचा ‘अग्ली’ गाजला. आता ‘बॉम्बे वेलवेट’ असे नाव असलेला कश्यप यांचा आगामी चित्रपट १५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘मुंबई फेबल्स’ या ग्यान प्रकाश लिखित इंग्रजी कादंबरीवर आधारित १९५०-१९७० च्या काळातील मुंबई शहरातील गुन्हेगारी, मुंबईचे तत्कालीन आंग्लाळलेल्या संस्कृतीचे दर्शन या चित्रपटातून घडविले जाण्याची शक्यता ट्रेलर्सवरून दिसते. मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय महानगर बनण्याकडे वाटचाल कशी सुरू झाली याचीही मुळं १९६०च्या दशकात कशी आहेत किंवा असतील याचा चित्रपटात वेध घेण्याचा प्रयत्न अनुराग कश्यप यांनी केला आहे, असेही म्हटले जात आहे.
मुंबई शहराविषयीचा हा आपला पहिला चित्रपट असून याच विषयावर एकूण तीन चित्रपट आपण बनविणार आहोत, असे ‘बॉम्बे वेलवेट’चे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी कश्यप यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ‘मुंबई ट्रायॉलॉजी’ असे वर्णन त्यांनी केले असून त्यामुळेच ‘बॉम्बे वेलवेट’विषयी कुतूहल निर्माण झाले.
जॉनी बलराज, रोझी, कैझाद खंबाटा अशी यातील व्यक्तिरेखांची नावे ट्रेलर्समुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहेत. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रणबीर कपूर, अनुष्का शर्मा ही स्टार कलावंत जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. त्यापेक्षाही अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे ती या चित्रपटातील करण जोहरच्या प्रमुख भूमिकेची. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर प्रथमच अभिनयात पदार्पण करीत असून तेसुद्धा दुसऱ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून त्याने खलनायकी छटेची भूमिका साकारली आहे. ब्लिट्झ या गाजलेल्या टॅबलॉइडचे संस्थापक संपादक रूसी करंजिया यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित अशी भूमिका करण जोहरने केली आहे, असे सांगितले जाते.
एक सर्वसामान्य माणूस मुंबईतील ‘बिग शॉट’ असामी बनण्यासाठी वाट्टेल ते करतो असा या चित्रपटाचा सारांश आहे.
मुंबईच्या इतिहासातील गुन्हेगारी जगत, १९६० च्या दशकातील मुंबईचे नागरी जीवन, उच्चभ्रू लोकांचे जीवन, त्यांची राहणी, त्यांचे विचार याचे दर्शनही चित्रपटातून घडविले जाणार आहे.
तगडी स्टारकास्ट आणि उत्तम कलावंत यांचा संयोग या चित्रपटातून दिसेल. रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर या प्रमुख कलावंतांबरोबरच के. के. मेनन, मनीष चौधरी, सिद्धार्थ बसू, रेमो फर्नाडिस, विवान शहा, रवीना टंडन, मुकेश छाब्रा, सत्यदीप मिश्रा, संदेश जाधव, शांती यांच्याही साहाय्यक भूमिका आहेत.
जुनी मुंबई दाखविण्यासाठीचे चित्रीकरण बरेचसे श्रीलंकेत करण्यात आले आहे. ९० कोटी रुपये खर्च चित्रपट बनविण्यासाठी करण्यात आला असून ३०० कोटींचा चित्रपट आपण केवळ ९० कोटींमध्ये बनविल्याचा दावाही अनुराग कश्यप यांनी केला आहे.
कथानक उलगडून सांगण्याची अनुराग कश्यप यांची वैशिष्टय़पूर्ण पद्धत यामुळेही त्यांच्या प्रत्येक चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण होत असते. ‘बॉम्बे वेलवेट’ हा चित्रपटही त्याला अपवाद नसावा असे ट्रेलर्स पाहून खात्रीने म्हणता येईल. हिंदी चित्रपट असला तरी या चित्रपटाची एक भारतीय आवृत्ती आणि एक आंतरराष्ट्रीय आवृत्ती एकाच वेळी प्रदर्शित केली जाणार आहे.
सुनील नांदगावकर