अ‍ॅड. अधिक शिरोडकर व्यवसायाने वकील असले तरी त्यांचे पहिले प्रेम नाटक आणि दुसरे फोटोग्राफीवर होते. तरुणपणीच त्यांनी नाटकातून निवृत्ती स्वीकारली आणि फोटोग्राफी मात्र अखेरपर्यंत केली. गेल्याच आठवडय़ात त्यांचे निधन झाले. वन्यजीव चित्रणासाठी भरपूर संयम छायाचित्रकाराकडे असावा लागतो. तरच सुवर्णसंधी वाटणारे क्षण वाटय़ाला येतात. तासन्तास वाट पाहावी लागते प्राण्यांची हवी तशी पोज मिळण्यासाठी, कारण प्राण्यांचे वर्तन आपल्या हाती नसते. आफ्रिकेच्या जंगलात अशीच दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर शिरोडकर यांना मिळालेला हा फॅमिली आल्बममध्ये असावा, तसा चित्त्याच्या कुटुंबाचा फोटो.. संपूर्ण कुटुंबच जणू काही फोटोसाठी पोज देऊन उभे आहे.. ‘चित्ता’वेधक!