खरे तर या साऱ्याला सुरुवात झाली ती नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर. लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी निवड केली होती वाराणसी मतदारसंघाची. तिथे ते भरघोस मतांनी विजयी झाले आणि आपल्या पहिल्या भेटीतच त्यांनी गंगा स्वच्छता अभियानाची घोषणा केली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये गंगा स्वच्छतेसाठी वेगळा निधी उपलब्ध करून देत एक चांगली सुरुवात करण्यात आली होती खरी. पण कोटय़वधींचा निधी कुठे गेला ते कळलेच नाही आणि गंगा तशीच मैली राहिली. त्यानंतर घोषणा झाली ती मोदींकडून. अर्थात त्यावेळेस पंतप्रधानांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे काम किंवा हिंदुत्वाची पाठराखण करणाऱ्या भाजपाने गंगेच्या निमित्ताने हिंदू समाजाला भावनिक पद्धतीने जोडण्याचा केलेला प्रयत्न, याच दृष्टीने त्याकडे पाहिले गेले.

त्यानंतर दुसरी लाट आली ती १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणामध्ये स्वच्छतेचा उल्लेख आला. खरे तर भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, या एवढय़ा वर्षांनंतरही देशात स्वच्छता राखा, असा संदेश पंतप्रधानांना द्यावा लागणे ही आपल्या सर्वासाठीच लाजिरवाणी बाब होती. पण त्यातही चांगली बाब ही की, स्वच्छतेचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर हाती घेणे गरजेचे आहे, असे देशाच्या पंतप्रधानांना वाटले आणि स्वातंत्र्यदिनी महत्त्वपूर्ण भाषणात त्यांनी त्याचा उल्लेख केला. केवळ तेवढय़ावरच न थांबता त्यांनी या देशातील उद्योगांनाही स्वच्छतेसाठी आवाहन केले आणि त्याला अर्थशास्त्र जोडून दिले. अन्यथा निधीअभावी अनेक चांगल्या योजना बासनातच राहतात. स्वच्छतेच्या मोहिमेची देखरेख थेट पंतप्रधान कार्यालयाने करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. खरे तर पंतप्रधान कार्यालयाला त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची अशी अनेक कामे असतात. त्यांचा वेळ अशा कामांमध्ये जाणे योग्य नाही. पण स्वच्छतेचा मुद्दा केवळ राजकीय नव्हे तर राष्ट्रीय अजेंडय़ावर घ्यायचा असेल तर सध्याच्या भारतात तरी त्याला पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे.

ही मोहीम सुरू झाल्यानंतर त्याची प्रतीकात्मक सुरुवात म्हणून पंतप्रधानांनी हाती झाडू घेतला. त्याची छायाचित्रे सर्वत्र झळकली आणि मग त्यानंतर एक अहमहमिकाच या देशात सुरू झाली. ज्या त्या नेत्याच्या, अभिनेत्याच्या हातात झाडू दिसू लागला. त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली. कुणासाठी ते सारे प्रसिद्धीतंत्र म्हणून काम करत होते, तर कुणासाठी ती राजकीय शिष्टाई होती. आता त्याचा अतिरेक एवढा झाला की, त्याकडे फॅड म्हणून पाहिले जाते. हाती झाडू घेतलेला किंवा झाडतानाचा फोटो काढायचा आणि मग वर्तमानपत्रे, चॅनल्स आहेतच. अगदीच काही नाही तर फेसबुकची वॉल आहेच की! हा सारा प्रकार आता संतापजनक व्हायला लागला आहे. कारण त्यात केवळ देखावाच असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. काही प्रसंगांच्या बातम्याही अशा प्रसिद्ध झाल्या की, नेते झाडायला येणार म्हणून चांगला रस्ता शोधण्यात आला. ते येण्यापूर्वी तिथे कचरा आणून टाकण्यात आला, तोही असा की त्याचा दरुगध नेत्याला येणार नाही! हे जरा अतीच झाले! सार्वजनिक स्वच्छतेची अनेक परिमाणे असताना प्रत्येक जण केवळ रस्त्यावरच का उतरतोय, याचे कारण सहज आहे, ते म्हणजे ते सोपे काम आहे. स्वच्छतेची आवड खरोखरच आहे तर मग ही मंडळी रस्त्यावरच्या सार्वजनिक प्रसाधनगृहात का जात नाहीत स्वच्छतेसाठी? कारण एरवी केर काढताना नाकावर रुमाल किंवा पट्टी बांधणे हे खूपच सोपे आहे, फोटोतही स्वच्छता जाणवते. पण सार्वजनिक स्वच्छतागृहात जायचे तर ते अस्वच्छतागृहात जाण्यासारखेच असणार आणि नाक दाबून धरल्याशिवाय काम करणे अशक्य असणार. मग देखावाच करायचा तर रस्ता बरा आहे की, असा विचार या सर्व नेते मंडळींच्या मनात येणे साहजिक आहे.

शिवाय सध्या आपण स्वच्छता म्हणजे केवळ केरकचरा एवढय़ाच पुरता अर्थ मर्यादित घेतला आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि कचरा व्यवस्थापन हे महत्त्वाचे भाग येतात. कचरा व्यवस्थापनात घनकचरा, मलकचरा आणि रुग्णालयांतील जैविक कचरा याचा समावेश होतो. जगातील सर्वाधिक स्वच्छ आठ शहरांची यादी प्रतीवर्षी प्रसिद्ध होते. त्यात सिंगापूरचा क्रमांक सर्वात वरती आहे. सिंगापूरला दोन्ही अर्थानी ‘फाइन’ सिटी म्हटले जाते. फाइन म्हणजे सुंदर किंवा छान आणि फाइनचा दुसरा अर्थ म्हणजे दंड. केवळ कागदाचा कपटा टाकलेला दिसला तरी त्यासाठीचा दंड हा २० हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे स्वच्छता ही आता तिथल्या नागरिकांच्या अंगात भिनली आहे. स्वच्छतेच्या संदर्भात काम करणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणा एकाच छत्राखाली आणून त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ पब्लिक क्लीनलीनेस या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे. हे महत्त्वाचे पाऊल आहे अन्यथा एक विभाग दुसऱ्यावर जबाबदारी ढकलण्यात माहीर असतो. सार्वजनिक स्वच्छतेसाठीचा हा स्वतंत्र विभाग सर्व स्वच्छता यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करतो. शिवाय कडक कायदे आणि भ्रष्टाचाराला न दिलेला थारा उरलेले काम करतो. सिंगापूरच्या या स्वच्छता विभागाचे कामाचे स्वरूप तेवढेच महत्त्वाचे आहे. स्वच्छतेचा दर्जा आणि त्याच्याशी संबंधित सेवेची गुणवत्ता वाढविणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची नोंद ते तपशीलवार ठेवतात.

स्वच्छतेच्या यादीतील उरलेल्या सात शहरांकडून शिकण्यासारखेही बरेच काही आहे. यात नॉर्वेतील ऑस्लो आणि कॅनडातील कॅल्गरीचा समावेश आहे. कॅनडामध्ये तर स्वच्छतेचा समावेश शालेय शिक्षणामध्ये करण्यात आला आहे. कारण शाळेतून सुरुवात झाली तर ती सवय अंगात मुरते, असे मानसोपचारतज्ज्ञांच्या लक्षात आले आहे. जपानसारखा देश स्वच्छतेसाठीच ओळखला जातो. तिथेही शालेय शिक्षणातच स्वच्छतेचा समावेश आहे. जपानमध्ये पाळल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या बाबतीत तर अनेक कथा- दंतकथा ऐकायला मिळतात.

त्यानंतरचे महत्त्वाचे शहर म्हणजे कोपनहेगन वायुप्रदूषण टाळण्यासाठी हिरवाईचे पट्टे शहराने जपले आहेत आणि अनेक सायकल मार्गाची रचना करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडमध्येही हिरवाई चांगली जपण्यात आली आहे. न्यूझिलंडमधील वेलिंग्टन हे तसे छोटेखानी शहर, पण त्यांनीही शहरात स्वच्छता ही अ‍ॅटिटय़ूडप्रमाणे जपलेली दिसते.

होनोलूलूला तर मुंबईसारखी किनारपट्टी लाभली आहे. त्यांनीही त्याचा चांगला वापर करून स्वच्छतेच्या बाबतीत चांगली मजल मारली आहे. मुंबईचा विषय निघाला की, वाढत्या वायुप्रदूषणाने हैराण व्हायला होते. किनाऱ्यावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे ते तुलनेने कमी जाणवते तरीही ते प्रमाण एवढे आहे की, हे शहर किनाऱ्यालगत नसते तर प्रदूषणाने पातळी किती मोठी गाठली असती या विचारानेच भोवळ यावी.

पण स्वच्छतेचा धडा कसा गिरवायचा हे जाणून किंवा समजून घेण्यासाठी आपण फार दूर जाण्याची गरजच नाही. शेजारी असलेला भूतानसारखा छोटा देशही आपल्याला हा धडा देण्याची क्षमता राखतो. भूतानमध्ये प्रवेश करण्यापूर्वीचे भारतातील अखेरचे शहर म्हणजे पश्चिम बंगालमधील जयगाव. जयगाव म्हणजे तर कचऱ्याचे आगारच ठरावे, अशी अवस्था आहे. भूतानच्या प्रवेशद्वारापर्यंत हा कचरा आपली साथ करतो.. आणि प्रवेशद्वार समोर येताच पलीकडे दिसणाऱ्या कागदाचा कपटाही नजरेस न पडणारा अतिशय स्वच्छ भूतानी रस्ता आपल्याला खुणावत असतो! किमान तो समोरचा रस्ता पाहून तरी आपल्याला आपण आपले घर स्वच्छ ठेवण्याची जाणीव व्हायला हवी. पण आपल्याला अस्वच्छतेचीच एवढी सवय झाली आहे की, ती नसेल तर अस्वस्थता येत असावी, हे काही चांगले लक्षण नाही. पंतप्रधान झाल्यानंतरचा मोदींचा पहिला दौरा भूतानचा होता. त्याच दौऱ्यात त्यांना याची जाणीव झाली का, हे न कळे. त्यांनी स्वातंत्र्यदिनी स्वच्छतेची हाक दिली हे चांगलेच केले. एखादे काम नीट पार पडले नाही तर झाडाझडती घेण्यासाठी मोदी सुपरिचित आहेत. मग ती झाडाझडती कधी सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांची असते तर कधी कार्यकर्त्यांची. देशातील वाढलेल्या या देखाव्याच्या स्वच्छतेमुळे मोदींवर झाडुझडती घेण्याची वेळ न येवो, म्हणजे मिळवले!01vinayak-signature