शालेय जीवनापासूनच नकाशाचे आपल्याला कुतूहल असते. अगदी भूगोल हा विषय आवडत नसला तरीही त्या पुस्तकातील नकाशे पाहायला, त्यांच्या मदतीने खेळायला आपल्याला आवडत असतं. पण हे नकाशे तयार कसे करतात, त्यांचे प्रकार कोणते, किती, नकाशांच्या अचूकतेची गरज, ते कोण तयार करतं, असे नकाशे तयार करणाऱ्यांच्या आयुष्यात घडलेले काही रंजक प्रसंग अशांवर मराठीत एक छान पुस्तक आलं आहे.
पाश्चिमात्य जगातील लोकांना आपली दैनंदिन कामे करण्यासाठी असणारी ‘ड्रॉइंग आणि मॅपिंग’ची गरज भारतीय आणि पाश्चिमात्य मानसिकतेतील फरक स्पष्ट करते. अचूकता हा भारतीयांच्या तुलनेत इतरांचा सहजस्वभाव का आहे, याचे कोडे आपल्याला उलगडते. त्यामुळे केवळ नकाशांचाच नव्हे तर त्यामागे असलेल्या संस्कृतीचा, विचाराचा आणि विचारप्रक्रियेचा ‘पट’ या पुस्तकात उलगडून दाखविला आहे.
नकाशाशास्त्र (काटरेलॉजी), धर्म आणि नकाशा यांच्यातील संबंध, वनांची माहिती देणारे टिंबर नकाशे, गिरीकंदरांचे किंवा शिखरांचे नकाशे, प्राकृतिक नकाशे आणि राजकीय नकाशे यांतील फरक, त्यासाठी घेतली जाणारी प्रमाणे, अवकाशाचे नकाशे, घटनास्थळाचे प्रमाणित नकाशे, खगोलीय नकाशे, युद्धाचे नकाशे असे विविध नकाशा प्रकार, त्यांच्या वैशिष्टय़ांसह या पुस्तकात अत्यंत ओघवत्या शैलीत समजावून सांगण्यात आले आहेत.
पण एवढेच सांगून हे पुस्तक थांबत नाहीत. भूचुंबकीय गुणधर्म आणि सजीवसृष्टीवरील त्याचे परिणाम यात नमूद करण्यात आले आहेत. कासव, मादी, अंडी आणि पिल्ले यांबाबत पुस्तकात नमूद करण्यात आलेले निरीक्षण प्राण्यांची जाणीव किती तल्लख असते आणि ते निसर्गाशी किती जोडले गेलेले असतात हे अधोरेखित करतं. सध्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरात पिक्सेल हा शब्द परवलीचा झाला आहे. पण खरोखर पिक्सेल म्हणजे काय, असे विचारले तर अभावानेच या प्रश्नाचे उत्तर अचूक मिळू शकते. ‘ईगल्स् व्ह्य़ू’ या प्रकरणात आपल्याला पिक्सेल ही संकल्पना आणि त्याची व्याप्ती लेखक महोदयांनी लक्षात आणून दिली आहे. याच प्रकरणात मलिक अंबर या सरदाराने मध्ययुगात तयार केलेल्या नकाशांचा आणि औरंगाबाद येथील सलीम अलू तलावाचा किस्सा अतिशय उद्बोधक आणि जाणिवा समृद्ध करणारा आहे.
मराठीत नकाशा या विषयावर इतके छान माहितीपर आणि रंजक लेखन फारसे झालेले नाही. या अस्पर्शित विषयात भविष्यातील कारकीर्द घडविण्याची क्षमता आहे, यात वाद नाही.
नकाशाच्या रेषांवरून चालताना- डॉ. प्रकाश  जोशी.
परम मित्र प्रकाशन आणि जवाहर वाचनालय.
पृष्ठे – १२०, मूल्य – १७५ रुपये.

विजयी मनोवृत्तीसाठी.. यशाची सूत्रे
तंत्रज्ञानाच्या मदतीने इतिहासात सर्वाधिक ‘कनेक्ट’ झालेल्या विद्यमान जगात ‘सुसंवाद’ हरवत चालला आहे, आव्हानांची संख्या चढी असल्यामुळे त्याकडे संधी म्हणून पहायचे ठरविले तरीही ते अवघड जाते. ताण वाढत जातो, आधी कष्ट की आधी यश या प्रश्नाचे उत्तर शोधताना पैसा हे एकक ठरू लागले आहे.. या पाश्र्वभूमीवर मानसिकता पराभूत होत जाणे अत्यंत नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. या मानसिकतेवर मात करणारी, व्यक्तिमत्त्व फुलवणारी अनेक पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र तरीही जयको प्रकाशनाने मराठीत आणलेले जॉन लीच यांचे ‘यशाचे सूत्र’ हे पुस्तक अतिशय उपयुक्त आणि उठावदार आहे. प्रत्येक पुस्तकाची स्वत:ची अशी शक्तीस्थानं असतात, या पुस्तकाचं सर्वात महत्त्वाचं शक्तीस्थान म्हणजे या पुस्तकातील प्रकरणांची लांबी.. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण अवघे दोन पानांचे आहे. अत्यंत सुटसुटीत आणि नेमक्या शब्दांत, योग्य त्या शब्दांना ठळक करून ही मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक पुस्तकांमध्ये यश कसं मिळवावं याचाच उल्लेख असतो.. पण त्यात एकदा यश मिळाले की पुढे तोच मार्ग कसा टिकवून ठेवावा याचा उल्लेख अभावाने सापडतो. यशाचे सूत्र हे पुस्तक आपल्याला यश साजरे कसे करावे, त्यात गुंतून न पडता अलगद पुढे कसे जावे हेही सांगते. माणसाचे यश हे त्याच्या जीवनशैलीशी जोडलेले असते. त्यामुळे विचार करण्यापासून ते शरीराच्या सवयींपर्यंत आणि उत्स्फूर्त प्रतिसादांपासून अग्रसक्रिय (प्रोअ‍ॅक्टिव्ह) सादेपर्यंत सगळ्या बाबी यश मिळणे किंवा न मिळणे, यासाठी कारणीभूत असतात. ही बाब हे पुस्तक आपल्या मनावर ठसवते. त्या दृष्टीने या पुस्तकात महनीय व्यक्तींची काही ‘मार्गदर्शक’ वचने उधृत केली आहेत.
‘मी बोलताना दोनतृतीयांश वेळा लोकांना ऐकायला काय आवडेल याचा विचार करतो आणि एकतृतीयांश वेळा मला काय सांगायचे आहे त्यावर विचार करतो’, हे अब्राहम लिंकन यांचे वाक्य किंवा कोसलॉव्ह या विचारवंताचे ‘तुम्ही जेव्हा आपण केलेल्या कामाची जबाबदारी घ्यायची तयारी दर्शवता तेव्हा तुमच्याबद्दलची विश्वासार्हता वाढीस लागते’, हे उद्गार अतिशय बोलके आणि अत्यल्प शब्दांत नेमका विचार देणारे आहेत.
कसे बोलावे, नेतृत्व कसे करावे, विश्वासाचे महत्त्व काय, पायाभरणी कशी करावी, चिंतन आणि आत्मसंवाद कसा साधावा, स्वतला दिशा कशी द्यावी, घातपात करणाऱ्यांना कसे ओळखावे, एकटेपणाचा सामना कसा करावा, जिंकण्याची सवय कशी लावावी, पराभूत मानसिकतेवर मात कशी करावी, संघाकडून कामगिरी कशी करून घ्यावी अशा सर्व प्रश्नांचे – त्या प्रश्नांच्या उल्लेखासह उत्तर आपल्याला या पुस्तकात सापडते.
आता हे पुस्तक सर्वात जास्त कोणासाठी उपयुक्त ठरू शकेल.. तर खरं म्हणजे हे सर्व वयोगटांना उपयोगी ठरावे असेच पुस्तक आहे. पण माध्यमिक किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचल्यास आणि त्यात नमूद केलेल्या सवयी आपल्याला लावून घेतल्यास ते सर्वाधिक प्रभावी ठरू शकेल. कारण अनेकदा या वयात लावलेल्या सवयी आपल्याला आयुष्यभर पुरतात. त्यामुळे याच संवेदनशील वयात उत्तम सवयी अंगी बाणविणे, हेच ‘यशाचे खरे सूत्र’!
यशाचे सूत्र – लेखक – जॉन लीच.
अनुवाद – डॉ. संजय ओक.
जयको प्रकाशन. पृष्ठसंख्या – २२५. मूल्य – १९९.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !