‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित हा पहिला हिंदी चित्रपट बंगाली साहित्यातील गुप्तहेर नायकाला भव्य पडद्यावर आणणारा. हिरो आणि सुपरहिरो या दोनच नायकांचे वर्चस्व असलेल्या बॉलीवूडला एवढा परिचित जासुसी नायक देणारा हा पहिला हिंदी चित्रपट आहे. पण या चित्रपटाचे पहिलेपण हे केवळ हिंदीसाठी नाही तर बंगालीसाठीही आहे, असे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीचे म्हणणे आहे. कारण पहिल्यांदाच बंगाली साहित्याच्या पानांवरून उतरून हा प्रसिद्ध, अभ्यासू आणि काहीसा शांत गुप्तहेर हिंदीतून सगळ्यांसमोर येणार आहे. 

आपले साहित्य, संस्कृती याबद्दल प्रचंड अभिमान बाळगणाऱ्या बंगाली लोकांना रुपेरी पडद्यावरचा सुशांत सिंग राजपूत नामक अवघे दोन-तीन चित्रपट जुन्या असलेल्या कलाकाराने साकारलेला ब्योमकेश बक्षी कसा वाटेल? ते त्याला स्वीकारतील का याची उत्सुकता खुद्द दिबाकर बॅनर्जी आणि सुशांत सिंग राजपूतलाही आहे.
ब्योमकेश बक्षी बंगाली लोकांना भावेल की नाही अशी शंका येण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे बंगालमध्ये सगळ्यांनाच ब्योमकेश ही व्यक्तिरेखा आवडते असे नाही, असे सुशांत सांगतो. बंगाली साहित्यात जासुसी कथा आणि त्यांचे नायक म्हणून शरदिंदू बंडोपाध्याय यांच्या लेखणीतून उतरलेला ब्योमकेश बक्षी आणि चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांच्या कल्पनेतून साकारलेला ‘प्रदोषचंद्र मित्र’ अर्थात ‘फेलुदा’ या दोघांचेही वर्चस्व आहे. त्यातही ब्योमकेश ही जुनी व्यक्तिरेखा. १९३२ साली पहिल्यांदा गुप्तहेर ब्योमकेश बक्षीची ओळख लोकांना झाली होती. ब्योमकेशचा मूळ स्वभाव गुप्तहेरी करण्याचा नाही. सत्य काय ते शोधण्याचा नाद ब्योमकेशला गुप्तहेर व्यवसायापर्यंत आणतो. त्याची खरी ओळख ही ‘सत्यान्वेशी’ अशी आहे. ब्योमकेश हा खूप शांत, अभ्यासू, अत्यंत बुद्धिमान पण काहीसा एकलकोंडा असा गुप्तहेर. त्याची जोडी जमलीय ती लेखक म्हणून त्याला भेटलेल्या अजितबरोबर. ब्योमकेशचे पराक्रम वाचकापर्यंत पोहोचतात अजितच्या लेखणीतून. पण शरदिंदू बंदोपाध्याय यांची निर्मिती असलेल्या या गुप्तहेरावर पश्चिमेच्या शेरलॉक होम्सची छाप आहे. त्याउलट सत्यजित राय यांचा फेलुदा हा अतिशय उत्फुल्ल स्वभावाचा हुशार खासगी गुप्तहेर आहे. ब्योमकेश आणि फेलुदा यांच्या वयात जवळजवळ ३० वर्षांचे अंतर आहे. फेलुदा पहिल्यांदा भेटला बच्चेकंपनीला. १९६५ साली ‘संदेश’ या लहान मुलांच्या मासिकात फेलुदाची पहिली कथा छापली गेली होती. या मासिकाचे संपादन खुद्द सत्यजित राय आणि सुभाष मुखोपाध्याय यांनी केले होते. सदा धोतीत असलेल्या बंगाली, संस्कृत साहित्यावर वर्चस्व असलेल्या ब्योमकेशपेक्षा आधुनिक विचारांचा फेलुदा बऱ्याच जणांना भावतो.
ब्योमकेश बक्षीची व्यक्तिरेखा साकारायची असेल तर बंगाली संस्कृती मुळात जाणून घेतली पाहिजे, या विचाराने तिथल्या घराघरांतून फिरलेल्या सुशांतला पहिल्यांदा काही जाणवले असेल तर ब्योमकेश बक्षी आणि फेलुदा यावरून बंगाली लोकांमध्ये असलेले गट-तट. ‘हो, मी खरंच सांगतो तिथे फक्त दोनच प्रकारचे बंगाली लोक आहेत. एक ज्यांना ब्योमकेश बक्षी आवडतो दुसरे ज्यांना फेलुदा आवडतो,’ असे सुशांत सिंग राजपूतने सांगितले. तुम्ही जर बंगाली साहित्यातील या दोन गुप्तहेर नायकांवर बोलायला सुरुवात केली तर पहिल्यांदा तुम्ही कुठच्या बाजूचे आहात याची चाचपणी बंगाली लोक करतात. ब्योमकेश की फेलुदा? याचे उत्तर मिळाल्यानंतर समोरचा तुमच्या बाजूचा असेल तरच सुसंवादाला सुरुवात होते, असे सुशांत म्हणाला. खरं तर या दोघांवरही बंगाली चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे हा नेमका प्रेमळ भेदभाव कशामुळे असावा याचे फारसे स्पष्ट उत्तर मिळालेले नाही, असेही त्याने सांगितले. पण १९४०-१९४३ च्या दरम्यान कोलकाता जसे होते, तिथे ज्या घटना घडत होत्या, त्यापेक्षा आजचे कोलकाता फारच वेगळे आहे. मात्र, दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्या शहरात जे काही घडले त्याचे पडसाद अजूनही कोलकातामधील लोकांच्या मनावर उमटले आहेत, हे त्यांच्याशी गप्पा करताना सहजपणे जाणवते, असे सुशांतने नमूद केले. नेमका हा जो काळ आहे तो ब्योमकेश बक्षीचा आहे, त्यामुळे साहजिकच काळानुसार बदलत गेलेल्या सामाजिक संदर्भाचा परिणाम कादंबरीतून अवतरलेल्या या नायकांवर आणि पर्यायाने त्यांना आपलंसं करणाऱ्या वाचकांवरही झाला असावा.
दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीला मात्र या गोष्टींची चिंता नाही. ब्योमकेश बक्षीच्या एकूण ३२-३३ कथांमधून ३-४ कथा त्याने या चित्रपटाच्या कथानकात गुंफल्या आहेत. बंगाली असूनही हिंदीत एका भव्य पडद्यावर ब्योमकेशची गोष्ट पाहायला बंगाली प्रेक्षकांनाही तितकेच आवडेल. फेलुदावरचे प्रेम त्याच्या आड येणार नाही, असा विश्वास दिबाकर बॅनर्जी यांना आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट