पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता मोहिमेला प्राधान्य दिल्यामुळे शहरांच्या पातळीवर अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला. पण गाव पातळीवर आजही अनेकांना नैसर्गिक विधींसाठी बाहेर जावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे..

दूरदर्शनवर जनजागृतीसाठी सरकारी प्रचाराची एक जाहिरात होती. त्यात मुलीचे आई-वडील होणाऱ्या जावयाच्या घरी गेल्यावर, ‘तुम्हारा लडम्का अच्छा है, तुम्हे अच्छा घर है, खेतबाडम्ी, गाडम्ी, नोकर-चाकर है, लेकिन तुम्हारे घर मे शौचालय नही है इसलिये हम तुम्हारे घर मे हमारी लडम्की नही दे सकते।’ असं म्हणून विवाह मोडतात.
भारत हा खेडय़ांचा देश आहे. खेडय़ात जरी शुद्ध, ताजी हवा मिळत असली तरीही स्वच्छेतेचा अभाव, हागणदारी हा ग्रामीण भागाला मिळालेला शापच म्हणावा लागेल. १९८० सालापर्यंत ग्रामीण महाराष्ट्रात फक्त एक टक्का जनता शौचालयांचा वापर करत होती. यात थोडी सुधारणा झाली तरीही आजमितीला ग्रामीण भागातील ८३ टक्के प्रातर्विधी हे उघडय़ावरच तेही गावाच्या कडेला रस्त्यावरच उरकले जाताहेत.
तसं पाहायला गेलं तर ‘स्वच्छतेच्या परीक्षेत’ महाराष्ट्र कधीच ‘नापास’ झाला आहे. अर्थात अस्वच्छता हे फक्त महाराष्ट्राचंच दुखणं नाही तर संपूर्ण भारत देशाचंच महादुखणं आहे. त्यामुळेच निर्मलग्रामसारख्या योजना आखाव्या लागताहेत. अजूनही महाराष्ट्रात हागणदारीमुक्त गावाला प्रोत्साहन म्हणून बक्षीस द्यावं लागतं आणि स्वत:च्या घरात संडास बांधणाऱ्या माणसालाच निवडणुकीला उभं राहता येईल असा कायदा करावा लागतो. इतकी या विषयातली मागासलेली स्थिती आहे. महासत्तेचे स्वप्न बघणाऱ्या भारतमातेला लाज वाटावी, किळस यावी इतकी बेकारावस्था स्वच्छतेच्या बाबतीत झालेली पाहावयास मिळते. उसनं अवसान आणून ‘मेरा भारत महान’ म्हणताना देशावर कितीही प्रेम असलं तरी घरातून बाहेर पडल्यावर अस्वच्छता व सार्वजनिक आरोग्याची दुरावस्था पाहून मन अस्वस्थ होऊन जातं.
आजमितीला देशातील अर्धी जनता उघडय़ावर शौचाला बसतेय हे एक नागडं सत्य आहे. परिणामी साथीचे रोग ठाण मांडून बसतायत. ‘प्राणघातक’ या सदरात मोडणाऱ्या २१ आजारांची निर्मिती दूषित मलजलामुळे होत असते.
महाराष्ट्रात अनेक गावांच्या वेशीवर आकर्षक कमानी बांधलेल्या दिसतात. तीन-चार लाख रुपये खर्चून ग्रामपंचायती कमानी उभ्या करतात. परंतु सूर्य मावळतीला गेला की याच कमानीच्या जवळपास गावातील महिलावर्ग उघडय़ावर शौचासाठी बसलेला दिसतो. संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरून एखादं चार चाकी-दोन चाकी गाडी जाऊ लागली की गाडीचा लाइट शौचाला बसलेल्या महिलांच्या अंगावर पडल्याने त्या उभ्या राहतात. अशीच एका गावात सायंकाळच्या प्रहरी मंत्रिमहोदयांची गाडी शिरली. गाडीचे लाइट अंगावर पडल्याने शौचाला बसलेल्या महिला नेहमीप्रमाणे पटापटा उभ्या राहिल्यावर संबंधित मंत्र्याला वाटलं की आपल्या स्वागतासाठीच महिला उभ्या आहेत. प्राधान्यक्रम चुकले की, असं होतं. खरंतर शौचालयांचा विषय हा प्राधान्याचाच होय, कारण शौचालयांचा मुद्दा हा केवळ शौचालयांचा राहत नसून तो देशाच्या विकास शून्यतेचा, सरकारी अकार्यक्षमेचा मुद्दा ठरत असतो. गावात अनेक मंदिरं असण्यापेक्षा पुरेशी शौचालयं असल्यास ती गावाच्या दृष्टीनं भूषणावह ठरेल. मंदिरांची तुलना शौचलयाशी होऊ शकत नाही, परंतु दोन्हीपेक्षा शौचालयं अधिक असणं महत्त्वाचं ठरेल कारण ती जनतेच्या जगण्याशी, आरोग्याशी थेट संबंधित आहेत. देशातील जनता अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या साथीच्या रोगराईने त्रस्त असताना दानपेटय़ांत अब्जो रुपये धूळ खात पडलेत हे संतापजनक वास्तव आहे.
पूर्वीच्या काळी फक्त उच्चभ्रूंच्या, सरदार-दरकरदारांच्याच घरात शौचालयं होती. त्यांना ‘पायखाना’ म्हणत. धनदौलतीमुळे उच्चभ्रूंची आमजनता कौतुक करत असे. त्यांच्या शौचालयातील मैल्याची भांडी वाहून नेणं हा विशिष्ट जातीतल्या लोकांचा व्यवसाय होता.
शौचविधी पार पाडण्यासाठी लोक गावाच्या वेशीबाहेर, घरापासून लांब शेतात, बांधाच्या आड, डोंगरउतारावर, नदी-नाले-ओढय़ाकाठी, उघडय़ा माळरानावर, झाडे-झुडपे-खडकांच्या आडोशाला, समुद्रकिनाऱ्यावर जात असतात. शहरी-निमशहरी भागात बसस्थानकाच्या बाजूला तसेच रेल्वे स्थानकाच्या बाजूला शौचविधी उरकले जातात. शौचविधी हा नैसर्गिक विधीप्रकार असला तरी तो, करण्याच्या ठिकाणीच होणे आवश्यक असते, परंतु घडते मात्र भलतेच. परिणामी तेथे वावरणाऱ्या जनतेला घातक परिणामांना सामोरे जावे लागते. हे विधी उघडय़ावर करणे लाजिरवाणे असल्याने स्त्रिया पहाटे किंवा रात्री अंधारात घराबाहेर पडतात तर लहान पोरा-टोरांना बाहेर अंगणात, दारात शौचास बसवतात. हे रोगराई निर्मितीला हातभार लावणारेच ठरते.
आपल्या शरीरधर्मासाठी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून वेगळी व्यवस्था करण्याची मानसिकता ग्रामीण मंडळीत दिसून येत नाही. याचे कारण गरिबी हे तर आहेच, पण सामाजिक अनास्था हेही आहे. स्वच्छता ही आर्थिक स्थितीशी निगडित असली तरी ती मनाच्या धारणेशीही निगडित असते. त्यामुळे निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात शौचालयेच नाहीत ही माहिती वाचून कुणालाही कदाचित आश्चर्य वाटणार नाही तरी खंत मात्र जरूर वाटली पाहिजे. कारण शौचालये असली काय न् नसली काय याचा पुरुष मंडळीस काहीही फरक पडत नसला तरी तमाम महिलावर्गासाठी ती अत्यावश्यक बाब आहे. शिवाय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागात मलविसर्जन हे गावाच्या बाहेर विशिष्ट जागेवर केले जाते. त्याला ‘हागणदारी’ तसेच ‘गावखारी’ म्हणतात. अशा उघडय़ा जागेवर मलविसर्जन केल्याने मानवी विष्ठेद्वारे रोगजंतूंचा फैलाव अतिशय जलद गतीमुळे होतो. एक ग्रॅम मानवी विष्ठेमध्ये एक कोटी विषाणू असतात. एक ग्रॅम विष्ठेमध्ये एक लाख जिवाणू आणि एक हजार परजीवीजंतूंची अंडी असतात.
आपल्या देशात राहणीमानाच्या सवयी कायदे करून लावाव्या लागतात. सगळ्या जगभरात अत्यंत गलिच्छ सवयींच्या नागरिकांनी भरलेला अस्वच्छ देश असा आपला बदलौकिक आहे. ‘होल वावर इज अवर’ असं म्हणत उघडय़ावर नैसर्गिक विधी करणं ही भारतीय माणसाची प्रवृत्ती ग्रामीण भागात प्रकर्षांने दिसते.
सांगली जिल्ह्यतील लिंगीवरे नावाच्या एका गावाच्या वेशीजवळ सरकारी जाहिरातीचा फलक वाचला होता. त्यावर लिहिलं होतं की,
‘असा रे कसा तू मर्द गडी?
फिरायला ५० हजाराची गाडी;
खिशातून १० हजाराचा मोबाइल काढी,
बायकोला नेसायला दोन हजारांची साडी, राहायला दोन मजली माडी,
तरी बायका मुलांना हागणदारीत धाडी,
असा रे कसा तू मर्द गडी? स्वखर्चातून शौचालय बांध ताबडतोब तुझ्या घरी, नाहीतर मिशा काढून ये मागल्या दारी..’
ग्रामीण मानसिकतेवर अगदी नेमकं बोट ठेवणारी ही वाक्यरचना. कारण शासकीय योजनेतून हागणदारीमुक्ती योजनेद्वारे शौचालय बांधण्यासाठी पैसे मिळवायचे, संडास नामक छोटी खोली बांधायची आणि त्याचा वापर जळण, अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी करायचा आणि योजनेतील अपेक्षित काम मात्र उघडय़ावर पार पाडायचे ही गावकऱ्यांची टिपिकल मेंटॅलिटी. हाती टमरेल, मुखी तंबाखु नि रोजचा व्यवहार बांधाआड उरकू ही डोकॅलिटी.
महाराष्ट्रातील भीषण पाणीटंचाई आणि वाढतच चाललेली लोकसंख्या याचा विचार करता आजच्या परिस्थितीत ग्रामीण भागात फ्लशची आधुनिक शौचालये सोयीची नाहीत हेही खरंच, पण त्यासाठी चुलीतील राख, कोरडी माती याचा वापर असलेली आणि फक्त शरीर स्वच्छ करण्यापुरते पाणी असा महात्मा गांधींच्या सेवाग्राम शौचालयाचा पॅटर्न हा एक पर्याय ठरू शकतो. उघडय़ावर मलविसर्जन करण्याची वर्षांनुवर्षांची सवय बंद करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणं गरजेचं आहे.
वास्तविक आरोग्य जोपासण्यासाठी निर्मल ग्राम ही काळाची गरज आहे. कारण गाव हागणदारीमुक्त झाले तरच आरोग्याला वाव मिळतो, म्हणून हागणदारीच्या या लाजिरवाण्या प्रथेला तडीपार केले तरच जनतेच्या निरोगी आरोग्याची गंगा वाहू शकेल.

अस्वच्छतेचे दुष्परिणाम
वाढती लोकसंख्या, वाहनांची रात्रंदिवस सुरू असलेली वर्दळ आणि शौचालयाच्या अभावामुळे शौचविधीसाठी बाहेर जावे लागत असल्याने स्त्रीवर्गाची फार कुचंबणा होत असते. निर्मनुष्य जागा गाठणे किंवा दिवस उगवायच्या आत नाहीतर मावळल्यावर अशी वेळ अ‍ॅडजेस्ट करायला लागते. समजा दुपारी बारा वाजता जरी शौचाला आली असल्यास दिवस मावळायची केविलवाणी वाट पाहावी लागते आणि तेवढय़ातूनही परिस्थिती नियंत्रणाबाहेर असेल तर दिवसाकाठी उघडय़ावर शौचाला बसून ‘उठाबशा’ काढायची लाजिरवाणी वेळ त्यांच्यावर येते. वेळच्या वेळी शौचास न जाण्याने मूळव्याध, चिडचिडेपणा, मलबद्धता, कॅन्सर, त्चचारोग असे आजार होतात. घराजवळ, रस्त्याच्या कडेला उघडय़ावर शौचास केल्याने टाकाऊ पदार्थाची दरुगधी हवेसोबत सर्वत्र पसरली जाऊन विष्ठेवरील सूक्ष्म जीवजंतू, माशा घरातील खाद्यपदार्थावर बसून रोगनिर्मिती करतात. मानवी शरीरात अनेक आजार दडलेले असतात. या आजारांचे अनेक जंतू शौचावाटे बाहेर पडून वातावरणात पसरतात व श्वासावाटे निरोगी व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करतात व त्यातून वेगवेगळ्या आजारांची लागण होते. शेतातून घरी येणारे ग्रामस्थ तसेच गल्लीतून घरात येणारे नागरिक यांच्या पायाला, चपला-बुटांना विष्ठेवरील घाण चिकटली जाऊन ती घरी येते व रोगराईला आमंत्रण देते.
शौचास बाहेर जाण्यामुळे अंधारात पाय घसरून पडणे; हात-पाय मोडणे; डोक्याला मार बसणे अशा प्रकारांमुळे दवाखान्यात उपचारासाठी बराच पैसा व वेळ खर्च होत असतो.
पावसाळ्यात बाहेर शौचास जाणाऱ्यांचे पाय घोटय़ा-गुडघ्यापर्यंत चिखलात बुडतात. त्यामुळे शौचास व्यवस्थित बसता येत नाही. तसेच चिखलातील खिळे, काचा, काटे पायात घुसून जखमा होतात.
अंधारात शौचास बसणाऱ्या स्त्री-पुरुष लहान मुलांना साप चावणे, श्वापदाचा हल्ला होणे असे प्रकार होतात. तसेच अंधाराचा फायदा घेऊन स्त्रियांचे लैंगिक शोषणाचे गैरप्रकारही होतात.
अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगाने आजारी पडल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होते.
उघडय़ावर शौचास केल्याने उद्भवणाऱ्या टॉयफाइड, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारख्या साथरोगांची दरवर्षी ४० लाख लोक रोगग्रस्त होतात व सरासरी हजार लोक मृत्युमुखी पडतात.
डॉ. सचिन गुरव