गेल्या वर्षअखेरीवर पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची गडद छाया होती. इस्लामी दहशतवाद्यांनी केलेला कहर इस्लामचीच भूमी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाकिस्तानात पाहायला मिळाला. तर नव्या वर्षांच्या सुरुवातीसच इस्लामी दहशतवाद्यांनी आणखी एक टोक गाठले. पॅरिसमध्ये शार्ली हेब्दो या व्यंगनियतकालिकाच्या कार्यालयात घुसून त्यांनी तेथील दहा पत्रकार, व्यंगचित्रकार यांची हत्या केली. ही केवळ त्या पत्रकार किंवा व्यंगचित्रकारांची हत्या नव्हती तर इस्लामसंदर्भात कोणतीही टीका करणाऱ्यांविरोधात हेच टोक गाठले जाईल, असा संदेश जगाला देण्याच्या प्रयत्नाचाच तो एक भाग होता. शार्ली हेब्दोमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वच्या सर्व गोष्टी सर्वानाच पटत होत्या, अशातील भाग नाही. पण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाच एक भाग म्हणून त्याकडे पाहिले जात होते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा तर लोकशाहीचा गाभा आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या त्रयीचा संदेश देणारी राज्यक्रांती ज्या भूमीवर झाली त्याच फ्रान्सच्या भूमीवर अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारा जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला व्हावा हे या घटनेमागचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. 

एखादी घटना किंवा कृतीमागील व्यंग नेमके टिपून केलेले चित्रण म्हणजे ढोबळ अर्थाने व्यंगचित्र असे म्हणता येईल. शब्द आणि चित्र यांची नेमकी ताकद यामध्ये पाहायला मिळते. डेव्हिड लोपासून ते आपल्याकडच्या आर. के. लक्ष्मण यांच्यापर्यंत अनेक व्यंगचित्रकारांनी त्यांच्या या व्यंगचित्रांच्या ताकदीने भल्या भल्यांना घायाळ केले आहे. शिवाय त्या व्यंगचित्रात नेमके बोट ठेवल्याामुळे समोरच्याची अवस्था अशी होते की, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. डेव्हिड लो तर जगभरातील अनेक व्यंगचित्रकारांच्या प्रेरणास्थानी होते. त्यांची राजकीय व्यंगचित्रे राजकीय भूकंप घडवत असत. आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे या सर्वानीच त्यांच्या आयुष्यात डेव्हिड लो यांचा आदर्श म्हणून उल्लेख केला आहे. हिटलरसारख्या हुकूमशहालाही ही व्यंगचित्रे पुरून उरली. लो यांच्या व्यंगचित्रांवरून देशादेशांमध्ये मानापमान नाटय़ रंगल्याचा इतिहास आहे. ही व्यंगचित्रांची ताकद असते. कदाचित ही ताकदच आता दहशतवाद्यांच्या नजरेत आली आणि म्हणून त्यांनी ती संपविण्यासाठी िहसेचा मार्ग पत्करला.
स्टिफन शाबरेनेर हे या शार्ली हेब्दोचे संपादक. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांनी कोणत्याही धर्माला टीका करण्यापासून वगळले नाही, हे खरे तर त्यांचे वैशिष्टय़. पण चर्चा झाली ती त्यांनी केवळ इस्लामवर केलेल्या टीकेची. २००७ साली एका डॅनिश मासिकाने मोहम्मद पैगंबराची बारा व्यंगचित्रे प्रसिद्ध केली. त्यावर जगभरात वाद झाला. ती पुनप्र्रकाशित करण्याचे धाडस दाखविणाऱ्यांमध्ये शाबरेनेर यांचा समावेश होता. त्याविरोधात काहींनी फ्रान्समधील न्यायालयातही त्यांच्याविरोधात प्रकरण गुदरले. पण ही व्यंगचित्रे ही इस्लामविरोधात नसून कट्टरतावादाविरोधात असल्याचा निवाडा फ्रेंच न्यायालयाने दिला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी २०११ मध्ये इस्लामसंदर्भातील आणखी एक व्यंगचित्र प्रकाशित केले, त्या वेळेस त्यांना बॉम्बहल्ल्याला सामोरे जावे लागले. अर्थात त्यानंतरही काही त्यांनी आपले धोरण सोडलेले नव्हते. त्यांनी जशी इस्लाममधील कट्टरतावादावर टीका केली तशीच टीका त्यांनी ख्रिश्चन, ज्यू आदी धर्मावरही केली. इस्लामी दहशतवाद्यांनी त्यांचा खातमा करण्याचा इशाराही दिला होता. त्याही वेळेस त्यांनी स्पष्ट केले होते की, ‘तुमच्यासमोर शिक्षा म्हणून गुडघ्यावर बसून चालण्याऐवजी मी मरण पत्करेन.’ झालेही तसेच. कोणत्याही कट्टरतावाद्यासमोर न झुकणारे शाबरेनेर दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. ते अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी शहीद झाले.
lp09
व्यंगचित्र हे तर आताच्या जमान्यात वर्तमानपत्राचा अविभाज्य भाग झाले आहे. डीझी अर्थात डी. जी. कुलकर्णी यांनी भारतात फ्री प्रेस जर्नलपासून त्याची सुरुवात केली आणि प्रत्येक वर्तमानपत्रात ते अविभाज्य भाग म्हणून आपल्यासमोर येते. अनेकदा त्यात चुरचुरीत राजकीय टिप्पणी असते, तर कधी टोचणीही असते. कधी मर्मभेदी वारही असतो. पण हा वार पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर स्मितरेषा आणत केलेला असतो. प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे एक गाजलेले व्यंगचित्र होते. इंदिरा गांधी यांच्या हाती सत्ता नसतानाचा तो काळ होता. त्या वेळेस नऊ राज्यांमध्ये काँग्रेसेतर पक्षांची सत्ता होती. तेव्हा इंदिरा गांधींच्या त्या लांब नाकावर असलेले नऊ राज्यांचे नऊ मुख्यमंत्री बाळासाहेबांनी दाखवले होते आणि खाली ओळ होती.. नाकी नऊ आले! इंदिरा गांधींची झालेली राजकीय कोंडी स्पष्ट करण्यासाठी एरवी विश्लेषण करणारा मोठा लेख लिहावा लागला असता. पण व्यंगाच्या आधारे वर्मावर नेमके बोट ठेवण्याचे काम व्यंगचित्र करते, तेव्हा अनेकदा शब्दांचा फापटपसारा लागतच नाही. म्हणून तर घरी वर्तमानपत्र आले की अनेकांची नजर त्यातील व्यंगचित्रावर सर्वप्रथम जाते. ते त्या दिवशी केलेले विधानच असते.
व्यंगचित्र आणि शब्द यांची ती ताकद लक्षात आल्यामुळेच तर
न खिंचो कमान को, न तलवार निकालो
जब तोप मुकाबिल हो, तो अखबार निकालो
या पंक्ती भारतात प्रसिद्ध झाल्या. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पाहिला तरी या अभिव्यक्तिस्वातंत्र्याने घडवलेले जनमत आणि त्याचे महत्त्व सहज लक्षात येते. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासाशी समांतर जाणारा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तर ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चळवळ अधिक समृद्ध झाली. शब्द आणि चित्र यांची ताकद नेमकी ओळखणाऱ्या अनेकांनी या पंक्तींचा वापर अनेकदा केला आहे. पट्टीचे व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी तर ‘मार्मिक’ या त्यांच्या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावरच या पंक्ती मिरवल्या. आरकेंनी तर अनेकदा राजकीय नेत्यांची झोप उडवण्याचे काम त्यांच्या व्यंगचित्रांतून केले आहे. त्यांच्या गाजलेल्या दोन-तीन व्यंगचित्रांनंतर तर राजकीय निर्णयही बदलण्याची वेळ संबंधितांवर आली. एवढी या व्यंगचित्रांची जबरदस्त ताकद आहे. पण आताचा जमाना मात्र ‘हम करे सो कायदा’ असा आहे. मूलतत्त्ववाद्यांनी केवळ डोके वर काढलेले नाही तर जगभरात सर्वत्र एकच उच्छाद मांडला आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आदी ज्या ज्या देशांनी एके काळी इस्लामी दहशतवाद्यांना खतपाणी घालण्याचे काम केले, तोच दहशतवाद सध्या त्यांच्यावर उलटला आहे. इतरांसाठी खड्डा खणण्याचे काम केले, की कधी तरी आपल्यावरच त्या खड्डय़ात पडण्याची वेळ येते असा अनुभव केवळ त्यांनाच नव्हे तर पाकिस्तानलाही आता येतो आहे.
lp08
‘इस्लाम खतरे में’ असे म्हणत हे सर्व हल्ले केले जातात. पण या सर्व हल्ल्यांनंतर इस्लामी जनतेचीच अधिक कोंडी करण्याचे काम दहशतवादी करीत आहेत. इस्लामी जनतेकडेच संशयाने पाहण्यास आता सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या पेशावरमधील हल्ल्यामध्ये ठार झालेले विद्यार्थी हेदेखील इस्लामीच होते. त्यामुळे ते इस्लामसाठी हल्ले करीत आहेत, हा त्यांचा युक्तिवाद भंपक आहे. इस्लामी जनतेनेही हा भ्रम तोडण्यासाठी शिक्षणाच्या मार्गाचा स्वीकार करीत पुढे जाणे गरजेचे आहे.
खरे तर शिक्षण हाच या सर्व गोष्टींवरचा तोडगा असणार आहे. शिक्षणच आपल्याला अनेक गोष्टी तारतम्याने घ्यायला शिकवत असते. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे याचे ज्ञान शिक्षणानेच येते. मात्र जगभरातील परिस्थिती थोडी विचित्र आहे. अनेक ठिकाणी धार्मिक कट्टरतावादाला खतपाणी घालण्याचे प्रकार सुरू आहेत, ते थांबविणे आवश्यक आहे. अनेक देशांसमोरचा हा गंभीर प्रश्न आहे, त्यात भारताचाही समावेश आहे. तो सोडवायचा तर तलवारीच्या धारेवर चालावे लागणार आहे. कारण कोणत्याही धर्माच्या कट्टरतावादाला प्रोत्साहन द्यायचे तर ते आज ना उद्या अंगाशी येणारच. शिवाय एकदा ‘सॅटनिक व्हर्सेस’वर बंदी घातली की मग इतर अनेक पुस्तकांवर भावना दुखावल्याचे कारण पुढे करून बंदी घालण्याची वेळ सरकारवर येते, असे आपला भारतीय अनुभव सांगतो. आणि दुसरीकडे कट्टरतावादाला कडवा विरोध करायचा तर कडवेपणाला अनेकदा त्याने बळच अधिक मिळते. त्यामुळे ही तलवार आपले तारतम्याचे भान कापून नाही ना काढणार, याची काळजी सर्वानाच घ्यावी लागेल!
01vinayak-signature
विनायक परब