lp32आषाढात धो धो बरसून गेलेल्या पावसानं सगळीकडं चतन्य वाहत असतं, आषाढानं आधीच वातावरण निर्मिती केलेली असल्यानं श्रावणातल्या ऊन-पावसाचा लपाछपीचा खेळ अधिकच रंगत जातो. आषाढातल्या पावसानं श्रावण उजाडेपर्यंत पानं-फुलं खुललेली असतात आणि श्रावणातल्या उन्हानं टवटवीत होऊन जातात. डोंगर-दऱ्या हळूहळू खुणावायला लागतात. त्यांना पण नटण्या-मुरडण्याचा छंद जडतो आणि वेगवेगळ्या फुलांनी नटून आपला छंद ते पूर्णच करून घेतात. श्रावणातल्या या डोंगर-दऱ्यांचं रूप मनाला भावतं आणि खुणावतंही. ऊन आणि पावसानं डोंगर-दऱ्यांनाही फुलवणारा हा श्रावण मनावर राज्यच करतो जणू. श्रावणाचं हे रूप मनाला भावून जातं.
इतक्या छान डोंगर रांगा, धबधबे खुणावत असताना, इथे रोजच्या पसाऱ्यात लक्ष कसं लागणार? मग हळू हळू पावसाळी सहलींचे बेत आखायला सुरुवात होते. ठिकाणांची कमतरता तर आपल्याकडं मुळीच नाही. खरंच हा भारत देश विविधतेनं नटलेला आहे आणि कदाचित त्या विविधतेची लज्जत अजून वाढवायलाच हा श्रावण ऊन-पाऊस घेऊन आलाय. लोणावळा, माथेरान, पळसधरी, भिवपुरी, लोहगड, सरसगड असे सगळेजण आपली हजेरी लावतात. कुठं जायचं हा पेच प्रसंग दरवर्षीच उभा ठाकतो, पण शेवटी एकाची निवड होते. या वर्षी निवड झाली भिवपुरीची. दिवस ठरला आणि एकेका गोष्टींची जमवाजमव सुरू झाली आणि एकदाचा दिवस उजाडला. निसर्गाच्या कुशीत एक अख्खा दिवस म्हणजे अप्रूपच वाटत होतं जणू!
ऊन-पावसाच्या या लपाछपीच्या खेळात आज मात्र राज्य होतं उन्हावर! ऊन पावसाला शोधत होतं, पण हा पाऊस कुठे जाऊन दडून बसलाय, हे कळतंच नव्हते. सापडला! एकदाचा पाऊस उन्हाला सापडला आणि आम्हालाही. डोंगराच्या पायथ्याजवळ पोहोचताच निसर्गाचं एक छान लोभसवाणं रूप दिसलं. असं वाटत होतं, जणू या हिरव्या गालिच्यानं मातीला ऊन-पावसापासून लपवून ठेवलंय. कारण कवयित्री शांताबाई शेळके म्हणतातच ना, ‘पाऊस हा मातीचा प्रियकर आहे’. एकमेकांना भेटण्याची ओढ कदाचित उन्हाच्या मध्येच येण्यानं वाढत असेल.
पावसाची रिपरिप चालूच होती, पण तरीही तो हिरवागार परिसर साद घालत होता. त्याच ओढीनं चिखलातून, दगडांतून वाट काढत काढत वर चालतच होतो आणि तेवढयात पुन्हा एकदा उन्हांवर राज्य आलं आणि इंद्रधनुष्याची झलक दिसली. ही सृष्टी किती छान रंगांनी नटलीय ते आज प्रत्यक्ष दिसलं. ऊन-पावसाचा हा खेळ चालूच होता आणि त्याची मजा आमच्याच बरोबर आजूबाजूची झाडं, फुलं पण घेत होती. असं वाटत होतं माती पाऊस येणार म्हणून हिरव्या गार रंगाचा शालू लेऊन फुलांचे सुंदर दागिने लेऊन त्याची वाट पाहत बसलीये आणि तिच्याबरोबर ही नदी आणि मुक्त कोसळणारे धबधबेही या पावसाची वाट पाहतायत. इतके मुक्त कोसळणारे धबधबे पाहून मनातल्या विचारांनाही गती मिळते. मुळातच आजूबाजूचं रम्य वातावरण आणि मनाला मिळालेली शांतता यामुळे बरीच कोडी उलगडतात. ऊन हा प्रश्न आणि पाऊस हा त्यावरचं उत्तरच वाटतो. उन्हानंतर पाऊस परत येतो तेव्हा तो एखाद्या नववधू सारखाच वाटतो. ‘नववधू प्रिया मी बावरते’ आजूबाजूला इतकी सगळीजण आहेत की समोर येतानाच त्याला बावरायला होतं जणू.
डोगर-दऱ्यांमधून मिळणारी शांतता हेच खरं श्रावणाचं रूप आहे. कोणताही कृत्रिम आवाज आजूबाजूला नाही फक्त पानांची सळसळ, पाण्याचा मंजूळ खळखळाट आणि टपटप बरसणारे पावसाचे टपोरे थेंब मनाला अगदी शांत आणि तृप्त करून जातात आणि पावसाच्या मागोमाग येणारं हे ऊन आकाशात सप्तरंगांची पाखरण करतं. या सगळ्यात कसा वेळ जातो ते कळतच नाही आणि परतीचा प्रवास सुरू होतो. पण तो कंटाळवाणा नसतोच, कारण हा पाऊस बऱ्याच गमती करत असतो. कोणी पाय घसरून पडलं तरी हशा पिकतो. कारण हा पाऊस सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. म्हणूनच शांताबाईच्या म्हणतात.
‘तांबूस कोमल पाऊल टाकीत.
भिजल्या मातीत श्रावण आला.’
अमेया सोवनी