lp28नाशिक जिल्हा, मालेगाव तालुका. या तालुक्यातल्या रावळगाव आणि वडेल या दोन छोटय़ा गावांमध्ये निसर्गाच्या कुशीत माझं बालपण गेलं. वडेल मामाचं गाव. जास्त निसर्गरम्य. गावात वाहणारी मोसम नदी. खरंतर तिचं नाव मोक्षगंगा. मालेगावात हीच नदी वाहते. तिथे मुस्लीम वस्ती जास्त. मोसम हा तसा हिंदी किंवा उर्दू शब्द. कदाचित त्यामुळेही अपभ्रंश होऊन मोक्षगंगेला मोसम म्हटलं जात असावं. तर अशा या मोक्षगंगेच्या तीरावरील निसर्गरम्य वडेल गावात श्रावण तसा नेहमीच भरारलेला असायचा.
कोकणात जशी ताडामाडाची झाडं असतात ना तशी आमच्याकडे शिंदीची झाडं श्रावणात अधिकच छान दिसायची. ही झाडं कोकणातल्या झाडांसारखीच हुबेहूब दिसतात, त्यांना जी गोड फळं येतात त्यांना शिन्दोळे म्हणतात, ते खायला मजा यायची. नदीच्या पाण्यात डुंबण्याची मजा यायची. श्रावणात आई या नदीच्या खडकांवर साती आसरांचं एक मंदिर होतं त्या मंदिरात दहीभाताचा नैवेद्य दाखवायची. सभोवताली डोंगरराजी तर भरपूर होती. भवानीआईची टेकडी, मुंजरेश्वर डोंगर, दुग्धेश्वर डोंगर अशा डोंगरांवर श्रावणात शाळांच्या सहली आयोजित केल्या जायच्या. लहान वयात डोंगर चढून पाय भरून यायचे. दुखायचे पण तरी आम्ही जायचो. कारण बोरं खायला मिळायची. रस्त्यावर डोंगरांवर चिंच, बोरं आणि एक जाळीदार झाड डोंगरावर असतं त्याला आमोनी कामोनी नावाचं तुरीच्या डाळीच्या आकाराएवढं फळ येतं. चव अतिशय सुंदर. आंबट, तुरट आणि गोड अशा तीन चवी या फळात मिळतात, चव तोंडात रेंगाळत राहते, अशी छान फळं खाण्याची मजा यायची ती श्रावणातच. डोंगर चढून गेल्यावर आत सगळ्यांनी सहभोजन करायचं. ते झालं की तिथल्याच एका खडकात असलेल्या नैसर्गिक टाक्यातलं पाणी प्यायचं. त्या टाक्यात जिवंत झरे होते त्यातून सतत पाणी झिरपायचं. शुद्ध स्फटिकासारखं हे गोड पाणी. निसर्गाची ही किमया नाही जमायची माणसाला. अशा वेळी बोरकरांची कविता आठवायची. हिरवळ आणिक पाणी तेथे, सुचती मजला गाणी, निळीतून पाखरे पांढरी, किलबिलतात थव्यांनी. हसरी, लाजरी, जराशी साजिरी अशी पावसाची सर सर्रकन यायची आणि झर्रकन ओलं करून जायची. श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम श्रावणधारा हे गाणं आम्ही फक्त ऐकायचो नाही तर अनुभवायचो. पाऊस अनुभवायचा तर पावसातच गेलं पाहिजे, श्रावण अनुभवायचा तर श्रावणच झालं पाहिजे.
प्रसन्न शिडकाव्यानंतर भलं मोठ्ठं इंद्रधनुष्य आकाशात दिसायचं. आता सिमेंटच्या जंगलात शहरात हा नजारा नाही अनुभवता येत. बालकवींच्या कवितेतला श्रावण चक्क आम्ही अनुभवला, आजही कधी गावाकडे गेलो की अजून अनुभवतो.

श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी उन पडे,
वरती बघता इंद्रधनुचा,
गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण जणु बांधले,
नभोमंडपी कुणी भासे,
झालासा सूर्यास्त वाटतो,
सांज अहाहा ती उघडे,
तरूशिखरांवर, उंच घरांवर,
पिवळे पिवळे उन पडे!
ही कविता साक्षात जिवंतपणे आम्ही अनुभवायचो. सांज खुलणे, सांज उघडणे हा अनुभव शहरात कसा येणार? कोवळी उन्हं, खुललेली सांज, झाडांवर घरांवर पडलेली पिवळीधम्मक उन्हं. सायंकाळचे पश्चिमरंग आजही काळजाच्या कॅनव्हासवर तितकेच स्पष्ट आहेत. हे सगळं बघितलं, म्हणूनच काळजात श्रावणच काय पण हिरवीगार पोपटी कविता सतत जिवंत आहे. पाडगावकर म्हणतात, ऊन खातात, वारा पितात, ज्यांची हृदयं झाडांची, त्यांनाच फक्त फुलं येतात! श्रावण अनुभवायचा तर शहरी गोंगाटातून बाहेरच पडलं पाहिजे. खेडय़ात गेलं पाहिजे. मानवी वस्तीपासून दूर एकांतात गेलं पाहिजे, अल्प काळ का होईना पण गेलं पाहिजे.
मश्रूम, भूछत्र असं शहरी माणसं ज्याला म्हणतात त्याला आम्ही कावळ्याच्या छत्र्या म्हणून लहानपणी ओळखायचो, श्रावणात त्या भरपूर उगवायच्या, कुठेही, कशाही. त्या आम्ही उपटायचो आणि त्या छत्रीचा मुलायम स्पर्श गालावर अनुभवायचो. अशा किती तरी वनस्पती श्रावणात उगवतात त्या सहजच दिसायच्या. त्यांच्या पानांवर पावसाचे थेंब एखाद्या मोत्याप्रमाणे स्थिर मध्यभागी असायचे, त्या छोटय़ाशा थेंबात आपलं प्रतिबिंब दिसतं, ते बघताना आनंद व्हायचा. तो अखंड गोल टपोरा थेंब आपण घरी घेऊन जाऊ असं मला वाटायचं म्हणून मी तो पानावरून अलगद हातात घ्यायचो पण असा प्रयत्न केला की तो थेंब खाली मातीत पडायचा, विरघळून जायचा, विखरून जायचा, पुन:पुन्हा थकेपर्यंत हा प्रयत्न चालू असायचा, तो टपोरा मोती आजपर्यंत पकडता आला नाही, हेच तर असतं ना निसर्गाचं गूढरम्य रहस्य!
सांगण्यासारखं खूप आहे, आणि तसाही हा श्रावण शब्दात पकडता येईल इतका साधा सोपा असा थोडाच आहे, रसिक मनांना तो सतत आपल्या गूढरम्य विलोभनीय रूपांनी संमोहक अशी भुरळ घालतच राहणार आहे. त्या संमोहित अवस्थेत राहणंच जास्त सुखद वाटतं.
हिरवी बांगडी घालून धरणी,
हिरवीच नेसून छान पैठणी,
हिरवे पैंजण लेवून अद्भुत,
आली ठुमकत स्वारी,
सखे गं आला श्रावण घरी!
आल्या श्रावण सरी,
सखे गं आला श्रावण घरी!
 भरत उपासनी

buldhana, bear, three cubs, temple, dongarshewali village,chikhali tehsil, viral video,
VIDEO : अस्वलाचे कुटुंब मंदिरात आले; पिंडीजवळ थांबले, प्रसाद खाल्ला आणि….
Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट
Tusker elephant nuisance increased in Chandgarh taluka
कोल्हापूर : चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीचा उपद्रव वाढला
water shortage Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता; नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट

॥ नेमेचि येतो-सुखवून जातो॥

हर्ष-उल्हासाचा श्रावणमास
मिष्टान्नाचा घास, कधी उपवास॥१॥
श्रावणमास-कथा कहाण्यांचा
आवडीच्या नावडीच्या, राजांच्या राण्यांचा॥२॥
हिरव्या पारव्या लावण्यछटांचा
पुनवेच्या भरतीला, उत्तुंग लाटांचा॥३॥
खमंग स्वादाच्या नारळी भाताचा
भावाबहिणीच्या उत्कट नात्याचा॥४॥
श्रावणमास-व्रतवैकल्यांचा
दही-पोह्यांच्या गोपाळकाल्याचा॥५॥
श्रावणमास – उत्सवी सणांचा
नेम संकल्पांच्या तृप्त पारण्यांचा॥६॥
हळदी-कुंकवाचा, वाणवंशाचा
खुलभर दुधाने भरल्या गाभाऱ्याचा॥७॥
गौरी-स्वरुपिणी लेक ये माहेरी
तिचा सन्मान श्रावण शुक्रवारी ॥८॥
संपत शनिवारी, मारुतीला तेल
श्रावण सोमवारी, शंकराला बेल ॥९॥
श्रावणमास- झिम्मा फुगडय़ांचा
ठेवणीतल्या, भर्जरी लुगडय़ांचा॥१०॥
श्रावणमास चमचम काकणांचा
परकऱ्या पोरींच्या, छुमछुम पैंजणांचा॥११॥
पुरणावरणाचा आणि तळणाचा
साग्रसंगीत थाट जेवणाचा॥१२॥
नैवेद्यासाठी केळीचे पान
भोजनानंतर विडय़ाला मान॥१३॥
सुवासिनींचा, कुवारिणींचा
लाडक्या लेकींचा, सासुरवाशिणींचा॥१४॥
हवा दरवळते- सुगंधी फुलांनी
झाडे प्रफुल्लित हिंदोळे झुल्यांनी ॥१५॥
श्रावणमास ऊन-सावलीचा
गणपती बाप्पाच्या, शुभ चाहुलीचा॥१६॥
कहाणीसारखा सुफल सरतो
सरला, तरीही मनांत उरतो॥१७॥
सुमन श्रीराम फडके