विमानात एअर होस्टेस ज्याप्रमाणे काय करा आणि काय करू नका अशी माहिती देतात, त्याप्रमाणे एसटी कंडक्टरही माहिती देणार अशी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीवरून केलेला हा कल्पनाविलास-

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस.टी. नवनवीन उपक्रम राबवीत आहे. त्यातलाच एक म्हणजे आता या पुढे एस.टी. कंडक्टर विमान प्रवासात हवाईसुंदरी जशी माहिती देतात तशी माहिती एस.टी. प्रवासात प्रवाशांना देणार. असाही एस.टी. कंडक्टर प्रवाशांची तिकिटे फाडत असताना बडबडत असतोच, आता तो आणखी माहिती कशी देणार याचा एक नमुना-
साधारण दुपारी चार वाजेचा सुमार. जळगांव एस.टी. स्टॅण्ड. मे चा महिना. जळगावचे ऊन. लग्नसराईचे दिवस. स्टॅण्डवर प्रवाशांची तुफान गर्दी. गाडय़ांचे घरघर आवाज. एस.टी. कंट्रोल रूममधून स्पीकरवर न कळणाऱ्या विविध सूचना. जळगांव-चोपडा गाडी प्लॅटफार्मला लागली. प्रवाशांची एकच झुंबड उडाली. आरडाओरडा, धक्काबुक्की, घूसखोरी करून प्रवाशांनी बसमध्ये जागा पकडल्या, जवळच्या बॅगा, पिशव्या, बोचके वरच्या रॅकमध्ये खुपसल्या. डोक्यावरचा पांढरा बागायतदार रुमाल काढून, तोंडावरला घाम पुसला व हाशहुश करीत, सीट मिळाल्याचे समाधान चेहऱ्यावर आणून तोंडावरला, मानेवरला घाम पुसला. रुमाल हवेत गरगर फिरवून हवा घेण्याचा प्रयत्न केला. वाऱ्याचा पत्ता नाही. दुपारी चारची एस.टी. सव्वाचार झालेले. जळगाव-चोपडा प्रवास साधारण दोन तासांचा. लोक एस.टी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. एस.टी. तापलेली व प्रवासीही तापलेले. तेवढय़ात कुरुक्षेत्रावर युद्धास अवतीर्ण होणाऱ्या श्रीकृष्ण-अर्जुन जोडीप्रमाणे, ड्रायव्हर-कंडक्टर आले. लोकांना हायसे वाटले. ड्रायव्हरने इंजिन स्टार्ट केले. दरवाजातून शिट्टी वाजवीत कंडक्टर आत शिरायचा प्रयत्न करतो.
‘‘सरका! सरका! पुढं सरका! मला आत येऊ द्या! तात्या! अण्णा, बापूजी पुढं सरका!’’ तो पायरीवर उभे राहून बसचा दरवाजा बंद करतो. दोन-तीन वेळा शिट्टी फुंकतो. थोडा गोंधळ कमी होतो कंडक्टर बोलायला सुरवात करतो.
‘‘नमस्कार मंडळींनो, रामराम, माय बहिणींनो नमस्कार! मी आता आमची वयख करी देतो. (जळगाव भागात दोन ग्रामीण भाषा बोलल्या जातात, जळगांव पूर्व भागात तावडी भाषा व जळगाव पश्चिम भागात अहिराणी. कंडक्टरची भाषा दोघांची मिश्रण आहे. कंडक्टर तसा भुसावळचा आहे, त्याची स्वत:ची भाषा तावडी आहे. शिवाय मधूनमधून तो शुद्ध मराठीही बोलू शकतो.जोडीला काही इंग्रजीही तो हाणू शकतो. प्रवाशांमध्ये ग्रामीण प्रवासी बहुसंख्य.
कंडक्टर ‘‘मी माही वयख करी देतो. माह्य नाव गणपत महादेव जाधव, मी तुमच्या गाडीचा कंडक्टर हाये! आज आपले ड्रायव्हरसाहेब आहेत श्री. महादू तुकाराम पाटील. (ड्रायव्हर सर्व प्रवाशांना मागे मान वळवून बसल्या बसल्या नमस्कार ठोकतो) त्याहीले एस.टी. चालवायचा २० वर्षांचा अनुभव आहे, त्यो बी विदाऊट अॅनी अॅक्सिडंट! आपल्या गाडीचा नंबर हाये एम.एच. २० बी.टी. ४५६३, औरंगाबाद पाशिंग हाये! गाडी सुटय़ाले जरासाक उशीर व्हयल व्हाये! तरी आम्हाले सांभाई घ्या! अन् माफी बी द्या! त्याने घंटी मारली अन् गाडी एकदाची घरघर आवाज करीत सुरू झाली. त्या आवाजातच कंडक्टरची कॉमेंटरी सुरू झाली.
‘‘तरन्या-ताठय़ा मानसाईन म्हाताऱ्या-कोताऱ्या मानसाइले जागा करी द्या! समद्यासनी तिकिटाचे पैशे सुट्टे काढी ठेवा. म्हाताऱ्या लोकांनी म्हंजे ज्येष्ठ नागरिक की काय म्हनत्यात त्यास्नी अपले वयख पत्र काढी ठेवा. पयले वयख पत्र दाखवा, मंगनच तिकटं फाडा. गाडीमंदी कोनी स्वातंत्र्यसैनिक असतील तर, त्याहीनी बी त्याहीचा पास, वयख पत्र हातात ठेवा. इथी लई स्वातंत्र्य भेटीसन साठ-पासट वरीस व्हयी गेले तरी हे स्वातंत्र्यसैनिक कोठून निघतात काई समजत नई भो!
त्याचे तिकीट फाडण्याचे काम चालू असताना तोंडही सतत चालू असते. ‘‘एस.टी.त पानी पेयाची सोय नाही आणि रस्त्यात बी कोनत्याच स्टॅण्डवर पानी भेटत नाई, तुमी समद्यास्नी आपापल्या पान्याच्या बाटल्या संगे ठेवल्या आसतीनच!
‘तर आपुन आता जडगांव सोडीसन नागपूर-बंबई हाय वे ले लागलो. कोनिबी आपला हाथ खिडकी भाईर काढू नका. हायवेले गहरा ट्रॅफिक असतो. धाकल्याबिगर तिकीट पोरासोराइले, मायबापांनो, आपल्या मांडीवर बसाडा. तिकीटवाल्या लोकाइले बशाले जागा करी द्या! दोन घटकाचा परवास हाये! सुखानं होवू द्या!’
‘‘चला तिकीट, तिकीट! सुट्टे पैशे दे रे भो! जो उठतो तो नोटच पुढं धरतो. सुट्टे पैसे नेमके मोजीशीन द्या! आम्हाले सहकार्य करा!
खिडकीबाहेर बघत ‘‘आता आपली बस गिरणा नदीच्या पुलावरून पास व्हऊन राहिली हाये! गिरणा सगडी सुरवाई जायेल हाय! वऱ्हे धरन त खालच्या लोकाइच मरन! आता आपल्या धुल्या हाताले आपुन बंबई हायवे सोडला. व जेवन्या हाताले चोपडा रोड धरला हाये! रोड जरा खराब हाये, लहान-मोठे खड्डे व्हयेल हायेत. गेल्या वर्षीच बांधला व्हता, पन दोन पाऊस येताच व्हायी गेला! पन त्याले आपला काही इलाज हाये का? वरते ठेवेल बोचकी, बॅगा, पिशव्या डोक्यावर पडतीन, तर आपलं डोक सांबाईसन बस. बसमंदी फस्ट अेड बॉक्स हाये, पन ती रिकामी हाये!’’ तोच एक प्रवासी खिडकीबाहेर लाल पिचकारी तोंडाने सोडतो, त्याच्यामागे बसलेल्या प्रवाशांच्या तोंडावर लाल तुषार येतात ते आरडाओरडा करतात. कंडक्टर ‘‘ऐका हो! पान, तमाकू, गुटखा खाईसन खिडकीबाहेर पचापचा पिचकाऱ्या मारू नका!’’
‘‘आता पाडधी (पाळधी-एक खेडे) येईन तवा उतरनाऱ्या परवाश्यांनी पुढं येऊनसन उभे राहा. गाडी दोनच मिनटं थांबीन.’’ बस थांबते. आतील लोक उतरण्याच्या आधीच बाहेरून लोक आत शिरण्याचा प्रयत्न करतात. ‘‘थांबा! थांबा, पयले अंदरल्या लोकाइले उतरू द्या! घाई करू नका हो! त्या म्हातारीचा हात धरा! जरा मदत करा! तिले पयले उतरू द्या! मावशे तुझं बोचकं संभाय! दोन-चार प्रवासी आत चढल्यावर, ‘‘बास! बास! आता कुनी आत चढू नका! ओ जीभाऊ दरवाजा बंद करा पयले! आता आत कुनी येऊ नका! बसमंदी जागा नई! मांगून दुसरी बस येऊन राहिली हो!’’ बसचे दार कसेतरी बंद होते.’’ ओ तात्या तुमीं-थोडं पुढं सरकाना! मधीच कशे काय उभे राहिले हो!
घंटी वाजते. बस पुन्हा सुरू होते. रस्त्यात पिंप्री गाव लागते. तेथील गर्दी पाहून कंडक्टर हुशारीने बस स्टॉपच्या थोडं आधीच, पिंप्रीच्या प्रवाशांना उतरवून देतो व बसस्टॉपवर बस न थांबवता पुढे दामटवून नेतो. स्टॉपवर थांबलेल्या लोकांच्या ग्रामीण शिव्या ऐकू येतात.
थोडय़ा वेळाने एक छोटा चढ लागतो. एस.टी. गचके देत देत चढाव चढू लागते. बहुतेक बसचे इंजिन चांगलेच तापले असावे. वर चढ संपल्यावर बस एकदम थांबते व बंद पडते. काही केल्या चालू होत नाही. इंजिनमधून विविध आवाज येतात. प्रवासी काय झाले? काय झाले? म्हणून कल्ला करतात. कंडक्टर सरावलेला असतो. त्याच्या लक्षात येतं, तो लगेच सूचना देतो ‘‘चला तरनेताठे लोकाइस्नी खाले उतरा! जरा धक्का देना पडीन.’’ १०-१२ लोक उत्साहाने खालली उतरतात. ऊन थोडं उतरलेलं असतं, पण तरी धक्का मारणारे घामाघूम होतात. एकदाचं ते धूड २३ं१३ होतं. मग पटापट सर्व प्रवासी आत शिरतात. कंडक्टर शेवटी आत येतो, एस.टी. पुन्हा मार्गाला लागते. कंडक्टर सर्व मदत करणाऱ्यांचे आभार मानतो. एस.टी.च्या सर्व प्रवाशांना या गोष्टींची सवय झालेली असते.
एस.टी. धरणगावला पोचते. कंडक्टर पुन्हा अनाउंसमेंट करतो. ‘‘बस येथे दहा मिनट थांबीन. आमी च्या-पानी करून येतो. तुमाले कोनाले च्याची तल्लफ लागली आशीन तर तुमीबी या! च्या आठी चांगली भेटते! घरी पोरासोराइले काई खाऊ घेना आशिन तर समोरल्या हॉटीलमंदी गोडी-शेव चांगली बनते अन् ताजीबी असती! लवकर जाइसन परत या!
तेवढय़ात एक सुशिक्षित प्रवासी, घडय़ाळात बघत तक्रारीच्या सुरात म्हणतो, ‘‘अहो कंडक्टरसाहेब बस चोपडय़ाला केव्हा जाणार? आम्हाला पुढे सात वाजेची शिरपूर गाडी सापडली पाहिजे.’’ कंडक्टर ‘‘साहेब डोन्ट वारी, तुम्हाला सातच्या आत चोपडय़ाला पोहचवितो, टेंशन नका घेऊ साहेब.’’ ड्रायव्हरही होकार दर्शवितो.
एस.टी. धरणगाव सोडते. रस्त्यात काही किरकोळ फाटे साळवे, नांदेड इ. लागतात २-२/३-३ प्रवासी उतरतात. एस.टी. सौखेडा गाव सोडते. एस.टी. तापी नदीच्या पुलावरून जात असताना कंडक्टर आपले तोंड उघडतो. ‘‘आता आपुन तापी नदीच्या पुलावरून जाऊन राह्यलो. पयले तापीले बारोमास पानी भरेल राह्ये! पण आता हातनूर धरण बांधल, तं पानी कमी झालं. नइतन् तापीमाय समद्या खान्देशले पानी पाजे.’’
२० मिनिटांत बस चोपडा स्टॅण्डमध्ये शिरते. शिरपूर बस सुटायच्या बेतात असते. ड्रायव्हर पाटील चपळाईने बस शिरपूर गाडीला आडवी घालतो. त्यामुळे त्या सुशिक्षित प्रवाशाला शिरपूर बस सापडते. तो थँक यू म्हणून घाईने बस सोडतो.
कंडक्टर दाराशी उभा राहून प्रवाशांना हात जोडून, तोंडावर उसने हास्य आणून धन्यवाद देतो, व पुन्हा एस.टी. लाच सेवेची संधी द्या अशी विनंती करतो. तेवढय़ात ड्रायव्हर पाटील बसची जळगांव-चोपडा पाटी उलटी करून चोपडा- जळगाव करतो. बस परतीच्या प्रवासाला सज्ज होते. जाधव कंडक्टर जळगांवकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या स्वागताला सिद्ध होतो.

Security guards have fake police character verification certificates
पिंपरी : धक्कादायक! सुरक्षारक्षकांकडे बनावट पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे
rashmi barve
रामटेकमधील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र प्रकरण काय आहे? उमेदवाराची जातवैधता छाननी प्रक्रिया कशी असते?
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
loksatta analysis why zomato scraps green uniform idea for vegetarian deliveries
विश्लेषण : हिरव्या युनिफॉर्मबाबतचा निर्णय झोमॅटोला काही तासांतच का बदलावा लागला?