lp27श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंदाचं प्रतीक. सृष्टीचा सृजनोत्सव. हिरवाईच्या विविध छटांचा, फुलांच्या रंगगंधांचा उत्सव.. सगळी सृष्टीच तो साजरा करत असताना आपण तरी मागे कशाला राहायचं? चला तर श्रावणाच्या रंगात रंगू या..

श्रावण महिना तसा उत्साहाचा. सगळीकडे हिरवळ, ऊन-पावसाचा खेळ आणि सण-उत्सवांची रेलचेल. त्यामुळे एकंदरीत वातावरण प्रसन्नतेचे असते. श्रावण महिन्याची चाहूल लागताच आठवण येते ती माझ्या आजोबांची. आजोबांना सगळे ‘भाऊ ’ म्हणत. ते शिवाचे परमभक्त होते. श्रावणात तर त्यांचा महादेवाला सव्वा लाख बेल वाहायचा नियम असे. सोमवारचा उपवास आणि प्रदोष ते न चुकता नियमित करीत. श्रावण सुरू होणार म्हणून बेल वाहण्याकरिता मोठा पाट आणि अखंड दिव्याकरिता मोठी समई बाहेर निघत असे. आता हे सव्वा लाख बेल वाहायचे, म्हणजे रोजचे सहा-सात हजार बेल घरी यायचे. तेव्हाचे आमच्याकडचे रामाकाका आणि बारसूकाका हे शेतातून पोती भरून बेल आणायचे. दुपारी तीन-चार वाजल्यापासूनच घरातील सगळे सदस्य टोपली घेऊन बेल मोजायला बसत असत. तेव्हा आमचे एकत्र मोठे कुटुंब होते. कधी जास्त बेल असल्यास शेजारचे चुलतकाका-आत्यापण बेल मोजायला मदत करायचे. बेल मोजताना एखादा पाच-सहा पानांचा बेल मिळाल्यास आम्ही वहीत ठेवायला वेगळा काढायचो. दुपारी भाऊ दुकानातून बारा-साडेबाराला आले की हात-पाय धुऊन ते आमच्या ओटय़ावरूनच एक आळ ओलांडून समोरच्या देवळात राहणाऱ्या सुदाम गुरुजींना आरोळी देत. ती भाऊंची आरोळी अजूनही कानात ऐकू येते. ते गुरुजीही तेवढय़ाच आवाजात ‘येतो..’ म्हणून प्रत्युत्तर देत असत. भाऊंचा आवाज तसा कणखर. ते बोलायला लागल्यास पूर्ण गल्लीत त्यांचा आवाज जात असे. गुरुजी आलेत की दुपारी दोन-अडीच वाजता फराळाचे झाल्यावर, आजी आणि भाऊ पूजेला बसत. महादेवाला पांढरे वस्त्र आवडते म्हणून, आजी पांढरे पातळ आणि भाऊ सोवळे नेसून पूजा करायचे. आधी अभिषेक, नंतर एक – एक बेल मंत्राबरोबर वाहणे, अशी अडीच ते तीन तास रोज महिनाभर पूजा असायची.
श्रावण महिन्यात आजी आणि भाऊ एकदाच जेवत, ते पण सूर्यास्तापूर्वी. पूजा सांगायला येणारे गुरुजी आणि बाई पण महिनाभर आमच्याकडे जेवायला असायचे. त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक सोवळ्यात ब्राह्मणबाई करायच्या. श्रावणसोमवारी तर वरण-बट्टी आणि चुरम्याचा लाडू असा स्वयंपाक ठरलेला असायचा. बाईच्या हातची बट्टी आणि गोड-आंबट वरण फार छान व्हायचे.
भाऊंना कुणाला चिडवायला किंवा गंमत करायला फार आवडे. त्यामुळे त्यांची आणि गुरुजींची हसत-खेळत मंत्रोपच्चांराबरोबर पूजा सुरू असे. आम्ही भावंडं तेव्हा लहान होतो पण आम्हाला ते ऐकायला फार आवडे आणि नंतर आम्ही त्याची नक्कल करायचो. श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून श्रावण अमावास्येपर्यंत हे सव्वा लाख बेल वाहून होत. त्यानंतर श्रावण अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी रुद्राभिषेक करून उद्यापन करायचे. उद्यापणाच्या दिवशी तर अकरा-एकवीस ब्राह्मणांच्या मंत्रोपचारांनी घर दुमदुमत असे. एक एक गुरुजी आपला आवाज चढवीत मंत्र बोलत. आम्ही शाळेतून येताना गल्लीच्या टोकावरच आमच्या कानावर हा आवाज येई. भाऊ अभंग आणि कविताही छान म्हणायचे. त्यांची आवडती कविता ‘‘राजास जी महाली, सौख्य कधी मिळाली। ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या।।’’ संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली, फार छान म्हणायचे. जेवणाच्या पंक्तीत ते एकतरी अभंग गायचे. भाऊ आता या जगात नाहीत, त्यांना जाऊन अठ्ठावीस र्वष झाली, पण श्रावणात त्यांची आठवण झाल्याशिवाय राहावत नाही. आताच्या काळात सव्वा लाख बेल वाहणे होत नाही, पण त्यांची आठवण म्हणून आईकडे, श्रावणातील एक दिवस रुद्राभिषेक करतात. असा हा श्रावणानुभव अजूनही मनात बालपणीच्या आठवणी जागवतो.
राजश्री नवलाखे

श्रावणमास

अवचित श्रावणसर
रिमझिमत झर झर
उमटे ध्वनी सर सर
अनिलगणही चौफेर
हा आला मृदगंध
अनुभवित पंचरंध्र
मयूर पंख पसरवीत
निसर्ग अलवार पालवीत
हिरवाई कुजबुजली
प्राणीमात्रें सुखावली
गात्रागात्रांत भरला
व्यापूनही उरला
असा हा उल्हास
आला श्रावणमास
राधिका कुंटे